डॉ. शकुंतला थिलस्टेड : ती आई होती म्हणुनी..

डॉ. नितीन अण्णा - 9028078063

आठ मे रोजी इंटरनॅशनल मदर्स डे असतो, यानिमित्ताने एका आईची कहाणी जाणून घेऊया. केवळ सहा महिन्यांचे बाळ घेऊन एक महिला अर्धी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करत बांगलादेशासारख्या मागासलेल्या राष्ट्रात पोचते. मात्र आपल्याच लेकाच्या वयाची कुपोषित बांगलादेशी बालकं पाहून तिचा जीव कळवळतो… ती या कुपोषणाचा प्रतिकार करायचे ठरवते आणि त्यात यश देखील मिळवते. ती आई होती म्हणुनी.. एवढ्या पोटतिडकीने प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकली. एक आई आणि शास्त्रज्ञ अशी दुहेरी भूमिका बजावताना डॉ. शकुंतला थिलस्टेड यांना ‘पालनपोषण’ या शब्दाचा खरा अर्थ समजला.

‘पालनपोषण’ हा शब्द आपण एरव्ही जोडूनच वापरतो. मात्र पालन आणि पोषण यामध्ये खूप अंतर आहे. एकीकडे, सुबत्ता असलेल्या घरात पालकांच्या हौसेखातर, समाधानाखातर बालकांना बळेच खायला घातलं जातं, मात्र त्या अन्नामध्ये पोषण असेलच असं नाही. पिझ्झा, बर्गर, नूडल्स आणि मैदायुक्त पदार्थ खायला घालून घालून हल्लीचे पालक बालकाचं देखील मैद्याचं पोतं करून टाकतात. त्यांचं बाळ वरून गुटगुटीत जरी दिसत असलं, तरी ते कुपोषितच असतं. भविष्यात अनेक आजारांना त्या बालकाला सामोरं जावं लागतं, सुबत्ता हेच अशा घरांमध्ये संकट बनतं. ‘आहे रे’ वर्गाची ही अवस्था.(खरं तर ‘खूपच आहे रे,’ असं या वर्गाचे नामकरण केलं पाहिजे).

दुसरीकडे, ‘नाही रे’ वर्गात अन्नाचं प्रचंड दुर्भिक्ष्य आहे. योग्य सकस, चौरस आहाराअभावी मुलं कुपोषित होतात. यात पालकांचा नाईलाज असतो. उघड्या डोळ्यांनी त्यांना आपल्या पोरांना सुकलेल्या अवस्थेत पाहावं लागतं. रात्रंदिवस काबाडकष्ट करून देखील हाताची आणि तोंडाची गाठ पडायची मुश्किल असते, अशा परिस्थितीत ते तरी काय करणार? ओरिसामध्ये ‘भात-भात’ करून प्राण सोडलेली मुलगी अजून आपल्या विस्मृतीत गेली नसेल. श्रीलंकेत देखील गरिबांच्या तोंडाचा घास वाढलेल्या महागाईने पळवला आहे. जगातील 70 कोटी लोक आजही उपाशी झोपतात, दोन अब्ज म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश व्यक्ती कुपोषित आहेत.

‘माणसा, इथे मी तुझे गीत गावे’ या गीतात महाकवी वामनदादा कर्डक पुढे म्हणतात की, तुझ्या या भुकेचे कोडे उलगडावे. या भुकेविरुद्ध आणि कुपोषणाविरुद्ध लढण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न सुरू आहे आणि या लढ्यात भरीव कामगिरी करणार्‍यांना जागतिक खाद्य पुरस्काराने दरवर्षी गौरवण्यात येतं. मागच्या वर्षी हा पुरस्कार भारतीय वंशाच्या डॉ. शकुंतला थिलस्टेड यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍या त्या केवळ भारतीयच नाही, तर आशियाई वंशाच्या पहिल्या महिला आहेत.

दोन वर्षांपूर्वी भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ रतनलाल यांना हा पुरस्कार मिळाला होता. सलग दुसर्‍या वर्षी भारतीय वंशाच्या व्यक्तीने छाप उमटवल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे. पंचवीस लाख डॉलर्स एवढी रक्कम पुरस्कार म्हणून देण्यात येते. आजवर हरितक्रांतीचे प्रणेते स्वामीनाथन, धवलक्रांतीचे प्रणेते वर्गिस कुरियन यांसारख्या दिग्गजांसोबतच इतर सहा भारतीय शास्त्रज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र शकुंतला या पहिल्या महिला म्हणून त्यांचं विशेष कौतुक!

19 व्या शतकात ब्रिटिश आमदनीमध्ये कॅरेबियन बेटांवर उसाची लागवड करण्यात आली. त्यासाठी स्वस्त आणि अनुभवी मजूर म्हणून भारतीय लोकांना नेण्यात आलं. डॉ. शकुंतलांचे पूर्वज असेच तिकडं विस्थापित झालेले. त्रिनिनादमधील सॅन फर्नांडो या शहराजवळील एका छोट्या गावात या विस्थापित लोकांची वस्ती वसली आहे. या गावात 29 ऑक्टोबर, 1949 रोजी शकूचा जन्म झाला. शकूच्या घरात चार पिढ्या एकत्र नांदत होत्या. मात्र घरातील कारभारी आजी होती. किचन तिच्या ताब्यात. कोणतीही गोष्ट अधिक रुचकर, अधिक पोषक कशी बनवायची, यात आजीबाईंचा हातखंडा होता. घरातील पोरींना ‘स्वयंपाक-पाणी शिका गो,’साठी तिचा लकडा असायचा. शकू आजीची लाडकी. आजी सांगायला आणि शकू शिकायला. मस्त जोडी जमली होती

आजोबांचं दुकान होतं आणि आई पोस्ट खात्याचे स्थानिक पातळीवरील काम सांभाळत असे. आजोबा आणि आईच्या कामात छोट्या शकूची मदत-कम-लुडबूड सुरू असायची. दहाव्या वर्षी शकूचं स्थानिक कन्याशाळेत विद्यालयीन शिक्षण सुरू झालं. नंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का देत तिने बी. एस्सी.मध्ये शेती विषय निवडला. एका स्त्रीने कृषी विषय घ्यावा हे नवलच होतं. या क्षेत्रामध्ये तिला अजिबात स्पर्धा नव्हती. कारण तिच्यासोबत कोणी पोरी नव्हत्या; किंबहुना नंतर नोकरी लागल्यावर देखील तिथल्या कृषी मंत्रालयाची ती एकमेव महिला कर्मचारी होती.

जागतिक बँकेने प्रायोजित केलेल्या प्रकल्पात ती काम करत होती. तिथेच तिला फिन थिलस्टेड हा आयुष्याचा जोडीदार मिळाला. ‘फिन’ शब्द तिला चांगलाच भावलेला दिसतोय.. कारण नंतर तिने संपूर्ण आयुष्य ‘फिन’वाल्या जीवांसोबत (मासा हो) काढलं. फिन डेन्मार्कचा रहिवासी असल्यामुळे आता शकुंतला डेन्मार्क आणि त्रिनिनाद टॅबॅगो या दोन देशांची नागरिक झाली. कुटुंब डेन्मार्कमध्ये स्थायिक झालं. फिन शकुंतलाच्या संसारात दोन मुलांची भर पडली. नवर्‍याची नोकरी परराष्ट्रीय मंत्रालयात. त्यामुळे शकुंतलाचं जगभर फिरणं झालं. फिनने नेपाळ, बांगला देश आणि केनियामध्ये राजदूत म्हणून काम पाहिलं आहे.

डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठामध्ये शकुंतलाचं पीएच. डी.साठी संशोधन सुरू झालं. शरीरशास्त्र आणि पोषण हा विषय तिने संशोधनासाठी निवडला होता. 1980 मध्ये पीएच. डी. प्राप्त करून पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी डॉ. शकुंतला आफ्रिकेत टांझानिया इथं गेल्या. एक वर्ष तिथं संशोधन केलं आणि पुन्हा डेन्मार्कला परतून सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन सुरू केलं. पुढे, 1991 ते 2010 या काळात देखील त्यांनी तिथेच प्राध्यापकी केली. 1987 ते 1991 या काळात त्या आंतरराष्ट्रीय अतिसार नियंत्रण संस्थेच्या पोषणतज्ज्ञ म्हणून बांगलादेशमध्ये होत्या, हा कालावधी त्यांच्या आयुष्याला नाट्यमय वळण देणारा होता.

1987 साली जेव्हा त्या बांगलादेशमध्ये गेल्या होत्या, तेव्हा त्यांचा छोटा मुलगा केवळ सहा महिन्यांचा होता. तिथं आसपास त्यांच्या मुलाच्या वयाची कुपोषित बालकं आणि त्यांच्या कुपोषित माता पाहून त्यांचं मन कळवळून उठलं. या कुपोषणावर मात कशी करावी, यासाठी त्यांनी संशोधन आणि सर्वेक्षण सुरू केलं. खरं तर मासा हा बंगाली प्रांतामधील प्रमुख अन्नघटक. जो भात-मासा खातो तोच खरा बंगाली, अशी म्हण देखील तिकडं प्रचलित आहे. मात्र तरीही कुपोषणाची अशी अवस्था का? आणि त्यावर कशी मात करता येईल, यावर विचारमंथन सुरू झालं आणि उत्तर सापडलं.

आजही मांसाहार (मांसाहार वेगळा आणि ‘मासाहार’ वेगळा बरं का) म्हटलं की सुरमई, पापलेट (शहरातील उच्चभ्रू लोक त्याला उगाच ‘प्रॉम्फेट’ म्हणत असतात) किंवा गोड्या पाण्यामध्ये मिळणारा रोहू, (कटला) वाम यांचं जास्त कौतुक केलं जातं. बाजारात त्यांना चांगला भाव मिळतो. मात्र भिंग, काटी, पडवा यांसारख्या स्वस्तामध्ये मिळणार्‍या माशांकडे दुर्लक्ष केलं जातं; किंबहुना मत्स्यशेती करताना या माशांची वाढ आपल्या तळ्यात होऊ नये, यासाठी रसायनांचा देखील वापर केला जातो. डॉ. शकुंतला यांनी या माशांकडे आपलं लक्ष वळवलं आणि त्यावर अधिक संशोधन केलं.

स्थानिक प्रश्नांचं उत्तर स्थानिक नैसर्गिक संसाधनातच शोधायचं असतं. जसं डॉ. कमला सोहनी यांनी महाराष्ट्रातील आदिवासींच्या कुपोषणावर मात करण्यासाठी निरा आणि सुकडीचा उपाय सुचवला होता. बांगलादेशात जो तांदूळ वापरला जातो, त्यामध्ये कर्बोदकांचंच प्रमाण अधिक होतं, मात्र त्यामुळे खनिजं, प्रथिनं आणि सूक्ष्म जीवनसत्वं, मेदाम्लं यांकडं दुर्लक्ष होतं. छोट्या मासळीमध्ये ही सर्व पोषकतत्त्वे विपुल असल्याचं त्यांना आढळून आलं. मोठ्या मासळीमध्येच जास्त जीवनसत्व असतात, असंच तोवर समजलं जायचं. मात्र आता नवी माहिती समोर आली होती.

आता गरज होती ती प्रबोधनाची आणि शासनाची मदत घेण्याची. निवृत्तीनंतर म्हणजे 2010 नंतर डॉ. शकुंतला यांनी वर्ल्डफिश संस्थेमध्ये काम करणं सुरू केलं. भारतीय शास्त्रज्ञ मोडाडूगु विजय गुप्ता यांनी गोड्या पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये मत्स्यशेती कशी करता येते, याचं आदर्श उदाहरण घालून दिलं होतं. यासाठी त्यांना 2005 मध्ये जागतिक खाद्य पुरस्कार मिळाला होता. त्यांचं मॉडेल बांगलादेशमध्ये गावोगावी पोचवण्याचं काम डॉ. शकुंतला यांनी हाती घेतलं. याशिवाय मासेमारी करताना; तसेच विपणन व्यवस्थेमध्ये अधिक शास्त्रीय दृष्टिकोन कसा राबवता येईल, याची काळजी त्यांनी घेतली. घरामागील परसात छोटी डबकी बनवून त्यात देखील मत्स्यपालन सुरू झालं. त्यांच्या पुढाकाराने बांगलादेशात 40 लाखपेक्षा जास्त शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती सुरू झाली आहे.

मात्र अतिरिक्त मासळी उत्पादनाचं करायचं काय? इथं त्यांना त्यांची आजी आठवली. आजीबाईने शिकवलेली युक्ती उपयोगात आली. लहानपणापासून त्यांनी आजीबाईला विविध प्रकारची लोणची आणि चटण्या करताना पाहिलं होतं. त्या तंत्राचा वापर करून छोट्या मासळीची चटणी आणि पावडर करण्याचं काम सुरू झालं. आता या नाशवंत मालाची आयुर्मर्यादा वाढणार होती. या अन्नप्रक्रियेचं प्रशिक्षण खेडोपाडीच्या महिलांना देण्यात आलं. अगदी सोप्या प्रकारे मासेमारी करता येईल, अशी जाळी त्यांनी विकसित केली. तसेच शासनाकडे मागणी करून शेततळ्यांमध्ये रसायनं वापरायला बंदी घालण्याचा कायदा 2004 मध्ये मंजूर करून घेतला.

डॉ. शकुंतला यांनी 1000 दिवसाचा जो सिद्धांत मांडला आहे, तो सर्वांनी समजून घेण्याचा विषय आहे. समजून घ्या आणि इतरांना समजून सांगा. यावर त्यांचे ‘यू ट्यूब’वर व्हिडीओ देखील आहेत. लहान मुलांची वाढ होताना पहिल्या 1000 दिवसांमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्त्वं मिळाली, तर त्याच्या बुद्धीची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते, हे डॉ. शकुंतला यांनी त्यांच्या संशोधनातून दाखवून दिलं. बाळाचं योग्य पोषण होण्यासाठी गर्भवती आणि स्तनदा मातांना अधिकाधिक छोटी मासळी खाण्याची गरज असल्याचं त्यांनी सिद्ध केलं.

छोट्या मासळीवर प्रक्रिया करण्याचे कुटिरोद्योग सुरू झाले. भातशेतीमधील मत्स्यशेती गरिबांचा आधार होऊ लागली. छोट्या मासळीचं उत्पादन आणि सेवन याचं प्रमाण पाचपट वाढलं. त्यांनी हाच पॅटर्न कंबोडिया या देशामध्ये देखील यशस्वीपणे वापरून दाखवला. बांगलादेश असो किंवा कंबोडिया; त्यांनी सुरू केलेल्या प्रयोगांना चळवळीचे रूप आले, एक-एक करून अनेक साथी या प्रयोगात सहभागी होत गेले आणि एक मोठं जाळं तयार झालं. यातच त्यांच्या यशाचं रहस्य सामावलं आहे.

2000 या वर्षाच्या तुलनेत 2018 मध्ये जागतिक भूक निर्देशांकानुसार बांगलादेशमध्ये भूकबळीचे प्रमाण भरपूर कमी झालं आहे. लक्षात घ्या.. याच काळात आपल्याकडे सरकारने छठउ, उअअ यांसारख्या बिनकामाच्या लफड्यात जनतेला अडकवून ठेवलं; आणि याच काळात बांगलादेशने अर्थव्यवस्थेमधील बारीकसारीक बाबींवर लक्ष दिलं. आज त्यांच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकलं आहे. त्यांच्या देशात दारिद्य्ररेषेखालील लोकांचं प्रमाण 34.8 वरून 14.8 एवढं कमी झालं आहे आणि आपल्याकडे दारिद्य्ररेषेखालील लोकांचे प्रमाण वाढत आहे. अर्थात अशा परिस्थितीत देखील आपल्या भक्तांसाठी मंदिर आणि प्रधान सेवकाची इच्छा म्हणून ‘सेंट्रल विस्टा’ बनवले जात आहे.

डॉ. शकुंतला यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने इतर घटकांमध्ये देखील चांगलं योगदान दिलं आहे. अधिक लोहयुक्त तांदळाच्या वाणावर; तसेच अधिक जीवनसत्वयुक्त बटाट्यावर देखील संशोधन केलं आहे. त्यांच्याकडून भविष्यात अधिक संशोधनाची अपेक्षा आहे. आज जरी त्या 70+ असल्या तरी विशीच्या तरुणीला लाजवेल, एवढी ऊर्जा आणि उत्साह त्यांच्याकडे आहे. (आणि त्या 40+ देखील वाटत नाहीत.) जीवनभर योग्य पोषक आहार घेतल्यामुळे त्यांना त्यांचा फिटनेस मेन्टेन करता आला असावा. शास्त्रज्ञ पुरुष असेल तर तो विज्ञानाची सेवा करतोच; पण महिला शास्त्रज्ञ असेल तर त्या ज्ञानाला, विज्ञानाला करुणेचे आणि ममतेचे पंख फुटतात. डॉ. शकुंतलाचे बाळ सहा महिन्याचे होते, म्हणून. त्यांना कुपोषित बालकांची व्यथा तीव्रतेने भेडसावली असावी. ती आई होती म्हणुनी.

आजही संशोधनात महिलांचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा अधिक नाही, यावर डॉ. शकुंतला खंत व्यक्त करतात. महिला शास्त्रज्ञांची संख्या वाढली पाहिजे आणि आगामी काळात नक्की वाढणार आहे. आपण सारे त्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

जय विज्ञान, जय समता

लेखक संपर्क ः 90280 78063


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]