अंनिवाचा मे 2020 चा ई-अंक अमूल्य!

अंनिवा -

एखाद्या सामाजिक संघटनेचे मुखपत्र असलेले मासिक सतत तीस वर्ष चालते, दिवसेंदिवस वर्धिष्णू राहते आणि आपल्या अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या अनोख्या कामाचा लेखाजोखा सांभाळून ठेवते ही एक प्रशंसनीयआणि उल्लेखनीय बाब आहे. सामाजिक चळवळ चालविणार्‍या संघटनेला असे सतत जवळजवळ तीस वर्षे चालणारे मुखपत्र असणे ही एक फार मोठी उपलब्धी आहे. वार्तापत्राशी संलग्न संपादक मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना हे खचित भूषणावह आहे. त्यांचे हार्दिक अभिननंदन! स्वतःला अंनिस कार्यकर्ता म्हणणार्‍या प्रत्येकाने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वाचलेच पाहिजे. आतापर्यंत वार्तापत्राचे अनेक संग्रहणीय विशेषांक निघाले आहेत. वार्तापत्राचे स्वतःचे कार्यालय आज सांगलीत उभे आहे. 14,15 मे 2016 ला सांगलीत भरलेले वार्तापत्राचे रौप्यमहोत्सवी अधिवेशन तर एक अत्यंत उच्च दर्जाचे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्य असलेली घटना होती. भारतभरातून ह्या अधिवेशनासाठी मान्यवर उपस्थित होते. ते व्यासपीठावर आले आणि बोललेही.वार्तापत्राच्या मे 2020 च्या ‘लढा कारोनाशी’ विशेषांकाच्या अनुषंगाने या कठीण काळात हे दिलासा देणारे विचार मनात आले. ह्या विशेषांकाची मांडणी मुखपृष्ठापासूनच आकर्षक झाली आहे. मिलिंद जोशी यांचे मुखपृष्ठ हे सुंदर आणि अर्थपूर्ण ग्राफिक डिझाईन आहे. अंकामध्ये विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचे लेख आहेत. सामाजिक चळवळीतील डॉ. राम पुनियानी, अ. भा. मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा.नागनाथ कोतापल्ले, शिक्षण क्षेत्रातील हेरंब कुलकर्णी, काही वैद्यक क्षेत्रातील तर काही इतर असे सात डॉक्टर हे सर्व लेखकांच्या सूचित आहेत. ऍड रंजना गवांदे, कृष्णा चांदगुडे अशा अनेक कार्यकर्त्यांनी पण आपले मोलाचे स्वानुभव या अंकात मांडले आहेत.

डॉ.राम पुनियानी हे अंकाचा मुख्य विषय ’ लढाई करोनाशी ’ ह्या विषयावर लिहिताना म्हणतात की या लढाईत अवैज्ञानिकता आणि अंधश्रद्धा ह्यांना काहीही स्थान नाही. गाईला केंद्रस्थानी ठेवून भाजप मधील कार्यकर्त्यांनी केलेले अवास्तव आणि आचरट दावे त्यांची नावे घेऊन त्यांनी आपल्या लेखात नमूद केले आहेत.

कोव्हिड 19’च्या साथीनं बहुतांश सर्व जग थांबलं आहे. पण या थांबलेल्या जगात सर्वाधिक गतीनं फिरत आहे ती म्हणजे माहिती. ‘कोव्हिड – 19 पॅनडेमिक ’ सोबतच आपण ‘कोव्हिड – 19 इन्फोडेमिक’ मधून सुद्धा जात आहोत.असे अभिषेक भोसले आपल्या ’माध्यमांचे सोशल डिस्टन्सिंग’ ह्या लेखात म्हणतात.आपल्याकडं आलेल्या स्मार्ट फोननं आता कोणीही बातमीदारी करू शकतो.पण नवीन माध्यम तंत्रज्ञानाच्या या विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पणाला लागली आहे, ती विश्वासार्हता आणि विश्वासार्ह माहिती.मागच्या अनेक वर्षांपासून तुमच्यापर्यंत खोटी, अवैज्ञानिक, एका विशिष्ट समुदायाविरोधातील माहिती पसरविण्यासाठी आयटी सेल या संकल्पनेखाली एक नियोजित व्यवस्था काम करत आहे.पण आता अशी फिरत असलेली एखादी खोटी माहिती, घटना ही खोटी असल्याचं आपण कमीत कमी वेळात सिद्ध करू शकतोय ते अल्ट न्यूज (www.altnews.in) सारख्या माहितीचं सत्य तपासणार्या माध्यमसंस्थांमुळे. आपल्या लेखात अभिषेक भोसले यांनी ही उपयुक्त माहिती दिली आहे. अ‍ॅड. रंजना गवांदे ‘कोरोनाचे संकट आणि अध्यात्मिक बुवाबाजी’ ह्या आपल्या लेखात म्हणतात की, लोकांची असहाय्यता,असुरक्षितता, अज्ञान आणि अंधश्रद्धा हे ह्या बाबाबुवांचे भांडवल आहे. ‘जिथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते’ हे त्यांचे आवडते तर्कट आहे. त्यांनी आपल्या लेखात वेगवेगळ्या अवैज्ञानिक जाहिरातींचा उल्लेख केला आहे. असे उद्योग करणार्‍या राजकीय व्यक्तींवर गुन्हे दाखल करायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याच्या लढ्यात आघाडीवर असलेले कृष्णा चांदगुडे आपल्या लेखात कोरोना संदर्भातील सामाजिक बहिष्काराचा समाचार घेतात. डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस जे आज आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी काम करीत आहेत त्यांनाच सामाजिक बहिष्काराला तोंड दयावे लागत आहे. आपला जुलै 2017 चा सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा ह्या केसेस मध्ये लागू करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत ही त्यांनी नमूद केलेली बाब अंनिस ला नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रा.नागनाथ कोतापल्ले यांनी कोरोना महामारीच्या या अनुभवातून आपण शिकण्यासारख्या महत्वाच्या तीन गोष्टी आपल्या लेखातून सांगितल्या आहेत. त्या आहेत सार्वजनिक आरोग्यावर अधिक खर्च करणे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनावर भर देणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शिक्षणात अंतर्भाव करणे.

सगळ्यात आपल्या सर्वाना भावेल असा लेख किरण मोघे यांचा आहे. ‘जगभरातील सहा महिला पंतप्रधानांनी कोरोना विरोधात केलेला संघर्ष ’ त्यात त्यांनी मांडला आहे. जर्मनी, तैवान, न्यूझीलंड, आईसलँड, फिनलंड आणि डेन्मार्क हे ते देश होत. जर्मनी मधील कोरोना-टॅक्सी ही नाविन्यपूर्ण कल्पना त्यांनी दिली आहे. तेथे अलगीकरण केलेल्या पेशंटला मोफत शिधा, पुस्तके आणि रोजचा 30 डॉलर भत्ता दिला गेला. लेखिका म्हणते स्त्री पंतप्रधानांनी अधिक सहानुभूती आणि संवेदनशीलता दाखवली. तर सो कॉल्ड लोहपुरुष उदा.अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजनशून्य रीतीने काम केले. या सहा महिला पंतप्रधानांच्या या वैशिष्ठयपूर्ण कामगिरीमुळे कोरोना उत्तर काळात अधिक स्त्रियांना पंतप्रधान होण्याची संधी मिळेल अशी आशा शेवट लेखिकेने व्यक्त केली आहे. ह्याशिवाय होमिओपॅथी उपचार, कोरोना नंतरचे शिक्षण अशा विविध विषयांवर दर्जेदार लेख या विशेषांकात आहेत. शेवट दोन सुचना मला अंनिस च्या शाखा पदाधिकार्‍यांना कराव्याशा वाटतात.

1. सध्याच्या प्रत्येक ऑनलाइन शाखा बैठकीत ह्यातील एक एक लेखाचे वाचन व त्यावर चर्चा व्हावी.

2. Hoaxbusters ची 5-6 अशी कोरोना संदर्भातील मजेशीर पत्रके ह्या विशेषांकात आहेत. ह्या पत्रकांची पोस्टर्स बनवून त्यांचे शाखांनी आपल्या कार्यक्रमातून प्रदर्शन करावे.

खास पुरस्कारपात्र असा हा दर्जेदार विशेषांक काढल्याबद्दल संपादक मंडळ आणि कार्यकारी मंडळाचे पुनः एकवार अभिनंदन आणि अंनिवा ला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त करते.

प्रभा पुरोहित, अंनिस, गोरेगाव शाखा.