भोंदूगिरीचे जागतिकीकरण आणि नित्यानंदांचे चमत्कार!

डॉ. हमीद दाभोलकर -

स्वामी नित्यानंद हा स्वयंघोषित बाबा हा भारताचा फरार संशयित गुन्हेगार आहे. या स्वयंघोषित बाबावर लहान मुलींना पळवून नेण्याचा आणि डांबून ठेवण्याचा आरोप झाला आणि त्या निमित्ताने गुन्हा दाखल झाल्यावर हा बाबा देश सोडून पळून गेला. गेल्या दोन वर्षात या बाबाविषयी काही अचाट बातम्या माध्यमात येत राहिल्या. जसे की, त्याने वेस्ट इंडीज मधील त्रिनिदाद देशाच्या शेजारी एक बेट खरेदी केले आहे आणि त्या बेटावर एक ‘कैलास’ नावाचे राष्ट्र देखील घोषित केले आहे! गेल्या आठवड्यात या भोंदूबाबाने आणि त्याच्या विजयप्रिया या सहकारी महिलेने त्यांच्या देशाला युनोने आणि अमेरिकेने मान्यता दिली असे जाहीर करत काही कागदपत्रे आणि फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले. त्या निमित्ताने हा बाबा परत चर्चेत आला आहे. पुढे तपासात असे लक्षात आले की, अमेरिकेतील नेवार्क शहराने कैलास शहराच्या सोबत, कोणतीही चौकशी करता एक सामंजस्य करार केला होता आणि त्याचा फायदा घेऊन आपल्याला अमेरिकेने मान्यता दिल्याचा दावा हा भोंदू बुवा करत होता! सत्य लक्षात आल्यावर नेवार्क शहराने हा करार रद्द केला, तसेच युनो आपल्याला मान्यता दिली असल्याचा त्यांचा दावा देखील खोटा असल्याचे समोर आले. या निमित्ताने अशा स्वरूपाची भोंदूगिरी ही केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नसून त्याला असलेले आंतरराष्ट्रीय संदर्भ देखील अधोरेखित झाले. एका अर्थाने भोंदूगिरीचे जागतिकीकरण कसे होते याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्याला या निमित्ताने दिसून आले.

नित्यानंदबाबांचे सर्वच अजब म्हणावे असे आहे. त्यांचे व्हिडिओ पाहून सुज्ञ माणसाने हसावे की रडावे हा प्रश्न सहजच पडू शकतो. एका प्रसिद्ध व्हिडिओमध्ये ते भक्तांना सांगतात की, “आज आपल्या पृथ्वीवर सूर्य अर्धा तास उशिरा उगवलेला ना? तो केवळ माझ्या सांगण्याने उशिरा उगवला आहे!” मला जरा उशीर झाल्याने मीच सूर्याला सांगितले की, “सूर्या, तू जरा अर्धा तास उशिरा उगव आणि सूर्याने माझे ऐकले.” हे वाचून आपल्याला वाटेल की, हे विधान स्वामीजी विनोदाने करीत आहेत. प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. ते हे विधान हसत हसत करतात, पण विधानातील आशयाच्या विषयी ते अत्यंत गंभीर असतात. केवळ तेच नाही तर त्यांच्या प्रवचनाला समोर जमलेले हजारो भक्त देखील अत्यंत गांभीर्याने या विधानावर बाबांचा जयजयकार करतात! या पुढचे आश्चर्य म्हणजे, हे भक्त हे कोणी ‘गरीब बिचारी कुणीही हाका’ अशी ग्रामीण अशिक्षित जनता नसते तर उत्तम इंग्लिश बोलणारे, उच्चशिक्षित आणि खात्यापित्या घरातील लोक असतात! ही सर्व प्रवचने व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध असून, ‘मी असे म्हटलोच न्हवतो’! असा नित्यानंद स्वामींचा अजिबात दावा नाही. उलट पोलिसी ससेमिरा मागे लागल्यावर देखील आपल्या संदेशात ते आपल्या क्षमतांचा पुनरुच्चार करतात! एखाद्या विनोदी नाटक अथवा चित्रपटाला शोभावे असे हे कथानक नसून हे सर्व आपल्या आजूबाजूला घडणारे वास्तव आहे हे स्वीकारणे कितीही अवघड वाटत असले, तरी सत्य आहे हे आपल्याला स्वीकारावेच लागते.

गेल्या दहा वर्षांत ह्या नित्यानंद स्वामींच्या वर अनेक पोलीस केस दाखल आहेत. तमिळनाडूमधील एका प्रसिद्ध मंदिरात प्रसादात गुंगीची औषधे घालत असल्याच्या संशयावरून त्या मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांना निलंबित केले होते. बेंगळूरूमधील आश्रमात स्त्रियांचे शोषण झाल्याची केस देखील त्याच्यावर आहे. गुजरातमधील त्याच्या आश्रमाची जागा शासनाने त्याला दिली आहे. त्या विषयी कोर्टात सुनावणी चालू आहे. त्यांच्यावरील अनेक गुन्ह्यांचा पोलीस तपास चालू आहे आणि टोकाचा विरोधाभास असा की दुसर्‍या बाजूला नित्यानंद स्वामींचे शिष्यमंडळी वाढतच आहेत. हे केवळ नित्यानंद स्वामींच्या बाबतीत घडत नसून आज तुरुंगात असलेल्या आसाराम, रामपाल, रामरहीम ह्या लोकांच्या बाबतीत देखील घडताना दिसून येते. विचार करण्याची थोडीही क्षमता शिल्लक असलेल्या कोणत्याही व्यक्तीची मती गुंग व्हावी असे हे समाज वास्तव आहे. आपल्या देशाच्या समाजमनाला काही तरी भयंकर अंतर्गत विसंगतीने ग्रासेल असल्याचे हे लक्षण आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर म्हणत असत त्या प्रमाणे, “या देशाने विज्ञानाची सृष्टी घेतली पण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही.” विज्ञानाचे फायदे म्हणून येणार्‍या टीव्ही, मोबाईल, गाड्या, इंटरनेट, सोशल मिडिया अशा सर्व गोष्टी आपण समाज म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याश्या केल्या. परंतु ‘विज्ञानाची दृष्टी’ म्हणजे चिकित्सक मनोवृत्ती मात्र घ्यायला आपण विसरलो. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे निरीक्षण करून त्या मधून शोधक विचारांच्या माध्यमातून निष्कर्ष काढणे हे मानवजातीला इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळे काढणारे लक्षण आपण विसरून गेलो की काय, असा प्रश्न यामुळे मनात निर्माण होतो.

आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था देखील मुलांच्या मनातील चिकित्सक भावनेला पाठबळ देण्यापेक्षा, “बाबा वाक्यं प्रमाणम” शिकवण्यातच धन्यता मानतात. स्वाभाविकच आहे की, या व्यवस्थेमधून शिकून बाहेर पडणारे तथाकथित उच्चशिक्षित देखील भूलथापांना सहज बळी पडतात. या पलीकडे देखील एक गंभीर गोष्ट म्हणजे, पोलीस यंत्रणा, न्यायालय आणि समाजमन यांच्याकडून या भोंदूबाबा बुवांना मिळणारी छुपी मान्यता. नित्यानंद स्वामीचे उदाहरण ह्या बाबतीत बोलके आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये ह्या बाबाने आपल्या पोलीस, न्यायालय आणि समाजव्यवस्थेला आपण भोंदू बाबा असल्याचे अनेक पुरावे दिले होते. त्यापैकी कोणत्याही गोष्टीवर या यंत्रणांनी कठोर पावले उचलली नाहीत. जागे होण्यासाठी जणू काही अधिक गंभीर होण्याची वाट बघत आपण सुस्त पडून आहोत. धर्माच्या नावावर चाललेला हा काळाबाजार आपण का खपवून घेतो हा एक जटिल प्रश्नच आहे. महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात पारित झालेला भोंदूगिरी विरोधातील जादूटोणा विरोधी कायदा देश पातळीवर लागू होण्यासाठी प्रयत्न करणे हे देखील एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. गेल्या दहा वर्षार्ंत या कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रात एक हजारपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या भोंदू बाबा-बुवांना तुरुंगाची हवा चाखावी लागलेली आहे. याच कायद्यामुळे बागेश्वर धाम सारख्या स्वयंघोषित बाबाला शेजारी मध्य प्रदेशमध्ये पळून जावे लागले. बुवाबाजीचे जागतिकीकरण झपाट्याने होत असताना या बुवाबाजीला बळी न पडणारी नवी पिढी घडवण्याचे आव्हान आपल्या सगळ्यांसमोर उभे आहे. त्याला आपण किती प्रामाणिकपणे भिडणार यावरून आपण राज्यघटनेनुसार चालणार्‍या भारतात राहणार की, नित्यानंदांच्या भासमान कैलास देशात ते ठरणार आहे.

डॉ. हमीद दाभोलकर

कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ]