…आणि रानोबाची अघोरी प्रथा बंद झाली

हेमंत धानोरकर -

सिमरी पारगाव (ता. माजलगाव) या गावात रानोबा नावाचा एक देव आहे. गावातील सर्व (विशेषतः दलित समाज) या देवाच्या प्रकोपाला घाबरतात. त्यामुळे जुन्या काळापासून या रानोबाच्या नावाने एक मोठा कार्यक्रम या गावात होत होता. या कार्यक्रमात रानोबाची पूजा विशिष्ट पद्धतीने केली जाते. या पूजेमध्ये 15 x 3 x 2 फूट खड्डा करून त्यात लाकडं जाळून त्याचा विस्तव झाल्यानंतर नवस करणारे लोक त्या विस्तवावरून चालतात. तसेच त्या विस्तवाने भरलेल्या खड्ड्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून लहान मुलांना एका बाजूकडून दुसर्‍या बाजूला फेकले जाते आणि झेलले जाते. वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोलले जातात. अनेक स्त्री-पुरुषांच्या अंगात देवाचा संचार होतो. अंगात संचार झालेले अनेक लोक आगीच्या खड्ड्याभोवती नाचतात. मांत्रिकांच्या अंगात देव आल्यानंतर अनेक आजारी लोकांवर अघोरी उपचार केले जातात. अशा प्रकारे अंधश्रद्धा वाढवणारी व कायद्याचा भंग करणारी अनेक कर्मकांडं केली जातात.

या सर्व कार्यक्रमात त्या गावचे एक कुटुंब मांत्रिकाची/जाणत्याची भूमिका पार पाडायचे. त्या मांत्रिक कुटुंबातील लोक पिढ्यान्पिढ्या ही भूमिका बजावत होते. त्यामुळे गावात त्यांना इतरांपेक्षा अधिक महत्त्व आणि त्यांच्याबाबत दैवी दहशत सुद्धा होती. गावातील कोणतेही कुटुंब त्यांच्या वाटेला जात नव्हते.

आजोबा-वडील-काका मांत्रिक असल्यामुळे त्या कुटुंबातील तरुण पिढीकडे मांत्रिकपणाची जबाबदारी आली होती. परंतु 20 वर्षांपूर्वी काही अडचणींमुळे या मांत्रिक कुटुंबास सिमरी पारगाव सोडून दुसर्‍या गावात कायमचे राहायला जावे लागल्याने ही प्रथा बंद पडली. गावातील काही सुशिक्षितांचा या प्रथेस विरोध होताच; पण अंधश्रद्धेला पोषक वातावरणात सुशिक्षितांचा आवाज सतत दाबला जात होता. मांत्रिकाच्या कुटुंबाचेच दुसर्‍या गावात स्थलांतर झाल्याने ही प्रथा आपोआप थांबली.

दरम्यान, दुसर्‍या गावी स्थलांतरित झालेल्या मांत्रिकाच्या कुटुंबात आजोबा व वडिलांचा आजाराने मृत्यू झाला. एका मांत्रिक काकाने आत्महत्या केली. गेल्या 20 वर्षांत अशा अनेक वाईट घटनांमुळे या मांत्रिक कुटुंबाचा प्रमुख उमेश (बदललेले नाव) याने पुन्हा सिमरी पारगावला येऊन रानोबाची परंपरागत पद्धतीने पूजा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सिमरी पारगावातील नातेवाईकांना उमेशने (मांत्रिकाने) कळवला. त्यानुसार या कार्यक्रमाची गुपचूप तयारी सुरू झाली. रानोबाचा वार शनिवार असल्याने शनिवारी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम करण्याचे ठरले. सरपंच व इतर सदस्यांनी ग्रामपंचायत निवडणुकांचा विचार करून या कार्यक्रमाला मूक संमती दिली. ग्रामसेवक या गावात नुकतेच रुजू झाले असल्याने त्यांना या प्रकाराची काहीच माहिती नव्हती.

कुणालाही फारसे न कळू देता शनिवारच्या कार्यक्रमाची तयारी बुधवारपासूनच सुरू झाली होती. ‘हाळी’ (विस्तव) वरून चालण्यासाठी लाकडं गोळा करणे, ‘हाळी’साठी खड्ड्याची जागा निश्चित करणे, ‘हाळी’ची जागा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे या गोष्टींना सुरुवात झाल्यामुळे गावात सर्वांच्याच लक्षात आले होते की, रानोबाचा कार्यक्रम होणार आहे. 20 वर्षांपासून हा कार्यक्रम पाहिलाच नसल्याने गावतल्या लोकांनाही विस्तवावरून कसे चालतात, याबाबत उत्सुकता होती.

या कार्यक्रमाला कुणाचा विरोध होऊ नये म्हणून मांत्रिकाने धमक्या दिल्या होत्या. ‘हा कार्यक्रम मी करणारच आहे, कुणी आडवा आला तर त्याच्या घरादाराची राखरांगोळी करेन,’ असा धमकीवजा संदेश गावभर पसरलेला होता. मांत्रिकाकडे असलेली तथाकथित अघोरी शक्तीची भीती आणि ग्रामपंचायत निवडणुकांचा विचार करून कुणीही या अनिष्ट प्रथेला विरोध करायला तयार नव्हते.

कार्यक्रमाशी संबंधित लोकांनी खूप गुप्तता पाळूनही आजूबाजूच्या गावांत या कार्यक्रमाची माहिती पोचली होती. शेजारच्या गावातील पुरोगामी विचारांच्या काही व्यक्तींना 20 वर्षांपूर्वी बंद झालेली प्रथा पुन्हा चालू होणे पटत नव्हते. पुरोगामी विचारांचे हे कार्यकर्तेयावर काय उपाय करता येईल, या विचाराने तळमळत होते. शेवटी त्यांनी गुरुवारी दुपारी मला फोन केला आणि काहीही करून हा कार्यक्रम थांबवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.

त्यांची सर्व हकिकत ऐकून घेतल्यावर माझ्यासमोर दोन पर्याय होते –

1) ‘अंनिस’च्या मदतीने प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी जाऊन भांडाफोड करणे.

2 ) प्रशासनाच्या मदतीने संबंधित कार्यक्रम होण्याआधी रोखणे.

माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी दुसरा पर्याय निवडला. शुक्रवारी सकाळपासून मी कामाला लागलो. माझा पोलीस मित्र धनंजय याला विचारून माजलगाव ग्रामीण व दिंद्रुड पोलीस स्टेशनचे संपर्क मिळवले. परंतु त्यांना फोन करण्याआधी त्या गावचे सरपंच व ग्रामसेवकांना फोन करून तसा कार्यक्रम होणार आहे का, याची खात्री करून घेतली. सुरुवातीला ग्रामसेवक व सरपंचांनी फोन उचलले नाहीत. पण वारंवार प्रयत्न केल्यावर ग्रामसेवकसाहेबांनी फोन उचलला. त्यांनी आपल्याला काहीच कल्पना नाही, चौकशी करतो, असेही सांगितले.

वृक्षमित्र राजेसाहेब किर्दत यांच्या सल्ल्यानुसार अंबाजोगाई येथील अप्पर जिल्हाधिकारी मा. मंजुषा मिसकर मॅडम यांची मदत घ्यावी म्हणून शुक्रवारी शाळा सुटल्यावर सायंकाळी 5 वाजता मी कलेक्टर ऑफीसमध्ये पोचलो. पण मॅडम त्यापूर्वीच ऑफिसमधून गेलेल्या होत्या. त्यांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज करून सर्व हकिकत सांगितली. त्यांनी काही वेळातच रिप्लाय केला व माजलगाव तहसीलदारांकडे हे प्रकरण सोपवले आहे, असे सांगितले.

दरम्यान, पुन्हा गावच्या सरपंचांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य समजावून सांगितले. जादूटोणा कायदा -2013 – त्यातील कलमे व त्यानुसार होणार्‍या शिक्षा याबाबत कल्पना दिली. हा कार्यक्रम घडला तर ग्रामसेवक व सरपंचांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, हे पण सांगितले. सरपंचसाहेबांनी त्या मांत्रिक कुटुंबाला नोटीस देतो, असे सांगितले. शुक्रवारी रात्रीच सरपंचांनी मांत्रिक कुटुंबाला कार्यक्रम करू नका, अशी नोटीस दिली.

शनिवारी सकाळी माजलगाव तहसीलदार कार्यालयातून ग्रामसेवक व सरपंचांना फोन गेले. हा कार्यक्रम होऊ देऊ नका, असे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश आहेत, असे गावात सांगण्यात आले. त्यामुळे सरपंच आणि गावातील इतर अनेक लोकांनी मांत्रिक व त्याच्या कुटुंबाला समजावून सांगितले आणि शनिवारी सकाळी 11 वाजता रानोबाचा कार्यक्रम रद्द झाला. तशी सूचना मला माझ्या व्हॉट्सअ‍ॅपवर 12.30 ला मिळाली. 12.48 ला जिल्हाधिकारी मॅडम यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कळवून त्यांचे आभार मानले.

हेमंत धानोरकर, अंबाजोगाई


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]