प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैज्ञानिक जाणिवांचा जागर

राजीव देशपांडे -

‘आपली पंचेद्रिंये नेहमी उघडी ठेवावीत; निरीक्षण करावे, तपासावे आणि त्यानंतर निर्णय घ्यावा,’ असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. भवतालचे ज्ञान करून घेण्याची ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि लहान मुलाची पद्धत यामध्ये खूप साम्य आहे. मूल जितके लहान, तितका आई-वडील सांगतात म्हणून एखादी गोष्ट स्वीकारण्याकडे त्याचा कल कमी असतो. ‘आपण करून बघावे, अनुभव घ्यावा,’ हीच त्याच्या दृष्टीने जगाला भिडण्याची, जग समजून घेण्याची रीत असते. अनुभवजन्य ज्ञान हा विवेकवादाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा देखील पाया आहे. मोठ्यांचे जग गुंतागुंतीचे असते आणि त्याबद्दल स्वतः अनुभव घेऊन निर्णयाप्रत येण्याची शक्यता मर्यादित असते. त्यामुळे भवतालातील गुंतागुंत मुलाला उलगडून दाखवणार्‍या पालकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. मात्र पालकांना अनेक उत्तरे माहीत नसतात, आपल्याला माहीत असलेली उत्तरे तर्कसंगत नाहीत, हे त्यांच्या ध्यानात येत नसते किंवा आपले उत्तर तर्कसंगत नाही, हे त्यांच्या ध्यानात आले तरी आपले बोलणे अतार्किक आहे, हे स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. त्यामुळे मुलांच्या प्रश्नांना सामोरे जाताना आपण वयाने मोठे असल्यामुळे प्राप्त झालेले बळ वापरून त्यांना ‘गप्प बस’, ‘आधी गृहपाठ पूर्ण कर’, ‘तू एकटीच शहाणी आहेस का? आधीच्या लोकांना काही कळत नव्हतं का?’, ‘आपल्याकडे हे चालत नाही’ अशी पूर्णपणे अतार्किक उत्तरे देतो. वास्तविक पाहता विकसित तर्कबुद्धी हे माणसाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. जिथे मानवी मेंदू आहे, तेथे तर्क करण्याची क्षमता असतेच आणि ही तर्कबुद्धी वापरूनच मानवाने आपली प्रगती करून घेतली आहे; त्यामुळे औपचारिक शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून या तर्कबुद्धीच्या विकासाला चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 1986 च्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणा’मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा घटकांतील समावेश हेच दर्शवतो. माणसाकडे फक्त तर्कबुध्दीच आहे, असे नाही तर इतर प्राण्यांप्रमाणे त्याला तीव्र भावना, संवेदना, इच्छा, वासना या जन्मजात प्रवृत्ती देखील आहेत. त्यामुळे राग, लोभ, निराशा अशा सर्व भावनांचा सामना करताना तर्कबुद्धी शाबूत ठेवण्याचे शिक्षण मिळणे देखील महत्त्वाचे आहे. शाळेमध्ये मुलांना अनेक विषयांची माहिती मिळते; प्रत्यक्ष आयुष्यातील प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग करण्याचा अनुभव देखील मुलांना शाळेत मिळाला पाहिजे. उदाहरणार्थ भौतिक शास्त्रामध्ये ‘बाह्य बलाशिवाय कार्य घडत नाही,’ हा न्यूटनचा नियम शिकल्यावर हे देखील लक्षात आले पाहिजे की, करणी, भानामती अशा अतींद्रिय शक्तींमुळे काही घडणे अशक्य आहे. ग्रहणांबद्दल माहिती घेतल्यावर हे लक्षात आले पाहिजे की, ग्रहणाचा गरोदर बाईवर कोणताही अनिष्ट परिणाम होणे शक्य नाही.

अंधश्रद्धांचा पसरा गगनाला भिडणारा आहे. एखादी गोष्ट अंधश्रद्धेमध्ये मोडते का, हे सतत तुम्हाला कोणी सांगू शकत नाही आणि जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला पूर्वीपासून जे माहीत आहे, त्याला पुष्टी मिळेल असेच पुरावे स्वीकारण्याकडे आपल्या मेंदूचा कल असतो. त्याला स्वसोयीची खात्री (confirmation bias) असे म्हणतात. त्यामुळेच जडणघडणीच्या वयात वैज्ञानिक दृष्टिकोन समजणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगी निर्णय घेताना हा दिवा आपली वाट उजळणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही जगाचा अर्थ लावण्याची एक रीत आहे आणि यथार्थ ज्ञानप्राप्तीचा आज तरी माणसाला माहीत असलेला हा सर्वांत खात्रीचा मार्ग आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय आयुष्यात अत्यंत कसोशीने वैज्ञानिक दृष्टिकोन जपला. पुढील वर्षभर प्रा. डॉ. एन. डी. पाटील ‘वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन’ अभियानामार्फत महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांशी वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी विविध प्रकारे संवाद साधून आपण प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहोत. प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्यानंतर ‘अंनिस’च्या अध्यक्ष झालेल्या ध्येयवादी शिक्षक मा. सरोजताई पाटील यांच्यासोबत या अभियानात केलेले काम आम्ही वेळोवेळी आपल्यासमोर मांडूच.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]