-

॥ चिंतन ॥
रस्त्याच्या कडेला एक वृद्ध
शेवटच्या घटका मोजत होता.
पोट पाठीला टेकलेले
पायांना भेगा पडलेल्या..
पोटाशी पाय कवटाळलेले…
स्पष्टच होतं कैक दिवसांचा उपाशी
अन्
शरीरावर नावापुरत्या चिंध्या!
तिथून चारजण बारमधून बाहेर पडले होते,
जे कुठल्या व्यवसायांशी संबंधित होते,
हे तुम्ही स्वतःच ओळखाल..!
पहिला खिशातून पेन काढून त्याच्यावर
कविता लिहायला बसला.
दुसर्याने सिगारेटचे पॅकेट काढले आणि
त्यावरच त्याचे स्केच बनवू लागला.
तिसर्याच्या गळ्यात कॅमेरा होता….त्याने
वेगवेगळ्या अँगलने फोटो काढण्यास सुरुवात केली..
चौथा एक घाणेरडी
शिवी हासडत
म्हणाला,
‘या देशाचे काहीच होऊ शकत नाही साला,
…नालायक सरकार आहे हे!’
मग चौघांना वाटले,
सगळी मजाच निघून गेली राव…!
म्हणून ते आणखी एक पेग रिचवण्यासाठी
आणि देशातील सद्यःस्थितीवरील मघाशी
अर्ध्यातच राहून गेलेले चिंतन पूर्ण करण्यासाठी….
…..पुन्हा बारमथ्ये घुसले.
॥ नवे रामायण ॥
पुढारी-
‘उद्याचे शेड्यूल काय आहे बरं?’
सेक्रेटरी-
‘शबरीची बोरं खायची आहेत, साहेब!’
पुढारी-
‘पुन्हा तोच कंटाळवाणा ड्रामा…
हा अध्याय वगळता येणार नाही का?
आपल्या नव्या आवृत्तीत?’
सेक्रेटरी-
‘निवडणुकीचे दिवस आहेत साहेब,
त्यात चाळीस टक्के व्होटबँक…
समजून घ्या!
तशीही फक्त दोन-चार दिवसांचीच बाब आहे…
यानंतर तर तुमचे आवडते कांडच आहे..
शंबूक वध!
उडवत राहा मग मुंडकी या किड्या-मकोड्यांची!’
पुढारी-
‘चला, मग ठीक आहे…
पण शबरी….एखादी आपल्या जातीतली ठेवा!!’
॥ पक्षबदल ॥
एक
‘तुम्ही तर रामनाथच्या मेंढ्या आहात ना? -’
एकीने विचारले
‘हो.’
‘पण आता आम्हाला तुमच्या मालकाने
भरपूर किंमत देऊन खरेदी केलंय!’
दुसरीने बें बें करत उत्तर दिले.
—————
दोन
‘हे काय..?
रामनाथचे कुत्रे सुध्दा?’
पहिलीने आश्चर्याने विचारले!
‘आपल्याआधी तर ते विकले
गेले होते,’
दुसरी उत्तरली.
॥ चुकीचे बाळ ॥
काही दिवसांपासून एक-एक अक्षर जोडत
नवजात शिशू पहिला शब्द बोलू शकलं होतं आज-
‘..अल्लल्ला!’
ऐकल्याबरोबर घरात एकदम सन्नाटा पसरला..
अखेर शर्ट अंगावर चढवत बाप उठला-
‘असं वाटतंय की,
चुकून एखादं मुस्लिम लेकरू बदलून आलं आहे….
चला,
डॉक्टरला भेटून आपलं खरं बाळ घेऊन येऊ या.’
मूळ हिंदी लघुकथाः मोहनकुमार नागर
दूरभाष : 98936 86175.
पत्ताः नागर हॉस्पिटल, बृजहरी कॉलनी, गोल्डन सिटी पिपरिया,
जिल्हा : होशंगाबाद. मध्य प्रदेश – 461 775.
अनुवाद : भरत यादव