नव्या ‘गुरुबाजी’चे मायाजाल अर्थात गुरूविण कोण चुकवील वाट!

प्रा. प. रा आर्डे -

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची धुरा प्रा. . रा. आर्डे सरांनी गेली ३३ वर्षे वाहिली. प्रथम सहसंपादक, नंतर संपादक व अखेर सल्लागारसंपादक म्हणून आर्डे सरांचा सहभाग ‘अंनिवा’च्या वाटचालीत राहिला आहे. हा सहभाग १४ ऑक्टोबर २०२२ ला वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांच्या मृत्यूने खंडित झाला.

आर्डे सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी विपुल लेखन केले. जवळ जवळ प्रत्येक अंकात त्यांचा लेख असायचा. वार्षिक अंकातील विशिष्ट विषयांवरील त्यांचे अभ्यासपूर्ण लेख वाचकांच्या पसंतीस उतरत असत. या वार्षिक अंकातील ‘नव्या गुरुबाजीचे मायाजाल’ हा सरांचा अखेरचा लेख आहे. चळवळीच्या छद्मविज्ञान विरोधातील लढाईसाठी हा लेख मार्गदर्शक आहे. आर्डे सरांच्या स्मृतीला अभिवादन करत आम्ही हा लेख प्रकाशित करीत आहोत.

संपादक मंडळ, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र

माझ्या लहानपणीची एक गोष्ट पक्की आठवते. त्या वेळी मी पाचवी-सहावीत असेन. शेजारच्या गावच्या यात्रेला जाण्याचा हट्ट आईजवळ धरला. तिने थोड्या रागातूनच परवानगी दिली आणि जत्रेतील प्रसाद घेऊन येण्यासाठी खिशात आठ आण्याचे नाणे ठेवले. शेवटी टेकडी पार करून पलिकडच्या गावाला जायला निघालो. दुपारची वेळ होती. मागे-पुढे रस्त्यात कोणीच दिसेना. एवढ्यात मागून एक तरुण भरभर चालत आलेला दिसला. त्याने माझ्याजवळ येत ‘काय दोस्ता,’ असे म्हणून खांद्यावर हात टाकला आणि गप्पा मारत आम्ही दोघे पुढची वाट चालू लागलो. भर रणरणत्या उन्हात मागे-पुढे चिटपाखरू नसताना माझ्याबरोबर चालणारा ‘तो’ तरुण मला मोठा आधार वाटला. थोडे अंतर चालून गेल्यावर त्याने माझ्या खांद्यावरचा हात काढला आणि ‘तू आता सावकाश ये, मला लवकर पुढे जायचे आहे,’ असे म्हणून तो सटकला. जत्रेचे गाव जवळ आले होते. मी मनातल्या मनात म्हणालो, ‘लय चांगला दादा.’ थोड्या वेळात खिशात माझा हात गेला. आईनं दिलेली अधेली खिशातून गायब झाली होती. आधार देणारे, कठीण प्रसंगी सोबत देणारे लबाड आपल्याला कसे फसवतात, याचा हा अनुभव इतक्या वर्षांनंतरही मला अधून-मधून आठवतो.

एक सनातन समस्या

जगात सर्वत्र आपल्याला वाट दाखवणारे किंवा वाटेवर सोबत करणारे जसे सुजन भेटतात, तसेच लबाड लोकही भेटतात; ते आपला खिसा कसा रिकामा करतील, हे सांगता येत नाही. हे लोक आपण मोठे ज्ञानी आहोत, असा देखावा करतात. त्यांची भाषा मोठी लाघवी असते. अनेक कारणांनी अस्वस्थ असलेल्या माणसांना या तथाकथित गुरूंचा मोठा आधार वाटतो. पण हे गुरू ज्या वाटेवरून आपल्याला नेतात, ती वाट आपल्याला खड्ड्याकडे घेऊन जाते, हे आपल्या लक्षात येत नाही – ‘गुरूविण कोण दाखवील वाट!’ याऐवजी ‘गुरूविण कोण चुकवील वाट!’ अशा भामट्यांची जगात सगळीकडे चलती आहे.

नवी पुरोहितशाही अर्थात नवी गुरुबाजी

एकेकाळी जगातील सर्व देशांत शांततामय सहजीवनासाठी विविध धर्म निर्माण झाले. भारतातील वैदिक धर्माचे एक वचन ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे आहे; पण याच धर्मात नंतर पुरोहितशाही शिरली आणि शोषणांची विविध कर्मकांडे उदयाला आली. यातून अगदी अलिकडच्या काळापर्यंत नवनवे लबाड आध्यात्मिक गुरू उदयाला आलेत – आसाराम, रामरहीम, चंद्रास्वामी आदी. अध्यात्माच्या नावाखाली हे तथाकथित गुरू समाजाला चुकीच्या वाटेवरून नेतात आणि सामान्य लोकांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करतात. बुवाबाजीच्या या जाळ्यात हरिद्वारपासून ते खाली कन्याकुमारीपर्यंत आपण फसतो. हे केवळ आपल्याकडेच घडत आहे, असे नाही. सुईच्या भोकातून उंट जाईल; पण श्रीमंताला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही, असे सांगणारा ख्रिस्ती धर्म पुढे लोकांना स्वर्गात जाण्यासाठी प्रमाणपत्र विकू लागला. तीच गत इस्लामचीही झाली. इस्लामचा एक अर्थ शांतता असा आहे; पण पुढे इस्लाम धर्म आणि राजसत्ता यांच्यात युती होऊन इस्लामी धर्मगुरूंचे हितसंबंध जपले जाऊ लागले. ही झाली धर्म उदयाला आल्यापासून ते आजपर्यंतची धर्माची अवस्था. माणुसकी बाजूला पडली आणि सामान्य लोकांचे विविध धर्मांनी शोषण सुरू केले. ते आजही सुरू आहे.

नवी बुवाबाजी

१८ व्या शतकापासून ते आजतागायत ज्ञानचळवळीने जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जयघोष सुरू झाला. तंत्रज्ञानातून नवनवी साधने उदयास आली. आरोग्याच्या नव्या साधनांनी माणसांचे आयुर्मान वाढू लागले. विज्ञानाचे हे सामर्थ्य काही ‘चतुर’ मंडळींनी हेरले आणि नीतिधर्म बाजूला सारून जसा शोषणधर्म प्रभावी झाला, तसेच विज्ञानाचे मूळ कल्याणकारी रूप बाजूला ठेवून विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे आणि शोषणाचे नवनवे प्रकार तथाकथित नवनव्या गुरूंनी उदयास आणले. याला ‘न्यू एज गुरुबाजी’ म्हणता येईल. या मंडळींनी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या ‘हायब्रीड’ संयोगातून फसवणुकीचे नवनवे प्रकार सुरू केले. या प्रकारांना ‘छद्मविज्ञानाची गुरुबाजी’ म्हणता येईल.

छद्मविज्ञानाचा जागतिक पसारा

नेहरूंचे एक वाक्य आहे – ‘खर्‍या संस्कृतीची स्फूर्ती विश्वाच्या कानाकोपर्‍यातून मिळत असते.’ या वाक्यात थोडा बदल करून असे म्हणता येईल की ‘विविध विकृतींचा प्रसारही लबाड लोक सर्वत्र पसरवतात.’ छद्मविज्ञानाचे तथाकथित गुरू जगात सर्वत्र पसरले आहेत. देश कोणताही असो; आध्यात्मिक गुरुबाजीबाबत जसा सर्वधर्म समभाव आढळतो, तसेच छद्मवैज्ञानिक गुरुबाजीबाबत सगळं जग गिर्‍हाईक बनते. विज्ञानाच्या नावाखाली जगात पसरत चाललेल्या या नव्या ‘गुरुबाजी’बाबत अधिक विस्ताराने माहिती घेऊयात-

चित्र क्र. १ पाहा – ही एक जाहिरात आहे. या जाहिरातीचे शीर्षकच आहे – ‘Spiritual Rays.’ त्यात म्हटले आहे – “तुम्हाला चिंता आजार आहे का? तुम्ही आर्थिक संकटात आहात का? तुम्हाला आरोग्याची चिंता भेडसावते का? तुमच्यापासून सुख हिरावले जाते आहे का? धंद्यात तुम्हाला बरकत येत नाही काय? अशा सर्व प्रश्नांना माझ्याजवळ एक प्रभावी उपाय आहे – तो म्हणजे ‘रेकी.’ रेकीबरोबरच टॅरो कार्ड रीडिंग, देवदूत उपचार, आकाशी रेकॉर्ड रीडर, रंग उपचार…” अशा विविध छद्मविज्ञानांचा समावेश या जाहिरातीत आहे. यातील काही प्रकार अमेरिकेतून आपल्याकडे ‘आयात’ केलेले आहेत. अमेरिका हा व्यापारी देश आहे. इथून जगाला जशा काही चांगल्या गोष्टी पुरवल्या जातात, तसा हा छद्मविज्ञानाचा निरुपयोगी मालही इंटरनेटद्वारे सगळीकडे पाठविला जातो. इकडे पूर्वेकडूनही काही छद्मविज्ञाने आपल्याकडे मिळविली जातात. रेकीचा उगम जपानमध्ये झाला आहे. भारतातूनही पाश्चिमात्य देशांत छद्मविज्ञानाचा खोटा माल अमेरिकेला पाठवला जातो. आपल्याकडचे काही तथाकथित आध्यात्मिक गुरू अमेरिकन भक्तांना जाळ्यात ओढतात. ‘भावातीत ज्ञान’ नावाचे छद्मविज्ञान एका भारतीय गुरूने अमेरिकेत लोकप्रिय केले आहे. भावातीत ध्यानाच्या प्रभावाने तुम्ही जमिनीपासून अधांतरी तरंगू शकता, असा दावा हा गुरू करतो. जगात सर्वत्र पसरलेल्या विविध छद्मविज्ञानांचा खोलात जाऊन समाचार घेऊया.

काय आहे रेकी?

धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला मिकाओ हा जपानमधील धर्मगुरू. कुरयामा नावाच्या पर्वतावर जाऊन त्याने एकवीस दिवस ध्यानस्थ राहून उपोषण केले. एकविसाव्या दिवशी आकाशातून एक तेजस्वी प्रकाशझोत खाली आला. मिकाओंना कळायच्या आत तो त्यांच्या मस्तकात शिरला. या धक्क्याने ते बेशुद्ध झाले. जागे झाल्यावर पाहतात तो समोर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि काही धर्मसूत्रे तरळत होती. ते लगबगीने डोंगर उतरू लागले. एकवीस दिवसांची थकावट गेली. उतरताना पायाला जखम झाली, रक्त भळाभळा वाहू लागले आणि काय आश्चर्य! मिकाओ यांनी जखमेला हात लावताच रक्त तर बंद झाले; जखमही बरी झाली आणि इथेच रेकीचा जन्म झाला.

एकवीस दिवसांच्या तपश्चर्येने मिकाओंना प्रचंड भूक लागली होती, ते खानावळीत गेले. तेथे खानावळीत एका मुलीची दाढ प्रचंड दुखत होती. मिकाओंनी दुखर्‍या भागावर हात ठेवले आणि दाढ दुखायची थांबली! मग क्योटो येथील भिकारी छावणीतील सर्व लोकांचे आजार त्यांनी बरे केले. मात्र आजार फुकट बरे केले तरी कृतज्ञता नव्हती, म्हणून फुकट काही करायचे नाही, असे ठरले. त्यानंतर रेकी फोफावत गेली. मिकाओनंतर डॉ. ग्याशी यांनी रेकी चालू ठेवली आणि ते दुसरे रेकी मास्टर ठरले. त्यांनी बावीस रेकी मास्टर्सना दीक्षा दिली.

मिकाओ आणि त्यांनी ज्यांना रेकीची दीक्षा दिली, त्यांनी पुढे रेकी उपचार करणारे अनेक ‘रेकी मास्टर्स’ तयार केले. एखादा साथीचा आजार ज्याप्रमाणे सगळीकडे झटपट पसरतो, तसा हा रेकी उपचार काही कालावधीतच जगभर पसरला. रेकीची साथ भारतातही जोरात पसरली आहे. भारतातील विविध शहरांत सुखवस्तू लोकांमध्ये रेकीचा जोरात प्रचार चालू आहे. अशाच प्रचारातील एक जाहिरात चित्र – १ मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारच्या जाहिराती घेऊन मोठमोठ्या शहरात ‘रेकी मास्टर्स’ लोकांचे शारीरिक आणि मानसिक प्रश्न सोडवण्यासाठी दुकाने थाटू लागले आहेत. दूध पिताना बाळ रडत असेल द्या रेकी, भाजलेली जखम बरी करण्यासाठी द्या रेकी, संधिवात, डायबेटिस रेकीने बरा करा, असे दावे रेकीवाल्यांकडून केले जातात. एवढंच नव्हे, तर बॅटरी, बिघडलेला फोन, वाहने रेकीने सुरक्षित करता येतात. रेकी उपचाराचा आणखी एक फायदा म्हणजे रेकीमुळे हरवलेल्या वस्तूही परत मिळतात, असा दावा केला जातो.

रेकीच्या या दाव्यांची कठोर चिकित्सा जगभरातील वैज्ञानिकांनी केली आहे. एक म्हणजे रेकीमध्ये अध्यात्मवाद, विज्ञान आणि साक्षात्कार अशा परस्परांशी विसंगत विचारधारेची खिचडी केलेली आढळते. मिकाओला एकाएकी दृष्टांत झाला आणि त्याच्या पायाची जखम हात लावताच बरी झाली. मग त्याने एका मुलीची दाढदुखी हस्तस्पर्शाने बरी केली. नंतर त्याने भिकारी छावणीतील लोकांचे आजार बरे केले. म्हणजे मिकाओ हा ‘प्रतियेशू’च झाला नाही का? गरिबांसाठी आणि गरजू लोकांसाठी आपली विद्या देत तो जगाचा ‘मसिहा’ व्हायला पाहिजे होता; मात्र त्याऐवजी फुकट विद्या दिली, तर लोकांना त्याची किंमत कळत नाही, असा युक्तिवाद करून मिकाओने रेकीला व्यापाराचे केंद्र बनवले. याला धर्म म्हणता येईल का? रेकी मास्टर्स रेकीद्वारे तथाकथित उपचार करून पाच हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत पैसे कमावतात. मधुमेहासारखा आजार बरा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना प्रथम एम.बी.बी.एस. व्हावे लागते. नंतर मधुमेहतज्ज्ञ होण्यासाठी एम. डी. करावे लागते. पक्क्या ज्ञानावर आधारित औषधयोजना करून हे डॉक्टर्स मधुमेह नियंत्रित करतात. त्यांचे ज्ञान हे ‘डबल ब्लाईंड’ चाचणीद्वारे सिद्ध झालेल्या औषधांवर अवलंबून असते; पण रेकी मास्टर्सचे काय? महिनाभरात रेकी मास्टर्स रेकीची दीक्षा दुसर्‍या रेकीतज्ज्ञ होऊ इच्छिणार्‍याला देतात आणि असा रेकीतज्ज्ञ गंभीर मानसिक आणि शारीरिक आजार बरे करण्याचा दावा करतो; मात्र याचे कारण समजून घेण्यापूर्वी रेकीमध्ये विज्ञानही असल्याचा तो दावा केला जातो, त्याचा समाचार घेऊया.

रेकीवाले असे सांगतात की, विश्वात एक शक्ती भरून राहिलेली आहे. ही शक्ती रेकी करणार्‍याच्या हाताद्वारे उपचार होणार्‍या व्यक्तीच्या शरीरात सोडली जाते आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा आजार बरा होतो. दुसरी एक कल्पना म्हणजे शरीरात विविध ठिकाणी चक्रे असतात. ही चक्रे ‘प्राणशक्ती’द्वारे उत्तेजित करून रोग बरा करता येतो, असा दावा केला जातो. शरीरविज्ञानाचा अभ्यास सुरू झाल्यानंतर व्हेसॅलियस या संशोधकाने शरीरविच्छेदन शास्त्राला सुरुवात केली. हे शास्त्र पुढे प्रगत झाले, ज्याला शरीररचनाशास्त्र (अ‍ॅनॉटॉमी) असे नाव आहे. गेल्या पाचशे वर्षांत विविध प्रयोगशाळांतून शरीरविच्छेदन केलेल्या अभ्यासकांना माकडहाडापासून ते डोक्यापर्यंत तथाकथित चक्रांचा कुठेही मागमूस आढळला नाही. ही चक्रे म्हणजे छद्मविज्ञान होय. दुसरं म्हणजे प्राणशक्तीचं अस्तित्व. ही शक्ती हातातून रोग्याच्या शरीरात पाठविली जाते, याचा अर्थ ही प्राणशक्ती किंवा ऊर्जाभौतिक शक्ती आहे, असा तर्कशुद्ध निष्कर्ष काढता येईल. विश्वातील सर्व प्रकारच्या भौतिक ऊर्जांचे भौतिक विज्ञानात सखोल संशोधन झाले आहे. विद्युत, चुंबकप्रकाश, अणुऊर्जा अशा विविध प्रकारच्या ऊर्जा माणसाने हस्तगत केल्या आहेत आणि त्यांचा वापर केला आहे. या यादीमध्ये कुठेही प्राणशक्ती किंवा वैश्विक ऊर्जा असा उल्लेख विज्ञान साहित्यात आढळत नाही; म्हणजे ही प्राणशक्ती ही सुद्धा केवळ कल्पनाच होय. ‘कुंडलिनी’ किंवा ‘प्राणशक्ती’सारख्या कल्पित गोष्टींनी रेकीवाले संधिवात किंवा मधुमेहासारखे आजार बरे करतात, हे धादांत असत्य होय.

विकिपिडिया या वेबसाईटवर रेकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन दिले आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधनात्मक लेखांमध्ये रेकीचा ‘छद्मविज्ञान’ असा उल्लेख आहे. ‘प्राणशक्ती’ ही केवळ कल्पना आहे, हा संशोधनाचा निष्कर्ष आहे. रेकीसंबंधित वस्तुनिष्ठ संशोधनातून चिंतारोग, उदासीनता, मेंदूविकृती, मधुमेह किंवा कॅन्सर अशा आजारांवर रेकी परिणामकारक नाही, असा निष्कर्ष आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी रेकी निरुपयोगी ठरत असेल, तर लोक रेकीचा उपचार का घेतात? याची दोन प्रमुख कारणे सांगता येतील. त्यातील पहिले म्हणजे रेकी ही मानवी शरीरात फार्मसीची औषधे सोडत नाही किंवा शरीराची चिरफाड न करता रेकीमध्ये इलाज केला जातो. संधिवातासारखा आजार आधुनिक औषधांनी नियंत्रित राहतो; मात्र पूर्ण बरा होत नाही. मधुमेहासारख्या आजारात लोक बर्‍याचदा पथ्ये पाळत नाहीत. त्यामुळे साखर नियंत्रणासाठी डॉक्टरांना औषधाची मात्रा वाढवावी लागते. अ‍ॅलोपॅथीच्या औषधांबाबत रेकीसारखे छद्मवैज्ञानिक उपचार करणारे लोक औषधांच्या दुष्परिणामांचा मोठा प्रचार करतात. या सर्व कारणांमुळे; तसेच औषधे नाहीत, शरीराची चिरफाड नाही आणि कायमचा रोग बरी करण्याची खोटी हमी याला भुलून लोक रेकीसारख्या छद्मविज्ञानाकडे वळतात. रेकीच्या उपचारांबाबत आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे. तो म्हणजे ‘प्लॅसिबो परिणाम.’ प्लॅसिबो परिणाम हा आधुनिक विज्ञानाची सुरुवात होण्यापूर्वीपासून चालत आलेला आहे. ‘राखेची पुरचुंडी किंवा मंतरलेलं पाणी प्रसाद म्हणून खा, तुझा आजार बरा होईल,’ असे सांगणारे गुरू महाराज पुरातन कालापासून लोकांना मोहीत करत आले आहेत. प्रसाद खाऊन किंवा औषध नसलेली गोळी खाऊन बरे वाटणे, याला ‘प्लॅसिबो परिणाम’ म्हणतात. प्लॅसिबो परिणामांमुळे उपचार घेणार्‍याला बरे वाटणे म्हणजे बरे होणे नव्हे. आधुनिक मानसशास्त्रानुसार बरे होण्याच्या क्रियेत त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती हा महत्त्वाचा घटक असतो. त्याचबरोबर संधिवातासारखे काही आजार असे असतात की, त्यात काळानुसार चढ-उतार होत असतो. याचा फायदा संबंधित बुवा-महाराजांना किंवा आधुनिक छद्मवैज्ञानिकांना होतो. सर्व आजारांचे मूळ मन आहे, असा एक धादांत असत्य प्रचार तथाकथित रोगोपचारक करीत असतात. मन आणि शरीर यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचा विचार करता हे सत्य आहे की, शरीराचा सुद्धा मनावर परिणाम होतो. कॅन्सर हा शारीरिक आजार आहे. या आजारात मन कितीही खंबीर ठेवले, तरी त्याचा उपयोग होत नाही, हा संशोधनाचा निष्कर्ष आहे. अनेक खंबीर मनाची माणसे कॅन्सरच्या आजाराने निधन पावतात, हा इतिहास आहे; मात्र रेकी किंवा होमिओपॅथी आणि इतर छद्मविज्ञाने प्लॅसिबो परिणामाने कॅन्सर बरा करण्याचा दावा करतात, हे धादांत असत्य आहे. मूत्राशयातील किंवा पित्ताशयातील खड्यांचा आजार रेकी उपचाराने बरा होत नाही. मेंदूतील ट्यूमर रेकीने बरा होईल का? म्हणून सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक आजारांवर रेकीसारख्या उपचारांचा प्लॅसिबो परिणाम वापरणे कसे धोकादायक आहे, हे लक्षात येते. आणखी एक गोष्ट म्हणजे जंतू आणि विषाणू यामधून होणारे शारीरिक आजार. असे आजार केवळ काल्पनिक वैश्विक शक्तीद्वारे रोग्याच्या शरीरात सोडून कसे बरे करता येतात? किंवा मन हे सर्व आजारांचे मूळ आहे, म्हणून मनाला बरं वाटणारं, असं काहीतरी ‘प्लॅसिबो’सारखं आजारी माणसाला दिलं, तर ते किती धोकादायक ठरेल, याची कल्पना करा. मात्र अ‍ॅसिडिटी किंवा रक्तदाब याला कारण मानसिक चिंताग्रस्तता असू शकते. इथे कदाचित प्लॅसिबोमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढून आजार बरा होण्यास मदत होईल; पण अ‍ॅसिडिटी किंवा हृदयरोग याचे कारण चिंताग्रस्ततेऐवजी शारीरिकही असू शकते. उदा. जीवनशैली आणि आहारातील चुका यामुळे कोलेस्टेरॉल वाढून रक्तदाब वाढू शकतो. इथे मन कितीही भक्कम असले, तरीही त्याचा काय उपयोग होणार? म्हणून योग्य माहिती घेऊन, तारतम्य बाळगून ज्ञानावर आधारित उपचारांकडे लोकांनी वळायला हवे. मात्र सोपा उपाय औषध आणि चिरफाड नाही आणि कोणताही रोग खात्रीलायक बरा होतो, या भुरळीमुळे लोक मोठ्या संख्येने छद्मविज्ञानाकडे वळतात. धर्माच्या क्षेत्रात नीतिधर्म बाजूला ठेवून बुवा-महाराजांकडे लोक क्षणिक मोहापायी वळतात. तोच प्रकार रेकीसारख्या आधुनिक बुवाबाजीच्या बाबतीत घडतो. भारतात अध्यात्माच्या नावाखाली नाना प्रकारचे बुवा-बाबा, महाराजांचे मठ उदयास आलेत. त्याच्या जोडीला आता विज्ञानाच्या नावाखाली छद्मविज्ञानाचे नवे पंथ शहरांमधून मोठ्या वेगाने पसरत चालले आहेत. त्यांचा परिचय अशा फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी महत्त्वाचा आहे.

रंगोपचार :-

रंगोपचार म्हणजेच कलर थेरेपी; याला ‘क्रोमोथेरपी’ असेही नाव आहे. ‘क्रोमो’ हा शब्द रंगाशी संबंधित आहे. छद्मविज्ञानाची एक गंमत आहे- छद्मविज्ञान ज्या कुणाला पहिल्यांदा सुचते, त्याने काढलेले निष्कर्ष तो स्वत:च प्रसिद्ध करतो. आपल्याला जणू काही फार मोठे सत्य सापडले आहे, असा दावा करतो. ‘त्या’ तथाकथित सत्याची महती लोकांपुढे मांडून फसवणुकीचे नवे दुकान सुरू करतो. मात्र विज्ञानातील संशोधन असे नसते. विज्ञानात एखादी नवी कल्पना एखाद्याला सुचली, तर ती सत्य म्हणून स्वीकारली जात नाही. ते गृहीत तत्त्व (हायपोथेसिस) म्हणून मांडले जाते. या गृहीत तत्त्वावरून अनुमानाने काही निष्कर्ष काढले जातात आणि ते प्रयोगाने तपासले जातात. गृहीत तत्त्वापासून ते निष्कर्षापर्यंत सगळी मांडणी इतरांना तपासण्यासाठी प्रसिद्ध केली जाते. इतर संशोधक त्याचा स्वत: पडताळा घेतात. जगभर अशा पडताळ्यांतून सिद्ध झालेल्या गोष्टीला ‘विज्ञान’ म्हणतात.

मिकाओला रेकीबाबत जसा साक्षात्कार झाला, तसेच काहीसे या रंगोपचाराबाबतीत घडले. विविध रंग डोळ्यांना आल्हाददायक वाटतात, हे जरी खरे असले, तरी शरीरातील एखाद्या दुखर्‍या अवयवावर रंगवर्षाव करून तो अवयव बरा करता येतो, ही फसवणूक आहे. या फसवणुकीची सुरुवात इ. स. १००० च्या दरम्यान झाली. ‘अविसेना’ याने पहिल्यांदा रंग हे आजार बरे करण्यासाठी वापरता येतील, असे सांगितले. पुढे इ. स. १८७६ मध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्धातील जनरल ऑगस्टस प्लेंसटोन याने सूर्यप्रकाशातील आणि आकाशाचा निळा रंग याचा आपल्यावर जास्त परिणाम होतो, यावर लेख प्रसिद्ध केला. नंतर व्हिक्टोरियन काळात छद्मविज्ञानाचे जे पीक आले, त्यातून या रंगोपचाराला गती मिळाली. रंगोपचाराचा पायासुद्धा शरीरातील विविध चक्रे हा आहे. ज्या चक्रांचा वर आपण उल्लेख केला, त्या प्रत्येक चक्राशी संबंधित एक रंग असतो आणि ते चक्र त्या रंगाने उद्दीपित केले की, आपल्याला आजार बरे करता येतात, असा रंगोपचारकांचा दावा आहे.

१९३३ मध्ये जन्माने भारतीय असलेला; पण अमेरिकन नागरिक झालेला दिनशा घडियाली याने रंगोपचारावर ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याने या ग्रंथामध्ये शरीरातील विविध अवयवांशी विविध रंगांचा कसा संबंध आहे, याची माहिती दिली. नंतर घडियालीचा मुलगा डेलियस दिनशा याने ‘दिनशा हेल्थ सोसायटी’ या संघटनेद्वारे अमेरिकेत रंगोपचाराचा मोठा प्रसार केला. प्रख्यात वैज्ञानिक चिकित्सक मार्टिन गार्डनर याने ‘रंगोपचार म्हणजे संशोधनाची आतापर्यंतची सगळ्यात मोठी बनवेगिरी,’ असा घडियालीवर उपहास केला आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधकांनी ‘रंगोपचार ही मोठी फसवणूक आहे,’ असे मत व्यक्त केले आहे. अमेरिकन कॅन्सर सोसायटीने जो ग्रंथ प्रसिद्ध केला, त्यात म्हटले आहे की, ‘उपलब्ध पुराव्यांच्या आधारे रंगोपचाराने कॅन्सर किंवा इतर आजार बरे करता येतात, याला विश्वसनीय पुरावा मिळालेला नाही.’ परिसरात आपल्याला आवडणार्‍या रंगसंगतीने मन उल्हासित होते, हे खरे. आपल्या बैठकीच्या खोलीतील आवडत्या रंगाने मानसिक उल्हास साधता येईल; मात्र मनाचे आणि शरीराचे विविध आजार हे सूर्यकिरणातील सात रंगांनी बरे करता येतात, हे सत्य नाही. सूर्यप्रकाश किंवा कृत्रिमरित्या तयार केलेला प्रखर प्रकाश अंगावर घेतल्यास फक्त त्वचा तापेल, बाकी काहीही साध्य होणार नाही; मात्र रंगांचा उपयोग करणार्‍या विज्ञान शाखेत याबाबत संशोधन झालेले आहे. अतिनील किरण जास्त प्रमाणात अंगावर घेतल्यास त्वचेचा कॅन्सर होतो. विद्युत चुंबकीय पटातील क्ष-किरण आणि गॅमा किरण हेही शरीराला घातक असतात, हा ‘फोटोबायोलॉजी’चा अभ्यास होय. याचा रंगोपचाराशी काहीही संबंध नाही. इथेही पुन्हा रेकीप्रमाणेच लोकांची मानसिकता अशा उपचारांकडे वळण्यास कारणीभूत ठरते; रंगाबद्दलची नैसर्गिक आवड आणि इतर कोणत्याही प्रकारची औषधे किंवा चिरफाड नाही, या समजुतीतून लोक रंगोपचाराकडे वळत असावेत. रंगोपचाराचा दुष्परिणामासारखा तोटा नाही; मात्र त्याचा सुपरिणामही शून्य; म्हणजे केवळ मनाला बरे वाटणे आणि त्यातून होणारी आपली फसवणूक.

देवदूत उपचार (Angel Thearopy)

डोरीन व्हर्च्यू (Doreen Virtue) या अमेरिकन बाई देवदूत उपचाराच्या निर्मात्या. ‘आपणाला पृथ्वीवरील संकटात सापडलेल्या अथवा विवंचनेत असलेल्या माणसांना तथाकथित देवदूत सल्ला देतात आणि आपले संकट टळते,’ असे हे छद्मविज्ञान आहे. आधुनिक मानस आणि भौतिक विज्ञानानुसार देवदूत हे कल्पित आहेत; मात्र विविध धर्मांतील देव किंवा सैतान अशा कल्पना लोकांच्या डोक्यात भरून हे छद्मविज्ञान विकसित झाले आहे. प्लॅसिबो परिणामाच्या पलिकडे असे उपचार घेणे धोक्याचे आहे. डोेरीन व्हर्च्यूला देवदूतांचा साक्षात्कार कसा झाला, ते माहीत करून घेतले, तर देवदूत उपचार कसे फसवे आहेत, हे ध्यानात येईल.

डोरीन लहानपणापासूनच देवदूतांशी बोलत असल्याचे अनुभव घेत असे; मात्र आपल्याला देवदूत भेटतात, असे इतरांना सांगितल्यावर ते तिची टर उडवतील, या भीतीने तिने आपले हे गूढ अनुभव लहानपणी कोणाला सांगितले नाहीत. असे तिचे अनुभव तिच्या अंतर्मनात साचत राहिले आणि त्यांचा प्रभाव एवढा वाढत गेला की, आता मोठी झाल्यावर तिला हे अनुभव व्यक्त करण्याची प्रबळ इच्छा झाली. डोरीनने मानसशास्त्रात बी. ए. आणि एम. ए.च्या पदव्या घेतल्या होत्या. या आधुनिक मानसशास्त्राच्या आधारे ती लोकांना समुपदेशनही करीत असे; मात्र हे करता-करता तिच्या अंतर्मनात लपून बसलेले देवदूत या समुपदेशनात तिला मदत करीत. कधी-कधी ते समुपदेशनाच्या सत्रामध्ये मध्येच तिला भेटत; त्यांचा आवाज तिला ऐकू येई. एकदा तर डोरीनची कार चोरीला जात आहे, असा आदेश तिला देवदूताकडून आला. त्याच देवदूतांचा आवाज पुन्हा धोक्याची सूचना देत असताना ती एकदम किंचाळली; परिणामी तिचा जीव वाचला. अशा अनुभवांचे आधुनिक मानसशास्त्रीय ज्ञानाचे मिश्रण करून ती आपल्या रुग्णांना देवदूत उपचार करू लागली.

डोरीनच्या विचारसरणीनुसार डोरीनसारखे मध्यस्थ संकटग्रस्त लोकांना देवदूताशी जोडून देतात. त्या-त्या व्यक्तीसाठी ठराविक देवदूत तिचा मित्र बनतो आणि तो तिला कठीण प्रसंगी सल्ले देतो, अशी ही उपचारपद्धती आहे. मध्यस्थांबरोबरच देवदूतांची काडर्सही बनवली जातात. या कार्डातील देवदूताला पाचारण केले की, तो संबंधितांचे रक्षण करतो.

या छद्मविज्ञानाचा प्रतिवाद करण्यासाठी एकच गोष्ट पुरेशी आहे. विविध देशांत विविध ठिकाणी हजारो अपघात घडत असतात. या अपघातांत सापडलेल्या आणि ठार झालेल्या व्यक्तींनी देवदूतांना आपले मित्र बनवले असते, तर जगात अपघातच झाले नसते. भविष्यातही असे अपघात घडू नयेत म्हणून विविध देशांतील संरक्षण व्यवस्थांनी आपल्या पदरी अशा देवदूत उपचारांची फौज तयार ठेवावी आणि जोखमीचा प्रवास करणार्‍या सर्वांना देवदूत सल्लागारांच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्या आवडीच्या देवदूताची कार्डे त्यांच्या खिशात ठेवावीत. थोडक्यात, सांगायचे तर देवदूत उपचार हा बनवाबनवीचा मामला आहे.

मधुमेह हा स्वादुपिंडातील ‘इन्सुलिन’ स्त्रवणात व्यत्यय, आल्यामुळे होतो. विज्ञानाच्या या संशोधनातून शरीरातील ‘इन्सुलिन’ निर्मितीच्या अभावाला भरून काढण्यासाठी संशोधन झाले आणि त्यातून प्रयोगशाळेत ‘इन्सुलिन’ निर्मितीचा शोध लागला. ज्याने हा शोध लावला, त्याने सर्व विज्ञान जगतात तो प्रसिद्धीस दिला. ‘इन्सुलिन’च्या सार्वत्रिक उपयोगाने लाखो मधुमेही रुग्णांना दिलासा मिळाला. आरोग्य क्षेत्राने जसा ‘इन्सुलिन’चा शोध स्वीकारला, तसे डोरीनचे देवदूत आरोग्यक्षेत्रात आरोग्य विद्यापीठात का स्वीकारले जात नाहीत? याचे सरळ उत्तर हे की, कल्पित देवदूत हे छद्मविज्ञान होय.

आकाशिक रेकॉर्ड रीडर

मानसिक उपचारांचा हा एक गूढवादी छद्मविज्ञानाचा प्रकार आहे. ‘आकाशिक रेकॉर्ड’ म्हणजे काय? ‘जगातील आतापर्यंत होऊन गेलेल्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या जीवनात घडलेल्या घटना, कृती, विचार आणि भावना यांची अदृश्य चित्रमय लायब्ररी म्हणजे आकाशिक रेकॉर्ड.’ या चित्रमय (आपणाला दिसत नसलेल्या) ग्रंथालयात काळाला सुरुवात झाल्यापासूनच्या सगळ्या घटनांची नोंद आहे. ‘हे ग्रंथालय कुठे आहे,’ असा तुम्ही प्रश्न विचाराल. त्याचे उत्तर अध्यात्मवादी असे देतात की, मानवी ज्ञानेंद्रियांच्या कक्षेबाहेर ‘इथर’ नावाचं द्रव्य विश्वात भरून राहिले आहे. या द्रव्यात आकाश; म्हणजे सगळा मानवी इतिहास नोंद झाला आहे. या ग्रंथालयातील घटनांचे वाचन फक्त काही ठराविक आध्यात्मिक साधकांनाच वाचता येते. हे लोक आपले दरबार भरवून त्यात असे वाचन करतात. आकाश नावाच्या या द्रव्यातून मानवी आशा-आकांक्षा, विचार, भावना आणि कल्पना यांचे तरंग उमटत असतात. या तरंगांच्या सागराशी आपले प्रत्येकाचे मानसिक जग जोडलेले असते. आध्यात्मिक साधक आपले भावनातरंग आकाश तरंगांशी जोडून आपले भविष्य जाणू शकतात. असा हा सगळा मामला आहे. ‘आकाशिक रेकॉडर्स’ ही ‘थिऑसॉफी’ नामक अध्यात्मवादी पंथाची निर्मिती आहे. आकाशिक रेकॉर्ड हे अतिभौतिक पातळीवर; म्हणजे केवळ मानसिक पातळीवर अस्तित्वात आहे, अशी ही कल्पना आहे.

आकाशिक रेकॉर्डद्वारे अज्ञात अशा घटनांचा शोध घेता येतो, याचे वैयक्तिक दाखले दिले जातात; मात्र हे वैज्ञानिक पुराव्याने सिद्ध झालेले नाही.

टॅरो कार्ड रीडिंग

टॅरो कार्ड रीडिंग हा एक भविष्यकथनाचा गूढ प्रकार आहे, ज्यामध्ये विशिष्ट अशा पत्त्यांच्या पानांचा उपयोग केला जातो. ज्या माणसाचे भविष्य जाणायचे आहे, त्याचा प्रश्न निश्चित केला जातो. त्यावरून त्या प्रश्नाचे उत्तर देणारे संबंधित कार्ड निवडले जाते. या कार्डावरून त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. टॅरो कार्ड रीडिंगवर प्रख्यात विवेकवादी जेम्स रँडी काय म्हणतो पाहा –

“For use as divinatory divice, the tarrot deck is dealt out in various pattern and interpreted by a gifted “reader.’ The fact that the deck is not dealt out into the same pattern fifteen minutes later is rationalized by the occultists by claiming that in that short span of time, a person’s fortune can change, too. That would seem to call for rather frequent readings if the system is to be of any use whatsoever.”

म्हणजे टॅरो कार्ड रीडिंग हा पोपटाने भविष्य सांगण्याचाच प्रकार आहे. पोपटाला दुसर्‍यांदा चिठ्ठी उचलायला सांगितली, तर त्याने परत तीच चिठ्ठी उचलायला हवी; मात्र तो बहुतेक वेळा वेगळी चिठ्ठी उचलतो; म्हणजे दर पाच मिनिटांनी आपले भविष्य बदलते. या सगळ्या भविष्यकथनावर कसा विश्वास ठेवायचा?

डी.एम.आय.टी. चाचणी (DMIT TEST)

चित्र क्र. २ पाहा. DMIT TEST म्हणजे Dermatoglyphics Multiple Intelligence Test म्हणजेच त्वचारेखा विज्ञान, बहुविध बुद्ध्यांक परीक्षण. जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे डी.एम.आय.टी. टेस्टद्वारे बोटांच्या ठशांचे डी-कोडिंग करून आपल्या पाल्याच्या जन्मजात सुप्त गुणांचा शोध घेतला जातो. यामध्ये जन्मजात क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, वर्तणुक, नेतृत्वगुण, करिअर मार्गदर्शन आदी गोष्टींचे मार्गदर्शन मिळू शकते. जाहिरातीत बोल्ड टाईपमध्ये ‘करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडावे, यासाठी मार्गदर्शन करणारी शास्त्रोक्त पद्धत म्हणजेच DMIT TEST.’ गर्भसंस्कारांतून सगळ्या मातांना आपल्या मुलाने संत ज्ञानेश्वर किंवा छत्रपती शिवाजी महाराज व्हावे, अशी भुरळ घातली जाते. तसेच हे विज्ञान आहे, अशा डी.एम.आय.टी. या छद्मविज्ञानाद्वारे पालकांना फसवण्याचा हा एक आधुनिक ‘गुरुबाजी’चा प्रकार होय. या टेस्टमधलं विज्ञान काय आहे, त्याची चिकित्सा करूयात.

मानसोपचारतज्ज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेने एक पत्रक काढून पालकांना आणि पाल्यांना DMIT TEST पासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. केवळ बोटांच्या ठशांवरून संबंधित मुलाचे जन्मजात गुण ओळखता येतात, याला वैज्ञानिक पुरावा नाही, असे त्यांनी आपल्या पत्रकात जाहीर केले आहे. मुलाच्या बौद्धिक क्षमतेबद्दल आणि त्याच्या भविष्यातील वर्तणुकीबाबत अशा चाचणीद्वारे खात्रीशीर अनुमान शक्य नाही, असे या संघटनेचे मत आहे. DMIT TEST ची ‘दुकानदारी’ ही पालकांचे अज्ञान आणि भोळेपणा आणि आपला मुलगा भविष्यात कसा असेल, याबद्दलची अधीर भावना यावर चालते. अहमदाबाद येथील प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ मृगेश वैष्णव (मनोविकारतज्ज्ञ सोसायटीचे अध्यक्ष) यांनी ‘द टेलिग्राफ’ या पेपरला दिलेल्या मुलाखतीत हे उद्गार काढले. या ‘दुकानदारी’चा भ्रष्टाचार म्हणजे बोटांच्या ठशावरून कोडिंग करण्यासाठी DMIT Software बनवून त्याची विक्री केली जाते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे फक्त जेनेटिक कोडवरून ठरत नसून जन्मल्यानंतरचे वातावरण व संस्कारांमधून सुद्धा घडत जाते.

‘पुणे मिरर’ या वर्तमानपत्रात डॉ. सागर मुंदडा यांनी पुढील विधान केले आहे – ‘DMIT चाचणीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. या चाचण्या लबाड लोकांनी सुरू केल्या आहेत आणि ते त्यासाठी भरमसाठ फी आकारत आहेत.’ ‘हिंदू’ या वर्तमानपत्राने DMIT चाचणीला ‘वैद्यकीय हस्तरेषाशास्त्र’ असे म्हटले आहे.

बोटावरचे ठसे कसे निर्माण होतात?

बाळ आईच्या पोटात असताना अडीच महिने ते साडेचार महिने या काळात बाळाच्या बोटांवरच्या खुणा निर्माण होतात. गर्भाचे गर्भाशयातील स्थान, गर्भजलाची घनता, गर्भजलाच्या पिशवीत गर्भाची त्वचा कशी स्पर्श करून असते आणि गर्भाच्या हालचालीतून त्याच्या त्वचेवर जो दाब तयार होतो, त्याच्या खुणा गर्भाच्या बोटांच्या त्वचेवर निर्माण होतात. यांना फ्रिक्शन रिजेस (Friction Ridges) असे म्हणतात. यांनाच आपण बोटाचे ठसे म्हणतो. अशा रीतीने तयार झालेल्या ठशांचा बाळांचे व्यक्तिमत्त्व (बुद्धिमत्ता) घडण्यासाठी काहीही उपयोग नाही. बाळाचे व्यक्तिमत्त्व जनुके आणि जन्मल्यानंतरचे संस्कार यातून घडते; बोटाच्या ठशाने नव्हे.

छद्मविज्ञानाचा पसारा

मागील काही पानांत वर्णन केलेल्या छद्मविज्ञानाच्या प्रकारांना ‘न्यू एज रिलिजन’ असे नाव आहे. अशा प्रकारचे छद्मविज्ञान हा धड धर्म नव्हे आणि विज्ञानही नाही. गूढवाद, धर्मकल्पना आणि विज्ञान यांची सरमिसळ केलेले हे ‘हायब्रीड’ उपचार आहेत. धड घोडा नव्हे आणि गाढवही नाही, असा हा प्रकार आहे. विज्ञानाच्या प्रभावामुळे तथाकथित धार्मिक चमत्कारांना आव्हान दिले जाते. हे हेरून चलाख मंडळींनी नवा गूढवाद वापरून विविध भ्रामक प्रकार व्यवहारात आणले आहेत. सुरुवातीच्या नैतिक धर्मकल्पना बाजूला ठेवून विविध प्रकारची कर्मकांडे तथाकथित बाबा-बुवांनी आणि पुरोहितांनी निर्माण केली, तशीच ही नवी बुवाबाजी आहे. खरं तर जेव्हा विज्ञान लोकमानसांवर प्रभाव गाजवू लागले, तेव्हापासूनच छद्मविज्ञानाचाही उदय झाला. ज्योतिष हे याचे उत्तम उदाहरण होय. पुढच्या काळात धार्मिक बुवाबाजीला जसा विरोध होऊ लागला, तसतशी विज्ञानाची फसवी भाषा वापरून नाना प्रकारचे छद्मविज्ञान बाजारात येऊ लागले. चुंबकीय उपचार, अ‍ॅक्युपंक्चर, वास्तुशास्त्र, परामानसशास्त्र, मीडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन इत्यादी. भौतिक, आर्थिक, मानसशास्त्रीय; तसेच विशेषत: आरोग्य क्षेत्रात छद्मविज्ञानाने आपले हातपाय पसरले आहेत. त्यात विविध धर्मांतील कल्पनांच्या पुढे जाऊन नव्या युगात गूढवादाच्या मदतीने नवनव्या छद्मविज्ञानांची भर पडू लागली आहे. रेकी, रंगोपचार, देवदूत उपचार, बोटांच्या ठशांवरून व्यक्तिमत्त्व ठरवणे; तसेच गर्भसंस्कार, अग्निहोत्र, डाऊझिंग अशा एक ना अनेक छद्मविज्ञानाचा ‘बाजार’ मोठा होत चालला आहे.

पुढे काय?

धर्माच्या आधारे होणार्‍या बुवाबाजीला प्रबोधनाच्या मार्गाने; प्रसंगी कायद्याच्या आधारे जसा वचक निर्माण केला गेला आहे, तसाच छद्मविज्ञानाच्या बाबतीत निर्माण व्हायला हवा. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित समाजात वावरतोय; मात्र ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर हे विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारले आहे, त्याचं आकलन लोकांना झालंय का, याबद्दल शंका वाटते. अर्धवट किंवा चुकीच्या ज्ञानापेक्षा अज्ञान परवडले. समाजात विज्ञानाचा प्रसार झाला, तरी वैज्ञानिक दृष्टिकोन आला नाही. विज्ञानाचे अर्धवट ज्ञान अतिशय गंभीर संकटात पाडू शकते; प्रसंगी जीवही घेते. हे घडू नये म्हणून लोकशिक्षणाची व्याप्ती तर वाढवायला हवीच; मात्र त्याचबरोबर छद्मविज्ञानाच्या नावाखाली होणार्‍या फसवणुकीबाबत कायदेशीर मार्गाचाही शोध घ्यायला हवा. एखाद्या ग्राहकाची वस्तूंच्या विक्रीबाबत फसवणूक झाली असेल, तर उपाय म्हणून फसवणूक झालेली व्यक्ती ‘ग्राहक पंचायत’कडे दाद मागू शकते, तर अज्ञानावर आधारित फसवणुकीमुळे एखाद्या व्यक्तीचे शोषण झाले असेल, तर त्याविरुद्ध दाद मागणारी यंत्रणा निर्माण व्हायला हवी. चुंबकीय उपचारांमुळे एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब नियंत्रित होण्याऐवजी तो वाढतच जात असेल, तर त्या विरोधात संबंधित व्यक्तीला ग्राहक न्यायालयात दाद मागता यायला हवी. रेकीचा उपचार करवून घेणार्‍या व्यक्तीला त्याचा फायदा न होता तोटाच झाला असेल, तर संबंधित रेकी मास्टरच्या विरोधात तक्रार देता यायला हवी. अघोरी अंधश्रद्धेच्या बाबतीत जसा जादूटोणाविरोधी कायदा झाला, तशाच प्रकारचा एखादा नवीन कायदा छद्मविज्ञानातून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात व्हायला हवा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पाऊल उचलायला हवे.

लोकशिक्षणासाठी काय करता येईल?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती धार्मिक बुवाबाजीच्या विरोधात जोरदार प्रबोधन मोहीम राबवीत आहे. त्यासाठी डॉ. दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विपुल साहित्याची निर्मिती केली आहे. हे साहित्य, बुवाबाजीचा पर्दाफाश करणारे कार्यक्रम; तसेच प्रबोधन शिबिरे या माध्यमांतून अघोरी आणि धार्मिक बुवाबाजीला आळा बसत आहे. छद्मविज्ञानावर आधारित नवी बुवाबाजी रोखायची असेल, तर नवे ‘न्यू एज गुरू’ कसे धोकेबाज आहेत, याचे ज्ञान लोकांपर्यंत पोचवणारी विविध माध्यमे शोधली पाहिजेत. हे नवे गुरू म्हणजे ‘गुरूविण कोण दाखवील वाट!’ऐवजी ‘गुरूविण कोण चुकवील वाट!’ असे लबाड गुरू आहेत. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून आपण कधी खड्ड्यात पडू, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत, आपला मार्ग आपणच शोधणे, हाच खरा उपाय आहे; मात्र तो शोधता येत नसेल, तर लबाड गुरूंकडे जाण्याऐवजी खर्‍या ज्ञानमार्गाची वाट धरायला हवी. ही ज्ञानमार्गाची वाट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लोकांना दाखवायला हवी.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]