-
“दैवी शक्तीचे दावे करणार्या बुवा बाबांचे चमत्कार आणि अनैतिक कृत्ये आता डॉ. दाभोलकरांच्या अथक प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या कचाट्यात सापडू लागली आहेत.” भूत, भानामती, करणी मागचे मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक सत्य लोकांना पटवत, फलज्योतिषाच्या थोतांडातील फोलपणा उलगडत, छद्मविज्ञानाच्या दाव्यांना आव्हान देऊन त्यातील अवैज्ञानिकता सिद्ध करत आणि त्याद्वारे होणारे शोषण उघड करत, जनमानसाच्या विरोधात जाऊन समाजविघातक कर्मकांडे, परंपरा, रूढींविरोधात संघर्ष करत व त्यांना विधायक पर्याय देत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने आज संपूर्ण महाराष्ट्रात आपले पाय पक्के रोवले आहेत. परंतु चळवळ रुजण्यापूर्वीच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीकडे विविध दृष्टिकोनातून बघितले जाई. काहींचे मत होते की रूढी, प्रथा, परंपरा, दैवीशक्ती या धर्माचा भाग असल्याने चळवळीने त्यांची चिकित्सा करूच नये. काहींना वाटत होते की देव, धर्म या संकल्पनावर थेट हल्ला केला पाहिजे. तर एक दृष्टिकोन असा होता की ज्या समाज व्यवस्थेतून हे प्रश्न निर्माण होतात ती व्यवस्थाच बदलली तर हे प्रश्न लगेच सुटतील त्यासाठी वेगळ्या चळवळीची गरज नाही. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे सर्व दृष्टिकोन बाजूला ठेवत, “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत आणि समाजसुधारकांचा वारसा चालवू इच्छिते” असे या सर्व आक्षेपांना उत्तर देत, भारतीय परंपरेतील संत, समाजसुधारक आणि दार्शनिकांनी दाखवलेला विवेकी मार्ग स्वीकारला. “भारतीय परंपरेतील सर्व संत, समाजसुधारक आणि दार्शनिकांनी त्यांच्या त्यांच्या काळात अंधश्रद्धा व समाजविघातक रूढी, प्रथा-परंपरांच्या विरोधात प्रस्थापित धर्मसत्ता, राज्यसत्ता यांच्या विरोधात केलेल्या संघर्षाची अनेक उदाहरणे देता येतील. आजही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ त्यांच्या वैचारिक मांडणीचा आणि संघर्षाचा वारसा घेत तोच संघर्ष करत आहे. त्यामुळे या संत, समाजसुधारक, दार्शनिकांनी केलेल्या मांडणीचा वारसा काय आहे व त्या वारशाचा मूल्यात्मक सांधा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीशी कसा जोडलेला आहे हे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा निर्मूलनावरील विवेकी ग्रंथमाला प्रसिद्ध करीत आहे. या विवेकी ग्रंथमालेत वारकरी संत, वारकरी स्त्री संत, राष्ट्रीय संत आणि दार्शनिक या विषयांवरील पुस्तिकांचे संच प्रसिद्ध होणार आहेत.
वारकरी संतांच्या चळवळीने तेराव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंत म्हणजे जवळजवळ चारशे वर्षे महाराष्ट्राच्या समाज जीवनात प्रचंड खळबळ उडवून दिली. त्यावेळच्या प्रस्थापित धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेवर या चळवळीचा प्रभाव पडला आणि त्या वेळच्या मराठी समाजमनाला या प्रभावामुळे एक वेगळीच दिशा प्राप्त झाली. या चळवळीचा प्रभाव ओसरल्यानंतर आजही त्या चळवळीचे परिणाम मराठी समाजजीवनावर जाणवतात. या ग्रंथमालेतील पहिले दोन संच त्या वारकरी संतांच्या चळवळीबद्दलचे आहेत. “या संचांचा सविस्तर परिचय देणारा अनिल चव्हाण यांचा लेख याच अंकात देत आहोत. ज्यांच्या शब्दात आणि व्यवहारात वारकरी संतांच्या मूल्यांना काहीही स्थान नाही अशा बाजारू आणि धर्मांध प्रवृत्तीची घुसखोरी आज वारकरी संप्रदायात झालेली आहे. त्यामुळे वारकरी मूल्यांच्या पुनर्जागरणाची आवश्यकता प्रतिपादन करणारा ह. भ. प. देवदत्त परुळेकर यांचा लेख पंढरीच्या वारीच्या निमित्ताने आम्ही देत आहोत.
ही बाजारू आणि धर्मांध प्रवृत्तीची घुसखोरी फक्त वारकरी संप्रदायातच झालेली आहे असे नाही. राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्व पातळ्यांवर या प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे. ही घुसखोरी हा विवेकवादी समाजाच्या उभारणीला सर्वांत मोठा अडथळा आहे. याच प्रवृत्ती आज सत्तास्थानावर असल्याने त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. त्यामुळे अंधश्राद्धा निर्मूलनाच्या चळवळीपुढील प्रश्न व्यापक होत चालले आहेत. बुवाबाजी, भूत, भानामती, अन्याय रूढी, परंपरा ही आव्हाने आहेतच, पण त्याचबरोबर व्यसनाधीनता, स्त्रियांवरील अत्याचार, पर्यावरण, जातीयवाद, धर्मांधता किंवा आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारे प्रश्न, आधुनिकतेच्या नावाखाली होणार्या उपभोगवादी संस्कृतीच्या आक्रमणामुळे निर्माण होणारे प्रश्न अशा विविध प्रश्नांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला सामोरे जावे लागत आहे. संत, समाजसुधारकांना देखील आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तरीही त्यांनी सम्यकता, निर्भयता, कृतीशीलता आणि नैतिकता या मूल्यांना धरून संघर्ष केला. या मूल्यात्मक वारशाबरोबरच आज आपल्याला आधुनिक विज्ञानाचीही ठाम साथ आहे. विविध माध्यमांतून या मूल्यात्मक वारशाची जाणीव कार्यकर्ते व सामान्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
