शिवप्रसाद महाजन -

भिवंडीतील हजरत अली बाबाच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या ठाणे अंनिस शाखेच्या प्रयत्नांना मिळाले यश
भिवंडी शहरामध्ये श्रीमती नुसरा अन्सारी, त्यांचे पती अख्तर अन्सारी व मुलगा सादिक असं एक छोटंसं कुटुंब काही वर्षांपासून राहत आहे. त्याच भागात त्यांचे गृहउपयोगी वस्तू विक्रीचे दुकान आहे. मुलाचे शिक्षण सुरू आहे. पती अख्तर यांना थोडा मानसिक आजार असल्यामुळे, श्रीमती नुसरा आपल्या पतीला व्यवसायामध्ये मदत करतात. त्यामुळे त्या बरेचदा दुकानामध्ये पतीसोबतच असतात. याच दुकानातील उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू आहे.
हजरत अली नावाचा एक गृहस्थ त्यांच्या दुकानाच्या जवळपास राहत होता. हा इसम काही दिवसांपासून दुकानामध्ये सामान खरेदीसाठी नियमित येत असे. व्यवहाराला, बोलण्या, वागण्याला तो व्यवस्थित वाटत होता. एक दिवस हजरत अली अचानक श्रीमती नुसराचे पती अख्तर यांच्या जवळ जाऊन, त्यांच्यावर दीर्घ नजर टाकून म्हणाला की ‘आप हमेशा बिमार रहते हो, आपके उपर किसने जादूटोणा किया है’. हे ऐकल्यावर पती-पत्नीला आश्चर्य वाटले. त्याने हे कसे काय ओळखले या कुतूहलापोटी हजरत अलीसोबत संवाद सुरू झाला. या संवादात त्याने उभयतांना खात्री पटवून दिली की, तो नुसराच्या पतीचा आजार बरा करून जादूटोणामुक्त करेल.
व्यवसायातील मंदी, पतीचे आजारपण यामुळे श्रीमती नुसरा यांचा हजरत अलीच्या बोलण्यावर विश्वास बसला. हजरत अलीच्या बोलण्यावर नुसरा आणि अख्तर यांचा विश्वास बसू लागला आहे, हे त्याने ओळखले आणि मग त्यांना सांगितले की, ‘तुम्ही दोन अंडी घेऊन माझ्या घरी या. तुमच्या पतीवर जादूटोणा केलेला आहे, हे साबित करून दाखवीन’. हजरत अलीवर निर्माण झालेल्या विश्वासाच्या भरवशावर श्रीमती नुसरा, त्यांचे पती व मुलगा तिघेजण अंडी घेऊन अलीच्या घरी पोहोचले. हे तिघं घरी पोहोचल्यानंतर हजरत अलीने आपले चातुर्य दाखवायला सुरुवात केली. अन्सारी कुटुंबाने आणलेल्या दोन अंड्यांपैकी एक अंडे पतीच्या डोक्यावर व दुसरे अंडे मुलाच्या डोक्यावर ठेवण्यास सांगितले. पुढे अली म्हणाला ‘ही अंडी डोक्यावर सात वेळ फिरवा’. हे सर्व झाल्यावर अलीने दोन्ही अंडी एका रुमालात गुंडाळून काहीतरी मंत्र-तंत्र बडबडण्याचे नाटक केले, आणि ती अंडी घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी जाताना त्याने एक सूचना केली की, हीच अंडी रात्री ११ वाजता घेऊन पुन्हा माझ्याकडे या. अलीने सांगितल्याप्रमाणे तीच अंडी घेऊन तिघे रात्री अकराच्या सुमारास त्याच्या घरी पोहोचले. घरात हजरत अलीने परत दोन्ही अंडी स्वतःकडे घेतली आणि आधीच्या प्रमाणे पुन्हा मंत्र-तत्र बडबडण्यास सुरुवात केली. हे सर्व होईपर्यंत अन्सारी कुटुंब तिथेच उभे होते. त्यानंतर हजरत अलीने त्या अंड्यांपैकी मुलाच्या डोक्यावरील अंडे एका टोकरीत टाकून फोडले आणि पतीच्या डोक्यावरून फिरवलेले अंडे दुसर्या टोकरीत फोडले. पतीच्या डोक्यावरून फिरवलेल्या अंड्यात खिळा निघाल्याचे आणि मुलाच्या डोक्यावरून फिरवलेल्या अंड्यात खूप घाण निघाल्याचे दिसले. हे झाल्यावर त्याने असा दावा केला की ‘हे जे काही तुम्ही पाहत आहात, ते सर्व पती व मुलावर केलेल्या काळ्या जादूचा परिणाम आहे’. पुढे तो नुसरा यांना म्हणाला, ‘तुझ्या मुलाचे आयुष्य फक्त ६ महिने उरलेले आहे. आणि समजा तो जिवंत जरी राहिला तरी, वेड लागल्यासारखे करत राहील’. हजरत अलीचे आतापर्यंत वागणे, त्याने अंड्याचा केलेला चमत्कार यामुळे त्याच्यावर विश्वास पक्का झाला होता. त्यामुळे श्रीमती नुसरा यांना मनोमन वाटू लागलं की आपल्या मुलावर खरंच कुणीतरी काळी जादू केलेली आहे आणि त्यामुळेच आजारपण, व्यवसायातील मंदी आपल्याला सोसावी लागत आहे.
या भीतीपोटी नुसरा यांनी पुन्हा त्याला विचारलं की, “याच्यावर उपाय काय?” त्यावर अलीने सांगितले की, “उस पर मेरे पास उपाय है. लेकिन, उसके लिये मुझे एक मरे हुए आदमी का शव चाहिये. उसी शवपर मै काला जादू करके, इस काली जादू को काट दूंगा”. हे सर्व अन्सारी कुटुंबासाठी धक्कादायक होते. त्यामुळे नुसरा यांनी हजरत अलीला सांगितले की, “मृत व्यक्तीचे शव वगैरे आम्हाला काही मिळणार नाही. आम्ही आणून देऊ शकत नाही.” अगदी याचीच वाट पाहत असल्यासारखा हजरत अली म्हणाला ‘आप चिंता मत करो. मृत व्यक्ती का शव मै दिला सकता हु. कहा मिलता है, उसका पता करके, बात करके, आपको २ दिन मे बता दूंगा’. असं संभाषण झाल्यावर अलीने आम्हाला जाण्यास सांगितले.
दोन-तीन दिवसांनंतर हजरत अली पुन्हा आमच्या दुकानात आला आणि सांगू लागला की, ‘मृत व्यक्तीची बॉडी देणार्या इसमाची माहिती मिळालेली आहे. पण त्यासाठी आपल्याला नाशिक जिल्ह्यातील चांदवड या गावी जावे लागेल.’ यावर सहमती झाल्यावर दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी हजरत अली त्याची स्वतःची ईरटीगा गाडी घेऊन अन्सारी यांच्या दुकानात आला. अन्सारी यांचे कुटुंब आणि हजरत अली व त्याचा मुलगा हुसेन असे चारजण त्याच्याच गाडीमधून नाशिक जिल्ह्यातील चांदवडला गेलो. तेथे गेल्यावर हजरत अलीने कुणाला तरी फोन केला. फोनवरील संभाषणातून कळाले की, त्याने या सार्यांना मालेगावला बसस्टॉपजवळ यायला सांगितलेले आहे. त्याप्रमाणे हे सगळे पुन्हा मालेगावला गेले. मालेगाव बसस्टॉपवर हजरत अलीला एक इसम भेटण्यासाठी आला. तो इसम या सार्यांना बसस्टॉप समोरच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला; पण त्या इसमाने हजरत अलीला ओळखत नसल्याचे सांगितले. म्हणून ओळख पटवून देण्याची रुजवात केली. सगळे एकत्र बसलेले असताना हजरत अलीने त्या अनोळखी इसमाच्या बाबतीत झालेल्या घटनांची माहिती सार्यांच्या समक्ष त्यालाच सांगितली. हे ऐकल्यावर अनोळखी इसमाचा हजरत अलीची ओळख पटल्याचे व त्याच्यावर विश्वास असल्याचे अन्सारी यांच्या कुटुंबीयांसमक्ष सांगितले.
खात्री पटल्यावर हजरत अलीने सर्वजण तिथे कशासाठी आलेले आहेत, अन्सारींच्या मुलावर कशी काळी जादू केलेली आहे, हा इत्यंभूत प्रकार त्या अनोळखी इसमाला सांगितला. यावर उपाय म्हणून एका मृत व्यक्तीचे शव हवे आहे आणि त्यासाठी आम्ही इथे आलेला आहोत हे सुद्धा सांगितले. हे ऐकून ती अनोळखी व्यक्ती म्हणाली ‘सध्या दिवाळीचा हंगाम आहे, त्यामुळे लोक जास्त प्रमाणात बॉडी घेऊन जातात. शिवाय कब्रस्तानमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे मृत व्यक्तीचे शव लवकर मिळणार नाही’. त्यावर हजरत अली म्हणाला ‘मुलावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे शव लवकर मिळावे’. त्यांची तगमग पाहता तो अनोळखी इसम म्हणाला ‘अर्जंट शव हवं असेल तर, १० लाख रुपये लागतील’. हे ऐकल्यावर अन्सारी पती-पत्नी मध्येच म्हणाले, ‘१० लाख रुपये खूप आहेत आणि एवढे पैसे आमच्याकडे नाहीत’. याला जोडून हजरत अलीने त्या इसमाला सांगितले ‘दहा वर्षांपूर्वी ३ लाखात शव मिळत होते’; पण तो इसम बधला नाही. पुढे म्हणाला ‘तेव्हा तेवढ्याच रकमेत शव मिळत होते, आता मिळणे मुश्किल आहे. तुम्हाला १० लाख रुपये द्यावे लागतील’. असं सर्व संभाषण झाल्यावर सगळे जण परत भिवंडीला आले.
भिवंडीला आल्यानंतर पुढील दोन दिवसांतच हजरत अलीने फोन करून सांगितले की ‘मालेगावला जो इसम भेटला होता, तो ८ लाख रुपयात मृत व्यक्तीचे शव देण्यास तयार आहे’. यापुढे जाऊन तो म्हणाला ‘त्याकरिता त्याला १.५० लाख रुपये अॅडव्हान्स द्यावा लागेल. त्यानंतर शव आपल्याकडे आल्यानंतर २.५० लाख रुपये आणि त्या शवावरती काळी जादू केल्यानंतर उरलेले ४ लाख रुपये द्यावे लागतील. एक बाजूला ८ लाख रुपयांचा खर्च आणि दुसर्या बाजूला मुलाच्या मृत्यूची भीती, त्यामुळे अन्सारी कुटुंब ८ लाख रुपये देण्यास तयार झाले.
हजरत अलीने पैशासाठी तगादा लावल्याने दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी १.२५ लाख रोख व १७ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून हजरत अलीला दिले. त्यानंतर हजरत अली वारंवार फोन करून समोरची व्यक्ती लगेच पैसे मागत आहे, असं म्हणून पैशासाठी तगादा लावू लागला. त्यामुळे १ डिसेंबर २०२३ रोजी १.५० लाख रुपये, ३ डिसेंबर २०२३ रोजी १.७० लाख रुपये, त्यानंतर ५ डिसेंबर २०२३ रोजी १.३० लाख रुपये असे, एकूण ५ लाख ८७ हजार रुपये हजरत अली अन्सारी कुटुंबाकडून घेऊन गेला.
हजरत अलीला पैसे मिळाल्यानंतर डिसेंबर महिन्यात एक दिवस त्याने अन्सारी कुटुंबाला कळवले की, मृत माणसाचे शव भिवंडीमध्ये आलेले आहे; परंतु काळी जादू अमावस्येच्या दिवशी करण्याची असल्यामुळे, तो बाहेरगावी जात आहे. आम्हाला भीती आणि काळजी असल्यामुळे आम्ही त्याला मृत व्यक्तीच्या शवाबद्दल विचारले. त्यावर अली म्हणाला ‘मृत व्यक्तीचे शव गैबीनगर येथील माझ्या घरी ठेवलेलं आहे. माझं घर चौथ्या मजल्यावर आहे आणि ते शव पाहण्यासाठी तुम्ही रात्री या. पण पुढे तो असेही म्हणाला की, ‘त्या इमारतीला लिफ्ट आणि लाईट सुद्धा नाहीत, त्यामुळे सांभाळून या.’ हे ऐकल्यावर अन्सारींनी जाण्यास नकार दिला, कारण चार जिने चढून जाणे त्यांच्या आजारपणात त्यांना शक्य नव्हते. त्यामुळे अन्सारी कुटुंब शव पाहण्यास गेले नाही.
त्यानंतर काही दिवसांनी जानेवारी २०२४ मध्ये हजरत अलीने सांगितले की ‘बॉडीला वास येऊ लागलेला आहे, त्यामुळे लोकांना संशय येईल. म्हणून मी त्या बॉडीवर काळी जादू करून, ती बॉडी परत मालेगाव येथे पाठवलेली आहे. बॉडीवर काळी जादू केलेली असल्यामुळे तुमच्या मुलाला असलेल्या मृत्यूची भीती टळलेली आहे, माझं काम झालेलं आहे. तर, उर्वरित पैसे ताबडतोब द्या.’
तेवढे पैसे लगेच आमच्याकडे तयार नव्हते, त्यामुळे आम्ही त्याला पैसे देण्यास वेळ मागू लागलो; परंतु हजरत अलीने तगादा लावला व असेही सांगितले की, ‘तुम्ही माझ्याकडून व्याजाने पैसे घ्या.’ त्याने लावलेला तगादा व मुलावरील उपचाराच्या भीतीपोटी अन्सारी त्याच्याकडून ३ लाख रुपये व्याजाने घेण्यास तयार झाले. त्याप्रमाणे हजरत अलीने अन्सारींच्या दुकानाच्या म्हणजे ‘एस ए इंटरप्राईजेस’च्या एचडीएफसी बँक खात्यात ३ लाख रुपये जमा केले. त्यानंतर अन्सारींनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून, अलीला रोख स्वरूपात देऊन टाकले. या उपर काही महिने त्याला नियमित दरमहा २७ हजार रुपये व्याज देत राहिले. असे एकूण कर्ज व व्याजापोटी १ लाख ६३ हजार बँकेमार्फत व ३७ हजार रोख रक्कम अलीला परत केलेली आहे.
इतके पैसे आणि वेळ खर्च केल्यानंतरसुद्धा नुसरा यांच्या मुलाच्या आणि पतीच्या आजारात काहीच सुधारणा दिसत नव्हती. त्यांचे आजारपण तसेच होते. हे पाहता आपली फसवणूक झाली आहे अशी अन्सारी कुटुंबाला खात्री पटली.
फसवणूक होत आहे हे लक्षात आलं; पण त्यातून योग्य मार्ग आणि सल्ला कोण देईल? यासाठी श्रीमती नुसरा विचार करत राहिल्या. नेमकं यावेळी त्यांच्या डोळ्यासमोर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आली आणि तीच यातून मार्ग काढेल अशी आशा निर्माण झाली. म्हणून नुसरा यांनी मुक्ता दाभोलकर यांच्याशी संपर्क करायचं ठरवलं आणि त्यांचा फोन नंबर मिळवला.
मुक्ता दाभोलकर यांच्यासोबत त्याच दिवशी फोनवर बोलणं झालं. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती नुसरा यांच्याकडून घेतली, त्यांना आधार दिला आणि त्यासोबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखेच्या वंदना शिंदे यांचा फोन नंबर देऊन त्यांच्याशी संपर्क करायला सांगितले. फसवणूक आणि चिंतेमुळे अजिबात वेळ न दवडता नुसरा यांनी ३ जानेवारीला वंदना शिंदेंसोबत संपर्क केला. त्यानुसार वंदना शिंदे यांनी रविवार, ५ जानेवारीला त्यांच्या घरी ठाणे अंनिसची बैठक आहे. त्या बैठकीला नुसरा यांनी यावे असे सांगितले. तसेच आपाण बैठकीमध्ये सर्वांसमोर याबाबत चर्चा करू आणि योग्य मार्ग काढू. सोबतच त्यांची या त्रासातून मुक्ती करून योग्य न्याय मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. त्यानुसार नुसरा यांनी बैठकीला येण्याचे कबूल केले.
ठरल्याप्रमाणे रविवार, ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी नुसरा व त्यांचा मुलगा पोहोचले. तिथे अंनिसचे कार्यकर्ते व के. सी. कॉलेजमध्ये मास मीडिया शिकणारे काही विद्यार्थी व इतर सहकारी उपस्थित होते. त्यांच्याकडे नुसरा यांनी त्यांची करुण कहाणी पुन्हा एकदा सांगितली.
एवढं सगळं सुरू असताना स्वस्थ बसतील त्या वंदना माई कसल्या. त्यांनी लगेच दुसर्या दिवशी सोमवार, ६ जानेवारीला सकाळी एकटीने भिवंडी गाठले. अशा कामांमध्ये घाईगडबड किंवा आवास्तव चर्चा करून उपयोग होत नाही. कारण भोंदू, बुवा, बाबा सावध होतात आणि निसटतात. या पूर्वानुभवामुळे माईंनी थोडी सावध भूमिका घेतली. स्वतः फिरून सहज मिळेल अशी माहिती गोळा केली आणि परत ठाण्याला आल्या. दरम्यानच्या काळात ठाण्यामध्ये पोलीस आयुक्त म्हणून श्री. डुंबरे आलेले आहेत अशी माहिती माईंना मिळाली. पूर्वी गणपती विसर्जनाच्या दरम्यान गणपती मूर्ती दान करण्याच्या मोहिमेमध्ये डुंबरेसाहेबांनी सहभाग घेऊन, सहकार्य केलेले होते. श्री. डुंबरेसाहेबांचा हा दृष्टिकोन माईंना माहीत असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. त्यांनी डुंबरेसाहेबांना भेटण्याचे ठरविले.
दिनांक ९ जानेवारीला दुपारनंतर डुंबरेसाहेबांना भेटण्यासाठी वेळ घेतली. त्यानुसार ठाणे अंनिसचे कार्यकर्ते श्री. अजित डफळे व श्रीमती पुष्पा तापोळे यांना सोबत घेऊन माईंनी तडक आयुक्तांच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली. आयुक्तांनी परिस्थितीची पूर्ण माहिती करून घेतली आणि भिवंडीमधील शांतीनगर पोलीस स्टेशनचे सीनियर पोलीस इन्स्पेक्टर विनायक गायकवाड यांना फोन केला. परिस्थितीची पूर्वकल्पना देऊन ठेवली आणि भिवंडीला जाऊन भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे १० जानेवारीला वंदनाताई आणि ठाण्यातील सक्रिय कार्यकर्ता नितीन भवर असे दोघेजण भिवंडीला गेले. तिथे आजूबाजूला फिरावे लागेल म्हणून नितीन भवर आणि वंदनाताई जोखीम पत्करून दुचाकीवरून भिवंडीला गेल्या.
पोलीस स्टेशनला पूर्वकल्पना दिलेली असल्यामुळे पोलिसांनी विशेषतः सीनियर पोलीस इन्स्पेक्टर विनायक गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी खूप मदत केली. त्यांनी श्रीमती नुसरा यांना बोलावून घेतले, परिस्थितीचा अंदाज घेतला आणि कार्यवाहीच्या दृष्टीने लगेच पावले उचलली. पोलिसांना सोबत देऊन भोंदू बाबा हजरत अलीला पोलीस स्टेशनला बोलावून घेतले.
सदर घटनेबाबतची पोलिसांची शहानिशा झाल्यावर, पोलिसांनी त्याच दिवशी रात्री उशिरा एफ आय आर नोंद करून घेतला. श्रीमती नुसरा यांचा जबाब नोंदवला आणि ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ या कायद्यानुसार दि. १०/०१/२०२५ रोजी ऋखठ नोंदविला. मिळालेल्या माहितीनुसार त्याच दिवशी रात्री आरोपी भोंदू बाबा हजरत अली याला अटकसुद्धा झाली होती. ८ दिवस सुरू असलेल्या धडपडीला न्याय मिळाला होता. अंनिसच्या ठाणे शाखेने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि सहकार्याबद्दल अन्सारी कुटुंबीयांनी विशेष आभार मानले. त्याचबरोबर पोलिसांनी केलेल्या त्वरित कार्यवाहीबद्दल आणि सहकार्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन करून आभार मानले.
भोंदू, बुवा, बाबांकडून फसवणूक आणि शोषण होत असेल तर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यातून योग्य मार्ग काढून न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सामान्य लोकांमध्ये निर्माण करू शकलो, याबद्दल वंदनाताईंना व ठाणे अंनिस शाखेच्या सर्व सहकार्यांना आनंद वाटला, अभिमान वाटला.
– शिवप्रसाद महाजन
लेखक संपर्क : ९८६७६९१६८८