रामभाऊ डोंगरे -

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय दिवसानिमित्त महा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूर शाखा व जिल्हा कार्यकारिणी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रा. एन. डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा अभियानां’तर्गत एकदिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सुगत बुद्धविहार, सुगतनगर (नागपूर) येथे आयोजित केले गेले होते. उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सामाजिक न्याय विभाग, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन मंजुषा मेश्राम मित्रजन, पतसंस्था, नागपूर यांनी केले. प्रशिक्षक म्हणून राजेंद्र कोळी , अशोक वानखेडे व स्वप्निल शिरसाट (सर्वजण ठाणे) हे होते.
या शिबिरात बाबा-बुवा करत असलेल्या विविध चमत्कारांचे प्रात्यक्षिक दाखवून त्यामागील हातचलाखी व विज्ञान समजावून सांगण्यात आले. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनसुद्धा करण्यात आले. यावेळी मन आणि मानसिक आजारावर माहितीपर व्याख्यानसुद्धा झाले. यातील प्रशिक्षणार्थी येणार्या काळात शालेय विद्यार्थ्यांसमोर वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत सादरीकरण करतील. कार्यशाळेस जवळपास 75 कार्यकर्ते उपस्थित होते.
– रामभाऊ डोंगरे, नागपूर