मार्टिन जॉन यांच्या चार लघुकथा

-

॥ असहिष्णुता ॥

‘जो ईश्वरीय सत्तेवर श्रद्धा ठेवत त्याचा अंगीकार करतो, त्याच्या जीवनात सदैव संतुलन राहते.’

त्याच्या समोरच्या बर्थवर ऐसपैस बसलेले एक स्वामीजी सोबत प्रवास करत असलेल्या चार-पाच शिष्यांना प्रवचनाचे ‘बोधामृत’ पाजत होते.

दिवसाची वेळ होती.

कंपार्टमेंटमध्ये काही अन्य प्रवासीदेखील त्यांच्या प्रवचनाचा ‘लाभ’ घेण्यासाठी जमले होते.

खूप वेळापासून धावत्या ट्रेनच्या खिडकीकडे तोंड फिरवून तो स्वामीजीला सहन करीत होता. स्वामीजीचं आपलं सुरूच होतं-

‘जे आस्तिक असतात, त्यांच्यात आपोआपच उच्च मानवी गुणांचा समावेश होत असतो,

जसे औदार्य, सहिष्णुता…’

‘मान्यवर, मी कट्टर नास्तिक आहे.’ स्वामीजीचं बोलणं संपायच्या आतच त्याने नम्रपणे हस्तक्षेप केला.

सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं.

या आगंतुक हस्तक्षेपाला स्वामीजी मुळीच राजी दिसले नाहीत.

तात्काळ त्यांच्या भुवया ताणल्या गेल्या.

त्यांनी त्याला शुष्क आणि तीक्ष्ण नजरेने न्याहाळले.

‘मग?…आपलं म्हणणं काय आहे?’ स्वरातून कोरडेपणा झळकत होता.

‘आपण स्वतःला दैववादी, धार्मिक आणि आस्तिक मानता ना?’

‘नक्कीच!…..पण तुझ्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट होताना दिसत नाही.’

स्वरात शक्य तितकी विनम्रता आणत तो बोलत राहिला,

‘मान्यवर, आपण सगळे आस्तिक असतानाही मी सिद्ध करेन की औदार्य, सहिष्णुता यासारखी गोष्ट आपल्यात अजिबात विद्यमान नाही; पण माझ्यात त्या आहेत.’ त्याच्या ओठांवर अर्थपूर्ण हास्य विलसत होतं.

वादळाच्या गतीनं धावत असलेल्या ट्रेनच्या कंपाटर्र्मेंटमध्ये जणूकाही स्फोटच झाला होता.

स्वामीजींचं कपाळ आखडलं.

शिष्यगणांच्या मुठी आवळल्या गेल्या. सगळे सहप्रवासी हतप्रभ…

आस्तिकांना खुले आव्हान? बाप रे!!

‘काय..पण काय बोलतो आहेस, मूर्खा?’

स्वामीजींच्या श्वासांचा वेग वाढत चालला होता.

‘मूर्खासारखे तर तुम्ही बडबडत आहात मान्यवर. कारण तुम्ही अव्वल दर्जाचे ढोंगी आणि थोतांडी आहात.’

शिष्यांच्या नावाखाली तुम्ही मेंढरं पाळलेली आहेत!

‘गप्प बस वेडपटा!…नाहीतर…’

‘नाहीतर काय?’

शांतचित्ताने आणि अत्यंत संयमी स्वरात तो बोलण्यातून गोळ्या झाडत राहिला, ‘काय कराल तुम्ही?’

…तुमच्यासारख्या बहुरुप्याजवळ ना आत्मबल असते ना शारिरिक बळ; फक्त लोकांना मूर्ख बनविण्याची किळसवाणी कला येते तुम्हा सर्वांना. खोटारड्या धार्मिकपणाचे आणि आस्तिकपणाचे सोंग घेऊन अंधभक्तांचा ‘माल’ चरणारे महाधूर्त, लंपटखोर…’

‘गप्प…बस कुत्तरड्या!’

प्रचंड संतापाच्या आगीने पेटलेल्या स्वामीजीच्या विचित्र किंचाळण्याने संपूर्ण कंपार्टमेंट हादरले.

सीमेचे अतिक्रमण झाले होते. स्वामीजी झटकन उठून उभे राहिले. फट्! स्वामीजीचा पूर्ण हात त्याच्या गालावर आदळला.

शिष्यगण याचीच तर वाट बघत होते. अश्लील शिव्यांची लाखोली वाहत त्याबरोबरच बुक्क्या-लाथांची जोरदार बरसात होत होती. तो अजिबात प्रतिकार वा विरोध न करता शाब्दिक आणि शारीरिक प्रहार सहन करत राहिला; परिणामी तो जवळजवळ बेशुद्धच होत गेला. ओठांच्या दोन्ही भागातून रक्त टपकायला लागलं.

काही भल्या प्रवाशांच्या मध्यस्थीने आणि रेल्वे पोलीस कर्मचार्‍यांच्या हस्तक्षेपाने मारहाण कशीबशी थांबली. त्याचे घायाळ शरीर स्वामीजी आणि त्याच्या शिष्यांच्या दांडगाईचा; तसेच मस्तीचा पक्का पुरावा होता. मग रेल्वे पोलिसांकडून कायदेशीर कारवाईची प्राथमिक तयारी सुरू झाली. या दरम्यान कण्हत-कण्हत तो स्वामीजीच्या समोर आला,

‘मान्यवर, मी सिद्ध केलं ना?’

स्वामीजीला वाटलं जणूकाही सारे ठोसे, बुक्क्या, चापटा परतून त्यांच्या गालावर पडताहेत,

जखमी होण्याची पाळी आता त्यांची होती!

॥ धार्मिक कुरापत ॥

एका जवळच्या मित्राकडून खात्रीचा निरोप मिळाल्याने आपल्या लेकीच्या सोयरिकीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला स्मरत तो घरातून बाहेर पडणार इतक्यात, त्याच्या सेल फोनमधील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ची ट्यून वाजली. त्यामुळे साहजिकच त्याचे लक्ष तिकडे वेधले गेले. ‘व्हॉटसअ‍ॅप’चा नवीन मेसेज उघडून पाहिला तर त्यात इंग्रजीत लिहिलेले होते –

‘जिझस विल कम अ‍ॅट युवर होम, बी रेडी फॉर हिज वेलकम.’

या वाक्याला दहावेळा रिपिट केले होते आणि शेवटी सल्लावजा सूचना देण्यात आली होती की –

“..जर आजच कुणाला एखादी खूषखबर ऐकण्याची इच्छा असेल तर या मेसेजला दहा मिनिटांच्या आत दहाजणांकडे ‘फॉरवर्ड’ करावे.”

मेसेज वाचल्याबरोबर त्याला पत्रांचा काळ आठवला.

जवळजवळ पंचवीस वर्षांपूर्वी काहीशा अशाच ओळींचा मजकूर असलेले पोस्टकार्ड त्याला मिळाले होते. शुभवार्ता ऐकायला मिळण्यासाठी तसाच मजकूर लिहिलेली वीस पोस्टकार्डे वीसजणांपर्यंत पोचविण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळी त्याचे धर्मभिरू मन त्या पोस्टकार्डाकडे दुर्लक्ष करू शकले नव्हते.

वीस लोकांना त्याने लगोलग वीस पोस्टकार्डे पाठविली होती. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर कुठलीही सुवार्ता तर मिळाली नव्हतीच; उलट त्याच्या थोरल्या भावाची निधनवार्ता मात्र कानावर पडली होती.

तो मुलींचा बाप होता. शुभकामासाठी घराबाहेर पडणार होता. अडीच दशकांपूर्वीच्या कटु अनुभवातून गेल्यानंतरदेखील तो ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील मेसेजकडे कानाडोळा नाही करू शकला. लगेच त्याने तो मेसेज दहाजणांना ‘फॉरवर्ड’ केला आणि रेल्वे स्टेशनकडे निघाला.

10.40 ची लोकल गाठून तो अपेक्षित स्थळी पोेचलादेखील. आपल्या काळजीत असलेल्या पत्नीला व्यवस्थित पोेचल्याचा निरोप द्यावा, म्हणून सेलफोन काढण्यासाठी त्याने आपल्या खिशात हात घातला, तर तो अक्षरशः उडालाच!

खिशातून मोबाईल गायब झाला होता, दुसरा खिसाही घाईघाईने चाचपून पाहिला तर काय??

….पैशाचं पाकीटसुद्धा गायब!!

॥ बेघर ॥

वादळ-वार्‍याचा भयानक काळ संपल्यानंतर दिसून आले की, पक्की घरं, इमारती आहे तशा उभ्या होत्या विजयी मुद्रेमध्ये; परंतु परिसरातील कच्ची घरं, झोपड्या नैसर्गिक संकटातून स्वतःला वाचवू शकल्या नव्हत्या, उद्ध्वस्त झाल्या होत्या.

आता बेघर लोकांपुढे घराच्या छताचा विक्राळ प्रश्न आऽऽ वासून उभा होता.

जोपर्यंत काहीतरी पक्की व्यवस्था होत नव्हती, तोपर्यंत त्यांच्यापुढे मोकळ्या आकाशाखाली मुक्काम करण्यावाचून पर्याय नव्हता.

दुर्दैवाने त्या भागातले एकमेव मंदिर आणि मशीददेखील निसर्गाच्या प्रकोपाची शिकार ठरली होती.

मंदिर आणि मशिदीची झालेली वाईट अवस्था, पडझड येथील खात्या-पित्या रहिवाशांची चिंता वाढवत होती. मंदिरातील घंटानाद आणि मशिदीतली ‘अजान’ ऐकण्यासाठी कान आतुरले होते. म्हणून दोन्ही धार्मिक समूहांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. बैठकीत मंदिर आणि मशीद यांच्या दुरुस्तीची योजना ठरली.

काय करणार, इष्टदेवताच रूष्ट झाल्या होत्या. त्यांच्या निवार्‍याच्या दुरुस्ती-डागडुजीचा विषय होता, म्हणून या पुण्यकार्यासाठी लोकांनी भरभरून देणगीरुपी दान दिले.

परिणामी लवकरच सर्वव्यापी परमेश्वरांसाठी घरे बनून तयार झाली.

….तेथील बेघर जनता मात्र पक्क्या घरांच्या अपेक्षेने अजूनही खुल्या आकाशाखाली राहण्यास लाचार होती.

॥ पहारेकरी ॥

‘त्या’ नव्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मधोमध परस्परात अडकवलेल्या लिंबू आणि मिरच्या एका प्लास्टिकच्या एका दोर्‍याच्या आधारे हेलकावे खात होत्या. दरवाजाच्या दोन्ही बाजूला ‘शुभ-लाभ’सुद्धा रेखाटलेले होते. आपत्तीने त्यांच्यावर उडत-उडत नजर टाकली आणि घराच्या आत प्रवेशकरती झाली. काही वेळांतच तिथे एकच हल्लकल्लोळ माजला. आपल्या करणीचा प्रताप पाहून विजयी मुद्रेत आपत्ती आता शेजारच्या घरासमोर येऊन उभी राहिली. तिथे ना लिंबू-मिरची होती किंवा ‘शुभ-लाभ’ची रंगरंगोटी!

ती बेधडक घराच्या आत आली. परंतु दुसर्‍याच क्षणी

पडत, धडपडत तेथून तिची पळता भुई थोडी झाली आणि ती दिसेनाशी झाली!

आता… ‘त्या’ प्रवेशद्वारावर उभी असलेली हिंमत हसत होती.

मूळ हिंदी लघुकथा – मार्टिन जॉन

दूरभाष – 9800940477

मराठी अनुवाद : भरत यादव, सोलापूर

दूरभाष – 9890140500


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]