अंधश्रद्धेची ऑनलाईन दुकाने

वाघेश साळुंखे -

तुम्ही आर्थिक विवंचनेत किंवा मानसिक तणावात असता. अशा वेळी अचानकपणे तुमच्या फीडमध्ये एखादी चमत्कारी अंगठी किंवा कर्जमुक्ती विधीची जाहिरात दिसते. तुम्ही कुठल्यातरी शारीरिक त्रासाने त्रस्त असताना मोबाईलवर दैवी उपचाराची एखादी जाहिरात दिसते. हे तुम्हाला कदाचित चमत्कार वाटतील. पण हे चमत्कार नाहीत. ही आहे अल्गोरिदमची कमाल. तुम्ही कोणत्या पोस्टवर किती सेकंद थांबलात, कोणते व्हिडिओ पूर्ण पाहिले आणि कोणत्या शब्दांवर (उदा. ‘आजारी’, ‘कर्ज’, ‘ब्रेकअप’) क्लिक केले, याचा हिशोब अल्गोरिदम ठेवत असतो (डिजिटल फूटप्रिंट). तुम्ही फेसबुक बंद करून गुगलवर काही शोधले किंवा एखाद्या शॉपिंग साइटवर गेलात, तरी ‘मेटा पिक्सेल’ (Meta Pixel) नावाचे तंत्रज्ञान तुम्ही काय शोधत आहात याची माहिती फेसबुकला देत असते (ऑफ-प्लॅटफॉर्म ट्रॅकिंग). तुम्ही रात्री उशिरापर्यंत ‘एकटेपणा’ किंवा ‘भविष्य’ या विषयावरील व्हिडिओ पहात असाल, तर अल्गोरिदमला समजते की तुम्ही सध्या मानसिकदृष्ट्या अस्थिर किंवा चिंतेत आहात (पॅटर्न रेकग्निशन). यामुळे तुमच्या मनातली भीती, काळजी किंवा इच्छा आता फेसबुकच्या अल्गोरिदमला तुमच्यापेक्षा जास्त चांगली कळतेय. सोशल मीडिया कंपन्यांकडे वापरकर्त्यांचा जो डेटा जातो, तो केवळ जाहिरातींसाठी नाही, तर वापरकर्त्याच्या ‘मानसिक प्रोफाइलिंग’साठी वापरला जातो. आणि म्हणूनच तुम्हाला ग्राहक बनवणे जाहिरातदारांना शक्य होत आहे. याचाच फायदा घेऊन अंधश्रद्धेची काही ऑनलाईन दुकाने सुरू झालेली आहेत. ऑनलाईन शॉपिंग ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. त्यात आता अनेक वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. त्यातलाच हा एक प्रकार. त्यातल्या काही दुकानांचा धांडोळा या लेखामध्ये घेत आहे. दुकानांची नावे जाणीवपूर्वक लिहिली नाहीत. त्यांची जाहिरात करण्याची माझी अजिबात इच्छा नाही.

‘आम्ही भारतातील नंबर एकचे पूजा आणि ज्योतिषशास्त्राचे अ‍ॅप आहोत’, असा दावा करणारे एक दुकान मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले. रजिस्ट्रेशन वगैरे सगळे सोपस्कार पार केल्यावर त्या दुकानामध्ये प्रमुख चार भाग दिसले- ज्योतिष, पूजा, चढावा आणि टीव्ही… हो टीव्हीच. लोकांनी जास्तीत जास्त अंधश्रद्धेकडे वळावे आणि आपला धंदा चांगला चालावा, यासाठी त्यांनी स्वतःचे टीव्ही चॅनेल अ‍ॅपमध्ये ठेवलेला आहे. मी एकेक करून प्रत्येक भाग पाहिला. ज्योतिष विभागात ज्योतिषांची फौजच दिसली. मी सगळे ज्योतिषी मोजले. एकूण संख्या होती शंभर. या ज्योतिषांशी चॅटिंग करण्याची अ‍ॅपमध्ये सोय होती. नव्या ग्राहकाला पहिली तीन मिनिटे मोफत बोलता येत होते. त्यातल्या एका ज्योतिषी स्त्रीच्या नावावर मी क्लिक केले. चॅट ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा ऑटोमेटेड मेसेज आले. त्यामध्ये एक फॉर्मही आला. त्यामध्ये माझे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर वगैरे गोष्टी भरायला सांगितल्या होत्या. तो फॉर्म भरल्यानंतर चॅटिंगला सुरुवात झाली. पहिलाच मेसेज आला hello dear मी काय बोलायचे याचा विचार करत असताना पटापट तीन-चार मेसेज आले. तुमची समस्या सांगा, असा त्यांचा मथितार्थ होता. मी फक्त business problem असे दोनच शब्द लिहून पाठवले. तिने मला माझा व्यवसाय विचारला. माझा कोणता व्यवसाय आहे हे मी सांगायच्या आधीच तिने सुरुवात केली, “तरीच तुमच्या व्यवसायात खूप चढउतार चालू आहेत. तुम्ही १००% प्रयत्न करता; पण तुम्हाला २०% च रिझल्ट दिसतात. तुमची होत आलेली कामे शेवटच्या क्षणी बिघडतात.” शेवटी मी माझा हॉटेल व्यवसाय आहे असे सांगितले. इथे आमच्या तीन मिनिटांपैकी दोन मिनिटे संपलेली होती. पुढच्या एका मिनिटात तिच्यापुढे मला पेमेंट करायला प्रवृत्त करण्याचे चॅलेंज होते. तिने पुढे दोन मेसेज पाठवले. पहिल्यामध्ये लिहिले, ‘तुमच्या प्रोफाईलनुसार तुमच्या करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे ज्याच्यामुळे तुमचे संपूर्ण जीवनच बदलून जाऊ शकते. हा टर्निंग पॉईंट जाणून घेण्यासाठी रि-कनेक्ट करा.’ दुसर्‍या मेसेजमध्ये लिहिले, ‘तुमच्या कुंडलीत राजयोग आहे; पण तरीही तुम्ही मानसिक गोंधळाचा सामना करत आहात. माझ्याशी रि-कनेक्ट करा आणि जीवनात मोठा बदल आणा.’

            हे दोन्ही मेसेज म्हणजे टाकलेला गळ होता. या दोन्ही मेसेजमधून ग्राहकाची उत्सुकता वाढवण्याचे काम केले होते. आपल्या जीवनात नकी काय घडणार आहे? कोणता मोठा बदल येणार आहे? याची उत्सुकता ग्राहकाच्या मनात निर्माण होते आणि त्यातूनच तो पुन्हा तिच्याशी बोलण्यासाठी रि-कनेक्ट होण्याची शक्यता वाढते. रि-कनेक्ट होण्यासाठी अर्थातच पैसे मोजावे लागतात. एका मिनिटासाठी वीस रुपये इतकी त्यांची फी आहे. एवढ्या बोलण्यानंतर आमची तीन मिनिटे संपली. एवढ्याशा चॅटिंगमधून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे काही रेडिमेड मेसेज तयार आहेत. केवळ कॉपी-पेस्ट करण्याचे काम ते करतात. जे मेसेज टाईप करण्यासाठी एक-दोन मिनिटे लागतात, ते मेसेज त्यांनी केवळ पाच-दहा सेकंदातच लागोपाठ टाकले होते. म्हणजे समोरचा ग्राहक कोणताही असला, तरी ते त्या कमी वेळेत कोणताही मेसेज उचलून त्याच्यापुढे टाकतात, हे स्पष्ट आहे. (केवळ तीन मिनिटात ग्राहकाला पटवायचे असल्याने हे त्यांना करावे लागणार.) पण अंधश्रद्धाळू ग्राहक त्याच मेसेजला खरे मानून बसतात. दुसरी गोष्ट म्हणजे, हे चॅटिंग ग्राहकाची उत्सुकता वाढवत नेणारे असते. जेणेकरून ग्राहक जास्तीत जास्त वेळ चॅटिंग करत राहील आणि जास्तीत जास्त पैसे खर्च करत राहील. मी केलेल्या चॅटिंगमधील एक गंमत अशी की, ज्या व्यक्तीला माझ्या आयुष्यातील चढ-उतार, मानसिक गोंधळ, भविष्यातील राजयोग, करिअरमधील टर्निंग पॉईंट्स हे सगळे माहीत आहे; त्या व्यक्तीला माझा व्यवसाय काय आहे, हे माहीत नव्हते. तसेच मी सांगितलेला व्यवसाय खोटा आहे हेही तिला माहीत नव्हते. मला नोकरी आहे आणि मी माझ्या करिअरमध्ये स्थिरस्थावर आहे, यातील कोणतीच गोष्ट तिला माहीत नव्हती. माझ्या कुंडलीत तिला राजयोग दिसला; पण माझा व्यवसाय दिसला नाही. यावरूनच हे लोक किती भंपक आहेत हे स्पष्ट होते.

या दुकानाचा दुसरा विभाग होता पूजा. त्यांचा असा दावा आहे की, आमचे भारतातील वेगवेगळ्या मंदिरांशी करार झालेले आहेत आणि त्यानुसार आम्ही भारतातील वेगवेगळ्या मंदिरांमध्ये विशेष पूजा आयोजित करतो. त्यामध्ये तुमच्या नावाने पूजा घालण्यासाठी तुम्ही त्याची फी या अ‍ॅपमधून ऑनलाईन द्यायची. पूजेचा प्रसाद ग्राहकाला कुरिअरने पाठवला जाणार. पूजेचा व्हिडिओ सुद्धा ग्राहकाला पाठवला जातो. इथे ‘प्रेमप्राप्ती’पासून ‘शत्रू विनाशक’पर्यंत अनेक प्रकारच्या पूजा घालता येतात. पूजांची काही नावे इथे देत आहे – पशुपतिनाथ विशेष प्रेम प्राप्ती पूजा, प्रेम विवाह पशुपतिनाथ पूजा, संतान प्राप्ती पशुपतिनाथ पूजा, बडा मंगल विशेष हनुमान कृपा महापूजा एवं अन्नदान सेवा, ऋणमुक्ती पूजा, ऋणमुक्तेश्वर महादेव पूजा, वेगवेगळ्या ग्रहांच्या शांती पूजा, शत्रू विनाशक तांत्रिक महापूजा इ. शेकडो प्रकारच्या पूजा इथे दिलेल्या आहेत. पूजेसाठी वेगवेगळी पॅकेजेस आहेत. एकट्या व्यक्तीसाठी पूजा, जोडप्यासाठी पूजा, कुटुंबासाठी पूजा अशी पॅकेजेस आणि त्यांच्या किमती (८५१ पासून २८०१ पर्यंत) दिलेल्या आहेत. संतान प्राप्तीसाठी किंवा इतर इच्छापूर्तीसाठी पूजा घालणे ही उघड उघड अंधश्रद्धा आहे. हा सामाजिक गुन्हा आहेच; पण पैसे घेतल्यानंतर आपल्या नावे पूजा घातलीच जाईल याची खात्री काय? हे अ‍ॅप्लिकेशन दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलेले आहे. एकाच वेळी एका पूजेसाठी शेकडो/हजारो लोकांनी नोंदणी केलेली असू शकते. सगळ्यांची स्वतंत्र पूजा न घालता एकाच पूजेत या सगळ्या लोकांना गुंडाळले जात असण्याची शक्यताच जास्त आहे.

या दुकानाचा पुढचा भाग आहे चढावा. चढावा म्हणजे देवाला विविध वस्तू अर्पण करणे. प्रत्येक चढाव्यासाठी लागणार्‍या वस्तूंची यादी तिथेच दिलेली आहे. मधाची एकदम छोटीशी बाटली १५१ रुपयांना, बेलपत्र ४१, दूध ७१, जल ४१, रुद्राक्ष १८१ इ… या किमती महाप्रचंड आहेत. या वस्तू cart मध्ये add करून त्याचे पैसे भरायचे. ‘पशुपतिनाथ संपूर्ण चढावा’ या नावाच्या चढाव्याची किंमत आहे ६८१ आणि या चढाव्यासाठी ४० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पैसे भरल्याची माहिती तिथेच दिली आहे. (६८१ गुणिले ४०,००० हा गुणाकार करून बघा.) आपल्या वतीने त्या वस्तू देवाला अर्पण केल्या जाणार. भारताच्या कुठल्यातरी कोपर्‍यातल्या एखाद्या मंदिरात (नेपाळमधीलही एका मंदिराचे नाव तिथे होते.) आपला चढावा अर्पण केला की नाही हे ग्राहकाला कधीच कळणार नाही. ग्राहकाला फक्त एक मेसेज येणार, ‘तुमच्या नावाने चढावा चढवलेला आहे.’ ग्राहकाने डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायचा. मंदिरात अर्पण केलेली वस्तू मागील दरवाजाने बाहेर येऊन पुन्हा मंदिराबाहेरच्या स्टॉलवर विक्रीसाठी येण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. पण इथे तर वस्तू अस्तित्वात आहेत की नाही हाच प्रश्न निर्माण होतो. ग्राहकाने फक्त पैसे भरायचे आणि पुण्य मिळवल्याच्या भ्रमात राहायचे. ज्याप्रमाणे पूजा विभागात शेकडो पूजा दर्शवल्या होत्या; त्याचप्रमाणे चढावा विभागात सुद्धा शेकडो मंदिरांतील शेकडो प्रकारचे चढावे दिलेले आहेत. इथे प्रत्येक चढाव्याचे अनेक अतिरंजित फायदे सांगितले आहेत. ते वाचूनच अनेकांना चढावे अर्पण करण्याची इच्छा होत असणार आहे.

पुढचा विभाग टीव्ही. तिथे अनेक कार्यक्रमांच्या मालिका आहेत. सगळ्या मालिका ‘एआय’चा वापर करून बनवलेल्या आहेत. एकही मालिका खर्‍या कलाकारांना घेऊन बनवलेली नाही. हे अ‍ॅप्लिकेशन म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा धंदा आहे. प्रत्येक मालिकेमध्ये संगीत आणि डायलॉग चित्तवेधक आहेत. बघणार्‍याला खिळवून ठेवणारे आहेत. तसेच पूजा, चढावा, व्रतवैकल्ये यांचे महत्त्व वर्णन करणारे आहेत. एकंदरीत या मालिका ऑनलाइन दुकानाचा धंदा वाढवणार्‍या आहेत.

ही कहाणी झाली एका अ‍ॅप्लिकेशनची. या एकाच अ‍ॅप्लिकेशनचा धंदा करोडोंमध्ये आहे. अशाच दुसर्‍या एका ऑनलाईन दुकानाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करून घेतले. या दुकानात भेट, पूजा, होमपेज, पंचांग, राशीफल, कॅलेंडर, ज्ञान असे विभाग आहेत. भेट म्हणजे चढावा. आधी ज्या अ‍ॅप्लिकेशनचे परीक्षण केले, त्या अ‍ॅप्लिकेशनप्रमाणेच यातही चढ्या दराने व्हर्च्युअल वस्तूंची चढाव्यासाठी विक्री केली जाते. ‘पूजा’ विभागही आधीच्या अ‍ॅप्लिकेशनप्रमाणेच आहे. इथे एक पूजा (जिची किंमत १२०१ पासून २००१ पर्यंत आहे) पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी घातल्याचे लिहिले आहे. या अप्लिकेशनचा दावा आहे की त्यांचा ४०० मंदिरांशी करार आहे. (जाता जाता, एआय ने दिलेली माहिती- करार ही संकल्पना जास्तीत जास्त व्यवसाय, व्यापार, कायदेशीर व्यवहार आणि दैनंदिन आर्थिक देवाणघेवाणीत वापरली जाते.)

परीक्षणासाठी घेतलेले तिसरे अ‍ॅप्लिकेशन तर प्रचंड प्रमाणात वापरले जाणारे आहे. या अ‍ॅप्लिकेशनचे तर एक कोटींपेक्षा जास्त डाउनलोडस् झालेले आहेत. यातही ज्योतिषांशी चॅटिंग, पूजा आणि चढावा हे विभाग आहेत. त्याचबरोबर त्यांनी ‘आध्यात्मिक सामग्री’ या शीर्षकाखाली काही वस्तूही विक्रीला ठेवल्या आहेत. त्यात कुबेर यंत्र, Money Magnet Bracelet, Evil Eye Bracelet (दृष्ट लागण्यापासून संरक्षण), कालसर्प दोष निवारण यंत्र… अशा वस्तू विक्रीला ठेवलेल्या आहेत. ग्राहक या वस्तू ऑनलाईन ऑर्डर देऊन घरी कुरिअरने मागवू शकतो. याशिवाय अ‍ॅप्लिकेशनच्या प्रचारासाठी त्यांनी सुविचार वगैरे विभागही ठेवलेले आहेत. हे सुविचार सोशल मीडियावर शेअर करता येतात, पण शेअर करताना सुविचाराच्या इमेजबरोबर अ‍ॅप्लिकेशनची लिंकही आपोआपच शेअर केली जाते आणि अ‍ॅप्लिकेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. विशेष म्हणजे यात ‘रेफर अँड अर्न’चा ऑप्शनही आहे. आमचे अप्लिकेशन रेफर करा आणि ‘पुण्य मुद्रा’ कमवा अशी त्यांची ऑफर आहे. अ‍ॅप्लिकेशन रेफर करून पुण्य कमावण्याची ही युक्ती विज्ञानाचा विकास झाला नसता तर वापरता आली असती का?

अशी अनेक अंधश्रद्धेच्या ऑनलाईन दुकानांची अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्यांचे मालक करोडो भारतीयांकडून अब्जावधी रुपये गोळा करत आहेत.  अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर्स या अ‍ॅप्सची जाहिरात करताना दिसतात. त्यामुळे लोकांचा त्यांवर विश्वास बसतो. हे स्टार्टअप्स त्यांच्या महसुलातील २५-३०% हिस्सा केवळ मार्केटिंगवर खर्च करतात. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ‘टार्गेटेड अ‍ॅड्स’द्वारे अशा लोकांना शोधले जाते. जे सध्या मानसिक किंवा आर्थिक संकटात आहेत. इथे विकल्या जाणार्‍या वस्तूंच्या किमतीही अव्वाच्या सव्वा असतात. एक ते दहा रुपये खर्चामध्ये बनणारी वस्तू शंभर ते पाच हजार रुपयांपर्यंत किमतीला विकली जाते. विशेष म्हणजे, यातल्या काही अ‍ॅप्लिकेशन्समध्ये Recognized by Startup India असे लिहिलेले दिसले. म्हणजे त्यांनी सरकारी पैसा वापरून अंधश्रद्धेचा धंदा सुरू केला आहे. आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे, या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करणारे लोक अडाणी नाहीत. स्वतःला सुशिक्षित, तंत्रस्नेही मानणारे लोकच त्यांचा वापर करत आहेत. हे शिक्षित लोकच ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन पूजा, ऑनलाईन आशीर्वाद आणि इन्स्टंट ऑनलाईन पुण्याच्या या चक्रात अडकले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची लढाई किती अवघड आहे याचा अंदाज यातून येतो. पण या लेखाचे सुजाण वाचक म्हणून तुम्ही एक गोष्ट करू शकता, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या फीडमध्ये एखादी ‘चमत्कारी अंगठी’ किंवा ‘ऑनलाइन शांती’ची जाहिरात येईल. तेव्हा समजा की, ही तुमची श्रद्धा नाही, तर तुमच्या भीतीचा डेटा विकून कमावलेला नफा आहे. तुमचा वैज्ञानिक दृष्टिकोन हाच या डिजिटल अंधश्रद्धेवरचा सर्वांत मोठा ‘अँटी-व्हायरस’ आहे.

– वाघेश साळुंखे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ]