मला समजलेले दाभोलकर सर

डॉ. कृष्णा मस्तुद - 9822355645

१९८९ चं ते वर्ष होतं. मी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस च्या दुसर्‍या वर्षात शिकत होतो. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मी गावी म्हणजे टेंभूर्णीला (ता. माढा) गेलो होतो. तेव्हा तिथं असलेल्या उजनी इरिगेशन कॉलनी मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर सरांचं व्याख्यान आयोजित केल्याचं मला समजलं तसंच अंनिसची शाखादेखील टेंभूर्णीत सुरु करणार आहेत असं त्या कॉलनीतल्या श्री. हिंगसे आप्पा यांच्याकडून मला समजलं. हिंगसे आप्पा आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. ज्या जनता विद्यालयात मी दहावीपर्यंत शिकलो तिथल्या सर्व शिक्षकांना तसंच गावातील समविचारी लोकांना या अंनिसचं सभासद करण्याविषयी हिंगसे आप्पा प्रयत्न करत होते. माझे मोठे बंधू शिक्षक होते. ते अंनिसचे सभासद झाले. या निमित्तानं एक स्मरणिका देखील काढायचं ठरलं.

मी या सर्व गोष्टी सुट्टी असल्यामुळं जवळून अनुभवत होतो. मनामध्ये एक वेगळीच उत्सुकता आणि कुतुहल निर्माण झालं होतं. हे काहीतरी वेगळं आहे, भन्नाट आहे असं मनाला वाटत होतं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू करण्याविषयी असं काहीतरी कुणाच्या मनात येईल ही ही कल्पनाच मनाला स्वीकारायला जड जात होती. कारण त्यावेळी अंधश्रद्धा स्वतःच्या घरापासून अवतीभवती, सर्वत्र समाजामध्ये इतक्या पसरलेल्या आणि मुरलेल्या होत्या कि त्या अंधश्रद्धा आहेत की जीवनाचा भागच आहे हे देखील स्पष्ट करण्याची ताकद समाज हरवून बसला होता. ज्यांच्या हे लक्षात येत असेल ते लोक देखील आपण यावर काय करणार? असं म्हणून अशा गोष्टींकडं दुर्लक्ष करत. कुणीच यांविषयी मनापासून काही बोलत नव्हतं काही ठोस करण्याचा प्रश्न तर दूरच.

मी देखील याहून वेगळा नव्हतो. कारण लहानपणापासूनच हे अंधश्रद्धेचं विष मेंदूत मुरत गेलं होतं. पण माझ्यामध्ये काय चूक आणि काय बरोबर असलं पाहिजे हे द्वंद्व सतत मनाच्या पातळीवर चालू होतं हे मला आजही आठवतं. समाजाच्या खालच्या स्तरावर जीवन जगत (?) असलेला मी, माझं घर, माझी गल्ली आणि गावातील सर्वसामान्य लोक आणि सोबतीला आम्हाला जखडून टाकणारी अंधश्रद्धेची कर्मकांडं हे असं किती वर्षांपासून चालू होतं आणि पुढं आणखी किती वर्ष चालू राहणार असले प्रश्न कुणालाच पडलेले मला प्रकर्षानं जाणवलेलं मी पाहिलं नाही! हेच आमचं जीवन!

डॉ. दाभोलकर सरांच्या व्याखानाचा दिवस उगवला. मी जीवाचे कान करुन सरांना ऐकत होतो. पहिल्यांदाच चाकोरीच्या बाहेरचं आणि भन्नाट असं काहीतरी ऐकत होतो. करणी, भानामती, भूत-पिशाच्च यांविषयीच्या जनमाणसांच्या मनात रुजलेल्या आणि त्यांविषयींच्या कर्मकांडाच्या गोष्टींविषयी सर तार्किकपणे आपले विचार मांडत होते. चमत्कार करणार्‍या बाबा-बुवा, महाराजांविषयीच्या कथा सांगत होते. सत्यनारायणाची कथा आणि त्या कर्मकांडात अडकलेला समाज यांविषयी पहिल्यांदाच सरांची चिकित्सक पद्धतीनं केलेली मांडणी मी ऐकत होतो. तथाकथित आणि काल्पनिक ब्रह्माच्या मुखातून, बाहूतून, पोटातून, पायातून निर्माण केलेली वर्णव्यवस्थेची चिरफाड मी पहिल्यांदाच सरांकडून ऐकत होतो. हे खोटच असणार हे माझं अंतःर्मन देखील मला आधीपासूनच सांगत होतं; पण जातीव्यवस्थेच्या घाणीत अडकलेल्या मी आणि माझ्यासारखेच कित्येकजण सारासार विचार करण्याची कुवतही हरवून बसल्यानं कमालीचा न्यूनगंड मुरलेल्या आमच्या मनात कुणाशी यांविषयी वाद-विवाद, चर्चा करण्याची ताकद देखील त्यावेळी आमच्यामध्ये कुठं होती? कुठल्याही गोष्टींविषयी चिकित्सा, तार्किकता आणि विवेक हे शब्द तशा अर्थानं मी पहिल्यांदा सरांच्या तोंडून ऐकत होतो. चिकित्सा, तर्क, विवेक या शब्दांच्या संकल्पना आणि त्यांच्या व्यापक, सखोल अशा अर्थापासून आपण किती कोसो दूर आहोत याची जाणीव मला सरांना ऐकताना पहिल्यांदा झाली. सरांच्या व्याख्यानातील मुद्दे आणि भवतालच्या वस्तुस्थितीचं चित्र जेव्हा माझ्या डोळयासमोर आलं तेव्हा समाज कोणत्या विदारक अवस्थेत अडकलाय आणि याची त्याला कल्पनाच नाही हे प्रकर्षानं माझ्या लक्षात आलं. तेव्हा शिक्षण पूर्ण झालं की सरांच्या या कामात स्वतःला झोकून द्यायचं असं मी मनोमन ठरवलं. सुट्टी संपून जेव्हा सोलापूरला जाणार्‍या बसमध्ये बसलो तेव्हा याच विचारांचं काहूर माझ्या मनात दाटलं होतं. पण एक वेगळी वैचारिक उर्जा घेऊन मी पुन्हा कॉलेजला चाललो होतो. आत्मविश्वास वाढला होता. कुठल्याही प्रोफेशनल कॉलेजमध्ये अती गुणवत्ताधारक मुलांची एक लॉबी असते तशी ती आमच्या होस्टेलवर पण होती. सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना तसं काही देणं घेणं नसतं. हे चित्र अजूनही तसंच आहे. अशा कर्मठ मित्रांचं तोंड बंद करायला मला दाभोलकर सरांच्या व्याख्यानानं एक ताकद मिळाली होती. आजही अशा सो कॉल्ड प्रोफेशनल मेडीकल आणि आयआयटीमधल्या कॅम्पसमधील कर्मठपणा कमी होत नाही ही शोकांतिका आहे. गुणवत्ता या व्यापक संकल्पनेपासून ही ‘मार्कवान’ जनता अजूनही कोसो दूर आहे. त्यांच्या गुणवत्तेला एखाद्या झाडाला वेढून टाकणार्‍या वेलीप्रमाणं अंधश्रद्धेनं जखडून टाकलं आहे. अशा प्रोफेशनमधून बाहेर पडलेलं प्रोडक्ट कसं काम करतं हे आपण आजही बघतोच आहोत. असो.

तेव्हापासून दाभोलकर सरांच्या मी प्रेमात पडलो. त्यांच्याबद्दल अपार आदर मनात निर्माण झाला. माझं एमबीबीएस झालं. आणि गंमत म्हणजे मला एम.डी.साठी सायकिअ‍ॅट्री हा विषय मिळाला. मन, मानसिकता, मानसशास्त्र, मनोविकारशास्त्र आणि अंधश्रद्धा या गोष्टी कशा एकमेकांशी घट्ट चिकटलेल्या आहेत हे कुणाला आता वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणून जेव्हा मी बार्शीला मनोविकारतज्ञ म्हणून काम सुरु केलं तेव्हा याच विषयाला समांतर असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम माझ्याकडून सुरू झालं. अंधश्रद्धेविषयी प्रबोधन हा माझ्या रोजच्या रुणांच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या उपचाराचा एक भाग होऊन बसला. सरांनी लिहिलेली सर्व पुस्तकं वाचून काढली. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा सभासद झालो. ‘साधना’चा ही सभासद झालो. त्यावेळी त्या अंकातील गोविंद पानसरे सरांच्या लेखांमुळंही भारावून गेलो. बार्शीच्या अंनिस शाखेचा अध्यक्ष झालो. बार्शी आणि आसपासच्या शाळा महाविद्यालयांतून या विषयी व्याखानं द्यायला लागलो.

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेले डॉ. बी. वाय. यादव सरांनी मला संस्थेचा सभासद करून घेतलं. त्यामुळं संस्थेत देखील या विषयाच्या संदर्भात काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे डॉ. यादव सर आणि डॉ.दाभोलकर सर मिरजेच्या मेडिकल कॉलेजमधील वर्गमित्र असल्याचं यादव सरांकडूनच गप्पांच्या ओघात एकदा मला समजलं. मी त्यावेळी संस्थेचा सांस्कृतिक विभाग पाहत होतो. मी आणि यादव सरांनी दाभोलकर सरांना संस्थेत बोलवायचं ठरवलं. अंनिसचे बार्शी शाखेतील त्यावेळचे कार्याध्यक्ष हेमंत शिंदे सर तसंच अशोक कदम सर आणि आम्ही सर्वांनी मिळून दाभोलकर सरांशी संपर्क साधून कार्यक्रम निश्चित केला. दाभोलकर सर माझ्या घरी मुक्कामास राहतील असं ठरलं. त्यावेळी सरांचं विज्ञान वाहीनीचं काम चालू होतं. त्यांना सकाळी उठून पुढं लातूरला जायचं होतं. संस्थेतील सरांचं व्याख्यान खूपच सुंदर झालं. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जाणिवा या विषयांवर सरांनी आमच्या मुलांचं प्रबोधन केलं. जगदाळे मामांच्या संस्थेतील मुलांना असं काहीतरी देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत असतो. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेनंतर फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांच्या दिशेनं जाणारी कर्मवीर जगदाळे मामांची संस्था आहे, याची दाभोलकर सरांनाही जाणीव होती.

सरांचं व्याखान झाल्यानंतर त्या रात्री घरी आमच्या मॅडम डॉ. वर्षा यांनी छान मासे बनवले होते. दाभोलकर सर, यादव सर आणि मी छान गप्पा मारत जेवण केलं. सरांनी मॅडमचं मासे छान बनवलेत म्हणून कौतुक केलं. जेवण झालं तरी रात्री एक वाजेपर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आमच्या गप्पा चालूच होत्या. सामाजिक परिस्थिती तसंच पारंपरिक अंधश्रद्धांमध्ये हल्ली तरुणांमध्ये धर्मांधतेची कशी भर पडत चाललीय आणि ती आता समाजाला कुठं घेऊन जाईल यावरही आम्ही चर्चा केली. जात व्यवस्था आणि त्यावर आंतरजातीय विवाहाची गरज यांवरही आम्ही बोललो. उत्सुकता म्हणून मी डॉ. हमीदच्या नावाची कथा त्यांच्याकडून जाणून घेतली. रात्री जागरण झालं तरी सरांनी पहाटेच उठून त्यांचे सकाळचे व्यायाम प्रकार केले. आम्ही ब्रेकफास्ट घेतला आणि सर पुन्हा भेटू म्हणून लातूरला रवाना झाले.

पण सर पुन्हा भेटलेच नाहीत. माझ्याकडून गेल्यानंतर महिन्याभरातच सर गेल्याची बातमी सकाळी-सकाळीच टिव्हीवर समजली. विश्वासच बसेना पुन्हा पुन्हा बातमी बघू लागलो. खूप मोठा धक्का होता तो.

१९८९ ते २०१३ या कालावधीत दाभोलकर सरांनी अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक जाणीवा, विवेक वाहिनी या क्षेत्रात डोंगराएवढं काम करून ठेवलंय. पण त्यांच्या विरोधात काम करणार्‍यांची संख्याही वाढत गेली. कारण त्यांना धर्माशी काही घेणं देणं नव्हतं तर लोकांना अज्ञानात ठेवणं हाच त्यांचा इतिहास राहिला आहे. लोक सजग झाले, तर आपली पुरोहीतशाहीची दुकानं बंद पडतात की काय अशी त्यांना भीती वाटत होती. दाभोलकर सर, पानसरे सर, गौरी लंकेश आणि कलबुर्गी सरांच्या खुनामुळं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या क्रांती विरुद्ध प्रतिक्रांतीच्या सिद्धांताची पुन्हा प्रचिती आली. पूर्वी खेडेगावात अंधारी घरं असायची. पण सूर्याचा कवडसा आत यावा म्हणून घरांना झरोके ठेवलेले असायचे. सूर्यकिरणांचा एक कवडसा घरात पुरेसा उजेड निर्माण करायचा. हल्ली आपण आपल्या मनाची दारं खिडक्या एवढ्या घट्ट लावून घेतल्या आहेत की, मनातला अंधार दूर करायला रोज सूर्य उगवतोय पण मावळताना स्वतःशीच पुटपुटतोय, “यांना उजेड द्यायलाच मी रोज नित्यनियमानं येतोय. उजेड देणं हेच माझं काम आहे. पण यांनी स्वतःलाच अंधारात बंदिस्त करून घेतलंय त्याला मी काय करणार?”

असो. आपण सगळे मिळून विवेकाचा जागर असाच चालू ठेऊ या! तमाम माणसांच्या मनाला उजेड देण्याचा प्रयत्न करू या!

(डॉ. कृष्णा मस्तुद हे सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि अंनिसचे कार्यकर्ते आहेत)

संपर्क : ९८२२३५५६४५


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]