अंनिसचे काम मानसिक समाधान देते

सुनीता देवलवार -

सामाजिक विचारांचा वारसा मला माझ्या वडिलांकडून मिळाला. सामाजिक सुधारणा, तत्त्वज्ञानावर आधारित अशा थोर विचारवंतांची बरीच पुस्तके आमच्या घरी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतीबा फुले यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. माझी आई थोडी धार्मिक होती. वडील नास्तिक होते; पण आईला त्यांनी कधी विरोध केला नाही. पण काही वर्षानंतर आमच्या आईला वडिलांचे विचार पटू लागले आणि तीसुद्धा नास्तिक झाली.

माझ्या विचारांवर वडिलांचा खूप पगडा होता. मी बँकेत नोकरीला होते. वयाच्या ६० वर्षांपर्यंत नोकरी करायची नाही हे आधीच ठरवले होते. डॉक्टर दाभोलकरांची पुस्तके वाचनात आलेली होती. नोकरी सोडून सामाजिक कार्य करायचे ठरवले होते, पण नेमके कुठे ते समजत नव्हते. त्याच सुमारास एके दिवशी पेपरात बातमी आली होती की, गोरेगावच्या नंदादीप शाळेत अंनिसचा कार्यक्रम आहे. निखिल वागळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. तो कार्यक्रम बघायला गेले. कार्यक्रमात चळवळीची गाणी, चमत्कार सादरीकरण, पथनाट्य असा विविधरंगी कार्यक्रम मला आवडला. अंनिस संघटनेची कार्यपद्धती मला जाणून घ्यायची होती. तेव्हा शाळेच्या माजी शिक्षिका दिवंगत अलका चाफेकर माझ्या बाजूला बसलेल्या होत्या. त्यांनी थोडक्यात माहिती दिली आणि मला गोरेगावमधील केशव गोरे स्मारक येथे बैठकीला येण्याचे आमंत्रण दिले. त्या बैठकीला मी गेले. बैठकीची रूपरेषा आणि संघटनेची कार्यपद्धती ऐकून मला समजले की, हे सामाजिक कार्य माझ्या आवडीचे आहे. आता अंनिसमध्ये येऊन मला दहा वर्षे झाली आहेत.

अंनिसमधील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाताई, अलकाताई आणि सुनीताताई ह्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले. त्या जिथे कार्यक्रम करत त्या कार्यक्रमात मला आवर्जून घेऊन जायच्या. त्यांच्यामुळे मी ‘आपला हुकमी एक्का’ कार्यक्रम ‘चमत्कार सादरीकरण’ तसेच इतर विविध कार्यक्रम थोड्या अवधीत करायला शिकले. या कार्यक्रमांतून अंनिसच्या बोधचिन्हात असलेली मूल्ये ‘विज्ञान, निर्भयता, नीती’ ही आपसूक माझ्यात रुजलीच, पण त्याचबरोबर माझा आत्मविश्वासही वाढला.

संघटनेत नवीन आले होते तेव्हा काही अडचणी आल्या होत्या. एके ठिकाणी इमारतीत बांधकाम करणार्‍या मजुरांसमोर कार्यक्रम करायचा होता. माझी ती पहिलीच वेळ होती. बोलता बोलता मी अचानक थांबले. कारण पुढचे मला काही आठवेना. मी भांबावले पण नंतर स्वतःला सावरून थोडे काही बोलून बाजूला झाले. खूप काही तयारी करून गेले होते; पण अचानक सर्व विसरले. त्यामुळे खजील झाले होते. तेव्हा मला माझ्या साथीनी समजावले की मोठमोठे वक्ते पण कितीतरी वेळा भाषण करताना विसरतात. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस. अनुभवाने तूही शिकशील. अर्थात त्यानंतर परत असा विसरण्याचा अनुभव आला नाही.

अंनिसमध्ये काम करायचे ठरवले तेव्हा माझे वडील खूप खूश झाले. तसेच माझ्या बहिणी, मैत्रिणी यांनी मला प्रोत्साहन दिले. अंनिसमध्ये काम करायचे म्हणजे समाजातील प्रचलित विचारधारणेऐवजी वेगळी वाट धरणे. तेव्हा ‘जरा जपून काम कर’ असा प्रेमाचा सल्ला नेहमीच मिळत गेला.

अंनिसमध्ये काम करताना चांगले आणि वाईट अनुभव आले पण त्यामुळे शिकायला मिळाले की, सर्व काही गृहीत धरायचे नाही. महिलांच्या अडचणी सोडविणारी ‘स्वाधार’ या संस्थेने रोजच्या जीवनातील अंधश्रद्धा या विषयवार बोलण्यासाठी मला आमंत्रित केले होते. २५ ते ३० महिला होत्या. माझी ओळख त्या संस्थेच्या पदाधिकारींनी करून दिली. मी दिलेल्या विषयावर बोलणार, इतक्यात त्यांनी रोजच्या जीवनातील अंधश्रद्धा यावर त्यांनी लिहून आणलेल्या पेपरात बघून वाचायला सुरुवात केली. त्यामागील कारणे, अंधश्रद्धा, त्यात कालानुरूप बदल का झाला नाही, हे सर्व त्याच बोलत होत्या. हे सर्व एक तास सुरू होते. मला जरा जागा मिळाली की, मी लगेच माझे विचार मांडत होते. पण खूप कमी बोलायला मिळाले. सगळे काही त्याच बोलून मोकळ्या झाल्या. मला थोडा राग आला होता; पण लगेच मी स्वतःला सावरले. असे अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात.

एक चांगला अनुभव मी जिथे राहते तिथे आला. नवरात्रीत एक दिवस कन्या पूजन असते. त्यादिवशी रात्री हवन केले जाते. मुलींना रोजच्या वापरातील रुमाल, फणी, पावडर इत्यादी गोष्टी देऊन पूजतात. हवनमध्ये कित्येक नारळ टाकले जातात. त्यामागील उद्देश हा की, आपल्या घरातील इडा पिडा दूर करणे. मी एकीला विचारले की, ‘या सर्व नारळांचे काय करणार?’ तर उत्तर आले की, ‘जवळ असलेल्या तलावात टाकणार.’ मी लगेच विचारले की, ‘मी हे सर्व घेऊन जाऊ का?’ त्यांना आश्चर्य वाटले. मला घेऊन जाण्याची परवानगी दिली. दुसर्‍या दिवशी मी जे नारळ चांगले होते, पूर्ण जळालेले नव्हते ते किसून त्याच्या वड्या केल्या. थोड्या घरी ठेवल्या आणि बाकीच्या सुरक्षारक्षक, सफाई कामगार, माळी आदींना वाटल्या. याचा चांगला परिणाम असा झाला की, दुसर्‍या वर्षी नवरात्रीत केवळ एक नारळ टाकला गेला. आतापर्यंत यात बदल झाला नाही.

विविध शाळा, संस्था, महिला बचत गट, आदिवासी महिला, ज्येष्ठ नागरिक इत्यादी ठिकाणी जेव्हा कार्यक्रम घेते, तेव्हा त्यांना कार्यक्रम खूप आवडतो. कित्येक शाळा आवर्जून प्रत्येक वर्षी अगत्याने कार्यक्रमासाठी बोलवतात. तुम्ही समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्य करताय असे म्हणून स्तुती करतात तेव्हा मानसिक समाधान मिळते.

सुनीता देवलवार (मुंबई)

संपर्क : ९८२०४ ३५१०७


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]