‘म्हैसाळ’प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावावा

-

गुप्तधन, पैशांचा पाऊस यातून फसवणूक करणार्‍या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे वनमोरे कुटुंबीयांचे मांत्रिक अब्बास बागवान व त्याचा सहकारी धीरज सुरवसेकडून झालेले हत्याकांड अत्यंत निंदनीय, अमानुष आहे. या हत्याकांडाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध व्यक्त करते; तसेच वनमोरे कुटुंबीयांना आदरांजली व्यक्त करते. सांगली पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाचा योग्य दिशेने तपास केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गुप्तधन शोधण्याच्या प्रकरणात हे खून झाल्याचे प्राथमिक तपासात समजते. अघोरी अंधश्रद्धेच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे पुढे येत असल्याने या प्रकरणातील अटक केलेल्या मांत्रिकांना जादूटोणाविरोधी कायदा लावावा, गुप्तधन, पैशांचा पाऊस अशी आमिषे दाखवून लुबाडणार्‍या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’मार्फत राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात आणि फारुख गवंडी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली.

गेली अनेक महिने डॉ. माणिक आणि पोपट वनमोरे बंधू हे मुख्य संशयित मांत्रिक बागवान आणि सहकारी धीरज सुरवसे यांच्या संपर्कात होते, हे आता स्पष्ट झाले आहे. मांत्रिकांनी वनमोरे बंधूंना गुप्तधन शोधण्यासाठी मदत करण्याचे कारण दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे देखील समोर आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दैवी शक्तीचा दावा करून लोकांना फसवणे आणि ठकवणे हा गुन्हा असल्याने तातडीने या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायदा लावावा.

जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत असलेली ‘दक्षता अधिकारी’ ही तरतूद प्रभावी पद्धतीने कार्यान्वित करण्याची गरज यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. कायद्यामधील या तरतुदीनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत असतात. संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बाबा-बुवांच्या ठिकाणी जाऊन चौकशी करणे आणि गरज पडल्यास साहित्य जप्त करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत.

वनमोरे बंधू हे अनेक दिवस गुप्तधनाचा शोध घेत असल्याचे आजूबाजूच्या अनेक लोकांना माहीत होते. त्यासाठी त्यांनी अनेक खासगी सावकारांकडून पैसे कर्ज घेतले होते. यासारख्या प्रकरणांविषयी जागरूक नागरिकांनी वेळीच तक्रार केली असती आणि दक्षता अधिकार्‍यांनी त्यांची दाखल घेतली असती तर अशा घटना टाळता येऊ शकतात.

दरम्यान, सांगलीमध्ये पैशांचा पाऊस पडण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याची देखील एक घटना नुकतीच पुढे आली आहे. या दोन्ही घटना लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील दक्षता अधिकार्‍यांची प्रशिक्षण कार्यशाळा ही तातडीने आयोजित करून ती यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी देखील या वेळी त्यांनी केली.

समाजातील अनेक सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धांना बळी पडत असल्याने ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’ याविषयी समाजात प्रबोधन करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित होत आहे. सधन कुटुंबातील व्यक्ती देखील पैशांच्या हव्यासातून नोटा दामदुप्पट करणे, उल्कापातातून झालेल्या धातूचे यंत्र ‘नासा’ला विकून मालामाल होणे, पैशांचा पाऊस, गुप्तधन अशा हव्यासाला बळी पडताना दिसत आहेत. अशा प्रकारे कोणाचेही पैसे दामदुप्पट होऊ शकत नाहीत. अशा भूलथापांना लोकांनी बळी पडू नये.

अशा स्वरुपाच्या गुप्तधनाच्या दाव्यावर विश्वास ठेवणे आणि सातत्याने त्याच्या मागे धावणे, या पाठीमागे मानसिक अस्वस्थतेची लक्षणे असू शकतात. त्यामुळे गरज पडल्यास अशा व्यक्तीला बरे करण्यासाठी कुटुंबीयांनी मानसोपचारांची मदत घ्यावी, असे देखील डॉ. हमीद दाभोलकर यांनी नमूद केले. आपल्या बुद्धीचा वापर करून, चिकित्सा करूनच मग निर्णय घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 29 जूनला ‘महाराष्ट्र अंनिस’च्या शिष्टमंडळाने म्हैसाळ गावाला भेट देऊन वनमोरे कुटुंबाच्या नातेवाईकांची, गावकर्‍यांची भेट घेतली. म्हैसाळ ग्रामपंचायतीच्या सोबत अंधश्रद्धा निर्मूलनाविषयी प्रबोधन कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले.

सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची भेट घेऊन ‘महाराष्ट्र अंनिस’मार्फत त्यांना म्हैसाळ प्रकारणात जादूटोणाविरोधी कायदा लावण्याची मागणी करण्यात आली. यावेळी ‘अंनिस’चे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संजय निटवे, प. रा. आर्डे, चंद्रकांत वंजाळे, आशा धनाले, त्रिशला शहा उपस्थित होत्या.

अंनिस’च्या मागण्या :

1) सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पैशांचा पाऊस पाडणार्‍या, गुप्तधन शोधून देणार्‍या, बायंगी भूत विकणार्‍या अशा मांत्रिकांच्या टोळ्या कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. या टोळ्या अत्यंत हुशारीने, चलाखीने आणि संघटितपणे गुन्हे करतात, लोकांना फसवतात.

2) दुर्मिळ वस्तू ‘नासा’ला विकल्यानंतर करोडो रुपये मिळवून देऊ, असा खोटा प्रचार करणार्‍या परराज्यांतील काही बोगस कंपन्यांकडून जिल्ह्यातील लोक फसले जात आहेत. याचा सायबर पोलिसांनी तपास करुन ही फसवणूक थांबवावी.

3) म्हैसाळ प्रकरणात गेल्या 5 वर्षांपासून वनमोरे बंधूची जेजे मांत्रिक, बोगस कंपन्या आर्थिक फसवणूक करत होत्या, त्या सर्वांची कसून चौकशी करावी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत.

4) गुप्तधन धनाचे आमिष दाखवून आर्थिक, मानसिक फसवणूक करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. तो गुन्हा म्हैसाळ प्रकरणात लावावा.

5) जिल्हा प्रशासनाने समाजातील अंधश्रद्धा, अघोरी प्रथा या विरोधात प्रबोधन मोहीम राबविण्यासाठी ‘अंनिस’ला सहकार्य करावे.

6) यामध्ये नागरिक, महिला, विद्यार्थी, शिक्षक, पोलीस पाटील, जादूटोणाविरोधी कायद्याचे पोलीस स्टेशनचे दक्षता अधिकारी यांचे प्रशिक्षण घ्यावे.

या प्रकरणानंतर ‘अंनिस’ काय करणार?

अंनिस’चा कृती कार्यक्रम :

1) सध्या समाजामध्ये गुप्तधन, पैशांचा पाऊस अशा अघोरी अंधश्रद्धा फोफावत आहेत. या अंधश्रद्धांचे उच्चाटन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्ह्यामध्ये अघोरी प्रथाविरोधी प्रबोधन मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे. या प्रबोधन मोहिमेची सुरुवात म्हैसाळमधूनच करण्यात येईल.

2) पोलीस पाटील, दक्षता अधिकारी, शिक्षक, नागरिकांसाठी जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येईल.

नागरिकांना आवाहन :

गुप्तधन, पैशांचा पाऊस या सर्व अघोरी अंधश्रद्धा आहेत. त्यांच्या नादी लागू नका. झटपट पैसा मिळवून देण्याची आमिषे दाखवणार्‍या बुवा-बाबा-मांत्रिकांच्या आहारी जाऊ नका, अशी फसवणूक करणार्‍या बुवा-बाबांची माहिती ‘अंनिस’ कार्यकर्ते, पोलिसांना त्वरित द्या. आपले नाव गुप्त ठेवले जाईल.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]