नंदिनी जाधव -

पार्श्वभूमी
विदर्भाच्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा दुर्गम, आदिवासीबहुल भाग तेथील कुपोषण, शिक्षण व रोजगाराचा अभाव, आधुनिक आरोग्यसुविधांचा अभाव, तेथील गरिबी यासाठी कायमच चर्चेत असतो. हे सगळे घटक अंधश्रध्दा वाढविण्यासाठी आणि त्यावर पोसलेल्या हितसंबंधीयांसाठी फायदेशीर असलेलेच घटक आहेत. मेळघाटातील कुपोषणाच्या समस्येबद्दल बराच गाजावाजा झाला. अनेक एनजीओनी तेथे ठाण मांडले. पण आजही तेथील ह्या समस्येवर शासनव्यवस्थेला मात करता आलेली नाही. कुपोषणातून उद्भवणार्या विविध प्रकारच्या आजारांवर उपचार करणारी प्राथमिक आरोग्यव्यवस्था उभारण्यात शासनव्यवस्था पुरेशी यशस्वी ठरलेली नाही. पारंपरिक विचारांचा प्रभाव व सक्षम आरोग्यव्यवस्थेचा अभाव यामुळे तेथील आदिवासी छोट्या मोठ्या आजारांवर दैवी उपाय करण्याचा मार्ग स्वीकारतात. आजार म्हणजे दैवी कोप आहे त्यामुळे तो बरा देखील दैवी इलाजानेच होणार असे त्यांना वाटते. असा दैवी इलाज कोण करणार? तर ज्याला अतिमानवी दैवी शक्ति प्राप्त झालेली आहे असा एखादा भूमका,भगत किंवा एखादा बाबा-बुवा हे करेल असे ते मानतात. भोळ्या-भाबड्या, पिचलेल्या आदिवासीं लोकांसाठी तो जणू देवच असतो! त्याच्या इलाजानं आपण बरे होणार यावर त्यांची कडवी श्रद्धा असते आणि याच श्रद्धेतून ‘डंबा’देण्यासारख्या अघोरी प्रथांचा जन्म होतो.
गरिबी, अज्ञान, माहिती, आरोग्य सुविधा, रोजगार यांच्या अभावाचा फायदा घेत भूमका, भगत, बाबा, बुवा हे दैवी प्रथांच्या नावाखाली विविध अवैज्ञानिक, हिंसक, अघोरी इलाज करतात. या इलाजांवर विसंबून राहिल्यामुळे रुग्णाचा आजार बळावतो; लहान मुले वा अत्यवस्थ व्यक्ती मृत्यूमुखी देखील पडतात. हे सारं मेळघाटातल्या आदिवासींसाठी नित्याचेच आहे. अशा अघोरी इलाजांमुळे होणार्या बालमृत्यूची एक तरी घटना दरवर्षी प्रसार माध्यमातून सामोरी येतेच.
अलिकडेच मेळघाटात दोन हृदयद्रावक घटना घडल्या. पहिली घटना, डिसेंबर २०२४ मध्ये चिखलदरा तालुक्यातील रेटाखेड्या गावात घडली. करणी-जादुटोणा करते म्हणून गावकर्यांनी एका सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेला अमानुषपणे मारहाण केली. पहाटे आजी शौचालयास गेल्या असताना एका माणसाने त्या आजींना पकडले व ती जादूटोणा करते असे म्हणून तिला एका खांबाला बांधून घातले, तिला मिरचीची धुरी दिली, तिच्या तोंडाला काळे फासले, तिच्या तोंडामध्ये कुत्र्याची विष्टा घातली; तसेच तिच्या हातापायावर तापलेल्या लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. त्यानंतर तिच्या गळ्यात चपलांचा हार घालून तिची गावातून धिंड काढण्यात आली. या सर्व कृतीमध्ये सर्व गाव सामील होते.
दुसरी घटना अवघ्या २६ दिवसांच्या बाळाबाबत घडली. हातरु तालुक्यातील सिमोरी गावच्या बाळाची तब्येत बिघडली. त्याला श्वास घेता येत नव्हता. आदिवासी भागात मूल आजारी पडले की डंबा देण्याची पद्धत आहे. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी त्या छोट्या बाळाच्या पोटावरती दराती(छोटसं लोखंडी खुरपे) गरम करून ६७ डंबा (चटके, डांगण्या) दिले. यानंतर बाळाची प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी बाळाला हातरुच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेलं. पण बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढे अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात नेले. एका २२ दिवसाच्या बाळासाठी पोटावरील ६७ डागण्या आणि हा वेगवेगळ्या ठिकाणाचा प्रवास किती जीवघेणा ठरला असेल याची नुसती कल्पना देखील आपण करु शकत नाही. सरतेशेवटी बाळाच्या हृदयात छिद्र असल्याने बाळाला श्वास घेता येत नव्हता हे उघड झालं.
अलिकडच्या काळातल्या या दोन घटनांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले. या दोन्ही घटना जेव्हा घडल्या त्याबाबतची पेपरमधील बातमी अंनिसच्या कार्यकर्त्याच्या वाचण्यात आली. त्यावर त्यांच्यात चर्चादेखील झाली. या दोन्ही घटना जादुटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा ठरत होत्या. आपण याबाबत काय करू शकू याबाबत विचार सुरू झाला.
मेळघाटात अनेक एनजीओ आपआपल्या पध्दतीने काम करत आहेत.मेळघाटातील समस्याचे स्वरूपही विविध अंगी, व्यापक आणि गुंतागुंतीचे आहे. आदिवासी पाड्यांवर आरोग्य व्यवस्था अतिशय बिकट स्थितीमध्ये आहे. परंतु प्रथांच्या नावे प्रस्थापित झालेले हानिकारक अघोरी उपचार थांबवणेही आवश्यक आहे. त्यामुळे वरील दोन्ही घटनांत जादूटोणाविरोधी कायदा लागू करा अशी मागणी करून प्रशासन, भगत यांच्या विरोधात केवळ निषेधात्मक आंदोलन करण्यापेक्षा लहान मुलांना ‘डंबा’ देण्याच्या अघोरी प्रथेविरोधात प्रबोधन करत प्रशासकीय यंत्रणांच्या सहाय्याने जादूटोणाविरोधी कायदा थेट जनतेपर्यन्त पोहोचविणारी प्रबोधनाची मोहीम करावी असा विचार केला. त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ,पंचायत राज संस्थातील लोकप्रतिनिधी, शासनाचे व जिल्हा परिषदेचे विविध कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचे प्रशिक्षण करणे, जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती देणारे फलक गावोगावी लावणे अशी प्रबोधन मोहीम आखावी असे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने ठरविले. अशी मोहीम जी तेथील परिस्थितीचा आंखो देखा हाल आपल्याला सांगेल, आपल्या अनुभवात भर घालेल आणि त्यामुळे संघटनेच्या कार्यक्षेत्राचा विस्तारही होईल.
अशी मोहीम काढण्याचे निश्चित केल्यानंतर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी, संजीता मोहपात्रा यांची भेट घेतली. दरवर्षी घडणार्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करू इच्छित आहे, प्रशासनाच्या साहाय्याने गावागावात प्रबोधन करत जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रचार प्रसार केल्यास गावकर्यांमध्ये जनजागरण होईल आणि कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडण्यापूर्वी ते किमान एकदा विचार करतील हे त्यांच्यापर्यंत पोहोचविले. त्यांच्या सहकार्याने मोहिमेची रूपरेषा आखली. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने गावात प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्याचे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात राहण्याची सोय या व्यतिरिक्त खर्चाचा कोणताही बोजा प्रशासनावर न टाकता मोहिमेचा सर्व खर्च महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्याचे निश्चित झाले.
मोहिमेचे उद्घाटन

दि. १७ मार्च २०२५ पासून मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. पंधरा दिवसांच्या या पहिल्या टप्प्याची सर्व जबाबदारी अंनिसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव (पुणे)यांनी घेतली. त्यांचेसोबत भगवान रणदिवे(सातारा) श्रीकृष्ण धोटे (अमरावती) हे कार्यकर्ते आणि आणि २७ वर्षांचा सागर बावणे हे वाहन चालक मोहिमेत सहभागी झाले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ आणि ‘आरोग्य विभाग अमरावती जिल्हा’ यांच्या संयुक्त विद्यमाने काढलेल्या अघोरी डंबा (डागण्या) प्रथाविरोधी जनजागृती मोहिमेसाठी जादुटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पोस्टर चिकटवलेली गाडी सज्ज झाली. अमरावतीच्या ईरवीन चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करुन व वंदन करून मोहिमेला सुरुवात झाली. शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले तहसीलदार श्री विजय लोखंडे यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी मोहिमेला सदिच्छा देण्याकरिता राज्य कार्यकारिणी सदस्य मुक्ता दाभोलकर, प्रा प्रवीण देशमुख- मुंबई, मिलिंद देशमुख- पुणे, नरेंद्र कांबळे- वर्धा, नागपूर पश्चिम अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ विकास होले, विजयाताई श्रीखंडे, आधार फाउंडेशनचे श्री प्रदीप बाजड, श्री वसंत भाकरे, रक्तदान समिती अमरावतीचे उमेश पाटणकर, व्हिजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटना मुंबईचे अध्यक्ष प्रा. डॉ प्रमोद वानखडे, कॉम्रेड सुभाष पांडे, मुन्ना सवई यांच्यासह इतर सामाजिक संघटनांचे अनेक प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते.
मोहिमेची सुरुवात

प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात झाली. त्या यात्रेत काय घडले, काय अनुभवले याचा वृतांत यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली निघत होती त्या नंदिनी जाधव यांच्याच शब्दात वाचूया. नंदिनीताई सांगतात,
“अमरावतीहून आमच्या प्रवासास सुरवात झाली. रात्री ९:३० च्या दरम्यान आम्ही चिखलदर्याला पोहोचलो. त्यानंतर जेवण करून आम्ही आरोग्य ट्रेनिंग सेंटर चिखलदरा येथे गेलो. तेथे आमची राहण्याची व्यवस्था केली होती. राहाण्याची व्यवस्था खूप छान होती. जेवणही व्यवस्थित मिळाले. पण पुढे हे सर्व असेच मिळेल की नाही हे मात्र आम्हाला माहीत नव्हते.”
“दुसर्या दिवशी सकाळी बरोबर साडेसात वाजता मी, भगवान रणदिवे आणि श्रीकृष्ण धोटे ड्रायव्हर सागर बावणेसह तयार होऊन गाडीपाशी येऊन थांबलो. कार्यक्रमाचे अजूनही नियोजन ठरत होते. आरोग्य ट्रेनिंग सेंटरच्या आजूबाजूला काही महिला येत असताना दिसल्या. त्या महिलांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की आज आमचे दिवसभर ट्रेनिंग आहे. या सर्व वेगवेगळ्या भागातून आलेल्या अंगणवाडी सेविका होत्या. बालविकासच्या खान मॅडम या त्या अंगणवाडी सेविकांच्या दिवसभराच्या ट्रेनर असल्यामुळे मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना आम्ही विनंती केली की, आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे लोक आहोत आणि मेळघाटातील ज्या अंधश्रध्देबाबतच्या प्रथा आहेत त्याविषयी आम्ही सर्व गावांमध्ये फिरणार आहोत आणि लोकांशी संवाद साधणार आहोत तर अंगणवाडी ताई हा यातला महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही यांच्याशी एक तास बोलण्याची संधी द्यावी. खान मॅडमनी लगेचच त्याला संमती दिली.”
पहिला कार्यक्रम
“आम्ही लगेचच कार्यक्रमाची तयारी केली. हॉलमध्ये बॅनर लावून घेतले. सुरुवातीलाच भगवान रणदिवे आणि श्रीकृष्ण धोटे या दोघांनी दोन चमत्काराचे प्रयोग केले व त्यानंतर मी डंबा आणि जादूटोण्याच्या प्रकाराबाबतच्या मेळघाटामध्ये घडलेल्या दोन केसेसबद्दल उपस्थित अंगणवाडी सेविकांशी चर्चा केली. महिलांना त्यांच्या गावांमध्ये कोणकोणत्या प्रथा चालतात याबाबतची माहिती विचारली तेव्हा त्यांनी जादूटोणा, भानामती, भूत लागणे या प्रथा गावांमध्ये किती सर्रास आहेत याचे अनुभव सांगितले. तसेच गावातल्या लोकांचा आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही, डॉक्टर, दवाखाना याला पैसा लागतो, त्यांची जवळची सोय नसली तर लोक भगताकडे जातात.लहान मुलांच्या लशीकरणाबाबत प्रचंड उदासीनता आहे असे त्या सांगत होत्या. त्यांचा डॉक्टरांवर विश्वास नसतो. त्यामुळं मूल आजारी पडल्यावर त्याला डॉक्टरांकडे आणले जात नाही. मात्र त्याला भगताकडे नेले जाते. भगताची जडीबुटी, डागण्या देणे यावर विश्वास ठेवतात. काही वेळा भगत अमुक प्रकारचे जेवण घातले नाही तर तमुक होईल, देव कोपतो अशा प्रकारची भीती घालून लुबाडणूक करतात. डंबा हा प्रकार प्रत्येक गावामध्ये कसा दिला जातो याबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मी जादूटोणाविरोधी कायद्याच्या संदर्भात माहिती दिली.कार्यक्रमांमध्ये जादूटोणा विरोधी कायदा, बालविवाह या संदर्भात माहिती सांगितली.सर्व गावातल्या साधारण १२७ महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या.”
“या कार्यक्रमांमध्ये तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली. आमच्या अंगणवाडी ताईंना नक्कीच याचा फायदा होईल.अशा प्रकारचे ट्रेनिंग सातत्याने होणे आवश्यक आहे असे महिला बाल विकासच्या ट्रेनर खान मॅडम यांनी आम्हाला सांगितले आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे त्यांनी आभारही मानले.”

अंगणवाडीचा कार्यक्रम झाल्यानंतर ट्रेनिंगसाठी आलेले आदित्य पाटील आणि महेश वाडे यांच्याशी चर्चा केली. जवळच्या गावांतील शाळेमध्ये हे कार्यक्रम करूया असे सुचविले असता त्यांनी लगेच तयारी दर्शवली. जवळच असलेले आमदरी, खटकली या दोन गावामधील शाळेमध्ये कार्यक्रम घेण्याचे ठरवले परंतु मुले मोहाची फुले गोळा करण्यासाठी जात असल्यामुळे शाळेत मुलांची संख्या कमी होती. त्यामुळे जवळ असलेल्या खटकली गावातील शाळेच्या मुलांना आमदरीच्या शाळेत आणण्यात आले. अंगणवाडीच्या मुलांपासून ते पाचवी पर्यंतची मुले होती. शाळेमध्ये प्रथम भगवान रणदिवे, श्रीकृष्ण धोटे या दोघांनी चमत्काराचे प्रयोग दाखवले.त्यानंतर मी मुलांशी संवाद साधला. खरेच चमत्कार घडतात का? भूत आहे का? चमत्कार कसे घडले जातात या बाबत विश्लेषण केले आणि महत्वाच्या मुद्याला हात घातला. इथे मी एकटी बोलणार नव्हते तर मला मुलांना बोलते करायचे होते. त्यानुसार मी त्यांना प्रश्न विचारत गेले. हिंदी मुलांना व्यवस्थित समजत असल्यामुळे हिंदीमध्ये त्यांना प्रश्न विचारायला सुरवाती केली. पहिला प्रश्न,
“बीमार हो तो कहा जाते हो?”
“भूमका के पास”
“भूमका क्या करता है?”
“भगोती देता है, दाणा फेक के देखता है, कौनसी बीमारी है”
“भूमका पढा-लिखा होता है? या डॉक्टर?”
“डॉक्टर…….”
“तो हमे कहाँ जाना चाहिए?”
“डॉक्टर के पास…”
असे प्रश्न विचारून झाल्यानंतर मुलांना एक चित्र दाखवले व त्यावर मुलांना प्रश्न विचारले असता मुलांनी त्या चित्राचे वर्णन केले.त्या चित्रांमध्ये एक भूमका म्हणजे मांत्रिक एका छोट्या मुलाला तापलेल्या सळईने पोटावरती डंबा (डागण्या) देत होता. चित्र दाखवून त्याबाबत प्रश्न विचारले असता मुलांनी याला डंबा म्हणतात असे सांगितले. मग परत मी प्रश्न विचारत गेले कारण मुलांकडून सर्व माहिती जाणून घेणे महत्वाचे होते.
“डंबा क्यू दिया जाता है?”
“बीमार होने के बाद पेट फूल गया तो, पेट मे दर्द होने के बाद डंबा दिया जाता है”
“डंबा किससे दिया जाता है?”
“दराती ….. ( छोटे खुरपे)”
“कहा दिया जाता है?”
“पेट पे…”
“दराती से डंबा कैसे दिया जाता है?”
“दराती चुली मे गरम करके”
“डंबा किसको दिया है?”
मुले हाथ वर करून मुझे यहा दिया है!(कोणी कोणी शर्ट वर करून दाखवत होते)
“डंबा कौन देता है?”
“माय(आजी), दाजाजी, भूमका”
“डंबा देते वक्त दर्द होता है?”
“हां….” केविलवाणे चेहरे करून बहुतेक मुले उत्तरे देत होती.
“हे विचारत असताना माझ्या मनाला खूप यातना होत होत्या. रुढी परंपरेचा पगडा या आदिवासी लोकांवर इतका होता की, डंबा देताना त्यांचे हात पाय कसे पकडतात आणि पोटावर डंबा (चटका, डांगण्या) देतात हे पण कृती करून मुले दाखवत होती.समोर दिसणारे चित्र मला विचलित करत होते. मनाची कालवाकालव होत होती. डोळ्यात अश्रू येत होते. अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत स्वतःला सावरत मुलांशी परत संवाद चालू ठेवला.मुलांना परत हे समजावून सांगावे लागले की तुमचे आईवडिल शाळेत गेले नाहीत. त्यामुळे त्यांना हे माहीत नाही. रुढी परंपरेचा पगडा आणि अज्ञान असल्यामुळे ते या गोष्टी करत होते.आता तुम्ही शाळेत शिकता त्यामुळे तुम्हांला हे माहिती आहे की आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जायचे आणि औषध घ्यायचे. आपण आपल्या आईवडिलांना सांगितले पाहिजे. आजारी पडले की, मला भूमकाकडे नाही तर दवाखान्यात घेऊन चल.”
“भगवान से दुवा लेना और डॉक्टर के पास क्या लेना?”
मुलांचे उत्तर, “दवा……” असे असायचे.
आमचा हा पहिला कार्यक्रम यशस्वी झाला होता. मुलांशी कसा संवाद साधायचा हे माझ्या लक्षात आले होते. असाच पॅटर्न प्रत्येक शाळेत मांडायचा आणि मुलांना बोलते करायचे ठरवले. सोबत ट्रेनिंगसाठी आलेले महेश सर आणि गणेश गोगलकर सर या दोघांनीही आमची मुलांशी संवाद साधण्याची पद्धत खूप आवडली. तुमच्यामुळे आम्हांलाही खूप काही शिकायला मिळाले. अशा प्रकारे प्रत्येक शाळेत गावात कार्यक्रम झाला तर नक्कीच याचा फायदा होईल असे मत त्यांनी मांडले.
प्रत्यक्ष गाव पातळीवरील मोहीम, कार्यक्रम, संवाद

यानंतर खर्या अर्थानं आमची गावपातळीवर मोहिम सुरु झाली. धोटे सर अमरावतीचे असल्याने त्यांना या भागाची तशी बर्यापैकी माहिती होती. परंतू मी आणि रणदिवे या भागाला पूर्णपणे नवखे होतो.बर्याच गावात ९९ टक्के कोरकू आदिवासी होते. एखादे घर गवळी, बलई यांचे होते.मेळघाटामधले आदिवासी शेती करत असले तरी अन्न पुरेशा प्रमाणात निर्माण होत नाही. शेती प्रामुख्याने कोरडवाहू आणि तिच्यातून कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके धान्य कधीच पिकत नाही. ज्वारी, बाजरी, मका, कुटकी यासारखे तृणधान्य तसेच उडीद, मटकी, तूर ही कडधान्य शेतातून काढली जातात. पालेभाज्या, फळभाज्यांचे प्रमाणही कमी त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण जास्त पाहावयास मिळते.
आम्ही सकाळी गावात पोहचायचो त्यावेळी मोहाच्या फुलांचा आणि शेतीतल्या कापणीचा सिझन असल्यामुळे गावात कुणी भेटायचं नाही.त्यामुळं आम्ही प्रथम शाळांमध्ये जात होतो. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक अशा तिन्ही शाळा करेपर्यंत दुपारचे चार वाजायचे. त्यानंतर गावात वस्तीला असलेल्या वयस्क महिला-पुरुषांना भेटत असू. एकेका गावात तीन- चार वस्त्या असत. त्या विविध वस्त्यांवर जात असू. कामाला गेलेले स्त्री-पुरुष संध्याकाळी येत. मग त्यानंतर महिलांना स्वयंपाक पाणी असायचं. ते झाल्यानंतरच बैठक शक्य होती. गावातील अंगणवाडी ताई, आशा ताई, सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील अशा लोकांच्या भेटी घेऊन गावात दवंडी फिरायची. मग गावकरी गोळा होत. त्यांचा अर्धा तास त्यांनी द्यावा अशी त्यांना विनंती करायचो. मात्र पुढचे दोन तास ते आमच्यासोबत बसत.रणदिवे, धोटे सुरूवातीला चमत्कारांचे प्रात्याक्षिक दाखवत. त्यानंतर त्यांना भूताचे प्रयोग दाखवत असू. मग भास कसे होतात, चमत्कार कसे घडतात यावर माहिती देत असू.
“आदिवासी लोक कार्यक्रमाला येणार नाहीत, ऐकणार नाही असे सुरवातीला आम्हांला सांगितले गेले होते. पण इथे तर वेगळेच चित्र होते. लोक मोठ्या संख्येने कार्यक्रम पाहाण्यास येत होते. दीड तास कार्यक्रम चालायचा. त्यात भगवान रणदिवे आणि श्रीकृष्ण धोटे चमत्काराचे कधी एक तर कधी दोन दोन प्रयोग करायचे. ते प्रयोग पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे. पाण्याने आणि बिना वातीचा दिवा कसा पेटतो? दोन मोठ्या साखळीमधून छोटी कडी कशी निघते? विहिर, बोरचे पाणी कुठे लागेल हे दाखवणारा पाणीवाला बाबा नारळाच्या साहाय्याने पाण्याचा शोध कसा घेतो?. त्रिशूल जिभेतून आरपार कसे टाकतात?हे सर्व प्रयोग पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटायचे हे असे कसे घडते? खरंच चमत्कार आहे का? असे लोक विचारायचे. पण त्यामागील विज्ञान आणि हातचलाखी सांगितल्यानंतर हा चमत्कार नाही हे त्यांना पटायचे.मग आम्ही त्यांना भूत किंवा देवाची भीती दाखविली आणि फसवणूक केली तर शिक्षा करणारा जादूटोणाविरोधी कायदा आहे, त्या कायद्यामुळे शिक्षा होऊ शकते हे सगळं सांगून मांत्रिकाकडे जाणे, जादूटोणा याबद्दल चर्चा करत असू.”

कामाला जाणारे स्त्री-पुरुष रात्रीच भेटायचे. बर्याचदा गावात वीज नसायची, चौकात सोलरवर लाईट असायची, त्या लाईटच्या खांबाखालील प्रकाशात आम्ही रात्री कार्यक्रम करायचो. कधी गाडीचा लाईट चालू करुन त्या प्रकाशात लोकांशी संवाद साधायचो. म्हशीचा गोठा असेल, एखादी पडवी असेल, झाडाखाली उन्हात बसूनही माहिती दिली जात होती. लोकांना आम्ही बोललेलं पटत होतं. आम्हाला अशा प्रकारे कुणी माहिती सांगितली नव्हती. आमच्या गावात प्रथमच असा कार्यक्रम झाला असल्याचे ते सांगत होते.त्यांना आमच्याबद्दल इतका विश्वास निर्माण व्हायचा की ते आम्हाला त्या गावात घडलेल्या अंधश्रद्धेच्या घटना न घाबरता सांगायचे. कार्यक्रमानंतर आम्ही त्यांना शपथ घ्यायला सांगत होतो. त्यात ते म्हणत, हम अपने गांव में अंधश्रद्धाओं को थारा नहीं देंगे. अपनी बेटियों की शादी अठरा बरस पूरे होनेपरही करेंगे, बीमार पडने पर बच्चों को अस्पताल लेकर जायेंगे.
“भगत गावात आल्यानंतर अख्खं गाव भगताच्या भोवती जमा होते. एका गावातल्या भगताशी आम्ही चर्चाही केली आणि त्याची कार्यशैली समजूनही घेतली. तेथील गावात शेजारच्या मध्य प्रदेशातून खटियावाले बाबा येतो आणि तो सगळ्या गावांमध्ये खटिया घेऊन फिरतो. गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या घरापाशी थांबून हा व्यक्ती करणी करतो असा त्याच्यावर आरोप करतो आणि त्या व्यक्तीला खटियाने मारतो आणि मग त्या व्यक्तीला मंतरलेले पाणी प्यायला देतो. आता याने कोणावर जादुटोणा केला तरी कोणताही असर होणार नाही असेही सांगतो आणि ही व्यक्ती एक वर्षात मरेल अशी भीतीही निर्माण करतो. जादुटोण्याचे आरोप केलेल्या दोन ठिकाणच्या व्यक्ती भीतीने मृत्य पावल्या. त्यामुळे लोकांना असे वाटायला लागले की, खटियावाले बाबाकडे खरेच शक्ती आहे. त्यामुळे बाबावर विश्वास बसतो. हे भोळे भाबडे आदिवासी लोक बाबा जे म्हणेल त्यावर विश्वास ठेवतात.या भगतांचा आदिवासींवर प्रचंड प्रभाव आहे, दहशतच! त्याच्याविरोधात काही करणे तसे अवघडच. मात्र आम्ही तयारच असायचो. भगत करत असलेले नारळ फोडण्याचा, त्यातून रंग, वस्तू काढण्याच्या चमत्काराचा भांडाफोड जेव्हा व्हायचा तेव्हा लोक म्हणायचे,‘भगत तो हमको उल्लू बना रहा था.’ यापुढं जाऊन त्यांची होत असलेली आर्थिक फसवणूकही उघड करायचो. शेतात दिवसभर काम करुन तुम्ही दोन चारशे रुपये कमवता, तुमच्या स्वत:कडे पुरेसं अन्न जेवण नाही आणि भगताच्या मागे हजारोंनी खर्च करता. वरून त्याच्याकडून गरम सळईचा डंबा घेता हे पटतंय का? असा प्रश्न केल्यावर ते शांत बसत. विचार करत. शेवटी त्यांना असंही सांगायचो की तुम्हाला भगताकडे जायचंच असेल तर जा मात्र फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. आजारी असाल तर औषधे घ्या आणि त्याची दुवापण घ्या. मात्र तो जर म्हणत असेल औषधं सोडून द्या तर ते मानू नका.”

“भगताच्या चमत्कारांच्या भांडाफोडीमुळे त्याची दहशत थोडी कमी झाल्यावर लोक आमच्याशी बोलू लागले. गावातल्याच एकानं एक घटना आम्हाला सांगितली.एका गावात एका तरुण मानसिक आजाराने ग्रस्त होता. तो अचानक अस्थिर झाल्याने गावातल्या मंडळींनी त्याला अकोल्याला एका खाजगी दवाखान्यात नेले. तिथं डॉक्टरांनी गोळी चुकवायची नाही म्हणून सल्ला दिला. गावी परत आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला भगताकडे नेले. भगताने त्याला औषध सोडण्यास सांगितले. तरच तो उपचार करणार होता. त्यानुसार तरुणानं गोळी घेणं बंद केलं, पण आठच दिवसात त्याची स्थिती खराब झाली. त्याला पुन्हा दवाखान्यात न्यावं लागलं.हे सारे सांगताना तो तरुण आणि त्याचे वडील तिथेच उपस्थित होते. मग आम्ही गावकर्यांना त्या उदाहरणातूनच भगत कसा उपचार करू शकत नाही हे पटवून दिलं.”
“डंबा देण्याच्या बाबतीत आम्ही गावातल्या लोकांना विचारले तर त्यांनी संगितले डंबा भगतच देतो असे नाही तर घरातील कोणीही वयस्क बाई,पुरुष डंबा देतो.तर काहींच्या मते, केवळ भगतच डंबा देतो. दराती (छोटे खुरपे) गरम करून त्याचे चटके पोटावर किंवा जिथे वेदना होत असतील तेथे दिले जातात. काही लोकं म्हणत होते आता गावात डंबा दिला जात नाही. ते जुन्या काळात होतं आता बंद केले आहे. पूर्वी गरीबी होती तर लोकांना कळायचं नाही. आता लोक दवाखान्यात जातात. तर काही जण डंबा अजूनही दिला जात असल्याचं मान्य करत होते. एकुणच आदिवासी पाड्यांवर कमी अधिक प्रमाणात का होईना अद्यापही डंबा देण्याचा प्रकार घडतो हे स्पष्ट होतं. त्यामुळं तिथं जनजागरण करण्याची गरजही आहे.”
“ज्या भागात आरोग्य केंद्रे होती त्या भागात छोटी एखादी टपरी असायची. गावातल्या लोकांना इथे हॉटेल कुठे आहे म्हटले की, ते ती टपरीच दाखवायचे. त्या टपरीवर पोहे, समोसा, चहा मिळायचा.सकाळी जाताना पोहे, सामोसे असे काहीतरी खायचो. चहाबरोबर बिस्कीट खायचो. त्यावरच दिवस काढायचो, तर कधी अंगणवाडीमध्ये बनवलेल्या खिचडीवर भूक भागवायचो. मुरमुरे, चिवड्याचे दोन तीन प्रकार, बिस्कीट पुडे सोबत असायचे. कार्यक्रम करून यायला उशीर व्हायचा तेव्हा सुरूवातीला रात्रीचे पण जेवण मिळायचे नाही. पण नंतर त्यांना आम्ही जेवणाचे डबे आणून द्यायला सांगू लागलो. रात्री रूमवर आल्याआल्या हात धुवायचे, डब्यातील जेवण असेल ते खायचे, जेवताना दुसर्या दिवशीच्या कार्यक्रमाचे नियोजन करायचे. तेथे आम्ही बघितले की या आदिवासी मुलांचे आईवडील पहाटे शेतावर जात, तेव्हा अंगणवाडीत जी खिचडी मिळे तेच त्यांचे रोजचे जेवण असे. आमचे तर हे तात्पुरते होते! जेवण आणि इतर सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत म्हणून मोहीम अर्ध्यावर टाकून परत येण्याचा विचार मात्र कधी आमच्या मनात आला नाही.उलट १५ दिवसांची मोहीम आम्ही आणखी वाढवली आणि २१ दिवसांची मोहीम पार पाडली.”
“सुरूवातीला आम्हाला जंगल, निसर्ग याचे खूपच अप्रूप वाटत होते. पण मातीने भरलेल्या खाच खळग्याच्या उंच सखल रस्त्यांनी ते अप्रूप कोठल्या कोठे पळाले.सर्वात मोठा प्रश्न होता डिझेल, पेट्रोल कसे मिळवायचे? त्यासाठी आम्हाला महाराष्ट्राचे जिथे शेवटचे गाव आहे त्या गावापासून कच्च्या रस्त्याने हायवेकडे मध्यप्रदेशात जावे लागत होते. रस्ते अतिशय अरुंद. पण सागरने, आमच्या ड्रायव्हरने अजिबात कुरकुर केली नाही, तो काही कार्यकर्ता नव्हता पण मोहिमेच्या प्रभावाने मात्र तो अखेरीला आंनिसचा चमत्काराची प्रात्यक्षिके करण्याइतका कार्यकर्ता बनला.”
समारोप
“आमचा हा असा खडतर दिनक्रम तब्बल २१ दिवस चालला. १७ मार्च २०२५ रोजी मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आणि त्याचा समारोप ७ एप्रिल २०२५ रोजी झाला. खरेतर हा पहिला टप्पा पंधरा दिवसाचा होता. पण तो आम्हीच २१ दिवसांपर्यंत वाढविला. चिखलदरा तालुक्यातल्या ७२ गावांत ही मोहीम पोचली. प्रत्येक गावातील अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, आश्रम शाळा, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आणि प्रत्यक्ष गावकरी या सर्वांसाठी हे कार्यक्रम आम्ही घेतले.प्रत्येक गावात दोन/तीन/चार ढाणे असल्यामुळे गावातील प्रत्येक ढाण्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आले. या एकवीस दिवसांत आम्ही तिघांनी मिळून ७२ गावात चमत्कार प्रात्यक्षिके व जनसंवादाचे एकूण १४० कार्यक्रम केले. दर दिवसाला सहा ते सात चमत्काराची प्रात्याक्षिके, चर्चा, माहितीची देवाणघेवाण, प्रश्नोत्तरे असे १४० प्रयोग केले.”

“आम्हालाही या मोहिमेमुळे खूप शिकायला मिळाले. थेट आदिवासी जनतेशी संवाद साधता आला. त्यांचे प्रश्न प्रत्यक्ष समजावून घेता आले. त्याचा फायदा या मोहिमेच्या पुढील टप्प्यात नक्कीच होईल. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रतिमा एक सकारात्मक चळवळ करणारी संघटना म्हणून उभी करण्यात आम्हाला नक्कीच यश आले. एवढी मोठी मोहीम आम्ही यशस्वीपणे पार पाडली याचा आम्हाला संघटनात्मक पातळीवरही नक्कीच फायदा होईल. या मोहिमेमध्ये कार्यक्रमांचे संयोजन, दुर्गम भागातील निवास व्यवस्था यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेच्या आरोग्य, ग्रामविकास, शिक्षण विभागातील इतर कर्मचार्यांचे सहकार्य मिळाले. त्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. संजीता मोहपात्रा, चिखलदरा गट विकास अधिकारी मा. शिवशंकर भारसावळे व मा. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे विशेष सहकार्य लाभले. या सर्वांचे आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा आणि प्रोत्साहन याशिवाय ही एवढी मोठी मोहीम पार पडणे शक्यच नव्हते त्यामुळे त्यांचेही आभार मानते आणि या मोहिमेच्या पुढील टप्प्यांसाठी असेच सर्वांचे सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त करते आणि थांबते.”
(मेळघाटातील ‘डंबा’ प्रथा विरोधी जनजागरण मोहिमेला प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियातून चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे शासकीय यंत्रणांचे लक्ष मेळघाटातील प्रश्नांकडे वेधले गेले. सार्वजनिक आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेत आपल्या व्यवस्थेत कोणत्या त्रुटी आहेत याची पाहणी करण्याचे ठरविले आहे, तसेच आदिवासी जनतेने भगत/मांत्रिकाकडे जाण्याऐवजी रुग्णालयात जावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी भगतांची समुपदेशन प्रक्रिया चालू करण्याचे ठरविले आहे. जनजागरण मोहिमेचा पुढील टप्पा २७ मे रोजी सुरू होत आहे. १२ जूनपर्यंत हा दौरा चालेल. या टप्प्यात नंदिनी जाधव यांच्यासह मिलिंद देशमुख (पुणे), शंकर कणसे (सातारा) आणि गाडीचा चालक सागर यांचा सहभाग आहे.)
नंदिनी जाधव संपर्क : ९४२२३ ०५९२९
वृत्तांत संकलन – राजीव देशपांडे