प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे - 9850902154
यादव काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावली होती. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य माणूस अत्यंत पिचला गेला होता. त्यांना या अंधश्रद्धारुपी दलदलीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नव्हता. अशावेळी ‘अवघा जनु ठकला ठेला असे’ असे म्हणत या सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा विडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उचलला. यासाठी त्यांनी पायपीट केली. गावोगावी, वाडोवाडी जाऊन स्वामींनी लोकांना जागृत केले. त्यांना अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक समजावून सांगितला. स्वामींच्या या प्रयत्नांचा मोठा परिणाम समाजात दिसू लागला. अनेक लोक अंधश्रद्धा सोडून स्वामींचे अनुयायी बनले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करू लागले व मुक्तीचा मोकळा श्वास घेऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलून त्यांची पिळवणूक करणार्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला व त्यांनी ‘हे आमचा मार्ग उच्छेदिती’ असे म्हणत स्वामींना देखील त्रास देणे सुरू केले. पण स्वामी बधले नाहीत. त्यांनी आपले कार्य अखंडपणे सुरूच ठेवले.
अंधश्रद्धा हा आपल्या मानवी समाजाला झालेला एक मोठा आजार आहे. या अंधश्रद्धेमुळे समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. पिढी-दरपिढी हा अंधश्रद्धारुपी आजार अधिकाधिक वाढत गेला असल्याचे आपल्याला दिसून येते. अंधश्रद्धेच्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी अनेक संत व महापुरुषांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटणारी एक मोठी परंपरा आपणास पाहावयास मिळते. ज्ञानेश्वर, तुकाराम ते गाडगेबाबा, तुकडोजी महाराज ही संतपरंपरा आणि आगरकर, महात्मा फुले ते दाभोलकर, श्याम मानव अशी समाजसुधारकांची परंपरा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटत आली. या सर्वांनी आपल्या कृती आणि उक्तीतून समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अनेकांना याची किंमत चुकवावी लागली. समाजाच्या रोषाचा सामना करावा लागला. काही जणांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली; परिणामी अंधश्रद्धा पाळणे हा कायदेशीररित्या गुन्हा ठरला आहे. अंधश्रद्धेवर महाराष्ट्रात पहिला प्रहार महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी केला.
यादव काळात महाराष्ट्रात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावली होती. त्यामुळे समाजातील सर्वसामान्य माणूस अत्यंत पिचला गेला होता. त्यांना या अंधश्रद्धारुपी दलदलीतून बाहेर निघण्याचा मार्ग दिसत नव्हता. अशावेळी ‘अवघा जनु ठकला ठेला असे’ असे म्हणत या सर्वसामान्य माणसाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचा विडा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उचलला. यासाठी त्यांनी पायपीट केली. गावोगावी, वाडोवाडी जाऊन स्वामींनी लोकांना जागृत केले. त्यांना अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक समजावून सांगितला. स्वामींच्या या प्रयत्नांचा मोठा परिणाम समाजात दिसू लागला. अनेक लोक अंधश्रद्धा सोडून स्वामींचे अनुयायी बनले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करू लागले व मुक्तीचा मोकळा श्वास घेऊ लागले. त्यामुळे सर्वसामान्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेत घालून त्यांची पिळवणूक करणार्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला व त्यांनी ‘हे आमचा मार्ग उच्छेदिती’ असे म्हणत स्वामींना देखील त्रास देणे सुरू केले. पण स्वामी बधले नाहीत. त्यांनी आपले कार्य अखंडपणे सुरूच ठेवले. स्वामींच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची महती ‘लीळाचरित्रा’त जागोजागी दिसून येते. ‘लीळाचरित्रा’त डोकावून पाहिल्यावर याची आपल्याला अनुभूती येते.
श्री चक्रधर स्वामींनी आपल्या संपर्कात येणार्या शिष्यांना वारंवार अंधश्रद्धेला बळी पडू नका, असे सांगितले. ते जे करीत होते ती कशी अंधश्रद्धा आहे, हे स्वामी पटवून देत असत. त्या काळी मोठ्या प्रमाणात धर्माच्या नावावर समाजात अंधश्रद्धेचे स्तोम माजले होते. विविध धार्मिक रुढी, परंपरांमधून समाजाला अंधश्रद्धेच्या जोखडात अडकवून टाकले होते. याच रुढी आणि परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न स्वामींनी केला. अनेक सण-उत्सव समाजात साजरे केले जात असत. त्यातून देखील अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात होते. स्वामींनी हे हेरले व कशा पद्धतीने सण-उत्सव साजरे करावेत, याविषयी मार्गदर्शन केले. एकदा स्वामी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरला असताना बोणेबाई या स्त्रियांनी गोकुळाष्टमीचा सण साजरा केला. यावेळी त्यांची लगबग पाहून स्वामींनी त्यांना विचारले, ‘बाइ : तरि हे माती काइसी?’ त्यावर बोणेबाई स्वामींना सांगतात ‘बा मौन्यदेव हो : तुम्ही नेणा? आजि गोकुळाष्टमी : आजि श्रीकृष्णु जन्मले : याचा श्रीकृष्णु करुनि : नंदु : एस्वदा : वसुदेओ : देवकी करुनि : गोकुळ करुनि बा : फुलवरा कीजे : व्रत कीजे :’ त्यावेळी स्वामींनी त्यांना अतिशय प्रेमानेे ‘बाइ : श्रीकृष्णु तो काइ मातीएचा? नंदु : एस्वदा : वसुदेओ : देवकी : तीएं काइ मातीएची? गोकुळ काइ मातीएचें? तीएं साचोकारी माणुसें होतीं कीं : असे समजावून सांगितले. अंधश्रद्धेवर हा स्वामींचा कृतियुक्त प्रहार होता. सण, उत्सवांमध्ये उपवासाचे देखील मोठे महत्त्व होते. यावर देखील स्वामींनी प्रहार केला. बोणेबाई गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करतात. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा झाल्यावर स्वामी त्यांना म्हणतात ‘बाइ : तुम्ही जेवा :’ त्यावर त्या म्हणतात ‘जी जी : आजि गोकुळअष्टमि : मी व्रत करीन :’ त्यावर स्वामी अतिशय चपखलपणे बोणेबाईंना ‘बाइ : देवकीए देवीसि श्रीकृष्ण जन्मले तै काइ तीहीं उपवासु केला? पेज तर्हीं प्यालीचि कीं : असे निरुत्तर केले व त्यांना व्रत तोडायला लावले.
असेच एकदा आबाइसा आणि उमाइसा या स्वामींकडे येण्यास निघाल्या. त्यावेळी रात्र झाली आणि एका ब्राह्मणाच्या घरी मुक्कामी थांबल्या. त्या दिवशी एकादशी होती. त्यांचा उपवास होता. त्यामुळे काही न खाता त्या झोपल्या. परंतु रात्री त्यांना खूप भूक लागली. त्यामुळे झोप आली नाही. त्यावेळी त्यांनी त्या घरमालकांना न विचारता त्यांचे घरचे खाल्ले व आपली भूक शमवली. भूक तर भागली. परंतु त्यांच्या मनात अपराधीभाव जागृत झाला. त्या स्वामींकडे आल्या व त्यांना घडलेले सगळे सांगितले व ‘आम्हांसि काइ दोखु जाला?’ असे स्वामींना विचारले. त्यावर स्वामींनी ‘बाइ : तैसा अवस्वरी तेतुकें घेता तेयां तेतुका दोखु नाहीं : प्राणपदी पीडा समे इतुके घेइजे :’ असे सांगून त्यांच्या मनातील अपराधी भाव दूर केला व एकादशीच्या दिवशी जेवल्यामुळे काहीही दोष लागत नसल्याचे सांगितले. या लीळांमधून स्वामींनी उपवास करणे निषिध्द मानले आहे, असे लक्षात येते. उपवास करणे या अंधश्रद्धेला स्वामींनी नाकारले आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी केल्या जाणार्या कर्मकांडाला देखील स्वामींनी छेद दिला असल्याचे आपल्याला दिसून येते. या संदर्भातील लीळा मुळातून पाहण्यासारखी आहे. एकदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आबाइसांनी ‘पाटसुताचा अनंतु केला : हवीक्षाअनाचा उपाहारु निफजविला : बरवी पुजाद्रव्यें आणिली : गोसावियांसी बरवी साष्टांगी पूजा केली : गोसावीयांचा श्रीचरणांवरि अनंतु ठेविला:’ यावर स्वामींनी तो हातात घेतला आणि आबाइसांना विचारले : ‘बाइ : हें काइ?’ आबइसांनी तो पाहिला आणि ‘दोही श्रीकरी दोन्ही सेवट धरिले : आणि म्हणीतले : जी जी : हा अनंतु :’ त्यावर स्वामींनी ‘बाइ : अनंतु काइ सुताचा : सोळा तांथूंचा : चौदा गांठींचा? यांसि एकु सेवटु इउती : एकु सेवटु इउंती : बाइ अनंतु काइ ऐसा? अंतु नाहीं तो अनंतु : अनंतु तो अनंतु की :’ असे समजावून सांगितले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुताचा म्हणजेच दोर्याचा अनंत म्हणजेच गणपती बनवून त्याची पूजा करणार्या आबाइसांच्या मनातील अंधश्रद्धा स्वामींनी दूर केली. महादाइसांना देखील स्वामींनी उपवास करू नये, असे सांगितले. एकदा महादाइसांनी स्वामींना ‘जी जी : माहोउपवासु केलेयां काइ होए?’ असे विचारले. त्यावर स्वामींनी ‘बाइ : उपवासु केलेयां आत्मा पीडे :’ असे स्पष्ट सांगितले. एकादशीच्या दिवशी उपवास केल्यावर नरकच होणार, असे देखील स्वामी महादाइसाला सांगतात. उपवास करण्याची जी प्रथा आहे, त्यावर स्वामींनी आघात केला असल्याचे या लीळांमधून आपल्याला दिसून येते.
प्रथा आणि परंपरा रूढ करण्यासाठी निरनिराळ्या पंथ-उपपंथांची निर्मिती करण्यात आली होती. ही सर्व अंधश्रद्धा रूढ करणारी केंद्रं बनली होती. यावर देखील स्वामींनी आक्षेप घेत खरा पंथ कसा ओळखावा, हे सांगितले आहे. एकदा देमाइसा स्नान करून येत होत्या, त्यावेळी दोन बाया आपसांत बोलत होत्या. त्यांचे शब्द देमाइसांच्या कानावर पडले. त्या म्हणत होत्या ‘आइ : पुराणी ऐसे म्हणति : जें गुरुवीण संसारु तारिजे ना : मुंचिचे ना : गुरुवीण संसाराची ली पुसे ना : तरि गुरु केला : आता स्वर्गा जाइजो : अथवा नर्का जाइजो:’ हे ऐकलेले देमाइसांनी स्वामींजवळ येऊन सांगितले. त्यावर स्वामींनी ‘देमती गुरु वीस्वासु म्हैसेयाचा : देमती : हा प्रतीति पंथू की देमती : एरु तो वीस्वास पंथू:’ म्हणजे केवळ सांगोवांगी कोणतेही आचारण करणे चुकीचे आहे, तर प्रचिती आली ते खरे मानावे आणि त्याप्रमाणे आचारण करावे, असे देमतीला स्वामींनी समजावून सांगितले. यातून स्वामींचा वैज्ञानिक द़ृष्टिकोन दिसून येतो. हे पटावे, यासाठी स्वामी देमाइसाला उदाहरण देतात. स्वामी म्हणतात, ‘तुम्ही अस्त्री असा : आणि एथौनि म्हणिजैल : जा तुम्ही पुरुखू : आणि ते देमती ऐसे एउनीचि ठाकैल : जैसी पाखाणीची रेघ :’ असेच धर्ममार्तंडांनी आम्ही म्हणू तेच खरे आणि त्याप्रमाणेच समाजाने वागले पाहिजे, असा दंडक केला आणि त्यातूनच अंधश्रद्धा फोफावली. ‘जे जैसे असे ते तैसेचि जाणावे : ते ज्ञान’ अशा एकदम सोप्या पद्धतीने स्वामींनी वैज्ञानिक द़ृष्टिकोन रुजविला. आज शास्त्रज्ञ देखील प्रयोग करून सत्य जगापुढे मांडतात. स्वामींनी ते बाराव्या शतकात अगदी सहजरित्या सांगितले.
स्वत:ला निर्मोही म्हणवून घेणार्या ढोंगी साधूंचा देखील स्वामींनी पर्दाफाश केला आहे. एकदा स्वामी सहज फिरण्यासाठी म्हणून बाहेर पडले. तेव्हा दोन मळ्यांच्या मध्ये एक साधू उघडाच उभा होता. त्याला थंडी वाजत होती. हे पाहून बाइसा स्वामींना म्हणतात, ‘कसा विरक्त आहे हा. एवढ्या थंडीत देखील त्यांच्या अंगावर कपडा नाही.’ त्यावर स्वामी बाइसांना हे सगळं कीर्ती मिळविण्यासाठी किंवा विषयांचा उपभोग घेण्यासाठी चाललं असल्याचे सांगतात. त्यावर बाइसा म्हणतात, त्याला बिचार्याला कोण विषय उपभोगायला देणार आणि त्याची काय कीर्ती होणार. तेव्हा स्वामी बाइसांना सांगतात, हे इथे असे दिसतात; पण गावात गेले की यांचा थाट पाहण्यासारखा असतो. ‘नगरांतुनि एक एति : ते यांते हाती धरुनि घेउनि जाति : उटीति : न्हाणीति : पाटाउवें सुताउंवे वेढीति : बोट रुपेतवं आंगी चंदन लावीति : तुपेभातें जेउं सुति : आंथुरणाबाजेवरि नीजवीति : एरी दिसीं मागौतें तैसेंचि उघडेचि बैसले असति : तवं आणीक एक एति : ते घेउनि जाति :’ प्रसिद्धी व पैसा मिळावा, यासाठी हे सगळे ढोंग चालले असल्याचे स्वामी बाइसांना समजावून सांगतात. आज देखील समाजात अशा ढोंगी साधूंची गर्दी झालेली दिसते. अशावेळी स्वामींनी ढोंगी साधूंच्या वागणुकीवर केलेला प्रहार लक्षात घेण्यासारखा आहे.
तीर्थयात्रा केल्यानेच मोक्ष मिळतो, म्हणून तीर्थाच्या ठिकाणी गेले पाहिजे, ही देखील खुळचट प्रथा धर्ममार्तंडांनी सुरू केली. वास्तविक, मोक्ष तर नाही; पण तेथील पुजार्यांची मात्र चांगली सोय होते. आज तीर्थक्षेत्रांवर संपत्ती ओसंडून वाहताना दिसते. ही सर्व गोरगरिबांच्या खिशातूनच गोळा झालेली आहे. अशा या तीर्थयात्रेचा देखील स्वामींनी निषेध केला आहे. एकदा महादाइसा स्वामींकडे द्वारकेला जाण्याची इच्छा व्यक्त करतात. तेव्हा स्वामी त्यांना ‘बाइ : तीर्थदेवता अमोचक : परमेश्वर सन्निधान मोचक :’ असे समजावून सांगतात. खरी द्वारका आता नसल्याचे ते समजावून देतात. ‘साटि लक्ष नीज कूमरा : सपन कोडी यादवां : प्रभासे आटलीया : गोपिका भीली हरिलीया : द्वारावती पाणीयांआंतु बूडाली : धर्मेवज्रू राज्यीं बैसवीला : तो खुररवी गेला : मग परिक्षीत मुख्य कव्हणी एक कळियौगिचें राए : तेहीं श्रीद्भष्णचक्रव्रतीचा पणतु म्हणौनि जाणीतला : मग तेही आपूले घोडे दीधले : आपूले हस्ति दीधले : द्रव्य देउनि मागौता वज्र राज्यी बैसवीला : राज्यासि सेस भरली : मग तेणें आपूलिया परी समुद्राचा कांठी एकि द्वारावती केली : एकि पासाणाची प्रतिमा केली : तीसि लोकू जातु असे : आता तेथ काइ असे? बाइ ते द्वारावती नव्हे : तो श्रीद्भष्ण नव्हे : ते व्रजाची प्रतीष्टा :’ अशी द्वारकेच्या निर्मितीची कथा स्वामी महादाइसाला सांगतात. असेच महादाइसा वाराणसीला जाण्याची इच्छा व्यक्त करतात तेव्हा देखील स्वामी त्यांना ‘बाइ : तीर्थदेवता अमोचक : परमेश्वर सन्निधान मोचक :’ असे समजावून सांगतात.
काकोस नावाची एक व्यक्ती द्वारावतीला जाण्याचा विचार करीत असताना त्यांना स्वामी खरा देव, खरे तीर्थक्षेत्र पटवून देतात. तेव्हा काकोसांना प्रचिती येते आणि त्यांचे ‘देव होते ते पाणीयांतु घातले : नक्षेत्रमाळा : उपक्रणे होती तीएं वीकुनि तयाचा गोसावी आपुलां ठाइं उपाहारु करवीला :’ धर्माच्या नावाने गळ्यात माळा घालणारे, विविध वस्तूंचे देव बनवून त्याला पुजणारे याचा देखील स्वामींनी विरोध केला, हे वरील लीळेतून आपल्याला दिसून येते.
खरा देव समजावून सांगणारी स्वामींची अशीच सुंदर लीळा आपल्याला ‘लीळाचरित्रा’त अनुभवण्यास मिळते. श्री चक्रधर स्वामींनी जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे अनादीचे चार पदार्थ सांगितले. देव कोणाला म्हणायचे, याचे वेळोवेळी आपल्या भक्तजनांना विवेचन केले. परंतु येथील परंपरेने ज्या नाही, त्या वस्तूला देव बनवून भोळ्याभाबड्या भाविकांची लूट केली. आजही समाजात याचे प्राबल्य अनुभवण्यास मिळते. अंधश्रद्धेने एखाद्या वस्तूला देव मानणे, हे स्वामींना मान्य नाही, म्हणूनच प्रल्हादबाईसांनी देव कसा समजवून सांगा, असे विचारले तेव्हा स्वामींनी ‘बाइ : देओ कैसा निरुपावा?’ असा प्रश्न केला. प्रल्हादबाईसांनी पुन्हा स्वामींना ‘देओ निरुपावा,’ असा आग्रह केला, तेव्हा स्वामींनी त्यांना जे सांगितले ते अंधश्रद्धाळू लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे आहे. स्वामी सांगतात, ‘देओ पाखाणाचा नव्हे : देओ काष्टाचा नव्हे : देओ मातीचा नव्हे : देओ चीत्रीचा नव्हे : देओ पटीचा नव्हे : देओ धातुचा नव्हे : पाखाणाचा फुटैल : लाकडाचा मोडैल : मातीचा तो वीरैल : चीत्रीचा तो पुसैल : पटीचा तो फाटैल : धातुचा तो झीजैल : देओ तो अछेदु : अभेदु : अच्युतु : अलेख :’
मंत्र-तंत्र करून धनद्रव्य देण्याचे आमिष दाखविणार्या ढोंगी मांत्रिकांना देखील स्वामींनी नाकारले आहे. एकदा विश्वनाथदेव नावाचे नाथपंथी महात्मे स्वामींकडे आले आणि त्यांनी स्वामींना विचारले ‘आपण पीवळी दांडी करु जाणिजे :’ त्याला स्वामींनी नकार दिला. मग त्याने स्वामींना पुन्हा विचारले ‘तरि पांढरी दांडी करु जाणिजे :’ स्वामींनी या गोष्टीलाही नकार दिला. तेव्हा नाथोबांनी स्वामींना विचारले हे पिवळी दांडी, पांढरी दांडी म्हणजे काय? यावर स्वामींनी तांब्याचे सोने करणे म्हणजे पिवळी दांडी आणि कथिलाची चांदी करणे म्हणजे पांढरी दांडी असे समजावून सांगितले. हे कसे करतात हे विचारल्यावर स्वामी त्यांना ‘पोरे हो तुम्ही नासाल:’ असे स्पष्ट सांगतात. ही तंत्रविद्या मनुष्याला नासवणारी आहे, असे स्वामी समाजावून सांगतात.
विटाळ हा देखील अंधश्रद्धेचाच एक प्रकार. याला देखील स्वामींनी विरोध केला. एकदा ‘उमाइसे अस्परीसीये असति :’ तेव्हा स्वामी मुद्दाम तिच्या जवळ जातात व आपला अंगठा तिच्या कपाळाला लावतात व ‘हे काइ बाइ : एथिचेया आंगुठेयासि वीटाळु केला :’ असे गमतीने म्हणतात. उमाइसाला चुकल्यासारखे वाटते. त्यावेळी स्वामी पुन्हा गमतीने म्हणतात, ‘एथचेया आंगुठेया वीटाळु जाला : आतां लोणारा नेयावा लागैल : केदारा नेयावा लागैल : मलिनाथा नेयावा लागैल :’ उमाइसाच्या मनात अपराधी भाव निर्माण होतो. त्यावेळी स्वामी तिला जे समजावून सांगतात. त्यातून स्वामींचा विज्ञाननिष्ठ विचार किती प्रगल्भ होता, याची प्रचिती येते. स्वामी उमाइसाला म्हणतात, ‘बाइ : नव नाडी वाहाति कोठे : नवां नाडीमध्ये हे एकि नाडि बाइ : एकि क्रीस्ण नाडि : एकि सुक्ल नाडि : द्भस्णेचा वीटाळु कां होआवा? सुक्लेचा वीटाळु कां न व्हावा बाइ? तेणें काही नाहीं : कव्हणी एकी अवस्वरी कव्हणा एका इंद्रियाची नाडी श्रवे : एकी अधे : एकी उर्धे:’. यानंतर स्वामी उमाइसाला विटाळ करू नये, असे सांगतात. ‘बाइ : ये नवद्वारे : जैसा नाकी सेंबुड ए : डोळेंया चीपडी एति : कानां मळू ए : तोंडा थुंका ए : गुदद्वारा मळ एति : तैसी हे एकि धातु स्त्रवे : मग नीवर्तें : याचा विकल्पु धरुं नैए :’ विटाळ आहे म्हणून स्त्रीला कमी लेखणार्या पुरुषी मानसिकतेला स्वामींनी जबरदस्त टोला दिला असल्याचे या लीळेवरून आपल्या दिसून येते.
मेलेल्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध घालण्याची अंधश्रद्धा अनादिकाळापासून सुरू आहे. एकदा मेलेल्या व्यक्तीचे पुढे काहीच होऊ शकत नाही. परंतु त्या व्यक्तीच्या नावाने आपले घर भरता येते, या कुहेतूने काही धर्ममार्तंडांनी श्राद्धाची प्रथा सुरू केली. या अंधश्रद्धेला देखील स्वामींनी विरोध केला. एकदा महादाइसांनी स्वामींना विचारले ‘जी जी : मातेपितेयाचे श्राद्ध कीजे तें तेयांसि पावे?’ त्यावर स्वामींनी ‘बाइ : दहा दीसांभीतरी कीजे तें पावे : एर न पवे : ते पितृसंबंधा अवघे’ असे स्पष्ट सांगितले.
असेच संन्यास घेण्याच्या अनुषंगाने देखील समाजात फार मोठया अंधश्रद्धा आहेत. त्याचा देखील स्वामींनी निषेध केला. महादाइसा जेव्हा संन्यास घेण्याविषयी विचारतात तेव्हा स्वामी त्यांना समजावून सांगतात ‘बाइ : उराइतुकेया पणियांतु रीगौनि उर्धबाहो होउनि मग फोकारिजे : संन्यस्तोहम् : संन्यस्तोहम् : परि रागादिक न त्यजे : बाइ : तो काए संन्यासु? तो संन्यासु नव्हे बाइ : राग : द्वेष : काम : क्रोध : मद : मत्सर : यांचा त्यागु : याचि नावें संन्यासु कीं बाइ : कार्याचा न्यास कीजे : कारणाचा नाही : अंधश्रद्धारुपी कर्मकांड करुन संन्यासी बनविणार्या ढोंगी बुआ, बाबा, महाराजांना स्वामींची ही सणसणीत चपराक आहे.
एकंदर, समाजातील अंधश्रद्धांवर स्वामींनी आपल्या द्भतीयुक्त आचरणातून चांगलेच कोरोडे ओढले आहेत. हा समाज अंधश्रद्धाळू न बनता तो सश्रद्ध बनला पाहिजे ही स्वामींची तळमळ होती. देव-धर्माच्या नावाने या समाजाची लुबाडणूक होता कामा नये यावर स्वामींचा कटाक्ष होता. आणि म्हणूनच स्वामींनी आपल्या शिष्यांना पदोपदी अंधश्रद्धेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना खरा देव आणि धर्म समजावून सांगितला. त्यांच्या मनातील अंधश्रद्धारुपी अंधकार दूर करून त्यांना श्रद्धेचा खरा प्रकाश दाखविला. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न करणार्यांसाठी स्वामींचा हा कृतिशील विचार दिशादर्शक ठरणारा आहे.
–प्रा. डॉ. किरण प्रभाकर वाघमारे
अकोला, संपर्क : 9850902154