जय भीम : एक महासमन्वय

सुभाष थोरात - 9869392157

जय भीम’बद्दलच्या आंबेडकरवादी प्रतिक्रियांतून ही गोष्ट अधोरेखित होते. बाबासाहेबांचा मार्गच यशस्वी झाला. हिंसेशिवाय न्यायालयीन लढाई जिंकली गेली, म्हणजे या मार्गाने न्याय मिळतो म्हणून या चित्रपटाला ‘जय भीम’ नाव दिले, हे बरोबर आहे; आणि हे म्हणणे बरोबरच आहे. पण त्याच सिद्धांत बनवणे व्यवस्थेला टिकवून ठेवणारे असते. काही लोकांना वाटते की, ‘लाल सलाम’ नाव द्यायला हवे होते. पण ते योग्य ठरले नसते; शिवाय दिग्दर्शकाला वेगळीच कथा तयार करावी लागली असती.

जय भीम ः एक महासमन्वय

सध्या ‘जय भीम’ या तामिळ चित्रपटाबद्दल समाजमाध्यमांवर जोरदार उलट-सुलट चर्चा सुरू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. या चर्चेतून दिसून येते की, या चित्रपटाने लोकांच्या मनात काहीएक खळबळ निर्माण केली आहे आणि हेच या चित्रपटाचे यश आहे.

या चित्रपटाच्या आशयासंदर्भात मात्र फारशी चर्चा नाही. कारण या आशयाला खोटा ठरवणे शक्य नाही. अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने दिग्दर्शक ज्ञान वेल यांनी हा आशय अगदी सरळ-सरळ, साध्या पद्धतीने मांडला आहे. आशयाबद्दल काही मतभेद नाहीत, काही तक्रार नाही; मतभेद आहेत चित्रपटाला ‘जय भीम’ हे नाव का ठेवले आहे, हे योग्य आहे का, याबद्दल.

या चित्रपटातील मोर्चाची दृश्य घोषणा, प्रतीके मुख्यत्वेकरून डाव्या चळवळीशी संबंधित आहेत. चित्रपटाचा नायक असलेला वकीलही हा कम्युनिस्ट विचारसरणीचा आहे. या सगळ्याशी ‘जय भीम’चा काय संबंध? त्यामुळे चित्रपटाला ‘जय भीम’ हे नाव का ठेवले आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे, आंबेडकरवादी असणार्‍या काही लोकांकडून. परंतु त्याला समर्पक उत्तरेही आंबेडकरवादी लोकांनीच दिली आहेत. त्यामुळे एक चांगली, सकस चर्चा पुढे आली आहे. जातिप्रश्नावर आजवर जे काही सहज आठवणारे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चित्रपट आले आहेत, त्यातही आंबेडकरी चळवळीची प्रतीके वापरलेली नाहीत. तामिळमध्येही अलिकडच्या काळात जातिप्रश्नांबद्दल जे चित्रपट आले आहेत, त्यात ‘काला’मध्ये आपणास या प्रतीकांचे दर्शन होते. नाही म्हणायला ‘न्यूटन’ या चित्रपटातील नायकाच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवून नायकाची विचारसरणी अधोरेखित केली आहे; त्यातही आदिवासी जनतेवर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात कायद्याच्या चौकटीचा वापर करीत प्रतिकाराचा प्रयत्न दिसून येतो.

अर्थात, अनेक चित्रपटांचे विषय जरी जातिप्रश्नाशी निगडित असले, तरी स्पष्टपणे आंबेडकरी चळवळीशी संबंधित एखादे नाव वापरलेले नाही. पण ‘जय भीम’ हे अभिवादनवाचक नाव आंबेडकरी चळवळीचा प्राण आहे, अस्मिता, स्वाभिमान आहे; आणि चित्रपटाला असे नाव दिल्यामुळे या नावाला अभिप्रेत असेल असे काहीतरी या चित्रपटात दाखवले जाईल, अशी अनेकांची समजूत होती. या चित्रपटात सर्वसाधारणपणे जातीय अत्याचार, त्यानंतर जनतेचा उठाव, यात बाबासाहेबांच्या विचारांना स्थान आहे, असे काहीतरी किंवा डॉ. बाबासाहेबांच्या विचारकार्याबद्दल काहीतरी मांडणी केली असेल, अशी एक सर्वसाधारण समजूत होती. त्यामुळे नाव तर ‘जय भीम;’ पण हाती लाल झेंडा, सोबतीला मार्क्स बाबा; म्हणजे सगळेच चक्रावून टाकणारे. त्यामुळे सुरुवातीला सर्वांचा गोंधळ उडाला; पण नंतर सगळे सावरलेही. आणि हळूहळू लक्षात येऊ लागले की, हा चित्रपट बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित आहे. त्यातील संवाद असोत किंवा ज्या पद्धतीने न्यायालयीन लढाई लढली गेली, ती बाबासाहेबांच्या विचारांवर उभी आहे; शिवाय या चित्रपटातील नायक असलेले खर्‍याखुर्‍या आयुष्यातील निवृत्त न्यायमूर्ती चंद्रू यांनीही आपण बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. त्यामुळे चित्रपटाला दिलेले नाव काही लोक बोलतात, त्याप्रमाणे केवळ धंदा व्हावा म्हणून दिलेली नाही, हे स्पष्ट व्हावे; शिवाय ‘जय भीम’ नावाने चित्रपट चालेलच, हे खरे नाही; उलटेही होऊ शकते. ते चित्रपटाचे दिग्दर्शकीय कौशल्य व आशयाच्या प्रभावी मांडणीवर बर्‍याचदा अवलंबून असते. अनेक चित्रपटांच्या बाबतीत हेच झाले आहे. त्यामुळे केवळ धंदा व्हावा म्हणून नाव दिले, हा आरोप पटणारा नाही.

हा चित्रपट अगदी कलात्मक पातळीवर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा आहे, असे कोणी म्हणणार नाही. असे असले तरी तो अगदी सुमार, दर्जाहीन, टाकाऊ आहे, असेही कोणी म्हणणार नाही. परंतु आजच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तो एक महत्त्वाचा चित्रपट आहे, यात शंका नाही. काहीएक प्रागतिक दृष्टिकोन जनतेत पोचवण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्याचे दिलखुलासपणे स्वागत करायला हवे. अर्थात, प्रत्येकाला आपले विचारस्वातंत्र्य आहेच; पण आजच्या राजकीय परिस्थितीचे भान बाळगूनच त्याकडे पाहिले जावे.

खरे तर महाराष्ट्रात येथे बॉलिवूड कार्यरत आहे. अशा ठिकाणी भटक्या-विमुक्त समाजातून येणार्‍या लेखकांनी ‘जय भीम’ चित्रपटातील पोलीस कोठडीतील वास्तवापेक्षा त्याच्या कितीतरी पट भटक्या-विमुक्त समाजावर होणार्‍या अन्यायाचे भीषण चित्रण पुढे आणले आहे. त्यावर चित्रपट करण्याची अजून कोणाची हिंमत झालेली नाही. ‘जय भीम’पासून प्रेरणा घेऊन हे काम कोणीतरी करायला हवे. जनतेच्या बाजूने उभ्या राहणार्‍या कलेचा काहीएक परिणाम समाजावर होतो. नवा प्रागतिक माणूस घडवण्याच्या प्रक्रियेत अशा कलेने मानवी विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.

काही लोकांनी भावनेच्या आहारी न जाता चिकित्सक स्वरुपाची टीका केली आहे. तीही महत्त्वाची आहे. त्यातून चित्रपटाचे मर्म समजण्यास अधिक उपयोग होतो. त्यातून एकच निष्कर्ष आपण काढू शकतो, तो म्हणजे लोकांना चित्रपट आवडलेला आहे. त्यांना विचार करायला प्रवृत्त करणारा आहे. चित्रपट व्यवसायिक आहे; पण करमणूकप्रधान नाही. गडद, हिंसात्मक दृश्यांवर काहींनी आक्षेप घेतला आहे. तो दक्षिणेतील चित्रपटांचा विशेष आहे, असे म्हटले आहे. पण या चित्रपटाच्या संदर्भात गडद हिंसेमुळे नंतर कोर्टातील युक्तिवाद यांना अधिक वजन महत्त्व प्राप्त झाले आहे. ही केस जिंकलीच पाहिजे, अशी एक प्रबळ भावना त्यामुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण होते.

शेवटी राज्यसंस्थेमध्ये पोलीस आणि न्याय यंत्रणाही आली. जे वर्ग-जाती सत्ताधारी आहेत, त्यांचीच ही पक्षपाती असते. बहुतेक निकाल तसेच लागतात; मग ते बिहारमधील लक्ष्मण बाथे हत्याकांड असो अथवा तामिळनाडूतील किलवेल मणी नरसंहार; सर्व पुरावे उघड असतानाही आरोपींना सोडून देण्यात आले.

न्यायालयीन लढाईत कायद्याची कलमे तशी महत्त्वाची असतातच; पण व्यक्तिगत भावभावना, विचार यांचाही परिणाम असतो. वकील कुठल्या विचारांचा आहे; तसेच न्यायाधीशाचे आजवरचे न्यायिक चारित्र्य काय, हाही प्रश्न उद्भवतो. पुरोगामी विचारांचे न्यायाधीश, वकील असतील तर शोषितांच्या बाजूने न्याय झुकवण्याचा नक्कीच प्रयत्न होतो. हीच गोष्ट सर्व राज्य यंत्रणांना लागू आहे. परंतु एकंदर व्यवस्था ही अदानी, अंबानी आणि तत्सम उच्च जात-वर्गाच्या बाजूची असते. त्यामुळे न्यायव्यवस्था, राज्यव्यवस्था ही भांडवली व्यवस्थेत काहीतरी स्वतंत्र गोष्ट असते, ही भाबडी समजूत मनातून काढून टाकली पाहिजे. हे न्याय मर्यादित असतात. त्यातून शोषित जनतेचे प्रश्न पूर्णपणे निकाली निघत नाहीत. त्यासाठी व्यवस्था उलथवून टाकण्याचे राजकारण गरजेचे असते.

बर्‍याच वेळा शोषित जात-वर्गातून आलेले लोकही राजयंत्रणेत वरच्या स्थानी असतात. पण ते पुरोगामी असले पाहिजेत. तसे जर नसेल त्यांची मनोवृत्ती व्यवस्थाशरण असेल, वरच्या जात-वर्गाच्या दबावाखाली येणारी असेल तर ते काही करू शकत नाहीत; उलट ते खेळ बिघडवू शकतात आणि त्यांच्या हातानेच न्यायाचा गळा दाबण्याचे काम केले जाते. खैरलांजी हत्याकांडाचे उदाहरण यासाठी तंतोतंत लागू पडते.

न्याययंत्रणा आंधळी असते, असे म्हटले जाते. पण ती आंधळी नसते; चांगली डोळस असते. आपल्या जात-वर्गाचे ‘हितसंबंध’ तिला चांगले कळतात. आजवरच्या सगळ्या न्यायदानाची चिकित्सा केली, तर हे सत्य सूर्यप्रकाशासारखे पुढे येईल. तीच गोष्ट पोलीस यंत्रणेची. ते तर उघड-उघड पक्षपात करताना दिसतात. त्याची हजारो उदाहरणे मौजूद आहेत. आता जी पुरोगामी विचारांची चार-दोन माणसे गोरगरिबांच्या बाजूने उभी राहतात, याचा फायदा गोरगरिबांना होतोच; पण त्याचा अधिक फायदा व्यवस्थेला होतो. कारण याचा फायदा व्यवस्थेवरची भाबडी समजूत शोषित जनतेत टिकून राहण्यासाठी होतो; म्हणजेच या गोष्टीचा फायदा शेवटी व्यवस्थेला होतो. हा अंतर्विरोध आपण नीट समजून घेतला पाहिजे.

‘जय भीम’बद्दलच्या आंबेडकरवादी प्रतिक्रियांतून ही गोष्ट अधोरेखित होते. बाबासाहेबांचा मार्गच यशस्वी झाला. हिंसेशिवाय न्यायालयीन लढाई जिंकली गेली, म्हणजे या मार्गाने न्याय मिळतो म्हणून या चित्रपटाला ‘जय भीम’ नाव दिले, हे बरोबर आहे; आणि हे म्हणणे बरोबरच आहे. पण त्याच सिद्धांत बनवणे व्यवस्थेला टिकवून ठेवणारे असते.

काही लोकांना वाटते की, ‘लाल सलाम’ नाव द्यायला हवे होते. पण ते योग्य ठरले नसते; शिवाय दिग्दर्शकाला वेगळीच कथा तयार करावी लागली असती. सत्यघटनेतील निवृत्त न्यायाधीश चंद्रू हे मार्क्सवादी विचारांचे आहेत. पण त्यांनी त्यांच्यावरील आंबेडकरवादाचा प्रभाव स्पष्ट केला आहे. त्यामुळे हा चित्रपट दोन विचारसरणींचा एकमेकांवरील प्रभावाचा पुरावा ठरतो. विचारांचा एक महासमन्वय म्हणूनही या चित्रपटाकडे पाहता येईल.

शेवटी विचार हे विचार म्हणून महत्त्वाचे नसतात; ते प्राप्त परिस्थितीतील प्रश्नांची उत्तरे देतात की नाही, हे महत्त्वाचे आहे. ती उत्तरे मिळत नसतील तर विचार हळूहळू कालबाह्य ठरतात; टिकून राहत नाहीत. मार्क्सवादाला आणि आंबेडकरवादाला भांडवलशाही आणि जातिव्यवस्था; म्हणजे भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही नष्ट करावयाची आहे. तुम्हाला जातिव्यवस्था नष्ट करावयाची आहे, तर तुम्हाला भांडवलशाही नष्ट करायला हवी. कारण बाबासाहेबांनी म्हणून ठेवले आहे की, आर्थिक समतेशिवाय इतर कुठल्याही समतेला अर्थ नाही. त्यामुळे सामाजिक समतेसाठी आर्थिक समता गरजेचीच आहे. तीच गोष्ट, भांडवलशाही नष्ट करायची असेल तर तुम्हाला जातिव्यवस्था नष्ट करणे गरजेचेच आहे. त्यात किंतु-परंतु नाही. दोन्ही विचार शत्रुभावी नाहीत; परस्परपूरक आहेत. त्यांचे एकमेकांच्या विरोधात उभे राहणे, हे भांडवलशाही जात-वर्गव्यवस्थेला फायदेशीर आहे, तिचे वय वाढवणारे आहे.

यामध्ये, एकमेकांच्या चुकांवर बोट ठेवणे, ते एकमेकांना सुधारण्यासाठी असावे; नष्ट करण्यासाठी नाही. कम्युनिस्टांनी जातिप्रश्नाकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करीत राहण्यापेक्षा त्यांना प्रश्न घेण्यास भाग पाडण्याचे राजकारण पुढे आणणे; तसेच आंबेडकरवाद्यांनी आर्थिक प्रश्न केवळ आरक्षणापुरते मर्यादित ठेवले आहेत; भांडवली व्यवस्थेत होणार्‍या आर्थिक शोषणाचे प्रश्न घेतले नाहीत, अशी टीका करण्यापेक्षा त्यांना ते घ्यायला लावले पाहिजेत, अशा पद्धतीने हातात हात घालून पुढे जाता येईल. ‘जय भीम’ चित्रपटांमधून हा संदेश घेतला पाहिजे.

सर्व प्रकारच्या शोषणाचा अंत हेच तर आपले अंतिम ध्येय आहे, ज्याची रुजवात अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी केली. हे स्वप्न कधी कबीराच्या, कधी चक्रधरांच्या, कधी बसवण्णांच्या; तर कधी तुकारामांच्या रुपाने जिवंत राहिले आहे. फुले- शाहू-आंबेडकरांनी त्याला हिमालयासारखी उंची प्रदान केली आहे. मार्क्सने, ‘जगातील कामगारांनो, एक व्हा’ असा उद्घोष करीत हे स्वप्न वैश्विक बनवले आहे. ‘प्रत्येक गोष्ट बदलाच्या प्रक्रियेत असते, सतत बदलत असते,’ या बुद्धाने सांगितलेल्या परिवर्तनाच्या सिद्धांताला मार्क्सने आधुनिक विज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्राची जोड देऊन समाजविकासाचे नियम शोधून काढले. त्याचे एक मानवमुक्तीचे शास्त्र बनवले; जे शास्त्र अजूनही कोणाला खोटे ठरवता आलेले नाही आणि वैज्ञानिक दृष्टीवर आधारलेले शास्त्र विज्ञानाच्या नियमाप्रमाणे नष्ट होत नाही; ते विकास पावते. मूळ सिद्धांताला अधिक समृद्ध करत, त्रुटी दूर करत ही प्रक्रिया निरंतर चालू राहते.

जय भीम, लाल सलाम!

सुभाष थोरात

संपर्क ः 98693 92157


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]