घरातून मिळाले प्रश्न विचारण्याचे प्रोत्साहन

कॅप्टन विवेक अण्णा कडलास्कर -

माझ्या बालपणापासूनच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम आणि समितीप्रति माझ्या वडिलांची निष्ठा व धडपड हे आमच्या जीवनाचे अभिन्न अंग होते. लहान असल्यापासूनच वडिलांनी घरी वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक कुतूहल जोपासले आणि ते आमच्या अंगी रुजावे यासाठी प्रयत्न केले. आमच्या घरामध्ये असे वातावरण असल्यामुळे पहिल्यापासूनच मला आमच्या व इतर मुलांच्या घरातील अनेक फरक जरी पूर्णपणे कळत नसले तरीही अस्पष्टपणे आढळून येत होते. मग ते परीक्षेच्या आधी मुलांची मंदिरामध्ये जाण्याची धावपळ असो किंवा देवाचा धावा, प्रार्थना असो!

लहानपणापासूनच माझे वडील मला नेहमीच प्रत्येक गोष्ट घडण्यामागचे वैज्ञानिक कारण सांगायचे व नवीन गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. नवीन गोष्टींबद्दल मला उत्साह वाटावा व मला त्यांची गोडी लागावी असा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा. लहानपणापासून मला खगोलशास्त्राबद्दल खूप कुतूहल होते. उंच आकाशात लुकलुकणार्‍या छोट्याशा बिंदूंमागे एवढे रोमांचकारी रहस्य दडलेले आहे हे मला त्याबद्दल माहिती काढल्यानंतर कळले. माझ्या लहान भावाचा नामकरण समारंभ हा याच सर्व गोष्टींशी जोडलेला एक अविस्मरणीय प्रसंग आहे. त्याचे झाले असे होते की, आम्ही सगळे सहकुटुंब एका आकाश दर्शनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे आम्ही दुर्बिणीने चंद्र, शनी, बृहस्पतीसारखे अनेक ग्रह पाहिले. लोक कसे शेकडो मैल दूर असलेल्या या ग्रहांच्या व तार्‍यांच्या शुभ-अशुभ अशा विभागण्या करतात व त्यांच्यामुळे आपल्या जीवनावर होणार्‍या प्रकोपाची भीती बाळगतात हे माझ्या वडिलांनी तेव्हा मला सांगितले. हे सगळे ऐकून मला थोडे नवलच वाटले. या सर्वांमध्ये मला शनी हा ग्रह भलताच आवडला व त्याच्या भोवतीच्या वलयांनी मी मंत्रमुग्ध झालो. रात्री जेव्हा घरी परत येऊन मी आई-वडिलांच्या शेजारी झोपलेलो तेव्हा अचानक माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी वडिलांना म्हटले, “जर मला छोटा भाऊ झाला तर आपण त्याचे नाव शनी ठेवायचे का?” माझ्या या कल्पनेला वडिलांनी क्षणार्धात सहमती दिली, पण अखेरीस माझी आई आमच्या या योजनेशी पूर्णपणे सहमत नसल्यामुळे आम्हाला फक्त माझ्या भावाचं टोपण नाव ‘शनी’ ठेवण्याची परवानगी मिळाली.

माझ्या वडिलांना पहिल्यापासूनच पुस्तकं वाचण्याचं प्रचंड वेड होतं. वडिलांसोबत वारंवार मारलेल्या पुस्तकालयातल्या चकरा, चिंटू आणि पंचतंत्रातील गोष्टी वाचण्याची लागलेली आवड कधी वाचनाच्या छंदामध्ये बदलली हे कळालंच नाही. असेच एकदा शाळेच्या पुस्तकालयात पुस्तक वाचत असताना मला आमच्या ग्रंथपालांनी बोलवले व ते आपल्या एका सहकारी शिक्षिकेला म्हणाले, “हे बघा, हाच तो मुलगा! ह्याच्या घरी गणपती बसत नाहीत.” मी कुठल्याही देवाची पूजा करत नाही हे ऐकून त्या शिक्षिकेला थोडा धकाच बसला व शहानिशा करण्यासाठी त्यांनी परत एकदा मला विचारलं, “एकही देव नाही तुझ्या घरी असं कसं बरं?” मी बहुधा तेव्हा दुसरी-तिसरीत असेन आणि माझ्या चिमुकल्या मेंदूला हे कळतच नव्हते की ही छोटीशी गोष्ट एवढी आश्चर्यकारक का होती? आमच्या घरी कुठलाच देव्हारा नव्हता अन् नाही हे खरं आहे. पण मी नास्तिक व्हावे असे दडपण किंवा बंधन कधीही मला घातले गेले नाही. खरं तर लहानपणापासून असे अनेक वेळा झालेले की मी माझ्या आईसोबत कुठल्या मंदिरात किंवा आमच्या कौटुंबिक मित्रांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये असलेल्या देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले आहेत. पण त्यात धार्मिक भाव नसायचाच. त्या वयात मी आस्तिक आहे का नास्तिक या विचारापेक्षा हात जोडल्यानंतर मिळणार्‍या खमंग प्रसादाचा मोह असायचा. हळूहळू जसा मी मोठा झालो तशी मला ही जाणीव झाली की फक्त प्रसाद खाण्यासाठी मी हे हात जोडण्याचे ढोंग करणे व स्वतःलाच फसवणे बंद केले पाहिजे.

पाचवीत असताना मला आठवते की फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम पहिल्यांदा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतला. त्याआधी मी दुसरी-तिसरीमध्ये असताना मी बरेच फटाके फोडले होते त्यामुळे मी हे एवढं ठळकपणे सांगू शकतो. पण त्या वर्षी मला व माझ्या लहान भावाला वडिलांनी फटाक्यांच्या घातक परिणामांबद्दल सांगितले. फटाके विकत घेण्याऐवजी खेळणी घेऊन देण्याचा प्रस्ताव मांडला. आम्हा दोघांनाही तो पटला आणि त्या वर्षापासून आम्ही फटाके फोडणे थांबवले. अर्थातच लहानपणी बाकी मुलांना फटाके फोडताना बघून आम्हाला थोडी ईर्षा नकीच वाटायची, पण जेव्हा मी फटाक्यांचा कारखान्यांमध्ये काम करणार्‍या बाल कामगारांबद्दल ऐकले तेव्हा हे करणे मुळीच योग्य नव्हे, असा मी मनाशी निश्चय केला. पुढे जाऊन अनेक वर्षे फटाके मुक्त दिवाळी हा उपक्रम समितीने राबवला. त्या निमित्ताने दरवर्षी माझे वडील आमच्या शाळेत पत्रक पाठवून मुलांना आवाहन करायचे की या वर्षी फटाक्यांवर पैसे न उडवता ते पैसे वाचवण्याचा सगळे ध्यास धरू या! सुरुवातीची काही वर्षे या मोहिमेचा फारसा परिणाम मला दिसला नाही, उलट बर्‍याच वेळा माझे मित्र मला चिडवत असत. ‘आले बघा याचे वडील परत पॅम्फलेट वाटायला’. त्या वयापर्यंत हे कळून चुकले होते की वडिलांची ही समाजसुधारणेची वाटचाल थोडी खडतर असणारच आहे आणि खरं म्हटलं तर या सर्व गोष्टींचा त्रास होण्याऐवजी मला अभिमानच जास्त वाटायचा. हळूहळू काही वर्षांनी सगळ्यांनाच फटाक्यांमुळे होणार्‍या हानीची, प्रदूषणाची व दुष्परिणामांची जाणीव झाली आणि बरीच मुले, त्यांचे पालक व शिक्षक फटाके मुक्त दिवाळी साजरी करू लागले.

आमच्या घरी आम्हाला नेहमी अशीच शिकवण मिळाली की सदैव सत्याची वाट धरावी, सगळ्या लोकांशी सहनशीलतेने वागावे, कोणामध्येच कसलाही भेदभाव करू नये, कष्ट करण्यास लाज बाळगू नये आणि नेहमी मेहनतीच्या जोरावर यश मिळवावे, कधीही कुठल्या चमत्काराची किंवा नशिबाची अपेक्षा करत वेळ व्यर्थ घालवू नये. माझा जन्म जरी मुंबईला झाला असला तरी माझं आजोळ सोलापूर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात होतं. उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही सदैव तिकडे जात असू व तिकडच्या गोष्टींचा मनसोक्त आनंद घेत असू. मग ते झाडावर चढून सुरपारंब्या खेळणं असो किंवा विहिरीत उड्या मारून पोहणे असो. तिथल्या हवेत एक वेगळा उत्साह असायचा. अशाच एका उन्हाळी सुट्टीत जेव्हा मी सातवीत होतो तेव्हाचा प्रसंग…

इतिहासाच्या पुस्तकातील अध्ययनामधून आपल्या देशातील जातिवाद व त्यामुळे झालेल्या लोकांच्या शोषणाबद्दल माहिती मिळाली होती पण या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत असे मला तेव्हा वाटायचे. परंतु या एका घटनेने माझा भ्रमनिरास झाला. दुपारची वेळ होती. मी आत्याच्या कौलारू घरात तिच्यासोबत बसलो होतो. त्यांच्या शेजारी राहणारी शेतात मजुरी करणारी त्यांची मैत्रीण घरी परतत होती. सहज भेटावे म्हणून ती त्या घरी आली. तिने पाहिले की, आत्या जेवणासाठी भाकरी थापत आहे. मला पाहून हा गावाला कधी आला ही विचारपूस केली व म्हणाल्या,”मी चवळीची भाजी केली आहे, फारच गोड झाली आहे. तुला चव चाखायची आहे का?” मी लगेचच हो म्हणालो; पण अचानक त्यांचा चेहरा थोडा बारीक झाला व त्या म्हणाल्या, “मी महाराची आहे. तुला चालेल का आमचं जेवण?”

सुरुवातीला मला त्या नेमकं काय म्हणत आहेत हे कळलंच नाही. मी म्हणालो,”मला काहीच आक्षेप नाही.” मी त्यांच्या चवळीच्या भाजीवर ताव मारला. नंतर मला कळाले की, त्या त्यांच्या जातीबद्दल सांगत होत्या आणि मला आश्चर्य वाटले की, या संपूर्ण जातिव्यवस्थेने लोकांच्या मनावर एवढे तीव्र घाव घातले होते की शोषित लोक स्वतःच स्वतःला कमी लेखत होते. हळूहळू हेही कळू लागले की, हा लढा किती खडतर होता व समाज सुधारण्याच्या या चिरंतन संघर्षात अनेकदा कार्यकर्त्यांना सर्वप्रथम आपल्या घरच्यांना सामोरे जावे लागत होते. आपल्याच घरात ही सामाजिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणणे बहुधा बाहेरच्या लोकांना पटवून देण्यापेक्षा जास्त अवघड होते.

दहावीनंतर मी औरंगाबादमध्ये असलेल्या ‘सर्विसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट’ या संस्थेच्या परीक्षेला बसलो व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालो. ही संस्था भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठीची तयारी करून घेणारी महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणीही १० वी मध्ये ही परीक्षा देऊ शकतो. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखत घेऊन त्यातून निवडक मुलांना संस्थेमध्ये प्रवेश मिळतो. ती परीक्षा देण्यासाठी माझे वडील मला पुण्याला माझ्या काकांच्या घरी घेऊन आले होते.

तसे बघितले तर ही माझ्या जीवनाची पहिलीच मुलाखत होती. मुलाखतीसाठी पूर्णपणे तयारी असावी म्हणून संध्याकाळी आम्ही सगळे मला नवीन कपडे आणि बूट विकत घ्यायला गेलो. तिथे स्पोर्टस् शूज विकत घेताना मला निळ्या रंगाची एक बुटांची जोड फारच आवडली. माझ्या काकांना ते कळाले व लगेच ते म्हणाले, “निळे बूट नको. तो जय भीम वाल्या लोकांचा रंग आहे.” माझे काका जे अभियंता पदवीधर आहेत व पुणे शहरातील रहिवासी आहेत त्यांना रंगाचा हा भेदभाव करताना बघून मला फारच मोठा धका बसला. माझ्या घरात मोकळे वातावरण होते आणि दोन्ही पालकांनी आम्हा दोघा भावंडांना आमच्या आयुष्यातील निर्णय घेण्यास मार्गदर्शन केले होते आणि खंबीर पाठिंबाही दिला होता. त्यामुळे रंगाच्या या भेदभावाला मी काकांसमोर आक्षेप घेतला आणि वडिलांच्या परवानगीने तेच निळे बूट विकत घेतले.

ती मुलाखत मी उत्तीर्ण झालो आणि तिथून माझी सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू होण्याची धडपड सुरू झाली. पुढची दोन वर्षं मी औरंगाबादमध्ये १२ वीनंतर असणार्‍या ‘एनडीए’च्या परीक्षेच्या तयारीत घालवली. लहानपणापासून असलेले माझे निवासी शाळेत जाण्याचे स्वप्न मी जगत होतो. भारतीय सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत मी माझे दोन वर्षांचे सगळे प्रशिक्षण पूर्ण केले.

घरापासून दूर राहण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. माझे वडील केंद्र सरकारचे कर्मचारी होते व त्या कारणामुळे जन्मापासून दहावीपर्यंत ज्या परिसरात मी वाढलो होतो तेथे भारताच्या कानाकोपर्‍यातून आलेले लोक व त्यांची मुलं होती. एकंदरीत तिथलं वातावरण थोडं मोकळ्या विचारांचं व भेदभावरहित होतं, पण बाहेर जगाशी संपर्क कमी; म्हणजेच आमचं जीवन विहिरीतल्या बेडकासारखं होतं. औरंगाबादमध्ये जाऊन मला बाहेरच्या जगातल्या गोष्टी कळू लागल्या आणि हेही कळलं की फक्त जुन्या पिढीतील नव्हे, तर माझ्या पिढीतील मुलांची मानसिकताही बर्‍यापैकी मागासलेली होती. सगळीच साक्षर माणसे सुशिक्षित असतात असे नाही, हेही वारंवार दिसून आले. घरी असलेल्या वातावरणामुळे व एकंदरीत माझ्या घडू लागलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे बर्‍याच वेळा मी माझ्या सवंगड्यांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले, धर्म आणि जातीचे भेदभाव न करण्याबद्दल वादविवाद केले; पण कुठल्याही व्यक्तीच्या मनावर बालपणापासून झालेले संस्कार, तो ज्या वातावरणात लहानाचा मोठा झाला त्यामुळे त्याच्या मनाचे बसलेले वळण व त्याचे घडलेले व्यक्तिमत्त्व बदलणे किंवा त्याच्या मानसिकतेत परिवर्तन आणणे किती अवघड असते याची मला जाणीव झाली.

धावत पळत परीक्षेच्या अभ्यासाची शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक तयारी करत कधी दोन वर्षे निघून गेली ते कळलेही नाही. एनडीएच्या परीक्षेचा क्षण आला आणि लेखी परीक्षेत आमच्या संस्थेतील ४३ मुलांच्या तुकडी मधील ३९ मुले उत्तीर्ण झाली. लेखी परीक्षेनंतर होणार्‍या एसएसबी चाचणीत सुद्धा मी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झालो पण त्यानंतर होणार्‍या भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय चाचणीत मला कायमस्वरूपी नापास केले गेले. लहानपणापासून बघितलेल्या देशासाठी फायटर पायलट बनण्याच्या स्वप्नाचा क्षणभरात चुराडा झाला. आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या घटनेत अपयशी होण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता.

मला जेवढे वाईट वाटत होते त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त वाईट माझ्या आई-वडिलांना वाटले असावे, पण याची थोडी ही भनक न लागू देता दोघांनीही आधारस्तंभ बनून मला धीर दिला. औरंगाबादची वाटचाल आता संपली होती व पुढे पदवी शिक्षणासाठी मी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज येथे बी. एस्सी. पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. हवाई दलात जाण्याचा मार्ग जरी बंद झाला असला तरी भारतीय सैन्यात-पायदळात सामील होणे मला शक्य होते आणि त्यासाठी पदवी शिक्षणानंतर ‘सीडीएसइ’ परीक्षेत उत्तीर्ण होण्याचा ध्यास मी घेतला.

एनडीएच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर व बी.एस्सी. मध्ये अ‍ॅडमिशन घेतल्यानंतर बर्‍याच वेळा माझ्या आई-वडिलांना “तुमचा मुलगा तर हुशार होता, टॉपर होता मग इंजिनिअरिंग का नाही करत?” असे टोमणे व टिप्पणी यांना सामोरे जावे लागले. बर्‍याच लोकांनी तर या अपयशाचे कारण देव-देव न करणे आणि नास्तिक असणे याच्याशी जोडले. अर्थातच माझ्या आई-वडिलांनी हे सगळे त्या वेळेस मला कधीही माहीत पडू दिले नाही, पण माझ्या संघर्षासोबत त्यांचाही तितकाच किंवा अधिक खडतर असा संघर्ष चालू होता हे मला नंतर कळाले.

कॉलेजमधली तीन वर्षं उनाडक्या करत कधी निघून गेली कळलेच नाही. या तीन वर्षांत मी अनेक नवीन मित्र-मैत्रिणी बनवले. त्या वेळेस ठाऊक नव्हते की या मित्र-मैत्रिणी मधील सुवर्णा नावाच्या एका जिवलग मैत्रिणीशी मी नंतर लग्न करेन. मी कॉलेज संपवले व त्यानंतर ‘सीडीएसई’च्या परीक्षेतही उत्तीर्ण झालो. त्यानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमध्ये मी दाखल झालो आणि दीड वर्षांच्या अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर सैन्य दलात ‘लेफ्टनंट’ या पदावर रुजू झालो. पुढची चार वर्षे सैन्यात घालवल्यानंतर वयाच्या २६ व्या वर्षी अखेरीस तो प्रसंग आला की मला माझ्या घरी लग्नाचा विषय काढावा लागला.

‘तिशी होण्याआधी माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही’ असे बजावून सांगितलेल्या आपल्या मुलाने लग्नाचा विषय काढला यावर सुरुवातीला आई-वडील भलतेच आश्चर्यचकित झाले होते. कॉलेजमध्ये असल्यापासूनच बर्‍याच वेळेस मला नातेवाइकांनी ‘आपल्याच जातीतली मुलगी निवड’ असे बजावले होते अथवा ‘आंतरधर्मीय विवाह तर करणार नाहीस ना?’ असे विचारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच आई-वडिलांनी मला जोडीदाराच्या निवडीबद्दल कसलेच बंधन घातले नव्हते. लग्नाचा विषय निघाल्यावर कुठली मुलगी आहे? तू तिला कधीपासून ओळखतोस? असे प्रश्नही विचारण्यात आले.

पुढचे पाच-सहा महिने आम्ही दोघांनी आपापल्या घरच्यांची, ‘आमचा निर्णय ठाम आहे’ अशी समजूत घातली. सुवर्णा ही पुण्यातल्या ब्राह्मण घराण्यातली होती आणि मी जातीने मराठा! तसं बघितलं गेलं तर नातेवाइकांना आक्षेप घेण्यासारखे काही नव्हते आणि आई-वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे, जरी त्यांचा आक्षेप असता तरीही मला त्याचा फरक पडणार नव्हता. कारण माझे विचार! पण सुवर्णाच्या घरी मात्र अशी परिस्थिती नव्हती. आपला देश जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर असे आपण कितीही गुणगान गायले तरी आजसुद्धा एका मुलीला आंतरजातीय प्रेमविवाह करण्यामध्ये किती अडचणी येतात हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. असाच लढा तिलाही आपल्या घरी द्यावा लागला. मुळातच जातिधर्माच्या भेदभावावर आम्हा दोघांचा विश्वास नव्हता, पण तिच्या घरी मात्र आम्हाला हे पटवून देण्यात पाच-सहा महिन्यांचा वेळ लागला.

मुख्य प्रश्न आंतरजातीय विवाह करण्याचा नसून लग्न कसे करायचे हाही होता. आम्हा दोघांनी पहिलेच ठरवले होते की लग्नामध्ये पैसे न उधळता कोर्ट मॅरेज करू या. पण आमच्या मुलीचं लग्न सर्व विधींसह व्हावे अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती. आश्चर्याची बाब म्हणजे माझ्या आईला सुद्धा असे वाटत होते. अखेरीस कशीबशी आम्ही ‘कोर्ट मॅरेज हा उत्तम उपाय आहे’ अशी सर्वांचीच समजूत घातली. कोर्ट मॅरेज हे दोघांच्या घरच्यांनी जरी मान्य केले असले तरी त्यांनी ही अट घातली की सर्वांसमोर हॉलमध्ये रजिस्ट्रारला बोलवून करू या. दोघांच्या घरच्यांनी आमच्या प्रेमविवाहास मान्यता दिल्याने आम्हा दोघांना ही मागणी मान्य करावी लागली आणि कोर्ट मॅरेज करून आपण पैसे वाचवू या हा आमचा उद्देश बर्‍यापैकी धुळीस मिळाला. आज माझ्या लग्नाला एक वर्षाहून अधिक कालावधी उलटून गेला आहे आणि आम्हा दोघांचे कुटुंबीय आमच्या जोडीदाराच्या निवडीबाबत अत्यंत खूश आहेत.

एकूणच माझ्या आयुष्यातल्या या सर्व वाटचालीतून मला बर्‍याच गोष्टींची शिकवणूक मिळाली आहे. आजही आपल्या समाजात कित्येक ठिकाणी पदोपदी होत असणारे भेदभाव प्रचलित आहेत. साक्षर व शिक्षित लोक आज सुद्धा अनेक अंधश्रद्धांना बळी पडत आहेत. आजही बर्‍याच वेळा, बर्‍याच प्रसंगी लोक आपली विवेकबुद्धी न वापरता जात, रंग, धर्म आणि प्रांताच्या नावाखाली नको नको त्या गोष्टी करत आहेत. आपल्या समाजाला या सगळ्या बंधनातून मुक्त करून सहनशीलता, तर्कशुद्धता आणि विवेक यांच्या आधारे प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर करण्याचा आपल्या सर्वांचा नेहमीच प्रयत्न असायला हवा, हीच माझी इच्छा आहे.

(विवेक कडलास्कर हे इंडियन आर्मीमध्ये कॅप्टन म्हणून सध्या भटिंडा, पंजाब येथे कार्यरत आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]