वर्ध्यात मांत्रिकाकडून तरूणाचा बळी

-

म्हणे जीन, सवारत्याला झोपू द्या ‘विज्ञान’ पदवीधारक रितिक ठरला अघोरी विद्येचा बळी!

अमरावती येथील स्थानिक बेलापुरा येथील विज्ञान पदवीधारक विद्यार्थी बळी ठरल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, या प्रकरणी आर्वी पोलिसांनी एका मांत्रिकासह त्याच्या दोन मुलांविरुद्ध भादंविचे कलम 302, 201 (पुरावा नष्ट करणे) व महाराष्ट्र बळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळा जादू नियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला.

रितिक गणेश सोनकुसरे (22, रा. बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. 18 मे रोजी सकाळी आर्वी येथे आपल्या घरी रितिकचा मृत्यू झाल्याची माहिती मांत्रिक अब्दुल रहीम अ. मजीद याने मृताच्या पित्याला दिली होती. अब्दुल रहीम अ. मजीद व त्याची दोन मुले अ. जुनेद व अ. जमीर (तिघेही रा. विठ्ठल वॉर्ड, आर्वी, जि. वर्धा) यांनी रितिकवर उपचार करण्याचा बहाणा करून त्याला आर्वी येथे नेले. तेथे त्याचा तांत्रिक विद्येने इलाज करून त्याला जिवानिशी ठार मारले, अशी तक्रार रितिकच्या पित्याने नोंदविली.

19 मे रोजी रात्री 8.55 च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापूर्वी 18 मे रोजी रितिकचे पार्थिव अमरावतीत आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विज्ञान पदवीधर असलेल्या व मेडिकलमध्ये काम करणार्‍या आपल्या मुलाचा आर्वीच्या ‘त्या’ बाबाने अघोरी विद्येचा प्रयोग करून बळी घेतल्याचा आरोप रितिकच्या पित्याने ‘लोकमत’कडे केला. ‘टीम लोकमत’ने शुक्रवारी बेलपुरा येथील सोनकुसरे यांचे घर गाठून संपूर्ण वास्तव जाणून घेतले.

म्हणे, तुमच्या घरी दोन जीन!

17 मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास मांत्रिक अ. रहीम हा त्याच्या दोन मुलांसह बेलपुरा येथे आला. घराची तपासणी करून ‘तुमच्या घरी दोन जीन आहेत, घरी सहा खड्डे करून पूजा करून बंदोबस्त करतो,’ अशी बतावणी करून त्याने दोन हजार रुपये घेतले. काही साहित्यदेखील आणले. मात्र ‘एक साहित्य नागपूरला मिळते, त्यामुळे आपण ही पूजा शनिवारी करू,’ असे म्हणत मांत्रिक त्याच्या दोन मुलांसह रितिकलादेखील आर्वीला त्याच्या घरी घेऊन गेला.

माझ्यासोबत काहीतरी दुर्घटना होणार

रितिकने 17 मे रोजी रात्री 10.45 वाजता पित्याला फोन केला. आपल्याला कसेसे वाटत आहे, माझ्यासोबत काहीतरी दुर्घटना होणार आहे, असे वाटत असल्याचे तो म्हणाला.

18 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास मांत्रिक अ. रहीमने, ‘रितिकचा मृत्यू झाला असून, त्याचे शव येथून घेऊन जा,’ असे फोनकॉलवर सांगितले. त्यावर सोनकुसरे हे पुतण्या व मित्रांसमवेत आर्वीला पोचले. तेथे रितिक मृतावस्थेत पडला होता, तर त्याच्या गळ्यावर जखमांच्या खुणा दिसून आल्या.

अंगास मुंग्या येतात अन् पोटात अग्निदाह

‘अंगास मुंग्या येतात, पोटात जळल्यासारखे वाटते; तसेच अंगात सुया टोचल्यासारखे वाटते,’ अशी तक्रार रितिकने पित्याकडे चार महिन्यांपूर्वी केली होती. त्याच्यावर ‘पीडीएमसी’मध्ये उपचारदेखील करण्यात आला. ती बाब रितिकच्या पित्याने त्यांच्या मानसबहिणीकडे कथन केली. तिने आर्वी येथील अ. रहीम नामक मांत्रिकाचे नाव सांगून फोन नंबरदेखील दिला. तीन महिन्यांपूर्वी रितिकला घेऊन त्याचे वडील अ. रहीमकडे पोचले. तेथे त्याने तावीज, लिंबू व बिबे दिले, उतारादेखील काढला. दिलेले अंडे शहराच्या चौरस्त्यावर फेकण्यास सांगितले.

असे पडले पितळ उघडे

आरोपींनी रितिक याची गळा आवळून हत्या केल्यावर रितिकला त्याच्या वडिलांच्या हवाली करण्यात आले. पण आपले पितळ उघडे पडू नये; तसेच रितिक गतप्राण झाला, याची कुठलीही शंका मृताच्या वडिलांना येऊ नये म्हणून आरोपींनी, ‘रितिकवर जीन सवार आहे. तो सध्या झोपून असून, त्याला झोपू द्या. आम्ही इलाज करतो. तो बरा होईल,’ असे सांगितले. मात्र अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या रितिकच्या वडिलांना त्याच्या गळ्यावर ओरबडल्याचे दिसल्याने त्यांनी अमरावतीतील ‘इर्विन रुग्णालय’ गाठले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याने गणेश सोनकुसरे यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

(दैनिक लोकमतवरून साभार)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]