कबुतराची विष्ठा मानवी फुप्फुसांना घातक

मुक्ता दाभोलकर -

ज्यांच्या घराच्या सज्जावर, बाल्कनीत, खिडकीत कबुतरे टेकण्यासाठी येतात अशी व्यक्ती कबुतरांना न विटणे अशक्य आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे विशेष करून श्वसन संस्थेवर परिणाम करणारे गंभीर रोग पसरतात. एकविसाव्या शतकातील भारतात कबुतरांच्या संपर्कातून फुप्फुसांवर झालेल्या परिणामांमुळे माणसे चक दगावली आहेत. मुंबईसारख्या सघन वस्तीत तर कबुतरांना खाद्य घालण्याची ठिकाणे म्हणजे कबुतरखान्याच्या परिसरात राहणार्‍या नागरिकांच्या नाकात कबुतरांनी शब्दशः दम आणला आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाणे घालण्यावर बंदी घालण्याचा लोकोपयोगी निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेने तीन ऑगस्ट रोजी दादर, मुंबई येथील कबुतरखान्यावर बांबूचा सांगाडा उभा करून त्यावर ताडपत्री टाकली. सहा ऑगस्ट रोजी जैन समाजातील शेकडो स्त्री-पुरुष व इतर समाजातील काही लोक दादरच्या कबुतरखान्यावर गेले. त्यांनी पोलिसांना न जुमानता महापालिकेने उभारलेली ताडपत्री काढून टाकली व कबुतरांना दाणे घातले. पशुपक्ष्यांना अन्न देणे हा त्यांच्या धार्मिक आचरणाचा भाग आहे, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु सर्वच जैन समाजाचे असे मत होते असे नाही. कबुतरखाना परिसरात राहणार्‍या काही जैन व्यक्तींच्या मुलाखती प्रसार माध्यमांमधून पुढे आल्या. धर्मातील भूतदयेचे तत्त्व हे लोकांच्या आरोग्याला बाधा पोचवणार्‍या कबुतरांना खाणे घालण्याऐवजी एखाद्या वेगळ्या मार्गाने अनुसरावे असे त्यांचे म्हणणे होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून आपल्या धर्मचरणात कालानुरूप बदल करावेत ही खरेतर किती साधी बाब आहे! पण ‘समाज’ म्हणून आपली ताकद दाखवून देण्याच्या चढाओढीत उतरलेल्या प्रत्येकाला त्याचा सोयीस्कर विसर पडतो.

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक कबुतरखाना बंदीच्या निर्णयाला स्थगिती मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात काही जणांनी एक याचिकादेखील दाखल केली होती. त्याची सुनावणी झाली व न्यायालयाने महापालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन एकप्रकारे लोकहिताच्या बाजूने उभ्या राहणार्‍या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला पाठबळ दिले. याचिकाकर्त्यांनी पुन्हा उच्च न्यायालयात सुनावणीसाठी अर्ज केला आणि या सुनावणीच्या वेळेला राजकीय दबावामुळे मुंबई महापालिकेने भूमिकेत बदल करत स्वतःच्याच निर्णयाचे पंख छाटले. महापालिकेने न्यायालयात सांगितले की काही अटींसह सकाळी ६ ते ८ या वेळेत ते कबुतरांना खाद्य टाकण्यास परवानगी देण्यास तयार आहेत. मुळात नागरिकांना मोकळा श्वास घेता येण्यासाठी तो परिसर कबुतरमुक्त होणे आवश्यक आहे; मर्यादित वेळेत खाद्य टाकून हे कसे शक्य होईल? मर्यादित वेळेत दिवसभर पुरेल एवढे खाद्य टाकले तर कबुतरे कमी होतील का? मुंबई महापालिकेने स्वतःच्याच निर्णयापासून घुमजाव करण्यावर न्यायालय संतापले आणि महापालिकेने मुळात सार्वजनिक आरोग्य आणि जनहित जपण्यासाठी हा निर्णय घेतला होता याची न्यायालयाने त्यांना आठवण करून दिली. कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून तुम्ही तुमचाच निर्णय जर बदलत असाल तर त्यामुळे ज्या घटकांवर परिणाम होतो त्यांना नोटिसा काढा, त्यांच्याकडून हरकती मागवा, सामान्य माणसाचे म्हणणे ऐकून घ्या असे बोल सुनावत न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्याच्या आदेशावरील बंदी कायम ठेवली. मला वाटते, जेथे जेथे धार्मिक किंवा सांप्रदायिक आचरणाच्या नावाखाली सार्वजनिक आरोग्य आणि सुव्यवस्थेला निःसंशय बाधा पोचत असेल त्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या गोष्टीला परवानगी देण्याआधी स्थानिक नागरिकांचे आक्षेप अशा पद्धतीने मागवले पाहिजेत.

            या संपूर्ण प्रकरणात ‘मानवी आरोग्य सर्वोच्च महत्त्वाचे आहे’ असे ठामपणे केवळ न्यायालय म्हणत आहे. मानवी आरोग्याला सर्वोच्च महत्त्व देऊन ते आपल्याला उपलब्ध करून देण्यासाठी जे सरकार आपण निवडून दिलेले आहे ते राज्य सरकार आणि महापालिका अशी ठाम भूमिका घ्यायला कचरत आहेत. अशावेळी भावनेच्या आधारे नव्हे, तर वैज्ञानिक तथ्यांच्या व विवेकाच्या आधारे स्वतःचे मत नकी करणे आणि झुंडीच्या विरुद्ध उभे राहता आले नाही तरी झुंडीत सामील व्हायला नकार देणे एवढे तरी आपण करू शकतोच.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी विंदा करंदीकर यांची ‘तसेच घुमते शुभ्र कबुतर’ नावाची एक कविता आहे. माणसाच्या न सुटणार्‍या अगम्य इच्छांबद्दल ही कविता बोलते असे मला वाटायचे. पण कोणत्याही चांगल्या कलाकृतीप्रमाणे तिचे इतर अर्थ देखील संभवतात. वर लिहिलेल्या परिस्थितीचा विचार करताना त्यातील एक कडवे विशेष अर्थपूर्ण वाटले. ते पुढीलप्रमाणे ..

शुभ्र कबुतर युगायुगांचे              कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?       अर्थावाचून व्यर्थ न का रव?’

…आपले प्रश्न काय आहेत आणि आपल्या मनात कोणते कबुतर निरर्थक आवाज करत घुमते आहे?


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]