भास्कर लक्ष्मण भोळे -
नवसमाजनिर्मिती हेच साध्य
जोतिराव फुले यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावर जे विचार मांडले आणि प्रत्यक्ष कार्य केले ते त्यांच्या सामाजिक क्रांतीच्या महत्कार्याचे एक अंग होते. नवसमाज निर्मिती हेच त्यांचे साध्य होते. त्यांच्या काळातील सामाजिक सुधारक जेव्हा उच्चवर्णीय व शहरी मध्यमवर्गीयांच्या कौटुंबिक सुधारणांवरच मुख्यत्वे भर देत होते, तेव्हा जोतिरावांनी तळागाळातील शोषित स्त्री-शूद्रातिशूद्रांच्या सामाजिक प्रश्नांना हात घातला होता. आर्य भटांनी कृत्रिम धर्माची रचना करून आणि शूद्रातिशूद्रांना ज्ञानबंदी करून येथील विषम व अन्याय्य समाजरचनेला बळकटी आणली. ही शोषणप्रधान समाजव्यवस्था मुळासकट उखडून फेकल्याखेरीज तिच्या जागी स्वातंत्र्य-समता-बंधुतादी नवमूल्यांवर आधारित नवा समाज उभारताच येणार नाही, अशी जोतिरावांची भूमिका होती. त्यामुळे जुन्या समाजरचनेला पुष्टी देणार्या सर्व अंधश्रद्धांचा पर्दाफाश त्यांनी केला होता.
यातूनच जोतिरावांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची दोन ठळक वैशिष्ट्ये निर्माण झालेली दिसतात. एक असे की, कोणत्याही अंधश्रद्धेला केवळ मनोविकृती समजून ते तिचा कधीच प्रतिवाद करीत नाहीत. अंधश्रद्धांचे अस्तित्व माणसांच्या मनात खोल रुजलेल्या भ्रमांमध्ये आणि गैरसमजांमध्ये असते, हे खरे असले, तरी केवळ मने साफ करून ते संपणार नाही. काही अंधश्रद्धांचे अस्तित्व माणसांच्या मनात खोल रुजलेल्या भ्रमांमध्ये आणि गैरसमजांमध्ये असते, हे खरे असले, तरी केवळ मने साफ करून ते संपणार नाही. काही अंधश्रद्धांचे बळी मनोरुग्ण किंवा मनोदुर्बल असतात आणि त्यांच्यावर मानसोपचार करून त्यांचे मनोबल वाढवण्याची निश्चितच गरज असते.
अंधश्रद्धांना बळी पडलेल्यांना त्यांनी हितोपदेश केला; पण त्यांना मूर्ख, मागासलेले वा वेडगळ ठरवून त्यांच्यावर तोंडसुख मात्र कधीच घेतले नाही. ज्या व्यवस्थेने त्यांना निरक्षर, अज्ञानी आणि दरिद्री ठेवले त्या व्यवस्थेवर जोतिरावांचा राग होता. तिच्यावर त्यांनी घणाघाती प्रहार केले आहेत. केवळ सामाजिक विकृतींवर हल्ला करून न थांबता त्या विकृतींना प्रतिष्ठा देणार्या सर्वच बाबी त्यांनी टीकास्पद ठरवल्या. प्रस्थापित व्यवस्थेला पुष्टी देणारी मूल्यव्यवस्था आव्हानित केली. धर्मग्रंथांचे अपौरुषयत्व व प्रामाण्य प्रश्नांकित केले. येथे दृढमूल झालेल्या जीर्ण, विषम व शोषणपर समाजव्यवस्थेच्या जागी जर/जेव्हा स्वातंत्र्य-समतादी नवमूल्यांवर आधारित नवा समाज उभा राहील, तर आणि तेव्हाच अंधश्रद्धांचे समूळ उच्चाटन होऊ शकेल अशी जोतिरावांची धारणा होती.
त्यामुळेच दुसरे वैशिष्ट्य जोतिरावांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात असे आढळते की, समाजपरिवर्तनाच्या व्यापक चळवळींचा संदर्भ त्यात कोठेही सुटत नाही. उपदेश, शिक्षण व पर्यायी आचारविचार दिल्यानंतरही लोकांभोवतीची सामाजिक-आर्थिक परिस्थिती जर तशीच राहिली तर अंधश्रद्धांचा नायनाट होणार नाही, हे ओळखून ते या कार्यासोबतच दारिद्य्र निराकरण व शोषणमुक्ती यांच्याही उपक्रमांची अंमलबजावणी सत्यशोधक समाजामार्फत करतात. त्यामुळे त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य एकांगी वा एकांडे होत नाही.
धर्माच्या नावाने समाजात सुरू असलेल्या अनेक अपप्रकारांचा जोतिरावांनी जाहीर निषेध केला होता. प्रारब्ध, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, मरणोत्तर सद्गती-दुर्गती, कर्मक्रिया इत्यादी कल्पनांमधील फोलपणा त्यांनी अनेक युक्तिवादांसह पटवून दिला. जन्मापासून मरणापर्यंतच्या अनेक प्रसंगांना चिकटवण्यात आलेले निरर्थक आणि शोषणकारी कर्मकांड, मूर्तिपूजा, फलज्योतिष, बुवाबाजी, अवतारकथा यांच्यावर जोतिरावांनी केलेले तार्किक व व्यावहारिक प्रहार आजही उद्बोधक ठरावेत असे आहेत.
निरर्थक कर्मकांड
सर्व चराचर सृष्टीचा निर्माता व नियंता असा एकच एक ‘निर्मिक’ असून सर्व स्त्री-पुरुष मनुष्यमात्र ही त्याचीच लेकरे आहेत. तो सर्वांचा पोशिंदा, न्यायकर्ता व उद्धारक आहे, अशी श्रद्धा जोतिराव बाळगून होते; पण त्याला ते कोणत्याही धर्मातील प्रचलित संबोधनाने उल्लेखित नाहीत. तो कधी कोणाला दर्शन देतो/ यावर त्यांचा विश्वास नाही. आराधना, भक्ती, पूजा, नैवेद्य, नवससायास, जप-अनुष्ठान वगैरे सर्वच गोष्टींचा त्यांनी अज्ञानापोटी माणसाला निसर्गप्रक्रियांची उकल होत नव्हती. त्या काळात अस्तित्वात आलेले पूजाविधी ज्ञानप्राप्ती नंतरही टिकून राहिले, याचे एकमेव कारण जोतिरावांच्या मते ऐतखाऊ पुजारी वर्गाचा स्वार्थ हेच होते. “धातू, दगडाच्या मूर्तीस भजून| घंटा वाजवून| स्वत: खाई॥ अशा शब्दांत त्यांनी मूर्तिपूजा आणि पुरोहितांची खाबूगिरी यांची संभावना केली आहे. मूर्तिपूजा ही त्यांना भिक्षुकशाहीची आधारशिला वाटते.
कर्मकांडांना जोतिरावांचा विरोध असण्याचे एक कारण ती निरर्थक आहेत हे तर होतेच; पण तितकेच गंभीर दुसरे कारण असे की मानवमात्रांत फूट पाडतात. जन्म, विवाह, ऋतुशांती, वास्तुशांती, प्रेतसंस्कार, श्राद्ध वगैरे विधींमधील तर्कदुष्टपणा आणि भिक्षुकांचे त्यामागचे पोटार्थी हेतू जोतिरावांनी वारंवार स्पष्ट केले आहेत. उदाहरणार्थ, “खारका खोबरे| नैवेद्याचा भार| दक्षिणा रीतसर| पैसालूट॥” किंवा “भोळ्या भाविकाला ठक फसविती॥ अधोगती जाती जोती म्हणे॥” जपजाप्य, होमहवन, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने, उद्यापने, सणवारांच्या पोथ्या, कहाण्या इत्यादी सगळी निमित्ते किंवा “ऋषिमंडळ धर्माचे बळ वेद सबळ॥” वगैरे थापा या केवळ भटांना शूद्रांचे शोषण करता यावे या एकाच हेतूने रचल्या आहेत, असे जोतिरावांनी सांगितले आहे.
फलज्योतिष्य
फलज्योतिष्य हे शास्त्र आहे किंवा आकाशातील ग्रहगोलांच्या स्थिती-गतीमुळे मानवमात्रास पीडा होऊ शकते, मात्र ग्रहशांती केल्यास ती टाळताही येते वगैरे कल्पनांवर जोतिरावांचा काडीमात्र विश्वास नव्हता. शेतकर्यांच्या घरी पुत्रजन्म होताच ‘सोहोम कोहोम’ नाद करीत कुडमुडे जोशीबुवा तिथे पोचतात. कुंडल्या मांडून विद्याविहीन मातापित्यांना भयकंपित करतात. ग्रहपीडानाशासाठी जप, अनुष्ठानादी विधी केलेच पाहिजेत, हे त्या मुलांच्या मनांवर बिंबवतात. मग ते बिचारे दरिद्री पालक कर्ज काढून, भांडीकुंडी विकून यथाविधी सारं कर्मकांड करतात. आपल्यावरचे मोठेच संकट टळले अशा भ्रामक समाधानात ते असतात. मुलाच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. वेळीच वैद्यकीय उपचार न झाल्यामुळे ते मूल मरते. कर्मकांड त्याला वाचवू शकत नाही असा एक करुण प्रसंग जोतिरावांनी उभा केला आहे.
या उलट ‘तृतीय रत्न’ या आपल्या नाटकात अशाच प्रसंगातून जाणार्या पण योग्य वेळी योग्य उपदेश लाभल्याने सन्मार्गास लागलेल्या एका माळी-कुणबी दांपत्याची गोष्ट जोतिरावांनी सांगितली आहे. यातील स्त्री गरोदर असताना एक भिक्षुक तिला अशुभाची भीती घालतो. पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचा उपाय सुचवतो. नाना प्रकारच्या लटपटी खटपटी करून भूलथापा देतो. ओसरी मिळताच पाय पसरीत जातो. अज्ञानापोटी ती स्त्री व तिचा पती त्याच्या भ्रमजालात अडकत जातात. पण अशा वेळी एक पाद्री तेथे येतो आणि वस्तुनिष्ठ व तर्कशुद्ध युक्तिवाद करतो. नाटकाचा विदूषक त्या पती-पत्नीला जोशी व पाद्री यांच्या म्हणण्यांतील फरक दाखवून सारासार विवेक करण्यास सुचवतो आणि विचारांती त्यांचे डोळे उघडतात. जोशी कसा आपल्याला ठकवत होता, हे त्यांना पटते आणि ती दोघे जोतिरावांच्या शाळेत दाखल होतात. या साध्या कथानकाच्या क्रमात जोतिरावांनी मूर्तिपूजा व फलज्योतिष याप्रमाणेच सामाजिक विषमता व शोषण यांचीही चिकित्सा केली आहे. शेवटी विद्या शिकण्याचे महत्त्वही मांडले आहे.
‘अवकाशातील ग्रह भूमंडळावरील मानव स्त्री-पुरुषास पीडा देतात’ हे स्वत:ला “ग्रहशास्त्रवेत्ते” म्हणवणार्या विद्वानांचे मत शास्त्रीय पुराव्यांनी सिद्ध झालेले नाही, याचे स्मरण देऊन जोतिराव पुढे सांगतात की, ज्या शनीवरचा प्रदेश एवढा विस्तीर्ण, तो आपला निसर्गदत्त उद्योग बाजूला ठेवून पृथ्वीवरच्या एखाद्या शूद्र मानवास पीडा देण्यास येतो, असे समजणे हे केवळ हास्यास्पद आहे. “आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धूर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दूर होती. ही सर्व पोटबाबू आर्य जोशांची लबाडी आहे.”
बालकाच्या जन्मावेळी आकाशात असलेल्या ग्रहदशेनुसार बालकाच्या नावाची मुळाक्षरे ठरवणे आणि त्या मुळाक्षरांवरून जन्मपत्रिका मांडून त्यांच्या भावी आयुष्यात संभवणार्या लाभालाभांचे भाकीत वर्तवणे हा प्रकार जोतिरावांना शुद्ध ठकबाजीचा वाटतो. स्वमतपुष्ट्यर्थ जोतिरावांनी अनेक युक्तिवाद केले आहेत. ते म्हणतात, ‘सत्तावीस नक्षत्रे आणि बारा राशी यापैकी प्रत्येक दिवसांचे एक नक्षत्र असते. प्रहरांनुसार त्यांची प्रत्येक चार चरणे असतात. चरणानुरूप नावाची मुळाक्षरे बदलतात. पहिले चरण संपून दुसरे केव्हा सुरू होते, हे नेमकेपणी सांगणे अत्यंत अवघड असते. “एक-शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर” मुळाक्षर बदलते. नऊ चरणांची एक राशी असते. एक राशी संपून दुसरी होण्याच्या दरम्यानही अशीच ‘घालमेल’ होणार. बहुसंख्य लोक जेथे “सूर्य कासराभर वर आला” अशा भाषेत वेळेचा अदमास घेतात तेथे बालकाची निश्चित जन्मवेळ काटेकोरपणे नोंदवली जाणे केवळ अशक्य असल्याची वस्तुस्थिती जोतिरावांनी निदर्शनास आणून दिली आहे.
फलज्योतिष्याच्या समर्थकांना अडवताना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते असा एक प्रश्न नेहमी विचारत असतात की, ‘कुंडली काढताना बालकाची जन्मवेळ निश्चित कोणती धरावी?’ जोतिरावांनी हाच प्रश्न बळवंतरावांच्या मुखाने एका संवादात विचारला आहे. बळवंतराव पृच्छा करतात : “एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुष आपल्या मातेच्या उदरात असता त्यांच्या सातव्या महिन्यात का आठव्या का नवव्या महिन्यात ते साक्षात सजीव प्राणी होऊन त्यांचे जन्म पावण्याची ती मुख्य वेळ म्हणावी. अथवा मातेच्या उदराबाहेर पडल्यावर त्याचे जन्म पावण्याची मुख्य वेळ म्हणावी? या दोहोंपैकी कोणती मुख्य वेळ खरी आहे?” आणि या प्रश्नाचे जोतिरावांनी दिलेले उत्तरही फार मार्मिक आहे. ते म्हणतात, “याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे भरण्याकरिता हे मन:कल्पित थोतांड उभे केले आहे. कारण स्त्रियांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकांची मुख्य जन्मकाळांच्या दोन्ही वेळा नव्हेत; परंतु स्त्री-पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभू अवताराचे बीजारोपण करतो. याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री-पुरुषांपासून त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची बरोबर माहिती काढून जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्या सर्वांस गंमतीकरिता याप्रसंगी बरे म्हटले असते.”
बुवाबाजी
स्वत:ला परमेश्वराचे अवतार म्हणवून समाजात वावरणारे, चमत्कार करणारे, सिद्धीचा दावा करणारे, बुवा, बाबा, महाराज स्वामी, सद्गुरू, संत-महंत अशा नावांनी ओळखले जाणारे कित्येक बनावट लफंगे यांच्या ढोंगी गुरुबाजीचा खरपूस समाचार जोतिरावांनी घेतला आहे.
निर्मिकाचे स्मरण मानवाने विशुद्ध स्वरुपातच करावे. त्यास कोणताही मानवी वा भौतिक आकार देऊ नये. यावर जोतिरावांचा कटाक्ष होता. निर्मिकाचे प्रत्यक्ष दर्शन किंवा साक्षात्कार माणसाला घडूनच शकत नाही. त्यामुळे जे स्वत:ला या किंवा त्या देवाचे अवतार म्हणून मिरवीत असतील हे सगळे जोतिरावांच्या मते ढोंगी व दांभिक असतात.
मानवी शरीरात कुंडलिनी चक्र दाखवून आणि त्याद्वारे प्रत्यक्ष ईश्वर दाखवण्याच्या पोकळ गप्पा मारणारे आणि देवांच्या नावाने आश्रम काढणारे हे बुवा प्रत्यक्षात पाखंडी असतात. त्यांच्या सगळ्या वासना आणि जीवनक्रम सामान्यांप्रमाणेच असतो. तरीही त्यांना असामान्य मानले जाते. याला कारण त्यांचा धूर्तपणा आणि जनसामान्यांचा मूढ भाबडेपणा होय, असा निर्वाळा जोतिरावांनी दिला आहे.
मंत्रतंत्र-चमत्कार करणारे भोंदू मग ते ब्राह्मण असोत की ब्राह्मणेतर असोत, जोतिरावांनी त्यांना सारखेच धारेवर धरले आहे.
हे तथाकथित अवतारी पुरुषच काय मानव-प्राण्यांपैकी कोणीही चमत्कार नावाची गोष्ट करूच शकत नाही, असे ठाम प्रतिपादन जोतिरावांनी केले आहे. महायाग किंवा चमत्कारांतून जर ईप्सिते पूर्ण झाली असती, तर माणसाचा अपेक्षाभंग होण्याची पाळीच कधी आली नसती, हे पटवून सांगताना जोतिराव विचारतात. “जप-अनुष्ठाने पाऊस पाडिती| आर्य का मरिती| जळावीण?॥” किंवा “जप अनुष्ठाने स्त्रियां मुले होती| दुजां का करिती| मुलासाठी?॥ भट ब्राह्मणांत बहुस्त्रिया वांज| अनुष्ठानी बीज| नाही का रे?॥ अनुष्ठानावीण विधवा मुले देती| मारुनी टाकिती| सांदिकोनी॥” असे का? हे सगळेच प्रश्न सडेतोड असून चमत्कारांतून सर्व मन:कामनांच्या परिपूर्ततेची आश्वासने देणार्यांना त्यांची उत्तरे आजही देता येणे शक्य नाही.
समाजात बुवा-बाबांची पैदास कशी होते, याचे मर्मग्राही विश्लेषण जोतिरावांनी ‘शेतकर्याचा आसूड’ मध्ये केले आहे.
त्यातून बुवाबाबा या घटिताची जोतिरावांची सूक्ष्म जाण व्यक्त झाली आहे. समाजातील चैनखोर, उपद्व्यापी, मतिमंद अशा घटकांना आपल्या अर्थार्जनासाठी बुवाबाजीचा धंदा सोयीचा वाटतो आणि ते एखादा ‘बेवकूफ ठोंब्या’ किंवा ‘देखणा जवान’ किंवा ‘भोळसर कारकून’ किंवा ‘अर्धवेडा भंगड’ हाताशी धरून त्याचे स्तोम पद्धतशीरपणे वाढवत नेतात आणि समाजात बुवाबाजी पसरते. बुवाबाजीच्या आश्रयाने व्यसने, व्यभिचार आणि पैशाची उधळमाधळ होत राहते. आजही आपल्याभोवती ढवळेबुवा-कवळेबुवा, देवमहालकरी, भंगड महाराज आणि लुच्चे स्वामी यांचा सुळसुळाट असून जोतिरावांनी वर्णन केलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीही अस्तित्वात आहेत.
मिथकांचा विध्वंस
सामाजिक क्रांतीचे शिल्पकार जोतिराव फुले यांनी मिथक भंजनाचे कार्य अत्यंत समर्थपणे पार पाडले आहे. चातुर्वर्ण्याची उत्पत्ती ब्रह्माच्या चार अवयवांपासून झाली असे पुरुषसूक्त सांगते. भगवद्गीतेतील “चातुर्वर्ण्यम मया सृष्टा” या श्रीकृष्णाच्या उद्गारामुळे पुरुषसुक्तीय मिथ्यकथेला पुष्टी मिळते. परिणामी त्रैवार्णिकांचे जन्मसिद्ध श्रेष्ठत्व शूद्र-अतिशूद्रांच्या मनांवर पक्के बिंबते. मिथ्यकथेला शब्दश: खरे मानून त्रैवार्णिकांना आपले स्वामी आणि स्वत:ला त्यांचा सेवक समजून ते सर्व व्यवहार करतात. ईश्वरी इच्छेनेच ही विषम रचना झालेली आहे, असे एकदा स्वीकारल्यावर तिला प्रतिकार करणे त्यांच्या ध्यानीमनीही येणे शक्य होत नाही. क्रमाक्रमाने ते आपल्या मानवी हक्कांनाही पारखे होतात. लोकांना हक्कजागृत करायचे तर सर्वप्रथम हे मिथ्यकथेचे भूत त्यांच्या मानगुटीवरून उतरवणे जोतिरावांना गरजेचे वाटते. त्यासाठी ते काही बिनतोड प्रश्न उपस्थित करतात. ब्रह्माच्या मुख, बाहू, मांड्या व पाय या अवयवांपासून कोणतेही मानवप्राणी उत्पन्न करणे कसे शारीरिकदृष्ट्या असंभवनीय आहे, हे त्यांना त्यातून जनमानसावर बिंबवायचे असते. ते विचारतात की गर्भधारणा गर्भवास, प्रसूती, स्तनपान या ज्या अपत्यजन्माशी अनिवार्यत: निगडित बाबी आहेत त्या उपरोक्त चार अवयवांमधून कशा साध्य होणार? अपत्यजन्माची जबाबदारी निसर्गाने स्त्रीवर सोपवलेली असताना ब्रह्माने ती अनैसर्गिकरित्या स्वत:कडे का म्हणून घ्यावी? “ब्रह्माचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या चार ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोवळे होऊन बसावे लागत असेल!” अशी एक टवाळखोर शंकाही जोतिरावांनी विचारली आहे. लोकांच्या मनात रुजलेल्या मिथ्यकथेला पुरते हास्यास्पद करून सोडणे हा या प्रश्नांचा व शंकाचा स्पष्ट हेतू होता. हे सर्व ऐकल्यावर श्रोत्यांना असा अचंबा वाटत असेल की, इतक्या मूर्ख आणि बिनबुडाच्या कथनावर आपण पिढ्यान्पिढ्या कसा बरे विश्वास ठेवला असेल!
सर्वच अवतारांच्या कथा जोतिरावांनी आर्य-अनार्य संघर्षांशी आणि त्यातील आर्यांच्या छद्मी रणनीतीशी जोडल्या आहेत. शूद्रातिशूद्रांनी या कहाण्या नीट तपासून आपला खरा पूर्वेतिहास समजून घ्यावा आणि आपल्या हितशत्रूंच्या दुष्ट हेतूंना फसू नये हा जोतिरावांचा उद्देश यामागे स्पष्ट दिसतो.
तत्त्ववैचारिक त्रिसूत्री
बुद्धिप्रामाण्यवाद, धर्माचे समाजशास्त्रीय विश्लेषण आणि इहवादी दृष्टिकोन ही जोतिरावांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याची तत्त्ववैचारिक त्रिसूत्री म्हणता येईल. विश्वातील इतर सर्व पशुप्राण्यांपेक्षा मानवप्राण्याचे वेगळेपण जर कशात असेल, तर ते त्याच्या सारासार विचार करण्याच्या क्षमतेत आहे, हे जोतिरावांनी आवर्जून सांगितले आहे. इतर सर्व प्राणी आपल्या स्वभावधर्मानुसार हजारो वर्षांपासून वागत असल्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीत तिळमात्रही सुधारणा घडून येऊ शकलेली नाही. माणूस मात्र आपल्या बुद्धीच्या बळावर आपल्या जीवनसरणीत जास्तीत जास्त सुधारणा करून घेऊ शकला. पक्ष्यांची घरटी हजारो वर्षांपूर्वी होती, तशीच आजही आढळतात. मानवप्राण्यांबद्दल मात्र असे दिसते की, “हजारो वर्षांपूर्वी झाडांच्या ढोलीत राहून निर्वाह करणारे व गुडघेमेटी येऊन हात टेकून जनावरांसारखे पाणी पिणारे मानवप्राणी हल्लीच्या सुधारलेल्या काळात मोठमोठ्या हवेल्यांत वास करून नाना सुखोपभोग घेत आहेत.” या श्रेष्ठत्वास मनुष्य पोहोचला तो केवळ बुद्धीच्याच योगाने असे जोतिराव म्हणतात. त्यांच्या मते, ‘पुढच्याच ठेच मागचा शहाणा’ या म्हणीनुसार प्रत्यक्ष अनुभवलेल्या चुकांमुळे तर माणसे सुधारतातच, पण लेखनविद्येमुळे चारही खंडांतील मानवमात्रांना लागलेल्या ठेचांचे अनुभवशीर वृत्तांत कागदावर टिपल्यामुळे हल्लीच्या माणसांना आनुभाविक ज्ञानाचा प्रचंड संग्रह उपलब्ध झाला आहे. जगाच्या कोणत्याही भागात लागलेले शोध समस्त मानवजातीस लाभदायक ठरले आहेत. ही सारी किमया मानवाच्या बुद्धिसामर्थ्याची आहे.
मानवी बुद्धीच्या या असामान्यत्वाची अशी महती गात असतानाच जोतिराव अशी खंतही व्यक्त करतात की, माणसाने आपल्या ‘या अमोल्य पवित्र बुद्धी’चे पुरेसे सार्थक केलेले नाही. वस्तुत: मानसिक दास्यत्वातून मानवाची मुक्ती करण्याचे अगाध सामर्थ्य बुद्धीच्या ठायी असते, पण बुद्धीच्या निकषावर तपासून न पाहता माणसाने असंख्य गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे तो मानसिक गुलामीत खितपत पडला आहे. भाकड पुराणकथा, अर्थशून्य कर्मकांड, परलोक-पुनर्जन्माच्या आणि स्वर्ग-नरक मोक्षाच्या लोणकढी थापा, साक्षात्कारी ईश्वराच्या आणि चमत्कारी महाराजांच्या गावगप्पा, देव-प्राक्तन-कर्मविपाकासारख्या तर्कदुष्ट संकल्पना यापैकी खरे पाहता कोणतीच गोष्ट मानवी बुद्धीला पटणारी नाही आणि म्हणून या सर्वस्वी त्याज्य ठरतात. ईश्वराच्या नावावर पुरोहित वर्गाने मारलेल्या भूलथापांना शूद्रातिशूद्रांनी बळी पडू नये या दृष्टीने इंग्रज राज्यकर्त्यांनी या वर्गांमध्ये विद्येचा प्रसार करावा, असे आवाहन जोतिरावांनी केले आहे. अविद्या हेच त्यांचे मते बुद्धीचा निकष डावलण्याचे मूळ कारण होते.
धर्मग्रंथ अपौरुषेय ईश्वरनिर्मित किंवा ईश्वरी प्रेरणेतून निर्माण झालेले आहेत, ही समजूत जोतिरावांना बुद्धिप्रामाण्याशी विसंगत म्हणून भ्रममूलक वाटते. धर्मासंबंधी मुळापासून बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन न स्वीकारणारे ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज हे त्यांच्या मते “बाह्यात्कारी धर्मसंबंधी, परंतु आतून शुद्ध राजकीय हेतूंनी रचलेल्या बाह्यगारूडावर केवळ झाकण घालण्यासाठी अस्तित्वात आलेले होते. त्या संस्थांना जर खरोखर धर्मसुधारणा करायची असती, तर त्यांनी हिंदू धर्मातील सर्व असत्ये हुडकून काढून “त्या सर्वांवर हरताळीचा बोळा फिरवून” उर्वरित सत्यांचा एक ग्रंथ केला असता, पण त्यांनी अशी परखड बौद्धिक चिकित्सा करण्याचे नाकारले आणि धर्मग्रंथांचे प्रामाण्य अबाधित ठेवले, असा आक्षेप जोतिरावांनी घेतला आहे.
जोतिरावांच्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या संदर्भात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी असे एक विधान केले आहे की, “फुले हे ईश्वराची कल्पना सोडल्यास इतर सर्व बाबतीत पूर्ण बुद्धिवादी दिसतात.” पण सखोल विचारांती असे वाटते की, जोतिरावांची निर्मिक कल्पनासुद्धा त्यांच्या बुद्धिवादाशी मुळीच विसंगत नाही. जोतिराव सश्रद्ध होते. आस्तिकही होते. चराचर सृष्टीचा एकच एक निर्माता व नियंता आहे. सर्व स्त्री-पुरुष त्याचीच लेकरे असून तो त्या सर्वांचा पोशिंदा, न्यायकर्ता आणि उद्धारक आहे. या गोष्टी जोतिरावांना मान्य होत्या; पण त्यांची ईश्वरकल्पना चिद्वादी-चैतन्यवादी किंवा अन्य सर्वत्र प्रस्थापित धर्मवादी-श्रद्धावंतांच्या परमेश्वरापेक्षा भिन्न होती. सामाजिक जीवन आणि प्रचलित ईश्वरकल्पना यांच्यातील संबंध द्वंद्वांत्मक असतात. त्यानुसार बदलत्या आर्थिक-सांस्कृतिक परिस्थितीबरहुकूम ईश्वरकल्पनाही बदलते. ही प्रक्रिया थांबल्यास कालबाह्य ईश्वरकल्पनेची खीळ समाजपरिवर्तनाच्या प्रवाहाला बसते, अशावेळी ही कोंडी फोडण्यासाठी ईश्वरासह धर्मकल्पनेची समूळ चिकित्सा आवश्यक ठरते, अशी जोतिरावांची भूमिका दिसते. सृष्टीचा अदृश्य प्रेरक व सूत्रसंचालक असलेल्या निर्मिकाचे अस्तित्व त्याच्या कर्तृत्वातून म्हणजेच सृष्टीवर दिसून येण्याच्या परिणामांमधून प्रत्ययाला येते, अशी बुद्धीला पटणारी भूमिका जोतिरावांनी घेतली आहे. मूर्तिपूजा, अवतारकल्पना, कर्मकांड वगैरेंना त्यांच्या निर्मिकांच्या संदर्भात काडीमात्रही जागा नाही. कोणी जर ईश्वराचे आपणास दर्शन घडवलेच तर त्या ईश्वरालाही आपण प्रश्न विचारू की, “हे ईश्वरा, तूच का रे बाबा आपल्या मुलाला-येशूला-दुष्टांच्या हातून मोकलले? मुसलमानांना कुराणग्रंथ सांगून तूच का शिया-सुन्नींची भांडणं लावलीस? तूच का बायकोसाठी रावणाचा वध करणारा राम आणि मामाचा खून करणारा कृष्ण आहेस? कोळ्यांनी तुलाच काय ठार मारले होते?” अशी जोतिरावांची तयारी होती. मानवमात्रांना निर्माण करणारा ईश्वर जर एकच असेल आणि त्याला जर सर्वांची सारखीच काळजी असेल, तर बहुसंख्य समाजाला अवगत नसलेल्या संस्कृत भाषेतच त्याने वेद का लिहिले असावेत? तेव्हा समजा, ती समाजातील सर्वांची भाषा असेलही; पण पुढे तशी ती राहणार नाही हे जर ईश्वराला कळले नसेल तर त्याला त्रिकालदर्शी वगैरे का म्हणायचे? असेही प्रश्न जोतिरावांनी उपस्थित केले आहेत.
मूर्तिपूजेने आत्म्याची उन्नती होणे, तर दूरच उलट त्यास भ्रष्टता येते आणि मानवी ज्ञानालाही नीचत्व प्राप्त होते अशी जोतिरावांची भूमिका होती. पवित्र देवस्थाने आणि तेथील जत्रा-यात्रा यात माणसांचे जीव, द्रव्य आणि उद्योग यांची अपरिमित हानी होत असल्यामुळे त्यास जोतिरावांचा विरोध होता. आम्ही खर्या परमेश्वरास विसरलो आणि त्यामुळे कुकल्पनाजन्य भुताखेतांच्या भीतीने आम्हाला पछाडले. ईश्वराविषयीचा सर्व गूढवाद आणि अलौकिकवाद नाकारून त्यास मानवी आकलनाचा विषय जोतिरावांनी केला आहे. ज्या सत्याचा त्यांनी पुरस्कार केला आहे ते सत्यदेखील अंतर्ज्ञानाने किंवा साक्षात्काराने वगैरे गवसणारे गूढ सत्य नाही, तर नैसर्गिक घडामोडी आणि सामाजिक जीवनव्यवहार यांच्याकडे जागरुकतेने व जाणीवपूर्वक पाहून त्या सत्याचे कोणालाही आकलन होऊ शकते. बुद्धी आणि तर्क यांच्या मदतीने कोणालाही त्याचा शोध घेणे शक्य असते. ‘ईश्वराचे पितृत्व आणि मानवमात्राचे भ्रातृत्व’ हे असेच एक प्राथमिक सत्य असल्याचे जोतिराव सांगतात.
ईश्वरकल्पना, धर्माचरण आणि धर्मग्रंथ या सगळ्यांची रचना माणसांनीच केली असून ज्यांनी ती केली त्या वर्गांचे स्वार्थी हितसंबंध त्यांच्याद्वारे सुरक्षित केले गेले आहेत. ही आज ‘धर्माचे समाजशास्त्र’ या नावाने ओळखली जाणारी भूमिका जोतिरावांनी त्या काळात मांडली होती. सर्वच धर्मांच्या धर्मग्रंथांतून सरसकट डोकावणारे पुरुषप्राधान्य अधोरेखित करताना जोतिराव एके ठिकाणी असे म्हणतात की, “एखाद्या स्त्रीने जर धर्मपुस्तक केले असते, तर मानव पुरुषांनी एकंदर सर्व स्त्रियांच्या हक्कांविषयी हयगय करून त्यांनी आपल्या पुरुषजातीच्या हक्कांविषयी मात्र वाचाळपणा केला नसता. कारण स्त्रिया जर ग्रंथ लिहिण्याजोगत्या विद्वान असत्या, तर पुरुषांनी असा उघड गोमा करून पक्षपात केला नसता.” धर्माविषयी इतका समाजशास्त्रीय-मानसशास्त्रीय विचार त्यांच्या काळात दुसर्या कोणत्याही विचारवंताने मांडलेला आढळत नाही. जोतिरावांचे असे स्पष्ट मत होते की, जगातील प्रत्येक धर्मग्रंथ हा त्या-त्या विशिष्ट काळाची निर्मिती असल्यामुळे त्यातील सत्ये कधीच त्रिकालाबाधित असू शकत नाहीत आणि दुसरे असे की ग्रंथकर्त्यांचे पूर्वग्रह व स्वार्थ यापासून त्या ग्रंथातील तरतुदी कधीच मुक्त राहू शकत नाहीत.
प्रारब्ध, पापपुण्य, स्वर्गनरक
प्रारब्ध, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, सद्गती-दुर्गती, कर्मविषयक वगैरे कल्पनांमधील फोलपणा पटवून देताना माणसाच्या ऐहिक जीवनाचे प्राधान्य जोतिरावांनी अधोरेखित केले आहे. माणसाला इथेच आणि याच आयुष्यात आपल्या बर्यावाईट कर्मांची झाडाझडती द्यावी लागते. त्याच्या पापपुण्याचा ताळेबंद इथेच पूर्ण होतो. गेल्या जन्मीच्या पापपुण्याच्या आधारे या जगातील सामाजिक-आर्थिक विषमतेचे स्पष्टीकरण-समर्थन करणार्या किंवा या जन्मातील आपल्या विपन्नावस्थेचा निमूट स्वीकार करून आणि पुढील जन्मात सुख मिळावे यासाठी आताचे दु:ख बिनतक्रार पत्करून माणसाला जगायला सांगणार्या कर्मविपाक सिद्धांताचा जोतिराव निषेध करतात. पुनर्जन्मावर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. त्यांच्या मते, जी उच्चनीचता जन्मसिद्ध असेल ती गुणकर्माधिष्ठित असूच शकत नाही. “सद्गुण -दुर्गुण पिढीजात स्वभाव नाही.” अशी शास्त्रीय भूमिका जोतिरावांनी घेतली आहे. “प्राक्तनात होते| तैसेची घडले| ब्रह्म्याने लिहिले| खोटे नाही॥” अशा प्रारब्धवादी मानसिकतेला त्यांनी स्पष्ट शब्दांत सोडचिठ्ठी दिली आहे. माणसांच्या मनात प्रारब्ध, नशीब किंवा दैववाद बळावण्याची त्यांनी कारणमीमांसा केली आहे, माणसाची करणी आणि सामाजिक शक्ती यांच्यातील क्रियाप्रतिक्रियांचे आकलन न झाल्यामुळे माणसे या संकल्पनांवर विश्वास ठेवू लागतात, असा निर्वाळा त्यांनी दिला आहे.
ऐहिक जीवनाविषयी तुच्छताभाव निर्माण करणार्या “जगन्मिथ्या” वादाला जोतिरावांनी कडाडून विरोध केला आहे. ते म्हणतात, निर्मिकाने निर्मिलेल्या पवित्र जगाविषयी व संसाराविषयी अज्ञानी अतिशूद्रांच्या मनात वीट भरवून तो सर्व व्यर्थ आहे म्हणून त्यांनी निरिच्छ व निरभ्रम होऊन परित्याग केल्याबरोबर धूर्त आर्य भट्टांनी त्यावर झोड उठवावी, असा स्वार्थ मायावाद पिकवण्याच्या मुळाशी होता. या मायावादाला बळी न पडता या जगातील आपले जीवन अधिकाधिक उत्तम प्रकारे कसे जगता येईल, असा प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे जोतिरावांच्या मते परमकर्तव्य असते. प्रत्येकाला येथे तहान, भूक, रोगराई, भय इत्यादींपासून मुक्त असे समृद्ध जीवन जगता आलेच पाहिजे. निर्मिकाने हे जग मानवाच्या उपभोगासाठीच केले आहे. विवेक जागा ठेवून माणसाने त्याचा अवश्य उपभोग घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
तर्क, विवेक आणि समतेचे तत्त्व या निकषांवर प्रत्येक धर्मग्रंथातील तरतूद तपासण्याची शिफारस जोतिरावांनी केली आहे. कारण भाराभर धर्मग्रंथ हेच या समाजातील अंधश्रद्धांचे सर्वांत मोठे मूलस्रोत आहेत. याबद्दल त्यांना शंका नव्हती; पण याही बाबतीत आडमुठेपणा करायची जोतिरावांची मुळीच तयारी नव्हती. कृष्णाजी अ. केळुस्करांनी एक उद्बोधक आठवण या संदर्भात सांगितली आहे. धर्मविधीत पुरोहितांची लुडबूड नको असेल, तर ज्या धर्मग्रंथांनी तिला मान्यता दिली ती साफ चुकली आहेत, त्यात काहीएक तथ्य नाही असे सिद्ध केले पाहिजे. एरवी त्यांचे बंड मोडावयाचे नाही. धर्मक्रांतीला या उपायाची जरुरी नाही, असे जेव्हा केळुस्कर जोतिरावांना म्हणाले. त्यावर जोतिराव उत्तरले की, “या तरुण मुलाची ही पुस्तकी युक्ती करावयास अजून अवकाश आहे व हे काम दांडग्या विद्वानाचे आहे. ते करणारे कोणी निर्माण होते तोपर्यंत आम्ही आमचा आसूड चालवून भटपांड्यांना झोडपून काढण्याचा उद्योग चालू ठेवणार.”
जोतिरावांच्या काळात अशी विस्तारत गेलेली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ पुढे फार काळ टिकाव धरू शकली नाही, याची अनेक कारणे सांगता येतील. त्यांच्या पश्चात त्यांची चळवळ ज्या सधन व्यापारी, राजेरजवाडे व जमीनदार वर्गांच्या हाती गेली, त्या वर्गांना जोतिरावांच्या सामाजिक ध्येयवादाशी फारसे कर्तव्य नव्हते. बहुजन समाजात जो नवशिक्षित मध्यमवर्ग पुढे आला होता, त्याला रुढीभंजनाच्या कार्यात फारशी रुची नव्हती. फुल्यांच्या चळवळीतील ब्राह्मणवर्चस्व विरोध आणि ब्राह्मणी मक्तेदारीला विरोध हेच या वर्गाला भावले. त्यांनी आपल्या राजकारणासाठी त्या मुद्यांचा यथेच्छ वापर करून घेतला. मात्र, समाजाला धार्मिक-सांस्कृतिक गुलामगिरीच्या मगरमिठीतून सोडवायची निकड त्याला जाणवली नाही. किंबहुना, स्वत: शिक्षण घेऊन पांढरपेशा व्यवसायात प्रवेश घेऊनही हा वर्ग आपल्या अशिक्षित बांधवांइतकाच परंपराभिमानी व अंधश्रद्ध राहिला होता. अंधश्रद्धेचे मूळ अज्ञानात आहे आणि अज्ञान दूर होताच अंधश्रद्धांचे निर्मूलन होईल असा जोतिरावांचा निष्कर्ष होता. तो नवशिक्षित बहुजन वर्गाने खोटा पाडला किंवा असे म्हणता येईल की, सुविद्य होऊनही या वर्गाची ‘अविद्या’ कायमच राहिला. आजही अशिक्षितांइतकीच गरज सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा दूर करण्याची आढळते.
अंधश्रद्धांमुळे शूद्रातिशूद्र समाजाची ऐहिक पिछेहाट होते, हा कार्यकारणभाव फुले जेवढ्या स्पष्टपणे मांडतात तेवढा भर दैन्यदारिद्य्राचा विसर पडण्यासाठी लोक भ्रामक समजुतींना व अंधश्रद्धांना जवळ करतात या वस्तुस्थितीवर देत नाहीत. अंधश्रद्धा बहुतांशी दु:खी, कष्टी मनांना खोटा का होईना दिलासा किंवा आधार पुरवतात. त्या आधाराची गरज नाहीशी व्हायची तर ज्या दैन्यापोटी ती निर्माण होते तेच संपवावे लागेल. अंधश्रद्धांना स्वतंत्र स्वयंभू मनोविकार समजून त्यांच्या निराकरणाचे प्रयत्न सफल होण्याची सुतराम शक्यता नसते. दारिद्य्र, आर्थिक विषमता, शोषण आणि मागासलेपण संपवण्याच्या क्रांतिकारक चळवळीशी अंधश्रद्धा निर्मूलनाची सांधेजोड झाली, तरच ती यशस्वी होऊ शकेल. जोतिरावांना सैद्धांतिक पातळीवर समजलेले हे सत्य प्रत्यक्ष चळवळीत क्रियाशील झाले नाही. त्यांच्या पश्चात तर चळवळीतील स्थितीवादी प्रवाहच उत्तरोत्तर प्रबळ ठरेल आणि महान सुपृक्षमता असलेल्या एका अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे यश अल्पजीवी ठरले.
-भास्कर लक्ष्मण भोळे
(‘समाजसुधारक आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकातून साभार.)
