क्यूबा – जागतिक भ्रातृभावाचे जितेजागते उदाहरण

अनुवाद - राजीव देशपांडे -

सार्‍या जगभर कोरोनाच्या साथीने हाहाःकार माजवला आहे. अशा वेळेस खरे तर जात, धर्म, वंश, पंथ, देश अशी आवरणे झुगारून देऊन केवळ मानवतेच्या पातळीवर एक होत सर्व देशांनी एकमेकांस मदतीचा हात देत मानवजातीवरील या संकटाचा मुकाबला करायला हवा; पण अशा या कठीण काळातही स्वत:ला सुसंस्कृत, विकसित समजणारे धनाढ्य देशही अत्यंत स्वार्थीपणे आणि संकुचितपणे कसे वागत आहेत, याची अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत; पण गेली साठ वर्षेअमेरिकेने लादलेली आर्थिक नियंत्रणे सहन करीत त्या नियंत्रणांना भीक न घालता आपला विकास साधत ताठ मानेने उभ्या असलेल्या क्यूबासारख्या छोट्याशा देशाने आजच्या या ‘कोविड-19’ महामारीच्या भयानक संकटकाळात जागतिक भ्रातृभावाचा झेंडा फडकत ठेवला आहे. सारे जग त्याबद्दल क्यूबाचे कौतुक करीत आहे.

मार्चअखेरपर्यंत क्यूबाने 59 कोरोनाबाधित देशांत आपल्या डॉक्टरांची पथके पाठविली आहेत. इटलीतील लोंबार्डी भागात कोरोनाची साथ अगदी शिगेला पोचली असताना क्यूबाच्या अशा साथीचा मुकाबला करण्यात तज्ज्ञ असलेल्या 53 डॉक्टर, नर्सेस यांचे पथक तेथे पोेचले, तर स्पेन आणि फ्रान्समध्ये असलेल्या छोट्याशा अंडोरा येथे 39 डॉक्टरांचे पथक पोचले. तेथील बहुतांश डॉक्टर कोरोनाबाधित झाले असल्याने सारी जबाबदारी क्यूबाच्या डॉक्टरांनाच पार पाडावी लागत आहे. इटलीत आणि इतर देशांत पाठविण्यात आलेल्या या क्यूबाच्या डॉक्टरांच्या पथकांना याआधी सहारातील आफ्रिकी देशात जीवघेण्या ‘इबोला’ साथीशी केलेल्या संघर्षाचा अनुभव आहे.

2005 साली अमेरिकेतील ‘कतरिना हरिकेन’च्या हाहाःकाराच्या वेळेस क्यूबाच्या सरकारने अमेरिकेला मदत करण्याची तयारी दर्शविली; पण जॉर्ज बुश यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर क्यूबाच्या सरकारने फिडेल कास्ट्रो यांच्या सांगण्यावरून नैसर्गिक आपत्ती आणि जागतिक साथींना तोंड देण्यासाठी हेन्री रीव्ह ब्रिगेडची स्थापना केली, ज्यात भूकंप, महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींत आणि कोरोना, इबोलासारख्या जीवघेण्या जागतिक साथींना तोंड देणारे तज्ज्ञ व प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस, तंत्रज्ञ आहेत. पाकिस्तान, इंडोनेशिया, ग्वाटेमाला आणि हैती येथील भूकंपानंतर याच ब्रिगेडने या देशात मदतकार्य केले होते. आज व्हेनेझुएला, निकारुग्वा, सुरीनाम, बेलिझ, जमेकासारख्या 59 देशात ही हेन्री रीव्ह ब्रिगेड कोरोनाच्या विरोधात कार्यरत आहे.

हेन्री रीव्ह हा अमेरिकेतील तरुण 19 व्या शतकात स्पेनच्या वसाहतवादाविरोधात क्यूबामध्ये चालू असलेल्या संघर्षात क्यूबाच्या क्रांतिकारकांबरोबर सामील झाला होता. त्याची गणना क्यूबाच्या राष्ट्रीय नायकांत केली जाते. म्हणूनच त्याचे नाव या ब्रिगेडला देण्यात आले आहे.

क्यूबाच्या समाजवादी राजवटीने गेली साठ वर्षे अमेरिकेने घातलेली नियंत्रणे सोसत विकसित केलेली आरोग्यव्यवस्था त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्यसेवा आयुष्यभर देते. क्यूबात आज 1000 नागरिकांमागे 8 डॉक्टर आहेत. हे प्रमाण जगात सर्वांत जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 1000 नागरिकांमागे किमान एक तरी डॉक्टर असावा, असे प्रस्तावित केलेले आहे. भारतात हे प्रमाण दहा हजार नागरिकांमागे एक इतके आहे. क्यूबाने जैवतंत्रज्ञान विभागात प्रचंड भरारी घेतलेली आहे. क्यूबाच्या सेंटर फॉर जेनेरिक इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी (सीआयजीबी) या संस्थेचे संशोधन आणि त्यांची उत्पादने यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.

इतर देशांत कोरोना साथीविरोधात आपल्या डॉक्टरांची पथके पाठवितानाच आपल्या देशातही क्यूबाने चीनमधील वूहानमधून जानेवारीत साथीची बातमी आल्याबरोबर कोरोनाच्या साथीला भिडण्याची तयारी सुरू केली. नागरी आणि लष्करी इस्पितळातून हजारो खाटा कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. क्यूबाची अर्थव्यवस्था पर्यटनावर मुख्यत: अवलंबून असूनही सरकारने परदेशी पाहुण्यांना बंदी केली आहे. क्यूबाचे अध्यक्ष मिगेझ डायल केनेल यांनी, ‘आमच्याकडे प्रत्येकासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे, आमच्या समाजात वैज्ञानिकता रुजलेली आहे, आमची नागरी सुरक्षा व्यवस्था परिणामकारक आहे आणि क्यूबाचा प्रत्येक नागरिक हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे,’ असे सांगत कोरोनाच्या संकटाला यशस्वी तोंड देण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

मार्चच्या मध्याला एक ब्रिटीश जहाज क्यूबाच्या किनार्‍याला आले. त्यावर 682 प्रवासी आणि 381 नोकरवर्ग होता आणि त्यापैकी पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. अमेरिकेसकट इतर शेजारी देशांनी त्या जहाजाला परवानगी नाकारली होती. ब्रिटनने केलेल्या विनंतीला अनुसरून क्यूबाने या जहाजाला आपल्या किनार्‍यावर उतरण्याची परवानगी दिली आणि प्रवाशांना विमानाने ब्रिटनला धाडत बाधितांना आपल्या इस्पितळात उपचारही दिले. ब्राझीलमध्ये लुला अध्यक्ष असताना ब्राझीलच्या दुर्गम भागासाठी त्यांनी क्यूबाच्या डॉक्टरांची मदत घेतली होती. जवळजवळ दहा हजार डॉक्टरांची ब्राझीलमध्ये नेमणूक करण्यात आली होती. तेथे क्यूबाच्या डॉक्टरांनी तेथे प्रचंड काम करत अनेक प्राण वाचवले होते. 2019 ला ब्राझीलमध्ये सत्ताबदल झाला आणि लुला यांच्या जागी अतिउजवे बोल्सोनारो अध्यक्ष झाले. त्यांनी क्यूबाच्या डॉक्टरांवर ते डावे क्रांतिकारक असल्याचे खोटे आरोप करत त्यांच्याबाबत ‘फेक न्यूज’ पसरवत आणि त्यांच्यावर हल्ले चढवत त्यांना ब्राझीलमधून अक्षरश: हाकलून लावले होते; पण ब्राझीलमधील सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि या साथीच्या ओझ्याने तेथील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे 15 मार्चला ब्राझीलच्या आरोग्य सचिवाने क्यूबाच्या सरकारला डॉक्टरांना पुन्हा पाठविण्याची विनंती केली आहे. अध्यक्ष बोल्सोनारो यांनी क्यूबाच्या डॉक्टरांची हकालपट्टी केल्याबद्दल ब्राझीलच्या जनतेची आणि क्यूबाच्या सर्व डॉक्टरांची माफी मागावी, अशी मागणी लुला अध्यक्ष असलेल्या वर्कर्स पार्टीने कली आहे.

(‘फ्रंटलाईन’ या पाक्षिकातील जॉन चेरियन यांच्या लेखावर आधारित)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]