मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण -

(नवरात्र विशेष)

आईने चष्मा पुसला आणि रस्त्यावर नजर टाकली. “गुंड्याभाऊ येतोय बरं!” डोळ्यांचे ऑपरेशन केल्यापासून तिला दूरवरचे दिसू लागले होते. आपल्याला दूरवरचे दिसू लागलेय, हे सिद्ध करण्याची ती संधी शोधत असते. लगेच वीरा आणि आदिने अभ्यास बाजूला सरकवला आणि दरवाजाकडे पळाले.

“होय, होय.”

“सोबत परवाचे गोड गळावाले आहेत.”

“मागे दोन लेडीज महिला पण आहेत.”

“अरे, लेडीज म्हणजेच महिला, एक कायतरी म्हण; आणि व्हा बाजूला. आपला अभ्यास करा.” – मी रागावलो, तसे ते परतले.

गुंड्याभाऊ आपल्या सहकार्‍यांसह घरात आला.

“वहिनी बाहेर या! तुम्हाला भेटायला साधक आलेत.”

काऊ हात पुसत बाहेर आली.

गुंड्याभाऊंनी सर्वांची ओळख करून दिली.

“आता नवीन काय आहे गुंड्याभाऊ?” – आईची विचारणा.

“आता नवरात्र आलंय ना! भाविकांना धार्मिक ज्ञान दिले पाहिजे.”

गुंड्याभाऊने खुलासा केला आणि गोड गळ्याच्या आप्पासाहेबांना बोलण्याची विनंती केली.

गोड गळ्याने लगेच कॅसेट चालू केली – “ताई, तुम्ही बसा ना! नवरात्रात आपण दुर्गेची पूजा करतो आहोत. हिला आद्यशक्ती म्हणतात. त्याशिवाय परा, महामाया, त्रिपुरा, त्रिपुरासुंदरी अशीही तिला नावे आहेत. याच आदिशक्तीची बंगालमध्ये महाकाली, गुजरातेत अंबामाता, तर महाराष्ट्रात महालक्ष्मी म्हणून पूजा करतात.”

“हो! पण नवरात्रीत आपण तिच्या तीन रुपांची पूजा करतो ना!” – लेडीज महिलेने आपले अस्तित्व दाखवले.

“आमच्या साधिकाताई म्हणतात ते बरोबर आहे. दुर्गेचीच रुपे आहेत.”

“महाकाली कालतत्त्वाचे रूप आहे. कालानुसार सर्व पदार्थांचा विनाश होतो. ती तमोगुणाची असून पहिले तीन दिवस तिची आराधना करावी. महासरस्वती हे गतीचे रूप आहे. गती नसेल, तर जीवन थांबते. ती सत्त्वगुणी असून तिचा रंग गोरा आहे. तिने महिषासुराचा वध केला!”

“नाही बरे! महासरस्वतीने शुंभ-निशुंभांचा वध केला, महिषासुराचा वध महालक्ष्मीने केला आहे. ती सत्त्वगुणी असून तिचा रंग गोरा आहे.” – लेडीज महिलेने दुरस्ती केली.

“हो! मग महासरस्वतीचा रंग लाल असून ती रजोगुणी आहे ना?” – दुसरी लेडीज महिला बोलली. ‘महासरस्वतीची आराधना शेवटचे तीन दिवस करावी,’ तिने भर घातली.

“पण काका, ही देवीची रुपे, तिचे रंग, तिचे गुण तुम्हाला कसे कळले?” – वीराचा प्रश्न आला.

“आपल्या धर्मग्रंथात आहे ना! प्राचीन धर्मग्रंथांत आहे.” गुंड्याभाऊ मदतीला आला. “आणि असा मोठ्या माणसाला उलट प्रश्न विचारू नये.”

“मला मेलीला काय कळतंय? पण भावोजी एवढा गोंधळ घालण्याचे कारण काय? एका देवीची तीन रुपे, तीन रंग, तत्त्वे भिन्न! एकदेवी आहे, तिला आम्ही नऊ दिवस नमस्कार करतोय! एवढं पुरे नाही का?” – काऊ.

“काऊ, असा गोंधळ घातल्याशिवाय त्याला अध्यात्म म्हणत नाहीत; सोपे सांगितले तर तुम्ही पुन्हा विचाराल का?” – मी म्हटले!

“काय, काय म्हणतोस? चिमणभाऊ!” – गुंड्याभाऊ जागा झाला.

“काही नाही! तिला म्हटले, तुझ्या डोक्यात गोंधळ आहे. अध्यात्म समजून घे!” – मी सारवासारव केली.

“हो, तर आता आपण धर्मशास्त्रानुसार घट कसा बसवावा ते पाहू बरे!” लेडीज महिलेने आता चर्चेचा ताबा घेतला!

“तांब्याच्या कलशात पृथ्वीचे रूप म्हणजे माती घ्यावी. त्याला ‘आप’ म्हणजे पाणी शिंपडावे. त्यावर तीळ, भात, मूग, उडीद किंवा राई, गहू आणि हरभरे पेरावेत. या कलशाकडे वातावरणातील सूक्ष्म पवित्र तरंग आकृष्ट होतात, त्यामुळे संपूर्ण वास्तू लाभान्वित होते. पूजकाच्या सूक्ष्म देहाची शुद्धी होते.”

“सूक्ष्म पवित्र रंग कसले हो ताई?” पुन्हा वीराने शंका विचारली.

“हे पाहा, देवी निर्गुण रुपात आहे; आपण तिची सगुण रुपात पूजा मांडतो आहोत. तिला जल अर्पण केल्यावर वीस टक्के लाभ होतो, धुपामुळे दहा टक्के, फुले अर्पण केल्याने दहा टक्के लाभ होतो.” – आप्पासाहेबांना मध्येच अडवत साधिकाताईंनी दुरुस्ती केली.

“नाही, नाही. फुले अर्पण केल्याने वीस टक्के लाभ होतो, अक्षता आणि नाणे ठेवतो, त्याने दहा-दहा टक्के लाभ होतो.”

“सुपारी राहिली की.” – दुसर्‍या लेडीज महिला बोलल्या.

“अरे हो, त्याने तीन टक्के लाभ होतो.”

“होय, पण हे लाभ मोजले कोणी? कसे मोजले?” वीराची शंका उद्भवली.

“आप्पासाहेब, एवढ्या सोप्या कार्याला असे अवघड रूप का देता आहात?”

“हे लाभ दहा टक्के की, अकरा टक्के, हे मोजले कसे? त्यापेक्षा घटस्थापनेची माहिती आईकडून करून घ्या.” – मी सल्ला दिला.

“हो आजी! तुला ठाऊक आहे? मग सांग ना आम्हाला!” – आदि, वीराने आग्रह सुरू केला.

“आमच्याकडे घटस्थापना अशी नाही करत!” आईला जोर आला. तिने सर्वांच्या वरून एक नजर फिरवली, चष्मा सरळ केला आणि सांगू लागली – “एक पसरट भांडे म्हणजे ताट घ्यायचे. त्यात शेतातील माती घ्यायची.”

“आजी! कोणाच्याही शेतातली माती चालते का?” – वीरा.

“नाही हो! आपल्याच शेतातली पाहिजे. माती पसरायची, त्यामध्ये घरातील धान्याच्या बिया पेरायच्या. बियाही आपल्याच बरे का! मध्ये एक मातीचे मडके पाणी भरून ठेवायचे. त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचा. रोज पूजा करायची, मातीवर पाणी शिंपडायचे! रोपे उगवतात. नऊ दिवसांनी घट हलवायचे. त्यासाठी शेजारच्या पाच शेतकर्‍यांना बोलवायचे. त्यांनी निरीक्षण केल्यावरच त्यांच्या हस्ते घट हालवायचा; मग त्याचे विसर्जन करायचे!” आईने एका दमात सांगून टाकले.

“मग आलेल्या मंडळींना कडाकणे आणि खोबरे देतात ना आजी?” आदिच्या तोंडाला पाणी सुटले होते.

“हो हो! आलेल्या सर्वांना कडाकणे आणि खोबरे द्यायचे.”

“ही खंडेनवमी ना आजी?” – आदि.

“हो, रे बाबा.”

“मग दुसर्‍या दिवशी दसरा, सोनं वाटायचं आणि पुन्हा कडाकणी खायची!” – आदि.

“पण तुमच्या घटस्थापनेत धार्मिक कार्य कुठेय?” एकाच वेळी गोड गळा आणि लेडीज महिलाबाईंनी प्रश्न केला!

“हीच धार्मिक घटस्थापना आहे, आम्ही पिढ्यान्पिढ्या अशीच करतोय!” – आईने ठासून सांगितले.

“पण आपल्याच शेतातली माती, आपल्याच घरातील बिया हे कशासाठी असते?” आदिची शंका.

“बरोबर विचारलं बरं!” आईने शेरा मारला आणि म्हणाली – “आपल्या शेतात रब्बी हंगामात कोणते पीक घ्यावे, कोणते पीक चांगले येईल, कोणत्या बिया रुजतील, हे घटस्थापनेने कळते.”

“ते कसे आजी?” – वीरा.

“आसपासचे पाच शेजारी येऊन पाहतात ना! ते सांगतात कोणत्या बिया चांगल्या रुजल्यात, कोणती रोपे तरारून आलीत.”

“हा शेतकर्‍यांनी घरी केलेला प्रयोग आहे. या वर्षीच्या वातावरणात, हवामानात, आपल्या शेतातल्या मातीत कोणते पीक येणार हे तपासण्याचा प्रयोग!” – मी म्हटले.

“मला मेलीला काय कळतंय? पण असे घरच्या घरी पीक संशोधन करणारे किती हुशार असतील नाही!”

“कसा लावला असेल हा शोध?” – काऊ म्हणाली.

“काऊ, ते शोध लावणारे हुशार आहेतच. पण ते, ते नाहीत. त्या आहेत; ‘महिला!’ त्या काळी स्त्रिया कुटुंबप्रमुख असायच्या! जिने शोध लावला, तिला देवी मानू लागले. तिच्या नावानेच दरवर्षी प्रयोग करू लागले” – मी!

“पण वहिनी, आता त्याचा काय उपयोग? आता हवामान, तापमान, पाऊसमान सगळं समजतंय. माती परीक्षण करता येतंय आणि आता पिकंही बदललीत.” – गुंड्याभाऊ.

“तर हो! आता बागायती पट्ट्यांत सगळे ऊस लावताहेत. तर जिरायत पट्ट्यात कापूस, फळबागा, ज्वारी आहे. आता असल्या प्रयोगाची गरज नाही.” – गोड आवाज.

“गरज उरली नाही म्हणून ते विसरलं गेलं. पण त्यात किचकट अध्यात्म शिरतंय ना!” मी म्हटले.

“वहिनी, ते असू दे! पण नऊ दिवसांचे नऊ रंग तेवढे लक्षात ठेवा बरं!” – लेडीज महिलेने विषय बदलला.

“हां हां! मी तुम्हाला रंग कळवीन वहिनी!” – दुसरी लेडीज महिला.

“कसले रंग काका?” – वीरा बोलली.

“नवरात्रात रोज देवीचा एक रंग आवडता असतो. त्या रंगाची साडी सर्व महिलांनी नेसावी. ग्रुपने फोटो काढले, तर वृत्तपत्रात छापताही येतात. वहिनी, आपण रोज नऊ साधिकांचा पाठवत जाऊ!”

“पण ताई! देवीला आज कोणता रंग आवडणार हे कळणार कसे?” – वीरा.

“कळते ना! त्यामागे धर्मशास्त्र आहे.” – गुंड्याभाऊने उत्तर दिले.

“धर्मशास्त्रानुसार कोणता रंग कोणत्या दिवशी वापरावा, ते धर्माचे अधिकारी सांगतात ना!” – गोड गळा बोलला.

“रावसाहेब, हे धर्माचे अधिकारी सांगत नाहीत. एका दैनिकाचे संपादक सांगतात आणि फायदा घेतात व्यापारी! साड्या विकून ते पैसा मिळवतात.”- मी खुलासा केला.

“मला मेलीला काय कळतंय? आता सगळंच पैशांवर चालतंय म्हटल्यावर, धर्म आणि देवतरी मागं कसा राहील?” – काऊने शेरा मारला.

आईने चष्मा काढला, हाताने हळुवार पुसला, त्याच हाताने डोळ्यांवर बसवला आणि पुन्हा दूरवर नजर लावली. ती खुशीत आली की, असे करते. आज तिच्या जुन्या माहितीला नव्याने झळाळी मिळाली होती.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]