डॉ. नरेंद्र दाभोलकर : धर्मांध शक्तींच्या विरोधातील प्रतीक!

राजीव देशपांडे -

20 ऑगस्ट, 2021 ला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला आठ वर्षे झाली. या आठ वर्षांत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्याबरोबर इतर डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी त्यांच्या खुनाच्या तपासाचा प्रश्न सातत्याने रस्त्यावर आणि न्यायालयात चिकाटीने लावून धरला. त्यामुळे खुनाच्या खटल्यात खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 आणि ऑगस्ट 2018, मे 2019 मध्ये अटक करून संशयितांवर आरोपपत्र दाखल जरी केले असले, तरी अद्यापि दोन संशयित आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्यापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सीबीआयने हे सूत्रधार शोधून काढावेत, ही मागणी घेऊन ‘महाराष्ट्र अंनिस’ने ‘सूत्रधार कोण?’ ही मोहीम चालविली आणि तिला संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशातील विविध भागातूनही मोठा पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रातील विविध शाखांनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’, आदरांजली सभा, कँडल मार्च अशा विविध मार्गांनी (ज्याचा सविस्तर वृत्तांत आम्ही याच अंकात इतरत्र दिलेला आहे) प्रशासनाला सूत्रधाराचा छडा लावण्यासंदर्भात निवेदने दिली. 14 ते 20 ऑगस्टचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारजागराचा ऑनलाइन कार्यक्रम’ आणि 20 ऑगस्टचा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’; तसेच ‘सूत्रधार कोण?’ मोहीम या कार्यक्रमांना सर्वसामान्य जनतेचा विविध भागांतून मिळालेला प्रतिसाद पाहता डॉ. नरेंद्र दाभोलकरांची प्रतिमा आता फक्त अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर व्यापक अशा फॅसिस्ट आणि धर्मांध शक्तींच्या विरोधातील प्रतीक म्हणून उभी राहत आहे. याचाच धसका घेत सनातन्यांनी त्यांना शरीराने संपविल्यावर त्यांच्या वैचारिक मांडणीचे विकृतीकरण करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याची मोहीम सुरू केलेली आहे. पण माणूस मारण्यात जरी त्यांना यश आले तरी त्यांच्या विचाराच्या विकृतीकरणाच्या मोहिमेला आपल्या कामाने आणि विचारांची व्यापकता वाढवत चोख उत्तर देण्याची जबाबदारी ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांवर येऊन पडली आहे. ते ती निश्चितच पेलतील, असा विश्वास या सर्व कार्यक्रमांचे वृत्तांत वाचल्यावर ‘अंनिवा’च्या वाचकांना वाटेल.

ऑगस्ट महिन्यात भारताच्या व एकूणच जगाच्या दृष्टीने चिंता वाढवणार्‍या घटना आपल्या शेजारील देशात – अफगाणिस्तानात – घडल्या. गेली वीस वर्षेठिय्या दिलेले अमेरिकेचे सैन्य अमेरिकेने माघारी घेतल्याने राष्ट्रीय आर्मीचा पराभव करून तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. ज्या-ज्या वेळेस अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी शक्तींनी एखाद्या देशाचा आक्रमकपणे ताबा घेतला आहे, तेथे-तेथे दहशतवादी संघटना वाढीस लागलेल्या आहेत. अफगाणिस्तानातही अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे ‘तालिबान’सारख्या संघटना रुजलेल्या आहेत. तालिबानी सत्तेचा मागील अनुभव आणि त्यांचे धर्मांध मूलतत्त्ववादी स्वरूप यामुळे अफगाणिस्तानचे भवितव्य खूपच अस्थिर बनले आहे. मागील तालिबानी राजवट वांशिक सौहार्द, स्त्रियांचे अधिकार आणि अल्पसंख्याकांचे अधिकार याबाबत अतिशय क्रूर आणि प्रतिगामी होती. आता या तिन्ही मुद्द्यांबाबत त्यांची भूमिका काय राहणार, यावरच त्या देशाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. धर्मांध शक्ती फोफावल्यानंतर काय परिस्थिती होते, याचे अफगाणिस्तान हे नेमके उदाहरण आहे. त्यामुळे दहशतवादी, धर्मांध संघटनांना वाव देणार्‍या साम्राज्यवादी शक्तींना आपल्या देशात वाव न देणे, हे आपल्या देशाची धर्मनिरपेक्ष रचना अबाधित ठेवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. हा धडा अफगाणिस्तानमधील घटनांवरून आपण घेतला पाहिजे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]