विनायक पुरुषोत्तम -
२००४ सालची गोष्ट आहे. मी आमच्या मागच्या दारात पायरीवर पुस्तक वाचत बसलो होतो… माझी आई अंगणात कपडे वाळत घालत होती. मला आईच्या मागे काळ्या रंगाचं काहीतरी सरपटताना दिसलं. काही कळायच्या आत त्या नागाने फणा काढला. माझ्या तोंडून फक्त ‘आई’ इतकाच शब्द निघाला. माझ्या हाकेमुळे आई सावध झाली; पण समोर फणा काढून उभ्या असलेल्या नागाला बघून ती जागीच थबकली. इतक्यात आईने पाळलेल्या मांजरीचं लहानसं पिल्लू कुठूनतरी आलं आणि त्याने त्या नागावर हल्ला केला. आईला तिथून निसटायला एक मौल्यवान सेकंद मिळाला; पण त्या पिल्लाने पुढच्या काही क्षणात तिथेच तडफडून प्राण सोडला.
हा किस्सा मी बेळगावच्या कलावती आईंच्या हरिनाम सप्ताहात अनुभव कथन करताना सांगितला आणि त्यात एका वाक्याची भर घातली. ‘त्या क्षणी त्या पिल्लात मला कलावती आई दिसल्या. साक्षात कलावती आईंनीच माझ्या आईला वाचवलं.’ सगळे भारावून गेले. आईंच्या नावाचा एकच गजर झाला..
खरं तर बालोपासना संपल्यावर रोज वेगवेगळा खाऊ (प्रसाद) खायला मिळतो. या कारणासाठी मी त्या ठिकाणी जायला सुरुवात केली होती. दोन वर्षांनी आमच्या एरियात स्वामींचं केंद्र सुरू झालं. तिथला प्रसाद इथल्यापेक्षा जास्त आकर्षक होता आणि दिवसातून तीन वेळा मिळायचा. त्यात तिथे स्वामींच्या दरबारात वीणा वाजवण्याची सेवा करायला मिळायची. वीणेबद्दलच्या कुतुहलाने आणि प्रसादाच्या लालसेने साहजिकच पावलं तिकडे वळली. बालोपासना आवडेनाशी झाली. मग तोच सापाचा किस्सा मी साक्षात स्वामींनी आईला वाचवलं म्हणून सांगू लागलो. पण कॉलेजला गेल्यावर नाटक करायला लागलो आणि लक्षात आलं की, आईला तर बिचार्या मांजराच्या पिल्लाने वाचवलं होतं. अचानक देव, प्रार्थना, उपासना केंद्र सगळं थोतांड वाटू लागलं. पण तरीही आई, बाबांना काही झालं, आजोबा आजारी असले की हात आपोआप जोडले जायचे. ‘देवा, तू जर खरंच असशील तर त्यांना काही होऊ देणार नाहीस’, अशी धमकीवजा विनवणी मनातल्या मनात करायचो. त्याच वेळी नाटकात काम करताना देवाने माणसाला निर्माण केलं की माणसाने देवाला? हे संवाद बोलायचो. कळायचं नाही देव कशाला म्हणतात, देव खरंच आहे का? देव जर नसेल तर ज्या वेळी आधाराची गरज असते त्या वेळी हात आपोआप का जोडले जातात. काय खरं काय खोटं?? पण त्याच वेळी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मुलाखत बघितली आणि काहीतरी सापडलं. गाडगेबाबांचा देव जास्त आपलासा वाटला. दाभोलकरांना ऐकू लागलो, वाचू लागलो. दाभोलकरांनी देवाची जी रूपं सांगितली आहेत त्यातलं आनंद निधान आणि सायकोथेरपिस्ट ही रूपं मनाला भावली आणि सगळे प्रश्न दूर झाले.
आनंद निधान – मी देव देव करत नाही; परंतु गणपतीच्या चार दिवसांत मी माझ्या सगळ्या मित्रांच्या घरी दर्शनाला आवर्जून जातो. कारण त्या काळात त्या घरांमधलं एरवी जाणवणारं वातावरण आमूलाग्र बदलतं, घराची मरगळ जाऊन प्रसन्नता येते आणि ती मला गणपती या देवाबद्दलची सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. माझ्यासाठी तो आनंद निधान आहे.
सायकोथेरपिस्ट – कोणतीही कठीण, अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करताना आपोआप हात जोडले जातात, देव आठवतो. त्याने ती गोष्ट सोपी होते का? नाही, पण अज्ञाताच्या भीतीने घाबरलेल्या मनाला एक आधार मिळतो आणि नकारात्मकतेची जागा सकारात्मकता घेते. माझी दृष्ट काढल्यामुळे जर माझ्या आईला शांत वाटणार असेल, तर मी तिच्या आनंदासाठी दोन मिनिटं माझी विचारधारा बाजूला ठेवून तिच्यासमोर बसू शकतो. इथे देवावरचा विश्वास किंवा देव ही कल्पना सायकोथेरपीचं काम करते.
देव ही संकल्पना जोपर्यंत आनंद आणि आधार देणारी आहे, माणुसकीच्या, करुणेच्या, नैतिकतेच्या वाटेवर चालणारी आहे, तोपर्यंत ती मान्य करायला काहीच हरकत नाही. कारण दाभोलकर सांगतात तसं, ‘घरातले देव’ नाकारणं सोपं आहे, पण मनातले देव नाकारणं ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे.
–विनायक पुरुषोत्तम
(‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक)