उमेद वाढवणार्‍या खुणा

राजीव देशपांडे -

इराणमध्ये हजारो महिला ‘जन-जिंदगी-आजादी’ असा उद्घोष करत ‘हिजाब’च्या सक्तीविरुद्ध आंदोलन करत आहेत. कट्टर धार्मिकता आणि वंशवादाकडे झुकणार्‍या प्रवृत्ती जगभर वाढत असताना (इटलीमध्ये नुकत्याच मुसोलिनीसमर्थक अतिउजव्या पंतप्रधान निवडून आल्या आहेत) इराणच्या स्त्रिया मोठी किंमत मोजून जे आंदोलन करत आहेत, ते मानवतावादी, विवेकी समाजनिर्मितीचे स्वप्न पाहणार्‍या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. इथे हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, पाश्चिमात्य राष्ट्रांना धार्जिणे राजकारण करणार्‍या सरकारने जेव्हा इराणमध्ये सक्तीने ‘हिजाबबंदी’ केली होती, तेव्हा इराणी महिलांनी त्याच्याविरुद्ध देखील आंदोलन केले होते. संस्कृतीचे वहन स्त्रियांच्या माथ्यावर थोपवल्याने बाईचे शरीर आणि व्यक्तित्वही धर्म आणि संस्कृतीच्या नावावर चालणार्‍या सत्ताकारणाची भूमी बनते.

इराणमधील महिला धर्माच्या; तसेच राजसत्तेच्या या सत्ताकारणाला विरोध करत आहेत. ‘हिजाबसक्ती’ आणि ‘हिजाबबंदी’ अशा दोन्ही गोष्टींच्या सक्तीला त्यांनी विरोध केला आहे. बहुमतवादाचे राजकारण करणार्‍या हिंदू गटांनी कर्नाटकात मुस्लिम मुलींना गणवेशाच्या नावाखाली सक्तीने ‘हिजाबबंदी’ करणे व त्यानंतर मुस्लिम समाजातील कडव्या लोकांनी ‘पहिले हिजाब, फिर किताब’ अशी प्रतिगामी प्रतिक्रिया देणे या गोष्टीदेखील राजकारणासाठी बाईचे शरीर व व्यक्तित्व कसे वापरले जाते, हे स्पष्ट करतात. सत्तेसाठी ‘बाईपण’ वापरणार्‍या सर्वांच्या समोर बाईचे माणूसपण स्वीकारणारे, जोपासणारे व त्याचा अवकाश विस्तारणारे महात्मा फुले स्थापित सत्यशोधक समाजाचे समाजकारण उभे ठाकते. स्वतःचे भले-बुरे, परंपरेतील भले-बुरे यांची स्वतःच्या बुद्धीने निवड करता यावी, यासाठी उपयोगी पडेल, असे शिक्षण तिला देण्याचा हा मार्ग आहे! यावर्षी २४ सप्टेंबर रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला दीडशे वर्षे होत असताना त्याची आजच्या काळातील गरज अधोरेखित होत राहते.

स्त्रीत्वाची संकल्पना जशी सत्ताकारणासाठी वापरली जाते, तसेच सण-उत्सव देखील सत्ताकारणासाठी वापरले जातात. महाराष्ट्रातील सत्तांतर आणि मुंबई महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सत्य यावर्षी अधिक उघडपणे समोर आले. अनेक वर्षे उत्सवांचे व्यवस्थापन करण्याच्या अनुभवातून पोलिस व प्रशासनाने निर्माण केलेले संकेत, न्यायालयाचे निर्देश या सर्वांना सत्ताकारणासाठी वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. अशा वेळी अनेक सामान्य माणसांनी मात्र आवर्जून स्वतःच्या पातळीवर पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा संकल्प पाळला. तीन दशकांच्या पूर्वी ‘अंनिस’ने सुरू केलेली विसर्जित गणपतीदान, निर्माल्यदान ही मोहीम लोकमानसात रुजल्याच्या अनेक खुणा दिसल्या.

या खुणा उमेद वाढवतात.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]