सुभाष थोरात -
सुप्रसिध्द शास्त्रज्ञ आदरणीय जयंत नारळीकर यांनी ब्राह्मण सेवा संघ नावाच्या संघटनेकडून ब्रह्मभूषण पुरस्कार स्वीकारला. त्याबद्दलची बातमी छापून आल्यानंतर उलट-सुलट चर्चा झाली आणि पुन्हा एकदा पुरोगामी समजल्या जाणार्या लोकांनी जाती संघटनेकडून असे पुरस्कार स्वीकारावेत का, हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला.
जात हे आपल्या समाजाचे वास्तव आहे. जातीचा प्रभाव समाजावर आजही मजबूत स्वरुपात आहे, त्याची लाखो उदाहरणे आजही मौजूद आहेत आणि रोज त्याबाबतीत काही ना काही घडते. जाती नष्ट करण्याची लढाई बुध्द काळापासून फुले-आंबेडकरांपर्यंत चालत आलेली आहे आणि आजही ती चालू आहे. अशा वेळी जातीच्या नावाने जेव्हा एखादा जात नाकारणारा पुरोगामी माणूस आणि त्यातही ज्याला समाजामध्ये आदर्श मानले जाते, असा माणूस जातीकडून पुरस्कार स्वीकारतो, तेव्हा तो त्याच्याही नकळत जातिव्यवस्थेला मान्यता देत असतो. त्यामुळे जातिअंताची लढाई एक पाऊल मागे जाते. जात ही मानवनिर्मित गोष्ट आहे आणि तिला कसलाही जीवशास्त्रीय आधार नाही, ती केवळ मानसिक आहे आणि श्रमविभागणीतून जन्माला आलेली आहे. त्यावेळेच्या शोषक जातवर्गाने, जो ब्राह्मण आणि क्षत्रिय होता, त्याने तिला धर्मशास्त्राचा आधार देऊन बळकट केले आणि आपला स्वार्थ साधला आहे, ही वस्तुस्थिती असताना नारळीकरांसारख्या वैज्ञानिक दृष्टिकोन असणार्या, ज्यांना आपण देशाचे भूषण बोलू शकतो, असा शास्त्रज्ञ जातीने दिलेला पुरस्कार स्वीकारतो, तेव्हा तो वरील वस्तुस्थिती नाकारतो आणि वैज्ञानिक दृष्टीला बाधा आणतो. त्यांच्याबद्दलचा आदर कायम ठेवून हे म्हणणे भाग पडते. धर्म आणि जातीपल्याड जाण्याचे धाडस जर नारळीकरांसारखे लोक करणार नसतील, मग कोण करणार?
या संदर्भात आदर्श उदाहरण आपल्याला महात्मा फुले यांचे देता येईल. वडिलांनी अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर काढले, तरी ते डगमगले नाहीत. घेतला वसा त्यांनी टाकला तर नाहीच; उलट अधिक जोमाने आयुष्यभर जपला. त्याच्या उलट उदाहरण सुधारणावादी असणार्या न्यायमूर्ती रानडे यांचे देता येईल. वेळ आली, तेव्हा त्यांनी आपल्या विचारांपासून कच खाल्ली आणि त्याबद्दल महात्मा फुले यांना अतिशय वाईट वाटले होते. त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांना यासंदर्भात जाब विचारून आपण जर विचारांच्या संदर्भात अशी माघार घेतली, तर यासंदर्भात आपल्याला संतश्रेष्ठ तुकाराम यांची साक्ष काढता येईल. त्यांनी म्हटले आहे – ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाऊले॥’ ‘बोले तैसा चाले।…’ असे म्हणण्याचे धाडस फार थोडे लोक दाखवू शकले आहेत. त्या पार्श्वभूमीवरच संतश्रेष्ठ तुकारामांनी वरील वचन उद्धृत केले आहे. याबाबतीत आपल्याला बसवण्णा यांचे उदाहरण घेता येईल. जेव्हा त्या काळी त्यांच्या अनुयायी असणार्या चांभार कुटुंबातील मुलगा आणि ब्राह्मण कुुटुंबातील मुलगी यांचे लग्न ठरविले, त्यावेळेस समाजात अगदी भूकंप होण्याची वेळ आली असता बसवण्णा यांचे मित्र असलेल्या राजा बिज्जल यांनी बसवण्णांना हा विवाह रोखावा. यातून अनर्थ घडेल, असे समजावून सांगितले. बसवण्णा म्हणाले, ‘मी जो उपदेश करतो आहे, त्याप्रमाणे जर कोणी व्यवहार करत असेल, तर मी त्यांना कसे सांगू, हे करू नका म्हणून. त्यातून जी परिस्थिती उद्भवेल, तिला मी सामोरा जाईन.’ त्यामुळे समाजाच्या त्या वेळेच्या सनातन्यांनी रोष निर्माण करून बसवण्णा यांच्या अनुयायांची कत्तल घडवून आणली. विचारांसाठी प्राण पणाला लावण्याची उदाहरणे आपल्याला केवळ युरोपातील प्रबोधनकाळात सापडत नाहीत, तर भारतीय परंपरेत चार्वाकापासून तुकारामांपर्यंत पाहता येईल. महात्मा फुले यांच्यावर मारेकरी पाठवण्याचे प्रकरण आपल्याला माहीत आहे.
जातीपलिकडे जाऊन मानवी समतेचा आग्रह धरणारी थोर अशी परंपरा आपल्या देशात आहे, तरीही जातीचा पगडा सर्वसामान्य लोकांवरच नव्हे, तर शिकल्या-सवरल्या लोकांवरही आजही मोठ्या प्रमाणात आहे. अशा वेळी पुरोगामी समजल्या जाणार्या आणि जाती नष्ट करू पाहणार्या लोकांनी जातीन दिलेले पुरस्कार स्वीकारावेत काय, असा प्रश्न पुढे येतो. उच्च समजल्या जाणार्या शोषक जातीबद्दल आणि खालच्या समजल्या शोषित जातींबद्दल या संदर्भात वेगळी भूमिका असावी काय? कारण वरच्या समजल्या जाणार्या जातीतील व्यक्तीला कर्तृत्व गाजवण्यासाठी समाजात सर्व प्रकारची अनुकुलता असते. आजही सत्तेची स्थाने त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या उलट परिस्थिती खालच्या समजल्या जाणार्या जातीतील व्यक्तीचे असते. असे असताना जेव्हा ते स्वकष्टाने कर्तृत्व गाजवून समाजात काहीएक स्थान निर्माण करतात, तेव्हा त्यांचे त्यांच्या जातबांधवांकडून कौतुक झाले तर काय बिघडले, असा युक्तिवाद पुढे येऊ शकतो. या दोन्ही अर्थाने म्हणजे वरच्या समजल्या जाणार्या आणि खालच्या समजल्या जाणार्या जातिबांधवांकडून कुठलाही पुरस्कार घेणे, हे जातिव्यवस्थेला मान्यता देण्यासारखेच असते. परंतु जातिव्यवस्था नष्ट करू पाहणारी एखादी संघटना या संघटनेत विशिष्ट जातीचा भरणा असला तरी अशा संघटनांकडून पुरस्कार घेणे चुकीचे नाही. कारण ती विशिष्ट जातीची संघटना म्हणून अस्तित्वात नसते, तर एक विचार घेऊन उभी असते, जो अंतिमतः जाती नष्ट करणारा समानतेचा धागा धरणारा असतो. त्यामुळे जातीपल्याड जाऊन जातीचे सर्व बंध झुगारणे महत्त्वाचे आहे.
भालचंद्र नेमाडे यांच्या एका कादंबरीतील पात्र म्हणते त्याप्रमाणे जाती न मानणार्यांची जात तयार होणे गरजेचे आहे, तरच जाती भावनेच्या मुळावर घाव घालता येईल.