अनिल चव्हाण -

भेकड सनातनी
2015 साल. 16 फेबु्रवारीची सकाळ! कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील आयडियल कॉलनी इथे शहीद कॉ. गोविंद पानसरेंचा बंगला आहे. तब्येत बरी नसली, तरी थोडे फिरावे म्हणून कॉ. पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा बाहेर पडले. सुख-दु:खाच्या गोष्टी करत, एकमेकांना आधार देत हे वृद्ध दाम्पत्य साडेनऊच्या सुमारास घरी परतत होते. एवढ्यात दोन भेकड सनातनी तरुणांनी त्यांना गाठले. जवळच्या पिस्तुलातून नि:शस्त्र वृद्धांवर गोळ्या झाडल्या आणि दुचाकीवरून पसार झाले. हल्लेखोरांनी कॉ. पानसरेंच्यावर तीन गोळ्या झाडल्या – एक मानेतून आरपार गेली, दुसरी पायाला चाटून गेली; तर तिसरी छातीत डाव्या बाजूला लागून तिथेच अडकली. वीस फेबु्रवारीला त्यांचे निधन झाले. उमाताईंना डोक्याला दोन गोळ्या लागल्या. कवटीला तडा गेला. त्या वर्षभराने हिंडू-फिरू लागल्या आणि पुन्हा कम्युनिस्ट पक्षाच्या कामात सहभागी झाल्या.
समता विरुद्ध विषमता
हे खून एकट्या-दुकट्याचे खून नाहीत, हे युद्ध आहे घटनेचे संरक्षण करणारे आणि राज्यघटना उद्ध्वस्त करणारे यांच्यामधले. समता, बंधुता, न्याय यावर आधारित समाज आणू पाहणारे आणि वर्णश्रेष्ठत्व, चातुर्वर्ण्य, मनुस्मृती पुन्हा आणण्याचे स्वप्न पाहणारे यांच्यामधले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजाला सांगणारे आणि शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून हिणवणारे यांच्यामधले. एका बाजूला दीन-दुबळ्यांबद्दल कणव, तर दुसर्या बाजूला सत्ता-संपत्ती आणि धर्मांध विचारांचा माज! अशा असमान पातळीवर लढले जाणारे युद्ध! त्यामधले हे दोन योद्धे भेकड सनातन्यांच्या गोळ्यांनी ‘हुतात्मा’ बनले.
नवे गुन्हेगार
वृत्तपत्रांतून खुनाच्या बातम्या रोजच येतात. बहुतेक खुनांचा तपास पोलीस लावतात. तपास कसा करावा, याचे प्रशिक्षण पोलिसांनी घेतलेले असते. या खुनामागे संपत्ती, अनैतिक संबंध, गुंडगिरी, चोरी, प्रेम अशी कारणे असतात; पण समाजात काही समाजद्रोही गुन्हेगार धर्माचा बुरखा घेऊन वावरत असतात. त्यांच्यापर्यंत कसे पोचावे, याबाबत तपासयंत्रणा आणि प्रचलित कायदा अनभिज्ञ आहे. हे गुन्हेगार धर्माच्या नावावर संघटना काढतात, मठ स्थापन करतात, भोळ्याभाबड्या जनतेकडून कोट्यवधींची ‘माया’ गोळा करतात. या कामासाठी आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक, पापपुण्य यासंबंधीच्या भाकडकथा रचतात. विरोधकांना नास्तिक, धर्मद्रोही अशी विशेषणे लावतात, धार्मिक भावना दुखावल्या म्हणत गळा काढतात, सतत विषारी द्वेष पसरवतात. द्वेषपूर्ण वातावरणामुळे काहीजणांची विवेकबुद्धी हरवते, अशा लोकांना हेरतात, त्यांच्या हातात हत्यार देतात. स्फोट घडवतात, खून पाडतात; स्वत: मात्र नामानिराळे राहतात.
खुनाचा इतिहास
देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि सहा महिन्यांच्या आत महात्मा गांधींचा खून झाला. अष्ठ्याहत्तर वर्षांच्या नि:शस्त्र वृद्धाला गोळ्या घालण्याचे ‘शौर्य’ भेकड खुन्याने दाखवले. बहुजनांना राजकारणात आणले. दलितांना सवर्णांच्या पंगतीला बसवले. स्त्रियांना मान दिला. त्यामुळे धर्मांध सनातनी खवळले. महात्मा गांधींबद्दल द्वेष पसरवला आणि खून पाडला. त्यावेळी काढलेल्या पत्रकात सरदार पटेल म्हणतात, ‘संघाच्या विचारानेच महात्मा गांधींचा खून झाला. गांधींच्या खुनाबद्दल संघाच्या लोकांनी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे.’ (टाईम्स ऑफ इंडिया 21 ऑक्टोबर, 1990) इतके सर्व माहीत असूनही महात्मा गांधींच्या नावाचा सतत जप करणारे राज्यकर्तेही खुन्याचा मास्टरमाईंडला शिक्षा करू शकले नाहीत. लोकांनीच पकडलेल्या खुन्याला फक्त ते फासावर चढवू शकले. अशीच परिस्थिती चारही विचारवंतांच्या खुनामध्ये दिसते.
जनतेचा प्रक्षोभ
संत तुकारामांची गाथा पुण्यात बुडवली आणि त्यांच्यावर बहिष्कार घातला, तेव्हा या अन्यायाविरोधात जनता उभी राहिली. त्यांनी बहिष्कार मोडीत काढला आणि लोकगंगेचे अभंग पुन्हा लिहून काढले. महात्मा गांधींच्या खुनानंतर धर्मांध संघटनेवर नाईलाजाने का होईना; पण शासनाला बंदी घालावी लागली. शहीद डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतरचा प्रक्षोभ विझवण्यासाठी अठरा वर्षेरखडलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा त्वरित पारित करावा लागला. पानसरेंच्या खुनानंतर आरोपीच्या बचावासाठी सनातन्यांनी आर्थिक मदत देऊन तीस वकिलांची फौज उभी केल्याचे जाहीर केले, तेव्हा केस लढवण्यासाठी पानसरेंच्या बाजूने शेकडो वकील मैदानात उतरले. आरोपीच्या वकिलाने इतरांना धमकावण्यासाठी ‘मॉर्निंग वॉक जात जा,” असा धमकीवजा इशारा दिला, तेव्हा प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला कोल्हापूरच्या विविध भागातून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ निघू लागला. पेठापेठांतून गीत घुमू लागले –
“गोळ्या घाला, लाठ्या मारा– आम्ही नाही डरणार
अन्यायाच्या विरोधात, लढत आम्ही राहणार,
– आम्ही सारे पानसरे!”
कोरोना येईपर्यंत हा ‘मॉर्निंग वॉक’ नियमित सुरू होता.
खून का?
सत्ताधार्यांचा वरदहस्त असला, तरी विचारवंतांचा खून करणे आणि तो पचवणे हे सोपे नाही. नियोजन करून घटना घडवून आणेपर्यंत कोट्यवधींचा खर्च आहे. घटनेनंतर खुन्याला पळून जायला मदत करणे, लपवणे, न्यायालयीन डावपेच खेळणे, विकाऊ राजकीय व्यक्तींची तोंडे बंद करणे, हा खर्चही कोटींमध्ये येणार; शिवाय बदनामीची टांगती तलवार आहे. एवढा मोठा धोका धर्मांध शक्ती का घेतात? हे समजून घ्यायचे, तर या मोठ्या माणसांचे कर्तृत्व अभ्यासले पाहिजे.
– अनिल चव्हाण