-

कोणत्याही चळवळीच्या दृष्टीने त्या संघटनेचे मुखपत्र ही फारच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यातही अंधश्रद्धा निर्मूलनासारख्या प्रबोधनपर चळवळीसाठी व प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढणार्या संघटनांसाठी तर मुखपत्र ही फारच गरजेची बाब असते. कारण इतर प्रस्थापित प्रसारमाध्यमांतून तुम्ही बहिष्कृत असता. अशावेळी संघटनेचे मुखपत्र म्हणजे संघटनेचा बाहेरच्या जगाशी असलेला संपर्क असतो, संवाद साधण्याचे साधन असते, तुमच्या संघटनेच्या वाटचालीचा आलेख, इतिहास असतो, अधिकृत दस्तऐवज असतो. तसेच ते तुमच्यावर होणार्या वैचारिक हल्ल्यांच्या विरोधातील संघर्षाचे हत्यारही असते.
संघटनेच्या मुखपत्राचे काम दुहेरी असते. केवळ रिपोर्टिंग नसते. आंदोलनांना, लढ्याला, मोहिमेला, उपक्रमाला आवश्यक तपशील पुरविणे; माहिती पुरविणे, वैचारिक सामग्री पुरविणे, त्यातून कार्यकर्त्यांना, सर्वसामान्यांना चळवळीसाठी तयार करणे, प्रोत्साहित करणे आणि मग त्या आधारावर झालेल्या ठिकठिकाणच्या आंदोलनात, लढ्यात, मोहिमेत, उपक्रमात काय घडले, याचा वृत्तांत जगाला पुरविणे. तो पुरवताना त्या आंदोलन, उपक्रम, मोहिमेच्या यशापयशाची, परिणामांची चर्चा मुखपत्रात घडवणे. थोडक्यात, आपण करत असलेल्या कामाचे एका पातळीवरील मूल्यमापन करण्याचे मुखपत्र हे स्थान आहे. त्यातूनच जशी संघटनेचा कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया सुरू होते, तशीच सर्वसामान्य वाचकांच्या मानसिकतेत बदल घडण्याच्या प्रक्रियेसही प्रारंभ होतो. त्या अर्थाने संघटनेचे मुखपत्र हे संघटनेचे बळ आहे. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ याला अपवाद नाही.
मुखपत्र आणि प्रस्थापित वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे यात मूलभूत फरक आहे. प्रस्थापित वर्तमानपत्रे ही बाजाराशी निगडित असतात, त्यांचा संबंध नफ्याशी असतो. पण मुखपत्र संघटनेशी, संघटनेच्या ध्येय-धोरणांशी निगडित असते. वर्तमानपत्राच्या लोगोत मोठमोठे क्रांतिकारी शब्द असतील; पण त्याच्याशी बांधिलकी असायलाच हवी, अशी काही अट नसते. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोगोत ‘विज्ञान’, ‘निर्भयता’, ‘नीती’ हे काही केवळ शब्द म्हणून नसतात, तर ‘विज्ञानाने प्रस्थापित केलेले सत्य निर्भयपणे आणि कालसुसंगत नैतिकतेने प्रस्थापित करणे’ हा या शब्दांमागचा आशय असतो आणि त्याच्याशी बांधिलकी बाळगतच मुखपत्राला वाटचाल करावी लागते. ही बांधिलकी मानतच आज अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र गेली ३३ वर्षे कोणतीही व्यावसायिक तडजोड न करता अनेक अडचणींना तोंड देत आपली वाटचाल करत आहे.
या वाटचालीत कार्यकर्त्याचा मोठा वाटा असतो, कार्यकर्त्यामुळेच वार्तापत्राला देणग्या मिळतात, जाहिराती मिळतात, वर्गणीदार मिळतात तसेच तो संघर्ष करत असतो, आंदोलने करत असतो. त्यामुळेच वार्तापत्र समृद्ध होत असते. वार्तापत्राचा हा सारा डोलारा उभा असतो कार्यकर्त्यांच्या जिवावर. तोच वार्तापत्राचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे हा डोलारा सांभाळणार्या कार्यकर्त्याचा सन्मान करावा, त्याला प्रोत्साहित करावे म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी असा शतकवीर, आधारस्तंभ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करत असते. पण या कार्यक्रमाला केवळ सोहळ्याचे स्वरूप न देता उत्साहाबरोबरच कार्यकर्त्याची वैचारिक, संघटनात्मक जाण वाढावी व त्यातून त्याचे लेखन कौशल्य वाढून वार्तापत्र जास्तीतजास्त समृद्ध व्हावे या दृष्टीने लेखन कौशल्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या वर्षी हा सोहळा आणि कार्यशाळा १४ आणि १५ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील हिरवेगार झाडेझुडपे असलेल्या डोंगरांच्या कुशीत, अतिशय शांत, निसर्गरम्य परिसर लाभलेल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या वास्तूत अतिशय उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जरी हा कार्यक्रम फक्त अंनिस सदस्यांसाठी असला, तरी पुरस्कारार्थी आणि कुटुंब तसेच त्यांचे शाखाकुटुंब अशी एकूण २०० जणांनी नावनोंदणी केली होती. हा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यानंतर नावनोंदणी थांबविण्यात आली होती. पण प्रत्यक्षात मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातून २५० कार्यकर्ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले.
उद्घाटन सत्र
लेखन कौशल्य कार्यशाळेच्या उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी सर्व उपस्थित मान्यवर कार्यकर्ते आणि निमंत्रितांचे वार्तापत्रातर्फे स्वागत केले आणि उद्घाटनाच्या प्रथम सत्राकरिता विचार मंचावर त्यांना पाचारण केले. त्यानंतर रायगड जिल्हा शाखेचे कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांतून आलेल्या २५० कार्यकर्त्यांचे स्वागत रायगड जिल्ह्यातर्फे केले. या वेळी विचारमंचावर उद्घाटन सत्राचे अध्यक्ष पूर्व न्यायाधीश मा. जी. डी. पारीख, उद्घाटक साधना साप्ताहिकाचे संपादक मा. विनोद शिरसाठ, अंनिवाचे संपादक राजीव देशपांडे, बालसाहित्यकार राजीव तांबे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. भाऊ सावंत आणि ज्येष्ठ अंनिस कार्यकर्त्या वंदना शिंदे उपस्थित होत्या. रायगड जिल्ह्यातील क्रियाशील कार्यकर्त्यानी पाहुण्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
नुकतेच निधन पावलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉ. सीताराम येचुरी आणि अंनिसचे खंदे कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांना दोन मिनिटे शांत उभे राहून आदरांजली वाहण्यात आली.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘डॉ. दाभोलकर घरोघरी’ या पुस्तिका मालेतील द्वितीय पुस्तिका संचातील १५ पुस्तिकांचे लोकार्पण ‘साप्ताहिक साधना’चे संपादक विनोद शिरसाठ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व कार्यशाळेचे उद्घाटन झाले असे जाहीर करण्यात आले.
त्यानंतर अंनिवा संपादक राजीव देशपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यशाळा आणि सन्मान सोहळा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना अखेरीस ते म्हणाले, “आज अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असो अगर इतर पुरोगामी चळवळ असो, या सर्व चळवळींसमोर एका बाजूला धर्मांधीकरणाचे तर दुसर्या बाजूला बाजारीकरणाचे आव्हान आहे. या धर्मांध आणि बाजारी शती केवळ ताकदवान झाल्या आहेत असे नव्हे, तर त्यांच्या हातात आज सर्वंकष सत्ता आहे. त्यामुळे संविधानाच्या विरोधी असणार्या या शक्तींच्या विरोधात संवैधानिक मूल्ये मानणार्या आपल्यासारख्यांचा संघर्ष अटळ आहे. त्यामुळे या संघर्षाला सामोरे जाण्याचे वैचारिक बळ आजच्या कार्यशाळेतून, तर उद्या होणार्या सन्मान सोहळ्यातून या धर्मांध आणि बाजारी शक्तींशी लढण्याची ऊर्जा नकीच मिळावी या हेतूने ही आजची कार्यशाळा व उद्याचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.”
प्रास्ताविकानंतर अंनिस कार्यकर्त्या रुपाली आर्डे यांनी अध्यक्ष, पूर्व न्यायाधीश जी. डी. पारीख आणि प्रमुख पाहुणे विनोद शिरसाठ यांचा परिचय करून दिला.
कार्यशाळेचे उद्घाटक व साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ हे गेले दीड दशक साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत. त्यातील बराचसा काळ त्यांना डॉ. दाभोलकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळालेली होती. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या लेखनशैलीतून आपण काय शिकायचे? या विषयावर केलेले त्यांचे प्रतिपादन प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेले होते. त्या अनुषंगाने डॉक्टरांचे लिखाण, त्या लिखाणाची शैली, त्यामधील वेगवेगळे पैलू, त्यातून त्यांची स्वत:ची झालेली जडणघडण त्यांनी मांडली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी आजच्या आव्हानांचा उल्लेख करत त्यातूनच आपल्याला संधी उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले व या संधींचा कसा वापर करून घ्यायचा याचे प्रशिक्षण अशा प्रकारच्या कार्यशाळेतून होऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यशाळा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. दाभोलकरांबरोबर झालेल्या पहिल्या भेटीबाबत बोलताना ते म्हणाले, “२००३ मध्ये विजय तेंडुलकरांनी एक फारच स्फोटक विधान केले होते. त्याचे अतिशय कडवे प्रतिसाद संपूर्ण राज्यभर उमटत होते. त्या सर्व प्रकरणाबाबतचा तीन पानी लेख मी लिहिला आणि साधनेला पाठविला आणि तो डॉक्टरांनी तसाच्या तसा छापला आणि त्यावर तीन वाक्यांत आभिप्राय दिला. तो तीन वाक्याचा अभिप्राय होता, ‘एक-या तीन पानांच्या लेखातून तुमचे वाचन-लेखन कळते, समजते. दोन-कठोर टीका करतानाही भाषा कशी सभ्य ठेवता येते ते समजते आणि तीन- तुमच्या विचारांची दिशा योग्य आहे.’ या तीन वाक्यांनी माझे आयुष्य बदलले आणि पुढे साडेनऊ-दहा वर्षे डॉक्टरांच्या सान्निध्यात मी तयार होत राहिलो.

डॉक्टरांबरोबर काम करताना आलेल्या दहा वर्षांच्या अनुभवातून आणि त्यांच्यानंतर त्यांच्या लेखनशैलीबद्दल विचार करताना आपल्याला काय जाणवले हे सांगताना ते म्हणाले, “माझा डॉक्टरांबरोबर जो संबंध आला तो मुख्यत: साधनेच्या संदर्भात. त्यामुळे मी तुम्हाला जे सांगेन ते प्रामुख्याने साधनेच्या संदर्भात! पण साधनेचा कालखंड हा त्यांचा शेवटचा आहे, त्या आधीही ते लिहीत होते. साधारण २५-२६ वर्षांपासून ते लिहीत होते. जवळजवळ ४५ वर्षे समाजात ज्या विषयांवर कोणी लिहीत नव्हते, त्यावर दाभोलकर सातत्याने लिहीत होते. दाभोलकरांच्या लिखाणाला ललित्याचे अंग आहे, पण केवळ मनोरंजन त्यात नाही, त्यांचे लिखाण चळवळीच्या तात्त्विक मांडणीच्या अंगाने जसे होते तसेच कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष कृतीला प्रोत्साहन देणारेही होते. या काळात ते वैद्यकीय अधिकारी होते, कबड्डीपटू होते. एक गाव एक पाणवठा आंदोलनात होते, समाजवादी युवक दलात होते, आदिवासींवरील अन्यायाविरोधातील लढ्यात होते, सावकारी विरोधातील आंदोलनात होते, काळाबाजार करणार्यांविरोधात ते आंदोलन करत होते. आणि या सर्व आंदोलनासंदर्भात ते लिहीत होते आणि हे सर्व लिखाण केवळ पुस्तकी नाही तर ‘अन्यायाचा त्वरित आणि तीव्र प्रतिकार’ या त्यांच्या भूमिकेतून आणि प्रत्यक्ष आंदोलनातील त्यांच्या सहभागातून झालेले लिखाण आहे. पुढे अंधश्रद्धा निर्मूलनविषयक त्यांनी केलेले लिखाणही प्रत्यक्ष आंदोलनातील त्यांच्या सहभागातूनच झालेले लिखाण आहे.
ज्या प्रकारे महात्मा गांधींनी आपल्या लिखाणाचा आणि वाणीचा वापर विचार आणि कृतीच्या दरम्यान पूल बांधण्यासाठी केला तसाच आपल्या लेखनशैलीचा आणि भाषणांचा वापर डॉक्टर दाभोलकरांनी कार्यकर्ता वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्यास आणि कृतिशील होण्यासाठी केला असे सांगून विनोद शिरसाठ यांनी डॉक्टरांची सतत नवनवीन गोष्टी शिकत राहण्याची कला आणि वृत्ती, कोणी मोठा असो वा छोटा, त्याच्याबरोबर संवाद साधण्याची कला, आपला मुद्दा योग्य रितीने कमीतकमी आणि नेमक्या शब्दांत पटवून देण्याची जबरदस्त ताकद, वेळेचे उत्तम व्यवस्थापन, उपलब्ध वेळेत विषयाची उत्कृष्ट तयारी, विषयाचे उत्तम प्रतिपादन ही सर्व त्यांची वैशिष्ट्ये त्यांच्या लेखनशैलीत कशी उतरली आहेत हे अनेक उदाहरणे देत विनोद शिरसाठ यांनी सांगितले.
नेमके शब्द आणि नेमकी वेळ याबाबतचे डॉक्टरांचे वैशिष्ट्य सांगताना विनोद शिरसाठ म्हणाले, “डॉक्टरांची मुलाखत घ्यायला कोणी आले की, मुलाखतकार बोलत ‘डॉक्टर तुम्ही बोला., तर डॉक्टरच त्यांना विचारत ‘तुमच्याकडे किती वेळ आहे ते सांगा म्हणजे मी माझा विषय तुम्हाला तेवढ्या वेळेत स्पष्ट होईल असेच बोलतो. मी एका मिनिटात विषय सांगू शकतो किंवा हवे असल्यास दहा मिनिटे त्याच विषयावर बोलू शकतो किंवा तासभर त्या विषयसंदर्भात बोलू शकतो. म्हणजे नंतर तुम्हाला एडिटची वगैरे गरज पडणार नाही.’
उद्घाटन सत्राचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश जी. डी. पारेख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रस्थापित न्यायव्यवस्थेवर व त्यासंबंधी घडणार्या घटनांवर परखड भाष्य केले. पारेख म्हणाले की, जिकडे तिकडे अंध भक्त सुकाळलेले आहेत. पिढीजात अंधभक्त व बनवलेले अंधभक्त असे दोन प्रकार सध्या अंधभक्तांचे आहेत, पण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून अंधभक्त कमी होणार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला २५ हजारांची देणगी देण्याची घोषणा त्यांनी केली.

सत्र दुसरे
कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात डॉ. हमीद दाभोलकर यांनी चळवळीसाठी लेखन का महत्त्वाचे आहे, याविषयी त्यांनी टिपलेले आपले अनुभव मांडले. हमीद दाभोलकर यांनी ऐतिहासिक दाखले देत कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. गांधी, पंडित नेहरू यांच्या विचारांतून निर्माण झालेल्या संघटनांची आजची वास्तव परिस्थिती मांडली व तरीही या महान व्यक्तींचे विचार त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून, लेखातून आपल्याला आजही प्रेरणा देतात असे प्रतिपादन केले. संत तुकारामाच्या गाथा बुडवल्या, पण त्यांना मारले नाही. कारण, त्या व्यक्तींचे लिखाण! हे उदाहरण देऊन त्यांनी कार्यकर्त्यांना सातत्याने लिहिण्याचा, व्यक्त होण्याचा सल्ला दिला. आजच्या काळात तंत्रज्ञान प्रगत झाले आहे, याचा वापर करून आपले लिखाण प्रभावीपणे लोकांपर्यंत आपण पोहचवू शकता, पण आळस आणि आत्मविश्वासाचा अभाव या कारणामुळे कार्यकर्ते लिखाण करत नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. आपल्या स्वत:च्या लिखाणाची पद्धत सांगितली. ती म्हणजे, मी लिहिलेला पहिला ड्राफ्ट हा प्रखर चिकित्सा करणार्या व्यक्तीला पाठवतो. यासाठी आपल्या लिखाणाचा पहिला कठोर वाचक कोण असेल हे ठरवतो, त्यानंतर लिखाण केल्यावर पुन्हा दोन ते तीन दिवसांनी तो पुन्हा वाचतो आणि त्यात आवश्यक ते बदल करतो. ही माझी पद्धत. पुढे त्यानी लिखाणाच्या संदर्भात तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कुठल्या गोष्टीवर लिहायचे तर सध्या घडलेल्या घटनांवर लिहायचे. वाचक कोण असणार आहे, हे लक्षात घेऊन लिहायचे आणि माध्यम कोणते असणार आहे हे लक्षात घेऊन लिहायचे.

याशिवाय त्यांनी आत्मविश्वास येण्यासाठी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे, असे मांडून जेव्हा अगदी आता लिहिलेच पाहिजे असे वाटू लागते तेव्हाच लिहिण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला दिला.
लिखाणाच्या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी लिखाण पुढील २ ते ३ पातळीवर करता येते हे मांडले. शास्त्रीय माहितीपूर्ण लेख, प्रत्यक्ष अनुभवातून आलेले लिखाण आणि मांडणीच्या पातळीवर करता येणारे लिखाण – यात आपली भूमिका असते, ज्यासाठी वाचन भरपूर असणे आवश्यक आहे.
आपल्या मांडणीच्या अखेरीस त्यांनी आपल्या लिखाणाची जाहिरात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यासाठी आजच्या काळातील माध्यमांचा वापर करत आपल्या अनुभवांची मांडणी करत चला आणि ते लिखाण सातत्याने लोकांसमोर आणत चला, असा सल्ला देत त्यांनी आपल्या मांडणीची अखेर केली.
भाषणाच्या प्रारंभी अण्णा कडलास्कर यांनी डॉ. हमीद दाभोलकर यांचा परिचय करून दिला.
सत्र तिसरे
यानंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील वरिष्ठ पत्रकार असलेले आलोक देशपांडे यांनी माध्यमांमधील लिखाण आणि आजची प्रसारमाध्यमे याविषयी मनोगत व्यक्त केले. विजय खरात यांनी त्यांचा परिचय करून दिला.

आलोक देशपांडे यानी सुरुवातीलाच वरुण ग्रोव्हर यांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति व्याख्यानात व्यक्त केलेले विधान उद्धृत केले की, आजकाल पत्रकार टीव्हीवर कॉमेडी करायला लागले आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या कॉमेडियन्सना पत्रकारिता करावी लागत आहे. यावरून आजची पत्रकारिता कशी सुरू आहे याचे वास्तव पुढे येते असे ते म्हणाले. पुढे त्यांनी आजचा मीडिया ज्याला ‘गोदी मीडिया’ हा शब्द प्रचलित झाला आहे त्या मीडियाचे बदललेले स्वरूप माडले. आजच्या पत्रकारितेच्या संदर्भात प्रसिद्ध लेखक व ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केलेले “भारतीय पत्रकारितेमध्ये संख्येची कमी नाही, तर दर्जाची कमतरता आहे” हे विधान आजच्या गोदी मिडियाच्या संदर्भात तंतोतंत लागू आहे, हे मांडून पुढे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या मालकी संदर्भात मत मांडताना, मालक फार कमी आहेत आणि त्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी ते Media Outlet काढतात व त्यावर आपले नियंत्रण ठेवतात हे भीषण वास्तव आहे असे आपले मत मांडले. यासाठी आपण आजच्या काळात ज्यांच्यासोबत डील करणार आहोत त्याबाबतची प्राथमिक माहिती असायला हवी, हे मांडतानाच आजची प्रस्थापित माध्यमे आपल्याला स्पेस देत नाहीत, देणार नाहीत. त्यामुळे आपण आपली माध्यमे निर्माण करायला हवीत, याशिवाय मुख्य माध्यमांमध्ये आपली माणसे घुसवायला हवीत, आपणही घुसायला हवं असे स्पष्ट मत मांडले.
त्याचप्रमाणे कुठलीही पत्रकारितेची डिग्री न घेता माध्यम प्रतिनिधी होणं शक्य आहे, हे मत मांडून ‘सिटीझन जर्नालिझम’ ही संकल्पना जागतिक पातळीवरच्या काही व्यक्तींच्या उदाहरणाद्वारे मांडली, त्यात त्यांनी आपल्या आजूबाजूला घडणार्या घटना टिपणे म्हणजेच सिटीझन जर्नालिझम अशी सोपी व्याख्या मांडली. या दृष्टीने आपण सगळेच सिटीझन जर्नालिझम करतोय म्हणजेच आपण सर्वच नागरी पत्रकार आहोत असे मांडले.
सिटीझन जर्नालिझमच्या संदर्भात मत मांडताना त्यांनी Fact चेक साठी सिटीझन जर्नालिझम किती महत्त्वाचे आहे हे सांगून अंनिस ही हिंदू विरोधी आहे, हा जो सतत दृष्प्रचार केला जातो याबाबत आपण मेसेजेस तयार करून त्याचा प्रचार प्रसार करू शकतो असे सांगितले. आपल्या मांडणीच्या शेवटी त्यांनी प्रामुख्याने प्रत्येक गोष्टीचे डॉक्युमेंटेशन करणे, ते डॉक्युमेंटेशन सोशल मिडिया, ब्लॉग यावर प्रकाशित करणे, स्वतःचे यू ट्यूब चॅनल सुरू करणे, ई-मेल मार्केटिंग, प्रेस रिलीज लिहिणे इत्यादी माध्यमांचा उपयोग करून आपले लिखाण, आपले विचार लोकांसमोर आणण्याचे आवाहन केले.
सत्र चौथे
दुपारच्या सत्रात प्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी ‘चला लिहू या’ या विषयावर दोन तासांची विशेष कार्यशाळा घेतली. राजीव तांबे यांनी विविध प्रात्यक्षिके देऊन अतिशय प्रभावीपणे आणि सगळ्या उपस्थितांना सहभागी करीत आपल्यात असलेल्या सुप्त सर्जनशीलतेला चालना कशी द्यायची, त्याचा लेखनात वापर कसा करावा याबद्दलचे बारकावे हसत खेळत अतिशय गमतीदार शैलीत सांगितले. यात त्यांनी अनेक छोट्या छोट्या अॅक्टिव्हिटीजच्या माध्यमातून ‘मल्टी डायमेंशन थिंकिंग’ची संकल्पना स्पष्ट केली. पुढे त्यांनी लिखाणाच्या संदर्भात चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

पहायचं आणि लिहायचं- बातमी, क्रिएटिव्ह व्हर्च्युअल इमेजेस – दृश्य प्रतिमा तयार करणे, दृश्य निर्माण करायचे आणि त्यात आपले विचार व आयडियाज टाकणे आणि व्हर्च्युअल सिच्युएशन तयार करणे.
पुढे त्यांनी नवीन शब्द तयार करण्याचे फार गमतीशीर खेळ घेतले आणि लिखाणाच्या संदर्भात त्यांनी एक गिझर फॉर्म्युला सांगितला. ज्यात त्यांनी दोन शब्द सांगितले, बादली आणि तारा, या दोन शब्दांच्या आधारे वाक्य बनवायचे, पण त्यासाठी ७ मिनिटे शांतपणे विचार करायचा आणि मग ८ व्या मिनिटाला लिहायला सुरुवात करायची. सगळ्यांनी खूपच उत्साहाने आणि प्रभावीपणे यात भाग घेत दोन शब्दांच्या आधारे वाक्ये बनवली.
राजीव तांबे यांनी घेतलेल्या अशा प्रकारच्या अनेक छोट्या छोट्या अॅक्टिव्हिटीजमुळे लिखाणाचे अनेक बारकावे या कार्यशाळेत कार्यकर्त्याच्या लक्षात आले.
संध्याकाळी पाच वाजता पु. ल. देशपांडे लिखित मंगेश सातपुते दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी निर्मित ‘मॅड सखाराम’ हे नाटक सादर झाले.(याचा वेगळा वृत्तांत याच अंकात आम्ही इतरत्र दिलेला आहे.)
रात्री अण्णा कडलास्कर यांच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला, ज्यात चळवळीच्या जनजागृती गीतासोबतच जुनी फिल्मी गाणीही काहींनी सादर केली. वयाने ज्येष्ठ पण विचाराने आणि मनाने तरुण असलेल्या अंनिसच्या साथींनी सादर केलेल्या गाण्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत अतिशय फुलला.

दुसर्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी सकाळी, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. या बैठकीचे प्रास्ताविक करताना अंनिवाचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी अंकात येणार्या जाहिरातीच्या पैशामधून १० टके रकमेतून कार्यकर्त्यांसाठी विविध उपक्रम घ्यायचे, त्यांचा सत्कार, सन्मान करायचा ही डॉ.दाभोलकरांची कल्पना होती, हे मांडले व त्याच अनुषंगाने हा सन्मान सोहळा होतोय, हे नमूद केले आणि वार्षिक अंकासाठी मोठ्या प्रमाणात जाहिराती व देणग्या जमा करण्याचे आवाहन केले. अंनिस वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी येणार्या वार्षिक अंकात काय मजकूर असणार आहे, याबाबत मांडणी केली. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी अंकाच्या मजकुराच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना मांडल्या. ज्याची नोंद संपादक मंडळाने घेतली. त्यानंतर नवीन आलेल्या काही कार्यकर्त्यांच्या ओळखीचा कार्यक्रम झाला.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी जाहिरात आणि देणगी संकलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा.
त्यानंतर अतिशय उत्साहाच्या वातावरणात जनजागृती गाण्याने सन्मान सोहळ्याची सुरुवात झाली. उपस्थित प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा यांचे स्वागत रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष विवेक सुभेदार यांनी केले. ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ सावंत अध्यक्षस्थानी होते. विचारमंचावर अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट महाराष्ट्रचे ट्रस्टी दीपक गिरमे, अरविंद पाखले, गणेश चिंचोले व कार्यकारी समितीचे सदस्य तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे व सहसंपादक मुक्ता दाभोलकर या होत्या. मुक्ता दाभोलकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यकर्त्यांनी अतिशय कल्पक माध्यमातून वार्तापत्र लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले आहे व यापुढेही अशाच प्रकारे अंनिसचे मुखपत्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे आवाहन केल्यानंतर कवयित्री नीरजा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी वर्गणीदार, देणग्या, जाहिराती मिळविणार्या ९० शतकवीरांना, आधारस्तंभांचा पुरस्कार सोहळा पार पडला. सुंदर प्रमाणपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. नीरजा यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे हा या दोन दिवसांतील खरोखरच आनंदाचा अविस्मरणीय असा क्षण होता. हा सोहळा अतिशय सुंदर आणि देखणा झाला. कार्यकर्ते आपल्या शाखेतील सहकार्यांसमवेत कुटुंबासह हा सन्मान घेण्यासाठी विचारमंचावर आनंदाने जात होते. अंनिसच्या कामात कुटुंबाची, सहकार्याची साथ किती महत्त्वाची आहे हेच यावरून दिसून येत होते.

पुरस्कार वितरणानंतर प्रमुख पाहुण्या, प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी मनोगत व्यक्त करताना डॉक्टरांसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा अनुभव मांडला. त्या वेळी डॉक्टरांचे भाषण ऐकून आपण प्रभावित झाल्याची आठवण त्यांनी उपस्थितांना सांगितली. अंनिसच्या चळवळीची १९७० च्या दशकात जितकी गरज नव्हती तितकी गरज आजच्या काळात आहे, हे नमूद करत त्यांनी सध्याच्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भेदक भाष्य केले.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही अचानक होत नाही तर ती एक प्रोसेस आहे हे नमूद करून आपल्या देशातील सर्वोच्च पदावरचा नेता अवैज्ञानिक गोष्टी मांडतो, स्वतःला दैवी अवतार मानतो, हे खूपच अजब आहे. आताच्या अंधकारमय, अंध भक्तीच्या काळात डॉ. दाभोलकरांनी सुरू केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले आणि हे फक्त भारतातच नव्हे, तर अमेरिकेसारख्या प्रगत देशातही घडते असे सांगून अमेरिकेने त्यांच्या देशात गर्भपाताचा कायदा रद्द केला, हे उदाहरण म्हणून सांगितले. यासाठी महिलांचा सहभाग चळवळीत वाढला पाहिजे. कारण ज्या अंधश्रद्धेच्या बळी असतात त्याच अधिक जोमाने विरोध करायला येतात, हे त्यांनी ठामपणे मांडले.
नुकत्याच घडलेल्या स्त्री अत्याचारांची आठवण करून देत त्या म्हणाल्या, “महिलांवर होणार्या अत्याचारासंदर्भात निव्वळ अत्याचार करणार्यांना फाशी देण्यापेक्षा या अत्याचाराच्या विरोधात मुळापासून विचार करून त्यावर घाला घालायला हवा. आता स्त्री सक्षमीकरण पुरे झाले. आता पुरुष सक्षमीकरणाची गरज आहे. पुरुषांची मानसिकता बदलणे, ती अधिकाधिक मानवी करणे ही काळाची गरज आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. त्यासाठी पुरुषप्रधान चौकटीत अडकलेल्या पुरुषांना त्यातून बाहेर पडण्याची आवश्यकता आहे तसेच सक्षम झालेल्या महिलांसोबत पुरुषांनी कसं राहायला हवे हेही पुरुषांना शिकवायला हवं हे स्पष्टपणे मांडले.
आपल्या भाषणाच्या अखेरीस नीरजा यांनी लिखाण ही गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे, हे मत व्यक्त करून त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुस्तके वाचायला हवीत, वाचन वाढवायला हवं, शब्द शोधणे ही कला आहे; जरी ते आव्हानात्मक आणि कठीण असले तरी ते अशक्य नाही ही भूमिका मांडून आपल्या भाषणाचा समारोप केला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव त्यांची गाजलेली कविता ‘खैरलांजी ते कोपर्डी व्हाया दिल्ली’ ही कविता सादर केली. त्यांच्या कवितेने सर्वांना अगदी सुन्न केले. कविता संपल्यावर काही क्षण सभागृहात सन्नाटा पसरला.

त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्ट महाराष्ट्रचे ट्रस्टी दीपक गिरमे, अरविंद पाखले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊ सावंत यांचे अध्यक्षीय मनोगत झाले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी संपूर्ण सन्मान सोहळ्याचे अतिशय नेमके व बहारदार सूत्रसंचालन केले, तर अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी दोन दिवसातील सर्व कार्यक्रमांचा आढावा घेतला व महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांचा आणि अतिशय नेमकेपणाने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करणार्या व हा सोहळा यशस्वी व्हावा म्हणून राबणार्या रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे तसेच साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक संस्थेतील सर्व कर्मचार्यांचे वार्तापत्राच्या संपादक मंडळातर्फे आभार मानले. शेवटी सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घेऊन ‘हम होंगे कामयाब’ हे गीत सामूहिकपणे घेऊन विवेकाचा हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करून ‘डॉ. दाभोलकर अमर रहे, विवेकाचा आवाज बुलंद करा’ या घोषणा देत सन्मान सोहळ्याचा समारोप केला.

(हा वृत्तांत विजय खरात, आंब्रोस चेट्टियार, रमेश साळुंखे यांच्या विस्तृत वृत्तांतावर आधारित आहे. – संपादक मंडळ)
ग्रंथदिंडी, वार्तापत्र, साने गुरुजी स्मारक संस्था यांच्या पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. याशिवाय तिथे असलेल्या कँटीनमधील नाश्ता आणि जेवणाची सोय खूपच छान… तेथील कर्मचारी, साथी यांनीही मनापासून ही सेवा दिली. एकूणच ही दोन दिवसांची कार्यशाळा ही खूपच माहितीपूर्ण, शिकायला लावणारी, खूप काही शिकवणारी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली. यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व साथींचे मनापासून खूप खूप आभिनंदन.
या दोन दिवसीय कार्यशाळेचे अतिशय नीटनेटके आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्याच्या अंनिस शाखेने नोंदणीपासून ते निवासापर्यँत अतिशय चोख व्यवस्था केली होती. यासाठी रायगड अंनिसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची तळमळ पावलोपावली दिसून येत होती.
पेण शाखा – प्राचार्य सतीश रंगनाथराव पोरे, अॅड. संकल्प संदेश गायकवाड, जगदीश दिनकर डंगर, नितीन निकम, सौ. मीना सनय मोरे, आदेश पाटील, राजरत्न लोखंडे, संचिता संदेश गायकवाड, साहिल संदेश गायकवाड, पोरे मॅडम, संदेश लक्ष्मण गायकवाड, योगिता जगदीश डंगर.
नागोठणे शाखा – मोहन भोईर, विवेक सुभेकर, विजया चव्हाण, नरेश पाटील.
पाली शाखा – अमित गवळे, अमित निंबाळकर, बिजली कांबळे.
रोहा शाखा – प्रमोद खांडेकर, दिनेश शिर्के, अनिकेत पाडस, नीरज म्हात्रे.
माणगांव शाखा – भाऊ सावंत, चिंतामणी, राहूल.