निसर्ग परिसंस्था रोग नियंत्रणासाठी मदतकारक

अनिल सावंत - 9869791286

कोविड-19’ने गंभीर इशारा दिलेला आहे, की मानवी आरोग्य आणि पृथ्वीचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. मानवाला स्वतःचे आरोग्य सांभाळायचे असेल तर निसर्ग संतुलन राखणे अपरिहार्य आहे. सतरा लाख विषाणू सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये आहेत. यातील एखादा विषाणू माणसात संक्रमित झाला, तरी नवा रोग होण्याचा धोका आहे. निरोगी आणि जैविक विविधतेने परिपूर्ण असलेली परिसंस्था संवेदनशील असते, लवचिक असते आणि रोगनियंत्रणासाठी मदतकारक असते, म्हणूनच जैविक विविधता जपली तरच भविष्यातील ‘कोविड-19’सारखे हल्ले टाळता येतील.

झुनोटिक बूमरँग

अधून-मधून वर्तमानपत्रातील व टीव्हीवरील बातम्यांतून असे प्रश्न उपस्थित केले जातात – बिबट्याने वस्तीत येऊन माणसावर हल्ला का केला? जंगली हत्तींचे कळप पिके उद्ध्वस्त का करत आहेत? वटवाघळात असणारा कोरोना विषाणूचा माणसात संसर्ग का झाला? आता तरी आपण उत्तर शोधणार की नाही? तेव्हा अकबर-बिरबल यांच्यातील प्रश्नोत्तराची आठवण होते. बादशहा अकबरने एकदा बिरबलला तीन प्रश्न विचारले; पण तिन्ही प्रश्नांचे उत्तर एकच असले पाहिजे, अशी अट घातली. पान का सडले? भाकरी का करपली? घोडा का बिथरला? बिरबलाने तिन्ही प्रश्नांचे उत्तर दिले, ‘न फिरवल्याने.’ म्हणजे बदल न केल्यामुळे. काहीसे याच पद्धतीने आपल्याही प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे समतोल न सांभाळल्याने, म्हणजे माणूस व इतर सजीव यातील समतोल सांभाळला नाही म्हणून.

यासाठीच 5 जून रोजी साजर्‍या झालेल्या यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाचे संकल्पना सूत्र होते – जैविक विविधता. संयुक्त राष्ट्राने घोषित केल्याप्रमाणे 1972 पासून 5 जून या दिवशी पर्यावरणाच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम जगातील अनेक देशांत राबवला जातो; तसेच काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन 22 मे रोजी साजरा केला गेला. त्याचेही यंदाचे संकल्पना सूत्र होते, आपल्या पर्यावरणीय समस्यांचे उत्तर निसर्गातच आहे. इतकेच नाही, तर माणसाला निरोगी जीवन कसे मिळेल, याचे उत्तर सुद्धा निसर्गातच, जैविक विविधतेत आहे.

जैविक विविधता

निसर्गात सूक्ष्मजीव, वनस्पती, पक्षी, प्राणी असे विविध जीव एकत्र नांदतात. त्यांच्या आपसातील संबंधांची आणि एकत्रित जगण्याची विविध नैसर्गिक जाळ्या बनलेल्या आहेत. पृथ्वीतलावर वने, पाणथळ जागा आणि समुद्र अशा वेगवेगळ्या अधिवासात अनुकूल जीवांची उत्क्रांती झाली. त्या-त्या परिसरात अनेक सजीवांच्या एकत्रित नांदणार्‍या परिसंस्था तयार झाल्या. जैविक विविधतेने समृद्ध परिसंस्था सदृढ समजली जाते आणि त्यातील सजीवांचे जीवनही निरोगी असते. प्रत्येक जीवाचे अस्तित्व दुसर्‍या जीवावर व आजूबाजूच्या पर्यावरणावर अवलंबून असते. वनस्पती खाऊन जगणारे प्राणी, इतर प्राण्यांना खाऊन जगणारे प्राणी अशी अन्नसाखळी बनते. पाऊस-पाण्याचे चक्र, कार्बन-नायट्रोजन-ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड अशी अनेक निसर्गचक्रे आहेत. जसे सजीवांचे जीवन या निसर्गचक्रावर अवलंबून असते, तसेच सर्व जीव या निसर्गचक्राचे भाग सुद्धा आहेत. पृथ्वीतलावर ऐंशी लाख सजीव प्रजाती आहेत, त्यापैकी मानव ही एक प्रजात आहे.

जैविक विविधता चार प्रकारची असते. प्रजातींची विविधता, एकाच प्रजातीअंतर्गत जनुकांची विविधता, एका प्रदेशात परिसंस्थांची विविधता, परिसंस्थेंतर्गत प्रजातींची जगण्याच्या पद्धतीची विविधता.

जैविक विविधतेची विपुलता असलेल्या बारा देशांपैकी भारत हा एक असा संपन्न देश आहे. जगाच्या 2.5 टक्के भूप्रदेश असलेल्या भारत देशात जगभर नोंद झालेल्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींपैकी 7.8 टक्के प्रजातींचे वास्तव्य आहे. वनस्पतींच्या 46 हजार आणि प्राण्यांच्या 81 हजार प्रजाती आहेत. 350 सस्तन प्राणी, 1224 पक्षी, 408 सरपटणारे प्राणी, पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी राहणारे 197 उभयचर प्राणी, 2546 मासे अशा अनेक प्रजाती आहेत. भारतातील वने, पाणथळ जागा आणि समुद्र जैविक विविधतेने संपन्न आहे. ही खूप मोठी निसर्ग संपत्ती आहे.

जैविक विविधता संवर्धन आवश्यकता

एका अंदाजानुसार जगभर सत्तर हजार प्रकारच्या वनस्पतींचा पारंपरिक व आधुनिक औषधे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच अन्न व ऊर्जासुद्धा आपल्याला या जैवघटकांकडूनच मिळते. जैविक विविधतेचा नाश झाल्यास, माणसाला केवळ कच्च्या मालाची टंचाई भासेल, असे नाही तर, मानवी समाजाची सकस अन्नसुरक्षेची शाश्वतीच धोक्यात येईल. अशा तर्‍हेने जैविक विविधता नष्ट होण्याचा नकारात्मक परिणाम मानवी जीवनावर होईलच. त्याचवेळी इतर जीवांचे जीवनही धोक्यात येऊन संपूर्ण परिसंस्थेचे संतुलन बिघडेल. सर्वच जीवांचे बदललेल्या नैसर्गिक वातावरणात जगणे कठीण होईल. जगभरात जैविक विविधता धोक्यात आलेल्या 34 ‘हॉटस्पॉट’पैकी 4 भारतात आहेत – पश्चिम घाट, हिमालयात पूर्व भागात आणि भारत-म्यानमार सीमा भागात.

समस्या व आव्हाने

जैविक विविधता धोक्यात येण्यास प्रमुख कारण आहे, निसर्ग परिसंस्थेमध्ये केला जाणारा मानवी हस्तक्षेप आणि त्यामुळे निसर्गात होणारे बदल. जैविकदृष्ट्या संवेदनशील भागात मानवी विकासासाठी होणारे हस्तक्षेप. खनिजांसाठी मोठमोठे खाण उद्योग, शेतीसाठी, कारखान्यांसाठी, वीजनिर्मितीसाठी मोठी धरणे, लोखंड व स्टील उत्पादन कारखाने यासारख्या प्रकल्पांमुळे; तसेच नागरीकरणाच्या प्रक्रियेत मानवी वस्तीसाठी संरक्षित जंगलावर होणारे अतिक्रमण यामुळे प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासांना हानी पोचते.

मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत अनधिकृत वस्ती वाढत आहे, टॉवर बांधले आहेत. त्यामुळे जंगल आक्रसत आहे. जंगलाच्या प्राणिजीवनावर विपरीत परिणाम होऊन जंगलातील प्राण्यांची संख्या कमी होत आहे. जंगलात खायला मिळत नाही, म्हणून बिबटे मानवी वस्तीत शिकार शोधण्यासाठी येऊ लागले. कुत्रा सापडला तर कुत्र्याची शिकार करू लागले. माणूस सापडला तर माणसावर हल्ला करू लागले.

कोकणात शेतीखालील जमीन वाढवत-वाढवत गावकर्‍यांनी जंगलाचे क्षेत्र कमी-कमी केले; परिणामी हत्तीना उर्वरित जंगल क्षेत्रात पुरेशा वनस्पती मिळत नाहीत, म्हणून हत्तीचे कळप खाण्याच्या शोधात जवळच्या शेतात घुसू लागले, शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान करू लागले.

कारखान्यात, विमानात, रेल्वे इंजिनात, बसमध्ये, कारमध्ये, मोटरबाइकमध्ये पेट्रोल, डिझेल अशी खनिज तेलं जाळून निर्माण होणारे वायू वातावरणाचे तापमान व आर्द्रता यात बदल घडवतात. हे बदल सूक्ष्म जीवांच्याअस्तित्वावर परिणाम करतात. संयुक्त राष्ट्रांच्या 2019 च्या अहवालानुसार आता वनस्पती व प्राणी यांच्या दहा लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत काही प्रजाती नष्ट होतातही; पण मानवी हस्तक्षेपामुळे सध्या हे प्रमाण एकशेचौदा पट वाढले आहे.

अन्नसाखळीवर परिणाम होऊन एखाद्या प्रजातीची संख्या कमी झाली, तर त्या प्रजातीमुळे नियंत्रित होणार्‍या दुसर्‍या प्रजातीची अनियंत्रित वाढ होऊ शकते. या प्रजातींचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांना जीवाणूची किंवा विषाणूची बाधा होऊ शकते. अशा बाधित प्राण्यांच्या संपर्कात माणूस आला तर माणसामध्ये पूर्वी न आढळणार्‍या नवीन रोगाचे संक्रमण होऊ शकते. प्राण्यांकडून संक्रमित झालेल्या रोगकारक घटकांमुळे उद्भवणार्‍या अशा रोगांना इंग्रजीत ‘झुनोटिक’ असे म्हणतात. वातावरणातील बदल ‘झुनोटिक’ला बढावा देतात, असे निरीक्षण आहे.

अमेरिकेत नेहमी उद्भवणारा लाइम (LYME) नावाचा रोग बोरेलिया बुर्गदोरफेरी (bacterium Borrelia burgdorferi) नावाच्या जीवाणूमुळे होतो. या जीवाणूचा संसर्ग झालेले गोचीड माणसाला चावल्यावर हे जीवाणू माणसाच्या शरीरात प्रवेश करतात आणि माणसाला हा रोग होतो. ताप येतो, डोके दुखते, थकवा येतो आणि त्वचेवर पुरळ येते. तसेच, वेळेत उपचार केले नाहीत, तर जंतुसंसर्ग वाढत जाऊन हाडांचे सांधे, हृदय आणि मज्जासंस्थेपर्यंत पसरतो. या रोगाच्या प्रादुर्भावासंदर्भात रिचर्ड ऑस्टफेल्ड आणि फेलिशिया कीसिंग या पर्यावरण शास्त्रज्ञांनी संशोधन करून असे दाखवून दिले आहे की, जैविक विविधतेने समृद्ध असलेल्या प्रदेशात संसर्ग करण्यासाठी इतर सजीवांची एक प्रकारची भिंत मध्ये असते त्यामुळे हा जीवाणू माणसांपर्यंत पोचत नाही. अर्थातच माणसाला या रोगाचा धोका कमी होतो. याला या पर्यावरण शास्त्रज्ञांनी विरलीकरण म्हणजे विरळ होणे (Dilution Effect) असे नाव दिले आहे. या संशोधनाला आता पुष्टीही मिळत आहे. 2014 मध्ये ब्राझील, अ‍ॅमेझॉन येथे केलेल्या एका पाहणीनुसार संरक्षित वनविभागातील प्रदेशात हिवताप, श्वसनाचे आजार व हगवण यांचे प्रमाण कमी असल्याचे आढळले.

माणसांमध्ये दरवर्षी सरासरी तीन नवे संसर्गजन्य आजार उद्भवतात, त्यातील चारपैकी तीन आजार हे प्राण्यांकडून संक्रमित झालेल्या रोगकारक घटकांमुळे असतात. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण संरक्षण संघटनेच्या येऊ घातलेल्या एका अहवालानुसार वातावरण बदलाचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक पावले उचलली नाहीत, तर रोगाच्या साथी पुन्हा-पुन्हा येण्याची शक्यता आहे. त्यांच्या 2016 च्या अहवालात कोरोना विषाणू अथवा प्राण्यांकडून माणसात संक्रमित होणारे रोगकारक घटक हे एकूणच मानवी समाजासाठी जागतिक समस्या असल्याचे अधोरेखित केले होते.

अशा तर्‍हेने, ‘कोविड-19’ने गंभीर इशारा दिलेला आहे, की मानवी आरोग्य आणि पृथ्वीचे आरोग्य एकमेकांशी जोडलेले आहेत. मानवाला स्वतःचे आरोग्य सांभाळायचे असेल तर निसर्ग संतुलन राखणे अपरिहार्य आहे. सतरा लाख विषाणू सस्तन प्राणी व पक्ष्यांमध्ये आहेत. यातील एखादा विषाणू माणसात संक्रमित झाला, तरी नवा रोग होण्याचा धोका आहे. निरोगी आणि जैविक विविधतेने परिपूर्ण असलेली परिसंस्था संवेदनशील असते, लवचिक असते आणि रोगनियंत्रणासाठी मदतकारक असते, म्हणूनच जैविक विविधता जपली तरच भविष्यातील ‘कोविड-19’सारखे हल्ले टाळता येतील.

लेखक रसायनउद्योग सुरक्षा व पर्यावरणतज्ज्ञ आहेत