सध्याचे सत्यशोधक

केशवराव विचारे -

सध्याच्या परिस्थितीत, सत्यशोधकांनी जागतिक घडामोडींचा, निरनिराळ्या धर्मांचा आणि शास्त्रांचा अभ्यास करून आणि अशा परिस्थितीत मानवी समाजाची सर्वांगीण सुधारणा करण्याकरिता काय केले पाहिजे, या बाबतीत संशोधन करून काढलेला निष्कर्ष खाली दिला आहे.

१) स्वतः सुखी होण्याकरिता आज बहुजन समाजाची असलेली हीन दशा घालविली पाहिजे. सर्वांना गोडीगुलाबीने व सुस्थितीत राहता आले पाहिजे, यासाठी अद्ययावत सुधारलेली यांत्रिक साधने वापरून, सर्व प्रकारचे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू करून उत्पादन वाढविले पाहिजे. कोणतेही काम पूर्ण सहकार्याने केले, तरच त्रास व खर्च कमी लागून, उत्पादन जास्त व चांगले होऊ शकते. परंतु ज्याच्याजवळ पुरेसे भांडवल नाही, शिक्षण नाही, अशा कष्टाळू माणसांची मने सध्याच्या राहणीमुळे सहकार्याला अनुकूल असत नाहीत. ती अभ्यासाने, शिक्षणाने सहकार्याला योग्य अशी बनविली पाहिजेत. कोणतीही गोष्ट स्वतः चांगली समजावून घेऊन, दुसर्‍यास समजेल, अशा सोप्या शब्दांत सांगण्याची लायकी, मनुष्यामध्ये ज्या प्रमाणात असेल, त्या प्रमाणात कमी-अधिक काम होते. काम कमी होत असल्यास, आपण स्वतःची लायकी अभ्यासाने वाढविली पाहिजे. आपली आजची लायकी सततच्या अभ्यासाशिवाय टिकणार नाही, म्हणून निरनिराळ्या विषयांच्या तुलनात्मक अभ्यासाची जरुरी आहे. हे सर्व ज्याला समजते, तो मनुष्य त्याप्रमाणे वागत असतो व समाजाचे मार्गदर्शन चिकाटीने करू शकतो. समाज ज्या वेळी सर्व उद्योगधंदे स्वतःच्या मालकीचे करून ते स्वतःकरिता चालवेल, त्या वेळी कलह नष्ट होऊन, समता, बंधुता, सहकारिता निर्माण होईल व सर्वांचे जीवन सुखमय होईल. सत्यशोधकाने हा संदेश जगाला देणे जरुरीचे आहे.

१२) आपणांभोवती मन उन्नत राखणारे वातावरण सदोदित टिकविण्यासाठी, भोळ्या आणि दुबळ्या विचारांचा फैलाव करणार्‍या माणसांची संगत कमी केली पाहिजे आणि अभ्यासू व धीट माणसांची संगत वाढविली पाहिजे. समाजांत धीटपणा आणून विचारक्रांती घडविण्यासाठी सत्यशोधकांनी निरनिराळे कार्यक्रम वरचेवर घडविणे समाजहिताच्या दृष्टीने अत्यंत जरुरीचे आहे.

३) धर्माचा अर्थ कायदा व नीतीचा अर्थ कानू आहे. ही गोष्ट पूर्ण विचारांती समजून आल्यामुळे कायदे, कानू कसे व का घडत आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी होत आहे, इत्यादी बाबतीत स्वतः माहिती मिळवून, तिचा बहुजन समाजात प्रसार करणे, कष्टाळू वर्गाच्या हिताचे आहे.

४) देव ही फक्त कल्पनाच आहे. ज्ञानालाच सर्व ऋषि-मुनी आणि साधू-संत यांनी देव मानले आहे. म्हणून देवाकरिता काही कर्तव्य उरले नसून, ज्ञान वाढविण्याकरिताच माणसांनी शक्य तितका जास्त प्रयत्न करणे सर्वांच्या सुखाच्या दृष्टीने आवश्यक आहे.

५) भक्ती म्हणजे अखिल मानवसमाजाशी (धर्म किंवा जातिभेदरहित) समता, बंधुता किंवा सहकारिता या त्रयींच्या आधारे वागणे.

६) मानवी समाजाच्या उत्क्रांतीला शासनसंस्था पोषक असल्यामुळे तिच्या घडामोडींत स्वतः सतत भाग घेऊन आपणांप्रमाणे बहुजन समाजास भाग घेऊन समर्थ करणे अत्यंत महत्त्वाचे व जरुरीचे आहे.

७) अन्न हे परब्रह्म आहे, हे जाणून आपण उत्पन्न केलेल्या अन्नाचे परोपजीवी, फुकटे हरण करू शकणार नाहीत, अशी सर्व प्रकारच्या संरक्षणाची सतत काळजीपूर्वक तजवीज करणे जरुरीचे आहे.

८) उत्कर्षाकरिता सर्व प्रकारचे कार्यक्रम, कोणत्याही प्रकारे दुसर्‍या वर्गावर न अवलंबिता, स्वावलंबनाने स्वतःच आखून ते लवकर पार पाडणे समाजाच्या हिताचे आहे.

९) शेती व इतर प्रकारचे उद्योगधंदे, पूर्ण सहकार्याने आणि सुधारलेल्या साधनांचा उपयोग करून, सुरू करणे सर्वांच्या हिताचे आहे.

देऊनि किंवा भोगुनी | उणे न होता सदैव वाढतसे ॥

ऐसे एकचि विद्याधन | गुण न हा दुजात बसे ॥

‘जनतेला तत्त्वज्ञान हे कळतच नाही. त्यांना असा काही सामाजिक कार्यक्रम लागतो की, त्यामुळे जीवनाची साधने व भोवतालची परिस्थिती सुधारली की पुरे,’ असे हॅवेल म्हणतो. पण जनतेपैकी निदान शेकडा एक माणूस तरी तत्त्वज्ञान समजावून घेऊन त्याप्रमाणे सामाजिक कार्यक्रम आखण्याची लायकी संपादन केलेला नको का? कार्यक्रम आखावयाचा कोणी, कोणासाठी व तो पार पाडावयाचा कसा? साधने असूनही त्यांची जुळवाजुळव करण्याचे ज्ञान नसल्यास परिस्थिती कशी सुधारणार? यासाठी ज्या थोड्यांना तत्त्वज्ञान समजले, त्यांनी ते इतरांना शिकविणे आवश्यक आहे. ‘दो दिल जम जाय| तो पहाड भी खेंचा जाय॥’ असे कबीर म्हणतो. पण अशी दिलजमाई ज्ञानानेच होणे आवश्यक आहे. आपल्याला जे समजले, ते शाक्तांच्या सारखे गुप्त ठेवण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःचे घर स्वच्छ ठेवले व शेजारच्या भाऊबंदांच्या घरी घाण असली की, कॉलरा, प्लेग, देवी वगैरे होणारच. या सर्व रोगांचे निर्मूलन करण्यासाठी तितकाच जोरकस प्रयत्न होणे आवश्यक आहे. मनुष्य हा संस्कारांचा परिणाम आहे. चांगले संस्कार सतत होत राहण्यातच स्वत:चा व समाजाचा उद्धार आहे. सत्ता हातात आली की, सत्ताधीशांकडून चुका होऊ शकतात. त्या टाळण्याकरिता बहुजन समाज आपल्या हिताकरिता दक्षता पाळणारा पाहिजे. स्वतंत्र बुद्धीने विचार करणारा शेकडा निदान एकतरी मनुष्य पाहिजे. मात्र आपल्या देशातील पक्ष स्वयंसेवकांनासुद्धा स्वतंत्र बुद्धीने विचार करणे चुकीचे वाटते. मग चुकीच्या कार्यक्रमाचा आणि विचारसरणीचा फैलाव झाल्यास आश्चर्य कसले? सत्यशोधकांनी हे टाळले पाहिजे. जरूर तेथे विरोध, अवश्य तेथे सहकार्य केले पाहिजे, तरच ते सत्यशोधक. ज्यांचे जीवन हे इतरांच्या अज्ञानावर अवलंबून आहे, असे लोक अर्थातच सत्यशोधक होऊ शकत नाहीत. त्यांच्याकडून तशी अपेक्षा करणेही चूक, त्यांनीच हजारो वर्षे धूर्तपणे जाळी विणली व त्यात शिकार पकडली. आजही तीच अवस्था चालू आहे. हे बदलविणे सत्यशोधकांचे कर्तव्य आहे.

सत्यअसत्यासी मन केले ग्वाही|

मानियले नाही बहुमता॥

बहुमताला न मानताही सत्य तेच सांगितले व केले. मात्र त्यास मनाचा खंबीरपणा पाहिजे. तो अभ्यासाने येतो. बहुमत बदलविणेही कठीण नाही. बहुसंख्य जनता गांजलेली आहे. अज्ञानामुळे हजारो वर्षे सर्व तर्‍हेच्या गुलामगिरीत आहे, याची जाणीव करून देणे शक्य आहे. श्रीकृष्ण, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास वगैरे साधू-संतांची मदत घेणे आवश्यक आहे. समाजापुढे त्याचे विकृत स्वरूप आहे. याची माहिती सत्यशोधनाने समाजाला होईलच आणि यासाठीच सत्यसंशोधन वृत्ती वाढविणे आवश्यक आहे. ही वृत्ती ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात यश येणार आहे. भारतात सुमारे दोन कोटी भिकारी आहेत. काय करतात हे? यांना कोण जगवितो? कोणत्या भावनेने जगवितो? इतरांना फुकट पोसण्याची व स्वतः पशूंसारखे कष्ट करण्याची हाडीमांसी खिळलेली दुष्ट सवय मोडून टाकण्याचे कार्य सत्यशोधकांना करावयाचे आहे. मात्र मानवात व पशूंत जो मुख्य बुद्धीचा फरक, त्याची तरी जाणीव असावयास नको का? बुद्धीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यामुळेच आपला घात झालेला आहे. हे शास्त्रीय युग आहे; अशास्त्रीय मार्गाने कष्ट करून फायदा कसा मिळणार? पुस्तकी पांडित्य आले म्हणजे बुद्धिवान झाला, असे समजणेही मूर्खपणाचेच द्योतक आहे. विलायतेत पाच-सहा वर्षे राहिलेले विद्वानही पोर व्हावे, नोकरीत बढती मिळावी म्हणून सत्यनारायणाची पूजा करतात. इतिहास संशोधक, मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास केलेले जात्याभिमानी आढळतात. असे जे आहेत ते शाक्त असले पाहिजेत किंवा बुद्धी गहाण टाकलेले तरी असावेत. ज्यांच्या शेकडो पिढ्या गायी मारून खाण्यात गेल्या, त्यांना गायींचा पुळका का येतो? गाय त्यांची माता केव्हा झाली? बैलोबांच्या जमान्यात हे असेच चालणार! ही अवस्था बदलणे आवश्यक नाही का? रामाचे दोस्त म्हणून कोट्यवधी वानरांचा हजारो वर्षे सांभाळ करणारी आमची नीती, ही वागण्याची रीत, जर आम्हास एकवेळही जेवावयास नीट निळत नसेल तर बदलावयास नको काय? ती बदलणे हे सत्यशोधकांचे कर्तव्य आहे.

अशा अनेक बाबी आहेत की, ज्यांत आपला समाज अनाठायी वेळ, अगणित पैसा व श्रम खर्च करीत आहे; तेे फक्त अज्ञानामुळेच. हे सर्व वाचवून त्यांची सुख-समृद्धी वाढवू शकेल, अशा कामी खर्च करण्याची योग्यता वाढविणे, हे सत्यशोधकांचे कार्य आहे, हाच सत्यशोधकांचा सध्याचा कार्यक्रम आहे.

(सत्य संशोधनलेखक के. व्ही. विचारे, महाध्यक्ष. भा. सत्यशोधक समाज या पुस्तकातील एक प्रकरण)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]