रयत शिक्षण संस्था आणि एन. डी. पाटील सर

प्राचार्या प्रमोदिनी मंडपे -

सातार्‍यात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत आहे. पण यापूर्वीच रयत शिक्षण संस्थेने वैद्यकीय महाविद्यालय काढावे, असा विचार पुढे आला होता. त्यावर सकारात्मकता दाखवणारे अनेक हितचिंतक होते; पण एन. डी. पाटील सरांनी या विचाराला खतपाणी घातले नाही. एक वैद्यकीय महाविद्यालय काढणे, त्यासाठी हॉस्पिटल तयार करणे, अनेक इमारती, स्टाफ, होस्टेल यावर खर्च करणे, याऐवजी ग्रामीण भागात पाच-पन्नास शाळा सुरू करणे कसे गरजेचे आहे, हे सरांनी पटवून दिले. त्याच खर्चात अनेक शाळा ग्रामीण भागात सुरू केल्या आणि उत्तम प्रकारे चालवल्या. कर्मवीर अण्णांचा विचार होता की, ‘जेथे उजेड आहे, तेथे रोषणाई करायची नाही, तर जेथे अंधार आहे तेथे पणती लावायची,’ याच विचाराचा पाठपुरावा सरांनी आयुष्यभर केला.

क्रांतिकारकांची भूमी असलेल्या वाळवा तालुक्यात ढवळी नागाव याठिकाणी मारुतीच्या देवळात भरणार्‍या प्राथमिक शाळेत सरांनी प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना ढवळी ते आष्टा अशा आठ मैल अंतरावरील शाळेत जावे लागले. येथेच त्यांना मुख्याध्यापक खैरमोडे सर लाभले. रयत शिक्षण संस्थेची पहिली ओळख येथेच झाली आणि त्यानंतर शेवटपर्यंत ती कायम राहिली. ‘रयत’ने मला मोठे केले’ ही जाणीव त्यांनी नेहमी जपली. खेडेगावातील एक मुलगा ते वकील, प्राध्यापक, प्राचार्य, आमदार, मंत्री, ‘रयत’चा कार्याध्यक्ष अशा अनेक पायर्‍या त्यांनी ओलांडल्या, स्वकर्तृत्वाने आणि कर्मवीरांच्या आशीर्वादाने! आष्टा येथील रयत शिक्षण संस्थेच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली. 1954 ते 57 या काळात त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. यावेळी ‘कमवा व शिका’ योजनेचे प्रमुख व वसतिगृहाचे रेक्टर म्हणून त्यांनी सेवा बजावली. कॉलेजमधील प्राध्यापकांपैकी काहींना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी काहीच माहिती नाही, हे त्यांच्या लक्षात आले. पुढे ते मॅनेजिंग कौन्सिलमध्ये आले, तेव्हा त्यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे चरित्र सर्वांना माहिती व्हावे, असा आग्रह धरला. ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र’ सुरू केले. स्वतः प्राध्यापकांसाठी अशी व्याख्याने दिली. त्यांच्या तोंडूनच आम्ही छत्रपती शाहू, महात्मा फुले, कर्मवीर अण्णा, विठ्ठल रामजी शिंदे यांची जीवनचरित्रे ऐकली. हे व्याख्यान म्हणजे दीड तासांची मेजवानी असे.

मागे, शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत एक विधेयक आणले. गणित विषयाचे 2 स्तर श्रेुशी रपव हळसहशी ारींही. हे विधेयक पास झाले तर ग्रामीण भागातील मुले ‘लोअर’ गणित घेतील आणि गणितात मागे राहतील. त्यांना इंजिनिअर होता येणार नाही. म्हणून सरांनी स्वतः या विधेयकाला कडाडून विरोध केला. आमदारांची एकजूट केली. शिक्षणात चातुर्वर्ण्य नको, हे त्यांना पटवले व विधेयक मागे घेण्यास भाग पाडले. सर्व मुलांना सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण मिळायलाच हवे, हा त्यांचा आग्रह असे. त्यांनी ‘हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’ अशी पुस्तिका काढली. शासनदरबारी असो किंवा संस्था कार्यालयात; त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी खूप धडपड केली. आदिवासी, ग्रामीण, कामगार, मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. मूठभरांसाठी खूप पैसे खर्चून उच्च शिक्षणाची दारे खुली न करता आश्रमशाळा, साखरशाळा चालवण्यावर भर दिला. ‘झाडाला पाणी घालताना शेंड्याला पाणी नको, मुळांना घाला तर ते झाडाला मिळेल,’ हा विचार पसरवला. शिक्षक नेमताना परीक्षा घेऊन नेमणुका कराव्यात, यादी बाहेर लावावी, अशी पारदर्शकता त्यांनी सुचवली व त्यानुसार नेमणुका केल्या. शिक्षणाचा पाया मजबूत करणं आवश्यक आहे. शेतकर्‍यांची मुले उच्चशिक्षित व्हायला हवीत. शिक्षणामुळे रोजगार मिळायला हवा, यासाठी सहा औद्योगिक प्रशिक्षण संस्था रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू केल्या. ‘रयत’ हे श्रमिक विद्यापीठ व्हावे, हे त्यांचे स्वप्न होते. संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केले. त्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठ्या देणग्या दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट सुरू केले. त्यांच्या प्रेरणेने अनेक महाविद्यालयांतून स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करण्यात आली. सामान्य शेतकर्‍याची मुले सनदी अधिकारी झाली. ‘कमवा व शिका’ योजना कष्ट करून शिकणार्‍या मुलांची आणि मुलींची संख्या वाढवायला उपयुक्त झाली. घरी अभ्यासाचे वातावरण नसणार्‍या मुलांना ‘गुरुकुल प्रकल्पा’ने मोठा आधार दिला. एस.एस.सी.चे निकाल वाढले. ‘लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना’, ‘सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना’ योग्य प्रकारे राबवण्यात आल्या. सर्व योजना सुचवणे सोपे असते; पण त्यासाठी निधीची गरज असते. अनेक शाळांना इमारती नव्हत्या. ज्या होत्या तेथे अपुर्‍या सुविधा होत्या. पैसा उभा करणे हे आव्हान होते. सरांनी एक नवीन योजना सुचवली. प्रत्येक सेवकाने स्वेच्छेने पगाराच्या एक टक्का रक्कम दरवर्षी संस्थेला द्यावी. हा ‘संस्था कृतज्ञता निधी’ निर्माण व्हावा व यातून ग्रामीण भागातील शाळांना बिनव्याजी कर्जाऊ रक्कम द्यावी. अनेक शाळा या माध्यमातून उभ्या राहिल्या. असा हा ‘दुर्बल शाखा विकास निधी’ तयार झाला.

1959 पासून ते रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य होते आणि 1990 पासून 18 वर्षे ते चेअरमन होते. या काळात घरातील अडचणी असोत किंवा तब्येतीच्या अडचणी; त्यांनी त्या आपल्या कामाच्या आड येऊ दिल्या नाहीत. पायाला अपंगत्व आले म्हणून ते फिरायचे थांबले नाहीत. संस्थेसाठी देणग्या मिळवल्या, जमिनी मिळवल्या, शाखांचे प्रश्न सोडवले; फिरण्यासाठी संस्थेच्या पैशाचा वापर केला नाही. स्वतःची नोकरीची पेन्शन व माजी आमदार म्हणून मिळणारी पेन्शन घरासाठी न देता प्रवासासाठी वापरली. त्यांच्या प्रेरणेमुळे ‘कर्मवीर विद्याप्रबोधिनी’ने अनेक उपयुक्त शैक्षणिक पुस्तके प्रकाशित केली. छोट्या गोष्टींकडेही त्यांचे लक्ष असे. ‘शिदोरी’ ही मूल्यशिक्षण पुस्तिका ‘कर्मवीर विद्याप्रबोधिनी’मार्फत प्रसिद्ध झाली. तिचे लेखन सुरू असताना एका प्रकरणात जयंत गडकरींच्या ‘माझ्या माणसांनो’ या कवितेच्या आठ ओळी घेतल्या होत्या. भेदाभेदांवर प्रहार करणार्‍या त्या ओळी सरांना फार आवडल्या. त्यांनी त्या कवितेची चौकशी केली. मी त्या लिहिल्या होत्या, म्हणून मी पूर्ण कविता त्यांना नेऊन दिली. ही बाब माझ्यासाठी कौतुकाची होती.

ते वैयक्तिक जीवनात चारित्र्यसंपन्न होते. नीतिमत्तेचा वस्तुपाठ त्यांनी इतरांना घालून दिला. रयत शिक्षण संस्थेच्या सर्वोच्च समितीचे चेअरमन असतानाही कोणीही कितीही जवळचा असला तरी नियमबाह्य लाभ करून दिला नाही किंवा स्वतः घेतला नाही. सर हे पुरोगामी परिवर्तनवादी लोकशाही समाजवादासाठी झटणार्‍या कार्यकर्त्यांसाठी चालते-बोलते विद्यापीठ होते. मृत्यूनंतरही त्यांचा वारसा जपला गेला. कोणतेही कर्मकांड न करता अंत्यविधी करण्यात आला. त्यांचा वावर थांबला; पण विचार नाहीत. विचारनिष्ठा हा दुर्मिळ गुण सरांकडे होता. शांतपणे पाहत बसणे त्यांना मंजूर नव्हतं. अनेक चळवळी. आंदोलने त्यांनी केली. त्याठिकाणी पद, प्रतिष्ठा, संपत्ती कशाचा मोह त्यांना रोखू शकला नाही. ‘ज्याने विठ्ठलमात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी,’ हेच त्यांचे सूत्र होते. त्यांचे सामाजिक काम असो वा राजकीय; त्यांनी संस्थेच्या हिताच्या आड येऊ दिले नाही. उलट संस्थाहित जपले. रयत शिक्षण संस्थेला विशिष्ट प्रकारे वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान होते. शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता दोन्ही बाबतीत ते टोकाचे आग्रही होते. ते प्रचंड वाचन करत. त्यावर चिंतन करत. यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व साकारले होते. ते तर्ककठोर होते; पण तरीही बौद्धिक आनंद घेण्याची त्याला जोड होती. सर म्हणजे संघर्ष. दणकट शरीर, पोलादी मन आणि खंबीर विचार यातून त्यांनी घणाघाती स्वरात भाषणे दिली. आवाज मोठा, नेमके, स्पष्ट विचार आणि दुष्ट शक्तीशी लढताना कृतीला बळ देणारी प्रेरणा असल्यामुळे ते विरोधकांना शांत करून सोपे, दैनंदिन जीवनातील दाखले देत आणि श्रोत्यांच्या मनापर्यंत आपले विचार पोेचवत. रयत शिक्षण संस्थेने जी जबाबदारी दिली, ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. प्रकृती आणि वय यामुळे सार्वजनिक जीवनात वावरण्यावर आलेली बंधने मान्य करून त्यांनी स्वतःहून चेअरमनपद सोडले. रयत शिक्षण संस्था म्हणजे त्यांचा श्वास आणि संस्थेसाठी सर म्हणजे आधारवड! त्यांनी ज्येष्ठ नेत्यांसोबत काम केले, तेवढ्याच आपुलकीचे संबंध पुढच्या पिढीतील कार्यकर्त्यांशी जोडले. हे ऋणानुबंध शेवटपर्यंत जपले. अनेक वेळी मीटिंगमध्ये मतभेदाचे क्षण आले. प्रत्येक वेळी अत्यंत कणखरपणे तीव्र शब्दांत, परखडपणे; पण संयमाने भावना व्यक्त केल्या. कधीही अपशब्द उच्चारला नाही. आई-वडील मुलांना सांगतात तशा काही गोष्टी त्यांनी आम्हा ‘रयतसेवकां’ना सांगितल्या. चांगल्या कामाचे तोंडभरून कौतुक केले, वेळोवेळी मार्गदर्शन केले; तसेच चुकल्यास कानउघाडणी केली; अगदी विरोधकांशीही त्यांचे सौहार्दाचे संबंध होते. रयत शिक्षण संस्थेचा इतिहास त्यांच्याशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. त्यांच्या कार्यप्रवण स्मृती सदैव प्रेरणा देत राहतील. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व व कार्यशैलीचा ठसा आमच्या मनात कायम राहील.

संपर्क : 86001 01063


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]