कन्यादान का नको?

अरूणा सबाने - 9970095562

अलिकडे विवाह समारंभ म्हटलं की, तो उत्साहातच साजरा व्हायला हवा, हा हट्टच असतो. विवाहाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा आपण संबंध जोडलेला आहे. ज्या लग्नात प्रचंड पैशांचा ओघ वाहतो, जिथे मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते आणि जी लग्नं किमान चार दिवस तरी चालतात, ती उत्तम, मोठी, सुखी श्रीमंत घरातली, हे आमचे समीकरण झालेले आहे.

अगदी हळद, संगीत, मेंदी लावणे, बांगड्या भरणेपासून सारेच विधी कसे दणक्यातच व्हायला हवेत. लग्नाच्या मुख्य कार्यक्रमात एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो, कन्यादानाचा.

मुळात लग्नात खूप अवास्तव खर्च करणेच मला पटत नाही. हळद, संगीत, मेंदी हे विधी असण्यापेक्षा फार झालं तर त्यांना तुमच्या आनंदापर्यंत सीमित ठेवायला हरकत नाही. एकीकडे, आम्ही खूप मॉडर्न आहोत म्हणायचं आणि दुसरीकडे सगळे पारंपरिक विधी अजूनही वाजतगाजत करायचे. अनेकदा मध्यमवर्गीय पालकांचं या मुलांच्या हौसी-मौजी भागवण्याच्या नादात कंबरडं मोडतं; पण मुलांचं तिकडे लक्षही नसतं. चार श्रीमंत लोकांची लग्नं पाहून यायची आणि तशीच सगळी मागणी पालकांकडे आपल्याही लग्नात करायची, असं उच्चविद्याविभूषित मुली पण करतात. यातलाच एक विधी कन्यादानाचा, जो मला अजिबात आवडत नाही. या विधीसाठी मला माझ्या मुलीच्या लग्नात फारच संघर्ष करावा लागला.

माझ्या मुलीचे लग्न कर्नाटकी ब्राह्मणासोबत झाल; अर्थात प्रेमविवाह. मुलांचं आपापसांत लग्न करायचं ठरलं आणि आम्ही पालक लग्न कुठे करायचं, कसं करायचं, यावर चर्चा करायला बसलो. मला माझा जावई जेवढा आवडला होता, तेवढेच माझे व्याही आवडले. अतिशय शांतपणे बोलणे, समजूतदार, अगदी सुसंस्कृत. चर्चा अतिशय खेळीमेळीने चालली होती. माझा आग्रह ‘रजिस्टर्ड मॅरेज’ला होता; त्यांना रीतसर लग्न हवं होत. त्यांच्या पद्धती बर्‍याच वेगळ्या होत्या आणि ते सारे परंपरेप्रमाणेच त्यांना करायचं होतं. अनेक गोष्टींना माझा विरोध होत होता, काही गोष्टी ते ऐकतही होते. शेवटी ‘लग्नात आवश्यक त्या विधी होतील; पण त्यात माझा काहीही संबंध राहणार नाही. तुम्ही काय ते बघा. मी फक्त तुम्हाला साधनं उपलब्ध करून देईल,’ यावर आमचं कॉम्प्रमाइझ झालं. कारण शेवटी लग्न त्यांच्या मुलाचंही होतं. सर्वांत शेवटी विषय निघाला तो कन्यादानाचा. त्याला माझा स्पष्ट आणि ठणठणीत विरोध झाला. “नहीं, कन्यादान तो मैं नहीं करुंगी।”

“क्यों?”

“नहीं, मुझे ये रस्मे पसंद नही है।”

“नहीं, वो ठीक है, लेकिन कन्यादान से कोई बडा पुण्य नहीं होता, अरुणाजी।”

“देखिये श्रीकांतजी, आप मेरे समधी हो। मैं आपसे बहस करना नहीं चाहती, लेकिन मैं कन्यादान नहीं कर सकती।” मी अगदी ठासून सांगितले. त्यातून त्यांनी असा अर्थ काढला की, या एकट्या आहेत, सोबतीला बसायला मुलीचे वडील नाहीत, म्हणून यांना एकटीला हा विधी नाही करायचा. म्हणून त्यावर तोडगा म्हणून ते मला म्हणाले, “ऐसा कुछ नहीं, भैया माझा मुलगा भी बैठ सकता है।”

त्यावर पीयुषा लगेच म्हणाली, “सॉरी, मैं आप बडोंके बीच बोल रही हूँ, लेकिन मेरी शादी में जो कुछ करना है, मम्मीही करेगी; बाकी कोई नहीं। ” हे काय चाललं आहे, ते नाकाच्या सरळ रेषेत चालणार्‍या माझ्या व्याही लोकांच्या काही लक्षात येत नव्हतं. शेवटी मी त्यांना स्पष्ट सांगितलं, “कन्यादान’ हा शब्दच मुळी मला मान्य नाही. माझी मुलगी दान करण्याची वस्तू असूच शकत नाही. मी तिचे फक्त तुमच्या मुलासोबत लग्न लावून देते आहे. त्यासाठी मी तिच्यावरचा आई म्हणून असलेला माझा हक्क सोडेन, असे होत नाही आणि हक्क सोडणार नाही; म्हणजे तिच्यावर अधिकार गाजवत राहील, असेही नाही. ‘दान’ या शब्दातच हा अर्थ अभिप्रेत आहे की, एकदा आपण एखाद्याला एखादी वस्तू दान दिली की, त्यावर तुमचा काहीही अधिकार राहत नाही; शिवाय दान वस्तूचे होते, ते मुलीचे कसे होणार? ती माझा अंश आहे, माझा गुरूर आहे, माझाच एक भाग आहे. तिचे दान होणार नाही. हे लग्न नाही झाले तरी चालेल.” माझ्या मुलीच्या छातीत धस्स झाले.

माझ्या लहानपणी माझे वडील वारले, त्यांच्या तेराव्याला माझ्या आईने ज्या गायीचे दूध आम्ही पित होतो, त्या गायीच ब्राह्मणांना दान दिल्यात. त्यानंतर आजी-आजोबांच्याही तेराव्यात आईने गायी दान दिल्यात. मृत्यूतही दान; आणि लग्नातही दानच! नो वे. मला हे मान्यच नव्हते.

हाडामांसाची आपली लाडकी लेक. तिचा विवाह आपण करून देतो. या विवाहाने चार लोक आपापसांत जुळले जाणार आहेत, काही नाती आपल्याला, काही नाती त्यांना मिळणार असतात. विवाहानंतर आपली मुलगी आपले संस्कार घेऊन त्या घरात जाणार असते, इथून पुढे ती दोन्ही घराण्यांची प्रतिष्ठा जपणार आहे, वाढवणारही आहे. आपल्या सहचराला, तिथल्या सर्वांनाच ती जपणार आहे. पण हे सारं करत असताना ती तिच्या आईला, भावंडांना विसरणार नाहीच. ती माझ्या हाडामांसाचा गोळा आहे, माझ्या आयुष्याचा एक भाग आहे; आणि तिचे मी दान करायचे? नाही, शक्यच नाही. या प्रथेला मी अजिबात पाठिंबा देऊ शकत नाही. जे देतील त्यांचाही मी निषेधच करते.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे ‘कन्यादान’, ‘विवाहहोम’ व ‘सप्तपदी’ हे तिन्ही विधी झाल्याशिवाय विवाहविधी पूर्ण झाला, असे मानले जात नाही. सुवर्णरत्नांनी अभिमंत्रित केलेल्या कलशातील उदकाने कन्यादान केले जाते. वर, वधू आणि वधूचे पिता आपापली ओंजळ धरून वधूमाता कलशातील पाण्याची संततधार वधुपित्याच्या ओंजळीत धरते. तेथून ती वराच्या, वधूच्या ओंजळीत व नंतर काशाच्या भांड्यात पडते; म्हणजे पाण्याचे अर्घ्य देता-देता मुलीचे कन्यादान करायचे. हे करताना वधुपिता पुढील मंत्र म्हणतो –

धर्मप्रजा सिध्यर्थ कन्या तुभ्यं संप्रददे

म्हणजे धर्मपालन व उत्तम प्रजा निर्माण करण्यासाठी या कन्येला मी तुमच्या गोत्रात समर्पण करतो.

धर्मपालन तिनेच करायचे काय? आणि उत्तम प्रजा निर्माण करणे, हा एकमेव उद्देश या लग्नाचा असतो काय?

त्यानंतरही बरेच मंत्र म्हटले जातात. त्याचा थोडक्यात अर्थ असा की “अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांना होण्यासाठी व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी कन्या या विष्णुरुपी वरास अर्पण करतो.” असे म्हणून अक्षता व पाणी वराच्या हातावर सोडायचे. भरपूर वरदक्षिणा द्यायची आणि “धर्म, अर्थ, काम या तीनही बाबतीत मी पतीच्या परवानगीशिवाय कोणतेही कार्य करणार नाही,” असे वचन वधूने पित्याला द्यायचे. यातली एकही गोष्ट लॉजिकली मला मान्य नव्हती – माझ्या पितरांसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी माझ्या मुलीचे दान? हा भंपकपणा मला मान्य नव्हता. मी हे सारे माझ्या व्याह्यांना समजावून सांगितले आणि एका कर्मठ; पण सभ्य ब्राह्मण वरपित्याचे मन वळवण्यात मी यशस्वी झाले. कुठल्याही चळवळीशी संबंध नसलेल्या या कुटुंबाने माझी भूमिका समजून घेऊन तिचा आदरही केला आणि माझ्या ‘फेमिनिस्ट’ विचारसरणीच्या मुलीचा संसार आनंदात आजही सुरू आहे. आपण आपल्या मतावर ठाम असू तरच पुढच्या व्यक्तीला समजावून सांगू शकतो.

संपर्क : 99700 95562


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]