डॉ. जयसिंगराव पवार -


१९ फेब्रुवारीला शिवजयंती आणि २० फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा स्मृतिदिन! त्यानिमित्ताने कॉम्रेड गोविंद पानसरे समग्र वाङ्गमय या ग्रंथाला डॉ.जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील “शिवाजी कोण होता?” या पुस्तिकेबद्दलचा संपादित भाग आम्ही देत आहोत.
– संपादक मंडळ
‘शिवाजी कोण होता’ ही पुस्तिका इतकी लोकप्रिय कशी झाली?
कॉ. गोविंद पानसरे यांची ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका तर इतकी लोकप्रिय झाली आहे, की तिच्या तीन-तीन/चार-चार हजारांच्या पंचवीस आवृत्त्या गेल्या बावीस वर्षांत प्रसिद्ध झाल्या आहेत. येथून पुढेही त्या होत राहतील, यात शंका नाही. कॉ. पानसरे यांची महाराष्ट्रात सुदूर पोहोचलेली व सर्वांत लोकप्रिय झालेली ही पुस्तिका आहे.
आमच्या मते या पुस्तिकेच्या अफाट लोकप्रियतेची चार कारणे आहेत :
१. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे शिवछत्रपती हा पुस्तिकेचा विषय.
२. शिवछत्रपतींच्या कामगिरीचे लेखकाने उलगडून दाखविलेले रहस्य.
३. या कामगिरीचा वर्तमानाशी असणारा अन्वय.
४. लेखकाची प्रासादिक भाषाशैली.
एकूण पाच प्रकरणांत कॉ. पानसरे यांनी शिवाजी महाराजांच्या कामगिरीचा वेध घेतला आहे. सरंजामशाही, तसेच राजेशाही ही आता कालबाह्य समाजरचना झाली असता, आता लोकशाहीच्या युगात आपण शिवजीराजाचा उदोउदो का करतो, आपल्या देशात हजारो राजे-रजवाडे होऊन गेले तरी, शिवाजी राजाचीच जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणावर का साजरी होते, असे त्याचे कोणते वेगळेपण आहे, असे प्रश्न त्यांनी प्रारंभीच उपस्थित केले आहेत आणि मग त्यांनी एका वाक्यातच त्याचे उत्तर दिले आहे. ते असे –
“शिवाजीचे कार्य व शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणार्या सर्वसामान्य माणसाला- रयतेला- आपले वाटत होते.” या त्यांच्या विधानाच्या पुष्टीसाठी त्यांनी शिवा काशीद (न्हावी), बाजीप्रभू, मदारी मेहतर, हिरोजी फर्जंद अशा अनेक सामान्य स्तरांतून आलेल्यांची उदाहरणे दिलेली आहेत; पण तरीसुद्धा सामान्य माणसाला, सामान्य रयतेला शिवाजी राजाच्या राज्याबद्दल आत्मीयता, प्रेम का वाटावे, याचा शोध कॉ. पानसरे यांनी पुढे घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या पूर्वीच्या राजवटी आणि शिवशाहीची राजवट यात नेमका फरक सांगताता ते म्हणतात-
“राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता. राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. राज्य बदलले की, ती जुनीच राज्ययंत्रणा ते राज्य राबवीत होते व प्रजेला नागवीत होते. वतनदाराने रयतेला छळले, लुटले, नागवले तरी राजाला पर्वा नव्हती. जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे.
शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार-देशमुख-वतनदार-पाटील-कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत, तर राज्याचे नोकर आहेत, असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले.
वतनदार राज्याच्या नियमाविरुद्ध वागू लागले, रयतेला छळू लागले व अत्याचार करू लागले तर, त्यांच्याविरुद्ध रयतेला दाद मागण्याचे धाडस आले. कारण रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब बसेल, अशी कठोर शिक्षा होऊ लागली.
शिवाजीच्या रयतेला हे सारेच नवे होते. कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते.”
दुसर्या प्रकरणात कॉ. पानसरे यांनी शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाची धोरणे कशी राबवली, याची चर्चा केली आहे. त्यामध्ये वतनदारांच्या कचाट्यातून, जुलूमजबरदस्तीतून रयतेची सुटका कशी केली; रयतेच्या जमिनीची मोजणी करून शेतसारा कसा निश्चित केला, तो वसूल करण्याची पद्धती कशी ठरविली गेली, रयतेच्या भाजीच्या देठासही हात लावता कामा नये, असे सक्त हुकूम मुलकी अधिकार्यांना व लष्करातील सैनिकांना कसे दिले गेले होते, स्त्रियांच्या अब्रूवर घाला घालणार्या मुजोर वतनदारांना व अधिकार्यांना कठोर शिक्षा कशा फर्मावल्या गेल्या; गुलामांच्या खरेदी-विक्रीस कशी बंदी घातली केली होती; स्वराज्यातील व्यापार-उद्योगाच्या वाढीसाठी कोणकोणत्या संरक्षणात्मक उपाययोजना आखल्या गेल्या होत्या; स्वराज्याच्या राज्यकारभारात मराठीला प्राधान्य कसे दिले; अशा नानाविध सुधारणांची चर्चा करत असता आज लोकशाहीच्या युगात आपल्या देशात शिवाजी महाराजांच्या या सुधारणांप्रमाणे आपण वागतो का, असा सवाल कॉ. पानसरे पानोपानी विचारताना दिसतात.
आपल्या गावातील रयतेच्या मुलीवर अत्याचार करणार्या रांझ्याच्या पाटलाला हातपाय तोडण्याची शिक्षा दिल्याची कथा सांगून कॉ. पानसरे त्यावर टिपणी करताना म्हणतात- “आजही गोरगरीब रयतेच्या लेकी-सुनांवर खेडोपाडी अन् शहरातसुद्धा अत्याचार अन् बलात्कार होतात; पण शिवाजीचा वारसा सांगणारे अन् उठल्या सुटल्या शिवाजीच्या नावाचा जयघोष करणारे आज काय करतात? अत्याचार करणार्याला शिक्षा होतात का? हात-पाय तोडायचे सोडा, कोर्टात केस तरी होते का? की अत्याचार करणारा जितका मोठा ‘वतनदार’, जितका मोठा ‘मालदार’ तितक्या लवकर त्याची सुटका होते? का अटकच होत नाही? लोकशाहीतसुद्धा शिवाजी आठवतो तो यामुळे – आठवावा तो यासाठी.
स्वत:च्या नातेवाईकांना अन् अधिकार्यांच्या पापाला पांघरूण घालून पुन्हा वर कुणी शिवाजीचं नाव घ्यायला लागला तर, त्या शिवाजीची आठवण करून त्याला जाब विचारायला पाहिजे, शिवाजी आठवावा तो यासाठी.”
कॉ. पानसरे यांच्या लिखाणात वर्तमानाशी अन्वय आहे, तो असा.
१७ व्या शतकातील राजांची, सरदारांची सैन्ये लुटीवर जगत. ती लुटारूंची सैन्ये होती. शिवाजी राजाचे सैन्य हे शेतकर्यांचे सैन्य होते. शेतीभाती करणार्या रयतेचे सैन्य होते, ते नुसते पराक्रमी नव्हते, तर नीतिमानही होते, हा मुद्दा मांडताना कॉ. पानसरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे स्वत:चे शुद्ध चारित्र्य, जाणीवपूर्वक हेतू मनाशी बाळगून दिलेल्या स्पष्ट आज्ञा, आज्ञेचा भंग करणार्यांना जरब बसेल अशा शिक्षा, उत्पादक शेतकर्यांमधूनच केलेली सैन्याची रचना, शिपायांचा शेतीशी व कष्टाशी जिवंत संबंध, रोख पगार देण्याची रीत आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अन्यायाचा व लुटींचा प्रतिकार करण्याच्या हेतूने सुरू केलेले कार्य, यामुळे शिवाजीचे सैन्य आणि इतर राजांचे सैन्य यात फरक होता. महाराष्ट्रातील सामान्य रयतेला शिवाजी महाराजांचे सैन्य हे लुटारू सैन्य वाटत नव्हते, तर लूट थांबवायला निघालेले संरक्षक सैन्य वाटत होते. रयत सैन्याला साहाय्य करीत होती आणि सैन्य रयतेला वाचवीत होते.”
तिसर्या प्रकरणात कॉ. पानसरे यांनी शिवाजी महाराजांच्या धार्मिक दृष्टिकोनाची चर्चा-चिकित्सा केली आहे. प्रारंभी त्यांनी महाराजांची जनमानसातील एकूण प्रतिमा कशी आहे, याचे रेखाटन केले आहे : “शिवाजी हा मुसलमानांच्या विरुद्ध होता… त्याचे जीवितकार्य मुसलमान धर्माचा प्रतिकार करणे हे होते… तो हिंदू धर्मरक्षक होता… गोब्राह्मण प्रतिपालक होता… शिवाजीचे युद्ध हे धर्मयुद्ध होते… तो परमेश्वराचा अवतार होता” इत्यादी.
ऐतिहासिक वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे कॉ. पानसरे निदर्शनास आणतात. शिवाजी हा हिंदू होता किंवा तो हिंदू धर्मरक्षक होता, म्हणून तो यशस्वी झाला असे म्हणावे, तर पृथ्वीराज चौहान किंवा राणा प्रताप हे का यशस्वी झाले नाहीत? धर्मयुद्ध म्हणावे तर एक जण त्यात यशस्वी होतो आणि दुसर्या दोघांना पराजित का व्हावे लागते? असे निरुत्तर करणारे प्रश्न कॉ. पानसरे उपस्थित करतात.
शिवाजी महाराजांचे सरदार व सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते; त्याच मुस्लीम धर्मीयांचाही भरणा होता, हे कॉ. पानसरे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात. दौलतखान, काजी हैदर, सिद्दी हिलाल, नूरखान बेग अशी कितीतरी उदाहरणे आहेत. मुस्लीम सुलतानांच्या सैन्यातही कित्येक हिंदू सरदार व सैनिक असत. खुद्द महाराजांचे वडील आदिलशाहीचे सरदार होते. मिर्जा राजा जयसिंग औरंगजेबनिष्ठ होता. अनेक हिंदू सरदार सुलताननिष्ठ होते, तर अनेक मुस्लीम अधिकारी शिवाजीनिष्ठ होते, असे प्रतिपादन कॉ. पानसरे यांनी आपला निष्कर्ष वाचकांसमोर ठेवला आहे. “धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता. राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती.”
शिवाजी राजा इस्लामच्या विरुद्ध होता काय? तो मुस्लीम धर्माचा द्वेष करीत होता काय? कॉ. पानसरे म्हणतात, की “इतिहासाशी इमान राखून बोलायचे तर या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी आहेत.” या संदर्भात औरंगजेबाचा चरित्रकार व शिवाजी राजाचा कट्टर शत्रू खाफीखान याचे प्रसिद्ध विधान कॉ. पानसरे यांनी उद्धृत केले आहे : “शिवाजीने सैनिकांकरिता असा सक्त नियम केला होता, की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुराण ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोषीश अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून ते आपल्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लीम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वत: त्यांची काळजी घेत असे.”
खाफीखानाचे हे विधानच एवढे स्वयंस्पष्ट व स्वयंसिद्ध आहे, की त्यावर काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. खाफीखान हा औरंगजेब व शिवाजी महाराज या दोघांचाही समकालीन आहे. दक्षिणेतील मोगल-मराठा युद्धाचा साक्षीदार आहे.
यानंतर कॉ. पानसरे यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबला जिझिया कराच्या संदर्भात जे निषेधपत्र लिहिले होते, त्याचा परामर्ष घेतला आहे. त्यात महाराजांनी म्हटले होते की, हिंदू व मुस्लीम हे दोन्ही धर्माचे रंग वेगवेगळे असले, तरी ते एकाच ईश्वराने निर्माण केले आहेत. कुराणाच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगवेगळे नाहीत. ईश्वर हा फक्त मुसलमानांचा आहे, असे कुराणात म्हटलेले नाही.
शेवटी महाराजांच्या धार्मिक धोरणाचा समारोप करताना कॉ. पानसरे यांनी म्हटले आहे – “शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी, त्याचा उद्देश एकच आहे, हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजीने मांडले. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता; पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मीयांच्या द्वेषावार आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही, असे त्याला कधीच वाटले नाही.”
चौथ्या प्रकरणात शिवाजी महाराजांच्या तथाकथित ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ या बिरुदावलीची चर्चा केली गेली आहे. महाराजांनी कोठेही स्वत:ला अशी बिरुदावली लावली नाही. महाराजांचे राज्य हे ब्राह्मणांच्या प्रतिपालनासाठी असते, तर मिर्झा राजा जयसिंगला विजय मिळावा म्हणून ब्राह्मणांनी कोटीचंडी यज्ञ केला नसता, अथवा रायगडावरील राज्याभिषेकालाही विरोध केला नसता; पण यावरून कोणी असा निष्कर्ष काढला, की महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मण शिवाजी राजाच्या विरोधात होते, तर तो चुकीचा ठरेल, असे कॉ. पानसरे म्हणतात. कारण महाराजांचे सात प्रधान व अनेक अधिकारी ब्राह्मणच होते. तेव्हा प्रश्न केवळ ब्राह्मणांचा नसून तो सनातन चातुर्वर्ण्य धर्माचा होता. त्या काळाच्या मर्यादांचा होता. राज्याभिषेकाचा धार्मिक विधी, त्याप्रसंगी मुंज व राण्यांशी पुन्हा विवाह वगैरे गोष्टी या मर्यादांच्या निदर्शक होत, असे मत व्यक्त करून कॉ. पानसरे यांनी “शिवाजीचे राज्य धर्मनिरपेक्ष होते… शिवाजी खरा समाजवादी होता.” ही विधाने हास्यास्पद ठरविली आहेत. त्याच्या दृष्टिकोनातून “सरंजामी समाजरचनेच्या काळात स्वत: एक राजा असलेला शिवाजी धर्मनिरपेक्ष असणे शक्य नव्हते, समाजवादीही असणे शक्य नव्हते. शिवाजी त्याच्या समकालीनांपेक्षा किती लांब पल्ल्याचा विचार करी हे महत्त्वाचे. त्या परिस्थितीतही त्याने किती दूरदृष्टीचा विचार केला आणि त्या परिस्थितीतही त्याने किती प्रगतिशील पावले उचलली. राजा असूनही रयतेची कशी कदर केली हे महत्त्वाचे.”
सर्वांत शेवटी कॉ. पानसरे यांनी शिवचरित्राचा विपर्यास कसा केला जातो, म्हणजे समाजकारणी व राजकारणी लोक शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्या स्वार्थासाठी कसा गैरवापर करतात, या विषयाची चर्चा केली आहे. खरे तर या प्रकरणात शिवचरित्राचा एक अभ्यासक याऐवजी एक तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता, प्रबोधनवादी विचारवंत म्हणूनच कॉ. पानसरे अधिक प्रकर्षाने पुढे येतात. तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या शिवाजीराजाच्या चरित्राचा आजच्या वर्तमानाशी अन्वय का आहे आणि तो कसा असावा, याचे त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. हे करीत असता काही ठिकाणी त्यांची लेखणी तिखट तसेच उपरोधक वळणे घेते.
“शिवाजी माणूस होता. चांगला माणूस होता. थोर माणूस होता. हुशार व दूरदृष्टीचा माणूस होता. नीतिमान आणि व्यवहारी माणूस होता. शूर लढवय्या आणि कुशल संघटक होता; पण माणूस होता. देव नव्हता. अवतार नव्हता.
शिवाजी देव केला म्हणजे काय होतं? देव केला की शिवाजीसारखं वागण्याची आपणावर जबाबदारी राहत नाही. “शिवाजीसारखं वागा”, “रयतेला सतावू नका”, “बलात्कार करणार्यांना पाठीशी घालू नका”, “रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू नका”, “स्वत:च्या धर्मावर श्रद्धा ठेवा; पण परधर्माचा द्वेष शिकवू नका” असं सांगितलं, तर सरळ उत्तर येतं, “तो शिवाजी कुठं? आपण कुठं? तो देवाचा अवतार आणि आपण माणूस, आपल्याला ते कसं जमणार? आपण आपलं असंच वागायचं.”
देव असल्यामुळे वर्षातून एकदा ‘शिवाजी महाराज की जय’ म्हणायचं, जयंती करायची, वर्गणी गोळा करायची, थोडी खर्चायची, थोडी खायची, जमलं तर थोडी खर्चायची अन् जास्त खायची, कपाळाला अष्टगंध लावायचं, गुलाल उधळायचा की काम झालं. शिवभक्त म्हणवून घ्यायला आपण रिकामे झालो. शिवाजीसारखं वागायची आपल्यावर जबाबदारी नाही.”
शिवाजी महाराजांसारखे थोर पुरुष सामान्यजनांची श्रद्धेची व आदराची स्थाने असतात. समाजातील प्रस्थापित ‘टगे’ लोक हे अचूक हेरतात आणि या थोर महात्म्यांच्या प्रतिमा उचलून त्या आपल्या स्वार्थासाठी विकृत करतात व त्याचा गाभाच गारद करून टाकतात, असे प्रतिपादन करत कॉ. पानसरे शिवाजी महाराजांसोबतच ज्ञानेश्वर, तुकाराम, महात्मा गांधी यांच्या प्रतिमा कशा विकृत केल्या गेल्या याची उदाहरणे देतात. ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणार्यांच्या वारसदारांनी ज्ञानेश्वरांसारखा थोर पुरुष झालाच नाही, असा पुकारा एका बाजूला करून दुसर्या बाजूला सामान्य जनांना शिक्षणाचा हक्क, म्हणजे शहाणे होण्याचा हक्क नाकारला! तुकारामाची गाथा बुडविणार्या आणि त्याला सदेह वैकुंठाला धाडणार्या (?) मंबाजीच्या वारसदारांनी त्यांच्या अभंगात ‘फुसके’ अभंग घुसडून त्यांची पुरोगामी प्रतिमा दडविण्याचा प्रयत्न केला! एवढेच नव्हे तर महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला, त्याचे वारसदार आता ‘आम्ही गांधीवादी समाजवादी आहोत’, असे सांगू लागले आहेत! कॉ. पानसरे म्हणतात, “खून करूनही महात्मा गांधी संपत नाहीत, असे दिसले म्हणून मग हे स्वत: गांधीवादी बनून गांधीला संपवायला निघालेत. दुसरे काय?”
कॉ. पानसरे यांनी हिंदू-मुस्लीम दंग्यात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या गैरवापराचाही मुद्दा हाताळला आहे. परवा दक्षिण महाराष्ट्रात अफझलखान वधाच्या पोस्टरवरून झालेली हिंदू-मुस्लीम दंगल वाचकांच्या स्मरणात असेलच. या संदर्भात कॉ. पानसरे लिहितात, “आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू-मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला हवे की, शिवाजी धर्मांध नव्हता. तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता; पण मुसलमान धर्माचा द्वेष करत नव्हता. श्रद्धावान होत; पण अंधश्रद्ध नव्हता.”
हिंदू-मुस्लीम दंग्यांसाठी कॉ. पानसरे यांनी केवळ हिंदूंना जबाबदार धरले आहे असे नाही. त्यांनी धर्मांध मुस्लिमांनाही फटकारले आहे. मुस्लिमांपैकी काहीजण आपणास शहेनशहाचे वारसदार समजतात. म्हणजे राज्यकर्त्या जमातीचे वारसदार समजतात. अशांना कॉ. पानसरे विचातात, की शिवाजीराजाचे राज्य हे फक्त हिंदूंसाठी नव्हते, ते महाराष्ट्रातील मुसलमानांसाठीही होते; त्याचे ‘स्वराज्य’ स्थापण्यासाठी मुसलमानांचेही प्राण खर्ची पडले होते. मग महाराष्ट्रातील मुसलमानांनी ‘शिवाजी’ आपला मानला पाहिजे की नको? की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे का? आरमारातील दौलतखान, प्रशासनातील काजी हैदर तुमचे कुणीच नाहीत काय?
शिवाजी महाराजांनी नवी वतने कोणाला दिली नाहीत. जुन्या वतनदारांची वतने बरखास्त करून सरकारजमा केली आणि वतनदारांची रयतेवरील पकड नाहीशी केली. रयतेस मुक्त केले. त्यामुळे रयत सुखा-समाधानाने नांदू लागली. रयतेला महाराजांचे राज्य आपले वाटू लागले. आज शिवभक्तांनी आपल्या राज्यात नवनवीन वतने निर्माण केली आहेत. हे शिवभक्त नव्या वतनदारांना सांगत असतात, ‘तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा. रयतेला हवे तसे लुटा, आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झाले!” कॉ. पानसरे यांनी जिल्हा परिषदा, म्युनिसिपालट्या, कार्पोरेशन्स, मोठमोठ्या सहकारी संस्था, साखर कारखाने, आमदारक्या, खासदारक्या या वतनदार्याच मानल्या आहेत. त्या वंशपरंपरागत दिल्या-घेतल्या जात आहेत!
कॉ. पानसरे यांनी अशा वतनदार्यांमधील आधुनिक वतनदारांच्या वर्तनाचा पंचनामा अतिशय परखड भाषेत केला आहे. तो उतारा देऊनच या गाजलेल्या पुस्तिकेच्या समालोचनाचा समारोप करू या.
लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण हवेच, त्याला विरोध कुणी करणार नाही; पण विकेंद्रीकरण म्हणजे वतनदारी नव्हे. शिवाजीच्या काळात वतनदार जसे जनतेला छळीत त्याहून हे नवे वतनदार जास्त छळतात. साखरसम्राटाविरुद्ध कुणी एखादा रयत गेला तर तो संपलाच. त्याला कर्ज मिळत नाही, खत मिळत नाही, त्याचा ऊस जात नाही. दोन वर्षांत तो बरबाद होतो अन् एक बरबाद झाला की दुसरे १० धजत नाहीत अन् वतनदारांचं वतन घट्ट होतं.
रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होताहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात या नव्या राजांची, सरदारांची अन् वतनदारांची सरबराई करण्याला रयत रंजीस येते की नाही?
आणि हे सारं शिवाजी महाराज की जय म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर? त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वत: येणार नाही हेसुद्धा तितकंच खरं आहे; पण त्याची शिकवण आहे ना? त्याची शिकवण अंगी आणून नव्या वतनदार्यांवर प्रहार करणे हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय.
खरोखरच शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील रयत या वतनदार्यांवर प्रहार करील काय?
– डॉ. जयसिंगराव पवार