नरेंद्र दाभोलकरांच्या वैचारिक साहित्यावर पीएच. डी. करताना…

सिद्धार्थ सखाहरी लांडे - 9763503972

दाभोलकरांनी माझ्या पिढीसाठी जे संचित मागं ठेवलं आहे, त्याचा वापर करून तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्गमाझ्यासारख्या अनेकांना मिळालेला आहे. इथून पुढच्या पिढ्यांनाही हा विवेकाचा वारसा उपयोेगी पडणार आहे. या लेखात माझी आधीची पार्श्वभूमी सांगणं मला गरजेचं वाटलं. कारण ती नसती सांगितली तर माझ्या जीवनात जे वैचारिक बदल झाले आहेत, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलो नसतो तर झालेच नसते. विद्यापीठात डॉ. मनोहर जाधव यांच्यासारखे प्राध्यापक भेटले, त्यांच्याकडूनच दाभोलकर समजले आणि एवढे बदल जीवनात झाले.

2018 च्या एप्रिल महिन्यात मी पीएच. डी.च्या संशोधनासाठी प्रवेश घेतला. संशोधनासाठी विषय निवडला, ‘अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतून उदयास आलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या वैचारिक साहित्याचा अभ्यास.’ या संशोधनासाठी मला मार्गदर्शक मिळाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव. विषयनिवडीनंतर “मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या साहित्यावर पीएच. डी. करतो आहे,” असं कुणाला सांगितलं आणि त्यानं आश्चर्य व्यक्त केलं नाही, असं झालेलं नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या कोल्हार खुर्द या गावी आई-वडील आणि दोन भावंडांसह मी राहतो. असंख्य लोकांच्या मागे लागणारा शनि असलेल्या शिंगणापूरच्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ख्याती प्राप्त झालेल्या साईबाबांच्या शिर्डीच्या मधोमध आमचं गाव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित देवींचं मंदिरही कोल्हार बुद्रुक या गावी आहे. माझे वडील लहान असतानाच आजी त्यांना घेऊन पोट भरण्यासाठी मूळ गाव सोडून कोल्हार खुर्द या गावी कायमची राहायला आलेली. माझ्या आईचं आणि आजीचं कधी पटलं नाही. वडील मजुरी करायचे तर आई आजूबाजूच्या लोकांच्या शेळ्या राखोळीने घेऊन चारायला जायची. आम्हा तिघा भावंडांचं शिक्षणही चालू झालेलं होतं. सुरुवातीला शाळेत हुशार असूनही घरच्या लोकांनी माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं नाही. मधल्या भावाला सहावीनंतर शाळेतून घरी ठेवलं आणि एका मेंढपाळाबरोबर मेंढ्या चारायला पाठवलं. लहान भाऊ शाळेत हुशार आणि त्याला घरात सहसा कुणी कामही सांगत नसे. पाचवी ते सातवी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत मी शाळेत जायचो आणि शाळेतून आल्यावर आई जिथं शेळ्या चारत असे, त्या ठिकाणी तिला मदत म्हणून जायचो. नंतर ती घरी असलेल्या गायीला चारा कापून आणायला जायची. एक दिवस अचानक आई घुमायला लागली. शेजारीच पाचशे फुटांवर असलेल्या एका भगताच्या घरी आई घुमतच पळत जायची. तिथं लिंबू कापून तिच्यावरून फेकलं की, ती शांत होऊन घरी यायची. काही दिवसांत आईने, गावातीलच एका बाईच्या अंगात येत होतं, तिला गुरू केलं. मोठा जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला होता. गणमाळ घालून आईला परडी, आसूड, पोत, त्रिशूळ आणि कवड्याच्या माळा देण्यात आल्या. कोल्हापूरची महालक्ष्मी आईच्या अंगात यायला लागली. दर मंगळवारी आणि शुक्रवारी; तसेच पौर्णिमेच्या दिवशी आईच्या अंगात यायचं. याच दिवशी आई दारोदार जोगवा मागायला जायची. लोक वर्दी घेऊन येत आणि आईच्या वार्‍यापुढे बसून आपल्या अडचणी सांगत. आई लिंबं कापून उतरून टाकायला सांगायची. आमच्या चुलीतलीच राख काहींना उदी म्हणून प्यायला सांगत असे. आई ज्या दिवशी घुमायची, त्या दिवशी आजी तिच्याबरोबर कधीच भांडत नसे!

संसारात भरभराट व्हावी म्हणून आई अनेक प्रकारची व्रतं करायची. तिला लिहिता-वाचता येत नाही, म्हणून मीच या व्रतांच्या पोथ्यांचं वाचन करायचो. वैभवलक्ष्मीचे एकवीस शुक्रवार, मार्गशीर्ष महिन्यातले देवीचे गुरुवार, पिवळे गुरुवार, संतोषीमातेचे शुक्रवार. वडिलांना रविवार आणि एकादशी हे उपवास असायचे. घरासमोर उंबराचं झाड होतं. दत्ताचे गुरुवारी मी उपवास करायचो. बरेच दिवस मी हे उपवास केले होते. श्रावण महिन्यात घरात नवनाथाची पोथी वडील वाचत. मी पाचवीला गेल्यापासून वडिलांनी ही पोथी माझ्याकडे वाचण्यासाठी दिली. गावातील तीन-चार लोकांच्या घरीही मी नवनाथाची पोथी वाचायला जायचो. हे लोक पोथी वाचून संपल्यावर मला कपडे घेत.

एक दिवस वडिलांनी एक पत्रिका घरी आणली. तिच्यात लिहिलेलं होतं, “ही पत्रिका पायाखाली तुडवू नये; तुडवल्यास, फाडल्यास घरात काहीतरी वाईट प्रसंग घडेल, सर्पदंश होईल. या पत्रिकेच्या पाचशे, हजार ऐपतीप्रमाणे पत्रिका छापून वाटाव्यात. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.” वडिलांनी त्या पत्रिकेच्या एक हजार पत्रिका छापून आणल्या. आमच्या गावातल्या आठवडे बाजारात मला घेऊन ते पत्रिका वाटायला गेले. ज्या लोकांना या पत्रिकेबद्दल माहिती होतं, ते लोक पत्रिका घेत नसत. ज्यांना माहिती नसे ते घेत. त्यांनी वाचून परत देऊ नये म्हणून त्यांच्या हातात पत्रिका देऊन मी आणि वडील तिथून दुसरीकडे निघून जायचो. माझ्याकडून सहसा कुणी घेत नसल्याने मी एखाद्या कचर्‍यात काही पत्रिका टाकून द्यायचो; पण मनात भीती असायची की, आता घरात कुणाला काही झालं तर काय करायचं? पण कुणाला काहीच झालं नाही! पत्रिका वाटून झाल्यानंतर वडिलांनी लॉटरीची काही तिकिटे खरेदी केली. तिकिटांची सोडत ज्या दिवशी असेल, त्या दिवशी मोठ्या आशेने वृत्तपत्रात तिकिटांवरचे नंबर जुळवून पाहायचे; पण सतत निराश व्हायचे. एक दिवस एका तिकिटावरचे शेवटचे दोन अंक जुळल्यामुळे तिकिटविक्री करणार्‍या माणसाने वडिलांना दहा रुपयांची नोट दिली होती. त्या दहा रुपयांची मला थंडीत वापरायला कानपट्टी घेतली होती.

मी सहावीत होतो, तेव्हा आमच्या गावात असलेल्या ह.भ.प. भोसले महाराज यांच्याकडे हरिपाठ, भजन शिकायला जायचो. गावातील वीस-पंचवीस मुलं एकत्र जमत. महाराज आम्हाला हरिपाठाबरोबर वारकरी सांप्रदायातील ‘पावल्या’ शिकवत. आजूबाजूच्या पंचक्रोशीत अखंड हरिनाम सप्ताह असल्यावर आम्हा मुलांना घेऊन हरिपाठ म्हणायला घेऊन जात. माझा बराचसा वेळ महाराजांबरोबर जात होता. त्यामुळे दहावीत चार विषयांत नापास झालो आणि महाराजांकडे जाण्याचं बंद झालं. नंतर दहावीची परीक्षा मार्च-ऑक्टोबर करत पास झालो. मोलमजुरीची कामं करूनच बी. ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. एस. वाय. बी. ए.ला असताना मराठी विषय शिकवणार्‍या डॉ. नवनाथ शिंदे सरांचा सहवास मिळाला. त्याच वेळी शिंदे सरांचं पुणे विद्यापीठात पीएच. डी.साठी संशोधनाचं काम सुरू होतं. ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा अभ्यास’ या विषयावर सर काम करत होते. सरांनी अभ्यासाचा भाग म्हणून देवीच्या भक्तांकडून काही गाणी, मुलाखती संकलित केल्या होत्या. त्यांचं शब्दांकन मी रात्री जागून करायचो. सरांच्या घरात बहुतांश लोकसाहित्याशी निगडित पुस्तकं होती. या सर्व पुस्तकांची मी एका वहीमध्ये नोंद करायचो. या कामामुळे माझ्यातल्या मूळच्या असणार्‍या धार्मिक, आध्यात्मिक वृत्तीला खतपाणीच मिळायचं. माझ्यातल्या क्षमता सरांनी ओळखल्या असाव्यात, म्हणून त्यांनी 2012 साली मला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम. ए. करण्यासाठी जाण्यास सांगितलं. विद्यापीठात प्रवेश मिळाला नसता तर मला आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेत एका महाराजांकडे कीर्तनकार व्हायला जायचं होतं. परंतु ऑगस्ट 2012 मध्ये एम. ए.साठी विद्यापीठात प्रवेश मिळाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात ‘मराठीतील वैचारिक साहित्य’ हा पेपर प्रा. डॉ. मनोहर जाधव शिकवत. मी मात्र सोपा विषय समजून ‘लोकसाहित्यफ’ हा पेपर निवडला होता. वैचारिक साहित्याचा पेपर अभ्यासणारे मित्र, मी उपवास करतो, गळ्यात माळ घालतो म्हणून मला चिडवायचे. मी जाधव सरांना भेटलो आणि सांगितले, “सर, माझे मित्र मला मी देवाचे उपवास करतो, गळ्यात माळ घातली आहे, म्हणून चिडवतात. तुम्ही त्यांना असं काय शिकवता?” सर म्हणाले, “मी तर त्यांना असं काहीही शिकवत नाही.” मग मी सरांना विनंती केली की, “सर, मला तुमच्या तासांना बसू द्या. पाठीमागे बसून मी तुमचे तास ऐकेन.” सरांनी मला परवानगी दिली. ‘मराठीतील वैचारिक साहित्य’ या पेपरसाठी त्यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचं ‘ऐसे कैसे झाले भोंदू?’ हे पुस्तक अभ्यासाला होतं. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सोललेला नारळ आणि त्याला कुंकू लावलेला फोटो आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मनात प्रचंड कालवाकालव झाल्याचं मला स्मरतंय. त्याला कारण मागे उल्लेख केलेली घरची पार्श्वभूमी होती. यानंतर जाधव सरांकडून मला अनेक पुस्तकं वाचायला मिळाली. धार्मिक आणि शालेय पुस्तकांचं वाचन सोडून मी अवांतर असं काहीही वाचलेलं नव्हतं. विद्यापीठात आल्यानंतर वाचनाला सुरुवात झाली. मराठीतील अनेक महत्त्वाची पुस्तकं, मासिकं, साप्ताहिकं, पाक्षिकं जाधव सरांकडून मला वाचायला मिळाली.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुस्तकं वाचताना एक गोष्ट लक्षात आली, ती अशी की, अगोदर धार्मिक पुस्तकं वाचलेली असल्यामुळे दाभोलकरांनी केलेली मांडणी पटकन समजत होती. कधी डोक्यावरूनही जायचं; विशेषतः ‘प्रश्न मनाचे’, ‘तिमिरातुनी तेजाकडे’ ही सैद्धांतिक पुस्तकं समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागला. पण आतून काहीतरी बदल होतोय, असं मला वाटत होतं. दाभोलकरांच्या भाषणांच्या कॅसेट्स मला मिळाल्या. ओघवत्या शैलीत सामान्यातल्या सामान्य माणसाला समजेल, अशा शब्दांत भाषण करण्याची कला दाभोलकरांकडे होती. त्यामुळे बर्‍याच गोष्टी समजण्यास मदत झाली.

माझ्या वडिलांचं वय 69 वर्षांचं आहे. आमच्या घरच्या शेळ्या चारायचं काम ते करतात. करमणूक म्हणून मी त्यांना मोबाईल घेऊन दिलेला आहे. या मोबाईलमध्ये त्यांना हिंदी चित्रपटातील गाणी आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ऑडिओ भाषणं भरून दिलेली आहेत. शेळ्या चारताना मोबाईलमध्ये ही भाषणं सुरू असतात. वडिलांना फोन केला की ते म्हणतात, “दाभोलकर किती भारी समजून सांगतात, स्त्रिया अंधश्रद्धांना कशा बळी पडतात ते. तुझ्या आईच्या अंगात कशाची देवी न् कशाचं काय? अंगात येणं एक आजार असतो.” 2019 च्या मे महिन्यात शेळ्या चारत असताना काही मोकाट फिरणार्‍या कुत्र्यांनी आमच्या शेळ्यांवर हल्ला केला. त्यात एक शेळी दगावली. एक-दोन जखमी झाल्या. वडील जमिनीवर अंग टाकून रडत होते. माझा भाऊ आणि मी पळत गेलो. कुत्र्यांना हाकलून दिलं. वडिलांना धीर देऊन शांत केलं. दर रविवारी खंडोबाचा उपवास करत असलेल्या वडिलांना या प्रसंगी दाभोलकरांची भाषणं आठवत होती आणि ते रडता-रडताच खंडोबाला शिव्या देऊन म्हणाले, “आयुष्यभर खंडोबाचे उपवास, पूजा-अर्चा केली; पण माझी मनषी (शेळी) कुत्र्यांनी फाडली. कुत्रा म्हणजे खंडोबाचं रूप असतं. त्याच कुत्र्यांनी माझी शेळी मारली.” त्याच दिवशी वडिलांनी गळ्यातली माळ काढून टाकली. घरात ते करत असलेली सगळी कर्मकांडं बंद केली. मांसाहारही सुरू केला. दाभोलकरांच्या भाषणांचा हा सगळा परिणाम झालेला होता. कुणाचा दशक्रिया विधी असेल तेव्हा माझे वडील म्हणतात, “जिवंतपणीच काय गोष्टी करायच्या त्या कराव्यात, मेल्यावर कोण येतंय पाहायला.” मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं आहे, “तुम्हाला जे पाहिजे ते आम्हाला मागा. आम्ही ते देऊ. परंतु तुम्ही मेल्यानंतर काहीही झालं तरी आम्ही कुठलंही कर्मकांड करणार नाही.” त्यावर दोघंही म्हणतात, “तुम्हाला जे करायचं ते करा!”

माझ्या आईलाही तिच्या अंगात येण्याची कारणं मी पटवून सांगितली. यासाठी दाभोलकरांनी सांगितलेल्या मार्गाने तिचं प्रबोधन सतत करत असतो. गेल्या तीन-साडेतीन वर्षांपासून आईच्या एकदाही अंगात आलेलं नाही. परंतु घरात असलेलं देवीचं साहित्य अजूनही आईनं जपून ठेवलं आहे. अगदीच नाही; पण देवीच्या नावाने ती करत असलेले मंगळवारचे उपवास मात्र बंद केलेले आहेत. हे काय कमी नाही तिच्यासाठी!

एकंदरीत, अंधश्रद्धेने गजबजलेल्या घरात जन्मलेल्या माझ्यासारख्याला दाभोलकर भेटले ते पुस्तकांच्या माध्यमातून. 20 ऑगस्ट 2013 या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मारेकर्‍यांनी निर्घृण खून केला. त्याच दिवशी एम. ए.च्या वर्गात प्रा. देसाई सरांचा तास सुरू असताना चैतन्य डुम्बरे या मित्राने वर्गात ही बातमी सांगितली. देसाई सरांनी तास बंद केला आणि निघून गेले. जाधव सरांनी दाभोलकरांबद्दल वर्गात माहिती सांगितली. दाभोलकरांची सर्वच पुस्तकं वाचायला सांगितली. दाभोलकरांची पुस्तकं वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, ते ज्या समाजसुधारकांचा वसा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, त्या समाजसुधारकांची पुस्तकंही तुम्हाला वाचावीच लागतात आणि तिथूनच सुरू होते बदलाची खरी प्रक्रिया. दाभोलकरांनी त्यांच्या चळवळीत काम करणार्‍या कोणत्याही कार्यकर्त्याला कधी देव-धर्म सोडून चळवळीत काम करा, असं सांगितलेलं नाही. विवेकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरून राज्य घटनेने सांगितलेलं मूलभूत कर्तव्य असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार-प्रसाराचं काम ते करत होते. मला नेहमी वाटतं, महात्मा फुल्यांना जीवे मारायला गेलेल्या मारेकर्‍यांचं मन जसं त्यांनी बदललं, तसं दाभोलकरांच्या मारेकर्‍यांनी दोन मिनिटं त्यांच्याशी बोलण्याची संधी दिली असती, तर त्यांचीही मनं दाभोलकरांनी नक्कीच बदलली असती.

मराठी साहित्यामध्ये अनेक लोक पीएच. डी.चे संशोधन करतात. त्या संशोधनाचा फायदा समाजाला व्हावा; परिणामी देशाला या संशोधनाचा फायदा होऊन समाज, देश पुढं जावा हा उद्देश असतो. पण मला स्वतःला सतत असं वाटतं की, आपण करीत असलेल्या अभ्यासाचा, संशोधनाचा फायदा समाजाला होईलच; आधी तो आपल्याला स्वतःला झाला पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी दाखवलेल्या विवेकाच्या वाटेवर चालताना पारंपरिक मानसिकतेच्या समाजातील कर्मठ लोकांचा विरोध होणारच आहे; आणि चांगल्या कामाची आपल्याला किंमतच चुकवावी लागते.

मी जन्माला आलो, तेव्हा माझ्या पोटाला एक लाल नायटा होता, असं घरचे सांगतात. मग ब्राह्मणाला दाखवण्यात आलं. त्याने मी ‘नावकरी’ आल्याचं सांगितलं. माझं नाव ‘भिकचंद’ असं ठेवलं गेलं. ‘सकाळ’ वृत्तपत्राचे मा. संपादक उत्तम कांबळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये कधी थांबले की, सकाळी मी त्यांच्याबरोबर विद्यापीठ परिसरात फिरायला जायचो. माझ्या नावाचा अर्थ त्यांनी मला सांगितला, तो असा – “मारवाडी समाजात सर्वांत श्रीमंत होऊन गेलेल्या व्यक्तीचं नाव भिकचंद होतं.” लोकांना मी माझं नाव ‘भिकचंद’ आहे, असं सांगितलं की, ते उच्चार करायचे बिभीषण, बच्चन, बिच्चन… डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची ओळख झाल्यापासून हळूहळू एकेक गोष्ट बदलत जाण्याचा निश्चय मी केलेला आहे. दाभोलकरांनी मुस्लिम सत्यशोधक समाजाचे हमीद दलवाई यांच्या नावावरून त्यांच्या मुलाचं नाव हमीद ठेवलं. श्रीराम लागू यांनीही त्यांच्या मुलाचं नाव तन्वीर ठेवलं होतं. हे जेव्हा मी दाभोलकरांच्या पुस्तकात वाचलं, तेव्हा लक्षात आलं, माझं नाव तर अंधश्रद्धेतून ठेवलं आहे. मग मी ‘भिकचंद’ हे नाव बदलून गॅझेट करून ‘सिद्धार्थ’ केले.

आमच्या घराला मी ‘परिवर्तन’ हे नाव दिलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हॉस्पिटलचं नाव आहे, ‘परिवर्तन, सहयोग हॉस्पिटल.’ हे ‘परिवर्तन’ नुसतं बोलण्यात नसून ते आम्ही भावंडांनी कृतीतही आणलं आहे. दाभोलकरांचा पंढरपूरच्या वारीसंबंधी असलेला एक लेख मी वाचला. ‘वारीचे सामर्थ्य समता-संगराला लाभावे!’ हा तो लेख. वारीला आठशे वर्षांची असलेली परंपरा आपण अभिमानाने सांगतो. संतांचे विचार समतेचं तत्त्वज्ञान सांगतात. महिनाभर पायी पंढरपूरला जाणारा वारकरी जात-धर्म विसरून फक्त विठ्ठलाचं रूपच प्रत्येक वारकर्‍यांत पाहतो. प्रत्येकाला ‘माऊली’ म्हणून हाक मारतो. एकमेकांच्या पायावर डोकं टेकवतो, गळाभेट घेतो. परंतु हा वारकरी वारी संपल्यावर पुन्हा आपापल्या जातीच्या चौकटीत बंदिस्त होऊन जातो. आठशे वर्षांत फार मोठं जातिनिर्मूलन व्हायला हवं होतं; पण ते झालेलं नाही. भारतातील जाती संपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला महत्त्वाचा उपाय म्हणजे आंतरजातीय विवाह. दाभोलकरांचं अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीबरोबरच जातिप्रथा निर्मूलनाचंही काम सुरू होतं. एम. ए.पासून पीएच. डी.पर्यंत एकत्र शिक्षण घेत असलेली माझी मैत्रीण ज्योत्स्ना आणि मी दोघांच्याही परिवाराच्या परवानगीने विवाहबद्ध झालो. शाहू महाराजांनी त्यांच्या बहिणीचा विवाह एका धनगराच्या मुलाशी लावला होता, अगदी अशाच प्रकारचा आंतरजातीय विवाह आम्हा दोघांचा झालेला आहे. आमच्या लग्नात साक्षीदार म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते. ‘फुले-शाहू-आंबेडकर’ यांच्या विचारांच्या प्रेरणेने आणि आता ‘आम्ही सारे दाभोलकर’ या घोषणेला स्मरून आम्ही दोघेही आयुष्यभर कुठलंही कर्मकांड न करता विवेकाने जगण्याचा निश्चय करून संसार करणार आहोत.

दाभोलकरांनी माझ्या पिढीसाठी जे संचित मागं ठेवलं आहे, त्याचा वापर करून ‘तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा मार्ग’ माझ्यासारख्या अनेकांना मिळालेला आहे. इथून पुढच्या पिढ्यांनाही हा विवेकाचा वारसा उपयोेगी पडणार आहे. या लेखात माझी आधीची पार्श्वभूमी सांगणं मला गरजेचं वाटलं. कारण ती नसती सांगितली तर माझ्या जीवनात जे वैचारिक बदल झाले आहेत, ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलो नसतो तर झालेच नसते. विद्यापीठात डॉ. मनोहर जाधव यांच्यासारखे प्राध्यापक भेटले, त्यांच्याकडूनच दाभोलकर समजले आणि एवढे बदल जीवनात झाले. गेली आठ वर्षेदाभोलकरांबरोबरच पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांनाही न्याय मिळालेला नाही. आपण न्यायव्यवस्थेला मानणारे आहोत. दाभोलकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना म्हणायचे, तसं ‘शेवटी विजय माझाच होईल’ या त्यांच्या आत्मविश्वासाची आठवण ठेवून ‘विवेकाचा आवाज बुलंद करून’ हा वारसा असाच पुढे घेऊन वाटचाल करत राहू…!

सिद्धार्थ सखाहरी लांडे
मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-411007
मो. 9763503972
ई-मेल- siddharthlande72@gmail.com


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]