सम्राट हाटकर -
नांदेड अंनिसच्या प्रयत्नाने जादूटोणाविरोधी कायदा लावला
३ मार्च २०२३ रोजी भाऊराव मोरे प्रधान सचिव नायगाव अंनिस यांनी व्हॉट्सअॅपवर पाठविलेल्या ‘जादूटोणा, भानामती केली म्हणून एकास ठार मारले’ या शीर्षकाच्या बातमीचे कात्रण वाचले. प्रकरण होते गागलेगाव, ता. बिलोली जि. नांदेड येथील.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मी नांदेड येथून अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव कमलाकर जमदाडे कासराळी येथून आणि नायगाव शाखेचे अध्यक्ष हनुमंत खांडगावकर व भाऊराव मोरे नायगाव येथून ताबडतोब निघालो. नरसी येथे एकत्र जमलो व तेथून गागलेगावला निघालो.
१ मार्च २००३ रोजी हणमंत काशीराम पांचाळ, (वय ८५) यांना जबरदस्तीने हनुमान मंदिराजवळून नेले. आपल्या मुलीला भानामती केली म्हणून चिंचेच्या झाडाला बांधून वामन डुमणे, त्याचा मुलगा रत्नदीप डुमणे व नातेवाईक दयानंद वाघमारे यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सोडवायला गेलेल्या हणमंत यांच्या मारुती नागनाथ या नातेवाईकाला डुमणे यांनी शिव्या देऊन हाकलून दिले. नंतर या तिघांनी हणमंत पांचाळ यांना उचलून हनुमान मंदिरात आणले व ओट्यावर ठेवले. तेथेही मारहाण केली व फरशीवर डोके आपटले. हनुमंत पांचाळ यांची हालचाल बंद झाली तेव्हा ते तिघेही तिथून पसार झाले. पोलीस, नातेवाईक व सरपंच यांनी पांचाळ यांना शासकीय दवाखान्यात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. इकडे त्यांच्या दुसरे नातेवाईक मारोती नागनाथ पांचाळ यांनी “हनुमंत काशीराम पांचाळ यांनी वामन डुमणे यांचे मुलीवर करणी/भानामती केली, या कारणावरून आमचे गावातील वामन डुमणे, मुलगा रत्नदीप डुमणे व कांगटी येथील सोयरा दयानंद वाघमारे यांनी मिळून संगनमताने त्यास पकडून घेऊन जाऊन चिंचेच्या झाडाला बांधून त्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारले म्हणून माझी त्यांचेविरुद्ध कायदेशीर तक्रार आहे”, या पद्धतीची तक्रार नोंदवली आहे.
८५ वर्षांच्या वृद्धाला गावातून जबरदस्ती घेऊन जाणे, झाडाला बांधून लाथा-बुक्क्या, लाकडाने व दोरीने मारहाण करणे, अर्धमेला झाल्यानंतर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरावर आणणे, मंदिराच्या प्रशस्त ओट्यावर ठेवून जमलेल्या गावकर्यासमोर पुन्हा मारहाण करणे, बघ्याची भूमिका घेऊन कोणीही सोडवायला न येणे, उलट त्याचे फोटो, व्हिडिओ काढणे, या मारहाणीत त्या वृद्धाचा मृत्यू होणे, ही बाब घडली ती करणी/भानामती केल्याच्या संशयामुळे. ही करणी/भानामती केली म्हणजे नेमके काय केले? काय होते? काय झाले? हे जाणून घेण्यासाठी आरोपीचे नातेवाईक, शेजारी, यांच्याकडे गेलो असता आरोपीच्या घराला कुलूप आढळून आले. आजूबाजूचे शेजारी बोलायला तयार नव्हते. लोक जवळ यायचे, पण काही विचारले की माहीत नाही, एवढेच उत्तर द्यायचे. नंतर असं कळलं की वामन डुमणे यांची २६ वर्षांची अविवाहित मुलगी सतत आजारी असते. तो आजार म्हणजे हणमंत पांचाळ यांनी तिला काहीतरी करणी/भानामती केली, त्यामुळे हनुमंत पांचाळ यांना आरोपींनी जबर मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला.
वरील तक्रारीमध्ये करणी/भानामती केली असे समजून हणमंत पांचाळ यांना जबरदस्त मारहाण केली व त्यामध्ये यांचा मृत्यू झाला अशी स्पष्ट तक्रार असताना सुद्धा महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर वरील घटनेबाबत अधिनियम भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३०२, ३४२ व ३४ लावल्याचे, एफ. आय. आर. क्रमांक ००३३ दिनांक २/३/२०२३ बघितल्यावर आमच्या निदर्शनास आले. जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनला निघालो. दरम्यानच्या काळात बिलोलीचे इन्चार्ज डी. वाय. एस. पी. विक्रांत गायकवाड व पी. आय. अनंत नरोटे यांच्याशी संपर्क साधला. रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. संकेत दिघे यांची भेट घेतली. संबंधित घटनेबाबत तक्रार घेतली त्याप्रमाणे गुन्हा नोंदवला नाही, तसा तो नोंदवावा यासाठी आम्ही अंनिसचे कार्यकर्ते आलो आहोत, हे त्यांना सांगितले. त्यांच्याकडे या कायद्याबाबत माहिती नव्हती. त्यांना तो अध्यादेश दाखवला. त्यांनी ताबडतोब ती प्रक्रिया पूर्ण केली, कलम वाढ केली व तसे मा. न्यायालय, पोलीस अधीक्षक नांदेड, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उपविभागीय अधिकारी बिलोली यांना कळविले. रात्रीचे नऊ वाजता ही प्रक्रिया पूर्ण झाली. पोलिसांना धन्यवाद देऊन आम्ही परत निघालो. वामन डुमणे, रत्नदीप डुमणे व दयानंद वाघमारे हे तिन्ही आरोपींना ४ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली व नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. दिनांक १९ मार्च २०२३ पर्यंत तिन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
– सम्राट हाटकर, नांदेड