अनिल चव्हाण - 8983661655
अंनिस कार्यकर्त्या गीता हासुरकर यांनी केले डॉक्टराचे स्टिंग ऑपरेशन
“लेकीला दोन पोरी झाल्यात. आता पोरगा झाल्याबिगार नांदवणार नाही म्हणतीय सासू! तवा काईतरी मार्ग काढा, डागदर!” अशी काकुळतीला आलेली गिर्हाईके शोधायच्या कामावर प्रत्येक गावात एजंट आहेत. दत्तात्रय शिंदे असाच एजंट! त्याला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हासुरकर यांनी फोन केला आणि महिलेचा गर्भपात करावयाचा असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांना गुरुवारी पहाटे पडळ येथील शिवनेरी क्लिनिकमध्ये येण्याचा निरोप मिळाला. महिला पोलीस रुपाली यादव यांना बनावट ग्राहक म्हणून पाठवण्यात आले. तिथे डॉ. हर्षल नाईक यांनी त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले आणि तीन गोळ्या व पुड्या दिल्या. या पथकातील इतर सहकार्यांसमवेत डॉ. नाईक रिक्षातून कोल्हापूरला गर्भपात करण्यासाठी आले. तेथे हरिओम नगरातील बोगस डॉक्टर उमेश पवार यांच्या रुग्णालयात आल्यावर त्यांचा पर्दाफाश करण्यात आला. सर्वजण जाळ्यात अडकले.
पडळ आणि कोल्हापूर येथे पोलिसांनी छापा टाकून महिलांचा गर्भपात करण्यासाठीचा मोठा औषधसाठा जप्त केला. आता संशयितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
विशेष म्हणजे पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी हे क्लिनिक बिनदिक्कतपणे सुरू होते; पण त्याची माहिती गावकर्यांना नव्हती.
छापा टाकणार्या पथकामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या, ‘पीसीपीएनडीटी’च्या सल्लागार समिती सदस्य गीता हासुरकर, कायदा सल्लागार गौरी पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, दिलीप जाधव, मारुती चौगुले, रुपाली भिसे, डॉ. अनिल कवठेकर, पोलीस पाटील अभिनंदन पवार, सरपंच पंडित कांबळे, सुनील पवार, अमोल कांबळे, पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले, पोलीस मीनाक्षी पाटील व रुपाली यादव यांचा समावेश होता.
अशा तर्हेचे बेकायदेशीर रॅकेट चालवणे एकट्या-दुकट्याचे काम नाही. त्यांच्यावर प्रशासकीय यंत्रणेची मेहेरनजर असली पाहिजे, अशी चर्चा गुन्ह्याच्या घटनास्थळी सुरू होती. विनाकष्ट हजारो रुपये मिळत असल्यामुळे यामध्ये बोगस डॉक्टर सक्रिय झाले आहेत आणि बेकायदेशीर गर्भपाताचे रॅकेट दिवसेंदिवस विस्तारत आहे. बोगस डॉक्टरांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ग्रामीण भागातील अधिकृत डॉक्टरांची यादी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. त्यांची संख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2280 आहे. त्या यादीनुसार अधिकृत डॉक्टरांची संख्या तालुक्यामध्ये 22 पासून 542 पर्यंत आहे.
शहरात, गल्लीबोळात डॉक्टर आहेत; पण अनेक दुर्गम ठिकाणी व खेड्यापाड्यात अधिकृत पदवीधर डॉक्टर नसतात; असतील तर त्यांची फी प्रचंड असते. त्यामुळे गरीब रुग्ण कमी पैसे घेणार्या आणि सहज भेटणार्या डॉक्टरांकडे उपचार करवून घेण्याला प्राधान्य देतात. अशा बोगस डॉक्टरांपासून रुग्णांना वाचवायचे असेल तर शासनाने वैद्यकीय सेवा माफक दरामध्ये उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या रेट्याखाली खासगीकरण वाढवत सुटलेल्या शासनाकडून हे शक्य आहे काय?
अजूनही समाजाची मानसिकता ‘मुलगा हवा,’ अशीच आहे. त्यामुळेच गर्भलिंग निदान केले जाते. केवळ मुलगा आहे की मुलगी, हे सांगण्यासाठी सध्याचा दर पंधरा हजार रुपये आहे. ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्यावर मिळालेल्या डायरीत दूरदूरच्या जिल्ह्यांमधील महिलांची नावे आढळून आली आहेत. यावरून स्त्रीभ्रूणहत्या रॅकेटची व्यापकता लक्षात येते. या तपासासाठी स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीम स्थापन करावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. .
‘वंशाला दिवा पाहिजे,’ ही अंधश्रद्धाच स्त्रीभ्रूणहत्येला खतपाणी घालत आहे.
स्त्रीभ्रूणहत्या टाळायची असेल, तर ‘स्टिंग ऑपरेशन’बरोबरच, धार्मिक अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाजप्रबोधन आणि सर्वांना माफक दरात अधिकृत आरोग्यसेवा पुरवली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या समोर असे दुहेरी आव्हान आहे.
– अनिल चव्हाण, कोल्हापूर
(अंनिस कार्यकर्त्या गीता हासुरकर,
कोल्हापूर यांचा संपर्क क्र. ः 89836 61655)