डॉ. हमीद दाभोलकर -
साथी किसन वराडे यांचे ‘सरवा’ हे आत्मकथनपर पुस्तक शिक्षण क्षेत्रात काही मूल्ये मनाशी धरून आयुष्यभर केलेल्या निर्धारपूर्वक वाटचालीचा लेखाजोखा आहे. शिक्षणाचे टोकाचे बाजारीकरण हा ज्या जगाचा युगधर्म झालेला आहे, त्या कालखंडात तर या आत्मवृत्ताचे मोल आणखीनच उठून दिसते.
जळगाव जिल्हयातून शिक्षकाची नोकरी करण्यासाठी एक तरूण अंबरनाथ येथे येतो आणि आपल्या जगण्याच्या मूल्यांशी कोणतीही तडजोड न करता एक शिक्षण संस्था स्थापन करतो आणि नेटाने ती चालवतो, हे अनेक तरूणांना प्रेरणादायी ठरावे, असे आत्मकथन आहे.
मला ‘सरवा’ हे आत्मकथन वाचताना जाणवत राहिला तो लेखकाचा साधेपणा आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जात राहण्याची वृत्ती, अंबरनाथसारख्या शहरात अन्य शाळांमध्ये नको असलेली गरीब घरातील मुले सोबत घेऊन शाळा चालवताना त्यांना नक्कीच अनंत अडचणी आल्या असणार! पण त्याचा त्यांनी कोठे बाऊ केलेला दिसत नाही.
आणखी एक महत्त्वाची नोंद करण्यासारखी गोष्ट म्हणजे शाळेत काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी यांच्याकडून कुठलेही डोनेशन न घेतालत्यांना सेवेत सामावून घेणे! सध्याच्या कालखंडात अशक्य वाटावी अशीच ही गोष्ट आहे. गरीब घरातील मुलांना शिक्षण आणि नोकरी मिळावी म्हणून त्यांनी केलेली धडपड खरोखरच स्तुत्य आहे.
स्वत:च्या कुटुंबातील सर्वांना आपल्या सोबत घेऊन एकमेकांना आधार देत स्वतंत्रपणे पुढे जाण्याची वराडे कुटुंबियांची पद्धत ही आजच्या कालखंडातील एकत्र कुटुंब विरुद्ध विभक्त कुटुंबाच्या वादाला एक सकारात्मक पर्याय आहे. त्यांच्या आईने सांगितलेले, ‘एकमेकायले धरीसन चाला. तेच्यातच राम हाये. भांडू नका भाऊ, गेला दिस लाखाचा समजा,’ हे वाक्य आयुष्य जगण्याचे एक साधे सोपे तत्त्वज्ञान आपल्याला देऊन जाते.
एवढा जनसंपर्क आणि अनेक वर्षेशिक्षण क्षेत्रात असलेली व्यक्ती राजकारणात न जाता निर्धाराने समाजकारण करीत राहते, हे देखील एक नोंद घेण्यासारखे वेगळेपण आहे. मुख्याध्यापक म्हणून निवृत्तीनंतर शिक्षण संस्थेच्या कामाबरोबरच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी आपले समाजकार्य चालू ठेवले आहे. शालेय वयातील मुलांच्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपल्या शाळेतील सर्व मुलांना सहभागी करून घेणे, ही देखील खूप स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यांचे हे काम असेच वृद्धिंगत होत राहावे आणि त्या माध्यमातून जबाबदार आणि संवेदनशील नागरिकांची पिढी घडत राहावी, ही सदिच्छा.
– डॉ. हमीद दाभोलकर
कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस
लेखकाचा परिचय
पूर्ण नाव : किसन अमृत वराडे
जन्म दिनांक : 1 जून 1955
मूळगाव : गाडेगाव, ता. जामनेर, जि. जळगाव
शिक्षण : एम. ए., बी.एड.
नोकरी : मराठा हायस्कूल, वरळी, मुंबई येथे 16 वर्षे
सहशिक्षक, ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय अंबरनाथ येथे
15 वर्षे मुख्याध्यापक.
संस्थेची स्थापना : परिवर्तन शिक्षण संस्थेचे संस्थापक व सचिव.
संस्थेचे शैक्षणिक कार्य : ज्ञानामृत बालवाडी,
मातोश्री देवकाबाई वराडे प्राथमिक विद्यालय,
ज्ञानामृत माध्यमिक विद्यालय, अंबरनाथ, जि. ठाणे.
सामाजिक कार्य : समाजमंडळांमध्ये सक्रिय सहभाग,
अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंबरनाथ
विविध पुरस्कार :
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेतर्फे गुणवंत मुख्याध्यापक,
भोरगाव लेवा समाजातर्फे शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल,
लेवा गणबोली साहित्य संमेलन, जळगाव येथे काव्य वाचनाबद्दल,
ग्लोबल लेवा फौंडेशन जळगावकडून ‘लेवा आयकॉन’,
अंबरनाथ नगरपरिषदेकडून शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल,
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून राज्यस्तरीय कोकण विभाग गुणवंत संस्थाचालक.
लेखक : किसन अमृत वराडे,
538, खरे विभाग, अंबरनाथ (पूर्व), जि. ठाणे. 421501.
मोबा. 9326019606
प्रकाशक : सनय प्रकाशन, शुभम विश्व, मोगरा बी. 14,
आनंदवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे. 410504.
मोबा. 9860429134
पृष्ठसंख्या : 240,
किंमत : 250 रुपये.
