ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर -
महिलांच्या स्वतंत्र जगण्यावर आज 21 व्या शतकातही प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. प्रतिगामी विचारांच्या अपर्णा रामतीर्थकर यांच्यासारख्या काही महिलाच स्त्रियांचे स्वातंत्र्य संकुचित करण्याचे विचार मांडत आहेत. पण तेराव्या शतकामध्ये स्त्रियांचे हक्क आणि त्यांना स्त्री म्हणून मिळणार्या दुय्यम वागणुकीवर स्त्रीसंतांनी जोरदार प्रहार केले आहेत. संत जनाबाई, संत सोयराबाई, संत कान्होपात्रा या महाराष्ट्रातील स्त्रीसंतांचे साहित्य म्हणजे स्त्रीशक्तीचा पहिला आवाज म्हणावा लागेल. या स्त्रीसंतांमध्ये सोयराबाई यांना तर स्त्री म्हणून आणि खालच्या जातीत जन्माला आल्या म्हणून दुहेरी अवहेलना सहन करावी लागत होती. त्याविरोधात त्यांनी बाराव्या शतकात मांडलेले विचार हे आता 21 व्या शतकातही मार्गदर्शक ठरतात.
मासिक पाळी आणि तिच्या पवित्र-अवित्रतेची चर्चा आजही मोठ्या प्रमाणात होते. इतकेच नव्हे, तर धर्माच्या ठेकेदारांकडून आजही मासिक पाळीला अपवित्र मानण्यात येते, म्हणूनच मंदिरात प्रवेश करण्याचा अथवा धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा अधिकार आजही मासिक पाळी असणार्या स्त्रीला मिळत नाही, ही 21 व्या शतकातील परिस्थिती आहे; मग तेराव्या शतकात याबाबत किती कर्मटपणा असेल? परंतु त्या काळात मासिक पाळीच आली नाही, तर तुमचा जन्म कसा होईल, असा खडा सवाल संत सोयराबाई यांनी विचारण्याचे धाडस केले होते. स्त्री म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक आणि खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे कुटुंबीयांना मिळणारी हीन वागणूक या विरोधात एकाच वेळी उभे राहण्याचे धाडस सोयराबाईंमध्ये दिसते.
संत नामदेव महाराज यांच्या सोबतीने वारकरी संप्रदायाच्या उभारणीत ज्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यात संत चोखा मेळा यांचे संपूर्ण कुटुंब होते. नामदेव महाराज यांनी सर्व जाती-धर्मातील विचावंतांना बरोबर घेऊन वारकरी चळवळीची उभारणी केली. नामदेव यांच्या या चळवळीत तत्कालीन 24 स्त्री-पुरुष संतकवींचा सहभाग होता. त्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांची भावंडं, गोरोबा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सेना न्हावी आदींचा समावेश होता. यातील संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या तिन्ही भावंडांनी या जगाचा फारच लवकर निरोप घेतला. या संत मांदियाळीत संत चोखा मेळा यांचे संपूर्ण कुटुंब होते. संत नामदेव महाराज यांच्या कुटुंबीयांतील सर्व स्त्री-पुरुषांच्या नावे अभंगरचना आहे. त्याचप्रमाणे चोखा मेळा यांच्या सर्व कुटुंबीयांच्या नावे अभंग पाहायला मिळतात. त्यात चोखोबांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्म मेळा, बहीण निर्मळा आणि मेहुणा बंका यांचा समावेश होतो. यातील सोयराबाई यांच्या अभंगात चोखोबा यांच्याप्रमाणेच कधी भगवंताशी सलगी; तर प्रसंगी विद्रोह दिसतो. सोयराबाई यांच्या अभंगाला अत्यंत नादमाधुर्य आहे. त्यांचा-
अवघा रंग एक झाला । रंगी रंगला श्रीरंग ॥
हा अभंग ऐकला नसेल, असा मराठी माणूस सापडणार नाही. या अभंगात सख्या पांडुरंगाविषयी जिव्हाळा तर प्रकट होतोच; पण या देवाचे वेगळेपणही सोयराबाई अधोरेखित करतात. या देवाकडे कोणताही भेदाभेद नाही. त्यामुळे त्याच्याकडे क्रोध-कामाला थारा नाही, हे सांगताना सोयराबाई लिहितात-
नाही भेदाचे ते काम । पळोनी गेले क्रोध काम ॥
एकीकडे, देवाशी इतकी सलगी असतानाच त्यावेळच्या समाजाकडून अस्पृश्य म्हणून होणार्या छळवणुकीबद्दलची खंत त्यांच्या अनेक अभंगांतून व्यक्त होते. चोखोबांच्या सर्व कुटुंबियांची एकंदर उच्च प्रतीची प्रतिभाशक्ती तत्कालीन उच्चवर्णीयांना खुपत होती, म्हणूनच चोखोबांवर विठ्ठलाचा हार चोरल्याचा आळ घेऊन मारहाण करण्यात आली. या घटनेचा चोखोबांच्या संपूर्ण कुटुंबावरच खूप मोठा परिणाम झाला. त्या घटनेबद्दल खुद्द चोखोबा यांनी देवाचा धावा केल्याचे दिसते; पण इतर कुटुंबीयांनी असा प्रसंगच येऊ दिल्याबद्दल देवाला जाब विचारलेला आहे. त्यात कर्म मेळा यांचे शब्द फारच धारदार आहेत. त्याच वेळी देवाशी सलगीने वागणारी सोयराबाईही कमालीची दुखावल्याचे दिसते. आम्ही तुझ्यावर भार घालून राहत असताना का बरं असे ‘मोकलीले’ आहे, असा सवाल सोयराबाई देवाला करतात-
हीन–दीन म्हणोनी का गा मोकलीले । परी म्या धरीले तुमचे पदरी ॥
आता मोकलीता नीत नव्हे बरी । थोरा साजे थोरी थोरपण ॥
अशा या सोयराबाई स्त्री म्हणून मिळणार्या दुय्यम स्थानाबद्दलही धाडसाने बोलतात. आताच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणाराजा हे संत चोखा मेळा आणि सोयराबाई यांचे गाव. तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजात त्यांचा जन्म झालेला. सोयराबाई यांचे आई-वडील आणि चोखा मेळा यांचे आई-वडील एकाच गावातील होते. सोयराबाई यांचा विवाह चोखा मेळा यांच्याशी झाला तर चोखा मेळा यांची बहीण निर्मळा यांचा विवाह सोयराबाई यांचे भाऊ बंका यांच्याशी झाला. दोन्ही कुटुंबीय धार्मिक होते. म्हणूनच नामदेव महाराज यांनी पंढरपुरात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करून धार्मिक लोकशाही आणण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या सोयराबाई यांच्यासह चोखा मेळा यांचे सर्व कुटुंब सहभागी झाले. नामदेव महाराज यांच्या सहवासात ते लिहून व्यक्त होऊ लागले. अस्पृश्य म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक, त्याचे सोसावे लागणारे चटके त्यांच्या रचनांतून व्यक्त होऊ लागले. तेव्हा तत्कालीन उच्चवर्णियांनी त्यांना त्रास दिला. पण हे कुटुंब डगमगले नाही. लिहित राहिले.
सोयराबाई या जातीय विषमतेबद्दल लिहित असतानाच स्त्री म्हणून मिळणार्या वागणुकीवरही तीव्र शब्दांत प्रहार करतात. विशेषतः स्त्रीच्या मासिक पाळीबद्दल तेराव्या शतकात त्यांनी व्यक्त केलेले विचार खूपच धाडसाचे म्हणावे लागतील. विटाळाबद्दल त्या लिहितात-
देहासी विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ॥
देहीचा विटाळ देहीच जन्मला । सोवळा तो झाला कवण धर्म ॥
विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान । कोण देह निर्माण नाही जगी ॥
त्यांचे हे धाडसी विचार आजही विचार करायला लावणारे आहेत. आजही मासिक पाळीबद्दल बुरसटलेल्या कल्पना घेऊन जगणार्यांना सोयराबाईने दिलेली ही सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. आज एकविसाव्या शतकात स्त्रियांना आत्मभान निर्माण होत असताना काही शक्ती स्त्रियांकडे केवळ मुलं जन्म घालणारे यंत्र पाहू लागतात. तेव्हा संतांनी मांडलेल्या स्त्रीशक्तीच्या विचारांचा जागर होण्याची गरज अधिक अधोरेखित होते.