अंनिवा -
दिनांक 25 जून 2021 रोजी मुंबई अंनिसतर्फे डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचे ‘पर्यावरणप्रेमाचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पर्यावरण आणि माणसांमधील संबंधांची गुंतागुंत विज्ञानाचा आधार घेऊन उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुक्ता दाभोलकर यांनी नुकत्याच होऊन गेलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक अवैज्ञानिक मेसेजेस सोशल मीडियावर कसे फिरत होते, याचा उल्लेख करून हल्ली छद्मविज्ञानाच्या भाषेत अंधश्रद्धांचा कसा प्रसार केला जातो ते सांगितले. अंनिसचे अनेक पर्यावरणपूरक कार्यक्रम आहेत. त्याबरोबरीने पर्यावरणाची जोपासना करत असताना ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे करावे, याच्या मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली. ज्योती मालंडकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.
जैवविविधतेचा र्हास, जागतिक तापमानवाढ, जागतिक रोगाच्या साथीचा सामना अशा भेडसावणार्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी लोक पर्यावरण संरक्षणाकडे वळलेले दिसतात. कुठल्याही कामात भावनिक गुंतवणूक महत्त्वाची; पण या भावनिकतेला तर्काची जोड कशी द्यावी, हे डॉ. कर्वे यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडून दाखवले. पर्यावरण म्हणजे नेमके काय? पर्यावरणाचा र्हास होतो म्हणजे काय? हा र्हास थांबवायचा म्हणजे नेमके काय करायचे? या तीन गोष्टी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केल्या.
पर्यावरण रक्षण म्हणजे नेमके काय अपेक्षित – तर मानव रक्षणासाठी पर्यावरणाची वर्तमान स्थिती अबाधित राखणे, समुचित तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व माणसांना समृद्ध जीवन जगू देणारी जीवनशैली अंगीकारणे. यासाठी व्यक्तिगत जबाबदारीपासून सुरुवात करून सामूहिक जबाबदारीकडे जाणे, सामाजिक, आर्थिक, राजकीय व्यवस्थेतील बदलांसाठी लढणे, संसाधनांचा पूर्ण र्हास होत नसेल तर संसाधनांचा वापर करणे गैर नाही. पण संसाधनांची समान उपलब्धता बघितली गेली पाहिजे.
अशाप्रकारे समुचित तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरणाची हानी टाळून, संसाधनांची समान उपलब्धता निर्माण करून योग्य जीवनशैली निवडून चांगले जीवन जगता येते हे डॉ कर्वे यांनी सहज, सोप्या शैलीत सांगितले. नंतर प्रश्नोत्तराचा भाग शुभदा निखार्गे यांनी घेतला. त्यात पर्यावरणविषयक अनेक गैरसमज डॉ. कर्वे यांनी दूर केले. समारोपात सुनीता देवलवार यांनी आभारप्रदर्शन केले.