पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञा बदलण्याची गरज?

नरेंद्र लांजेवार - 9422180451

पालक म्हणून आपण आपल्या मुलांची पाठ्यपुस्तकं बर्‍याचदा वाचत असतो. मुलांच्या पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर भारतीय संविधानाची उद्देशिका, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा प्रकाशित केलेली आहे. राष्ट्रगीत आणि भारतीय संविधानाची रचना कोणी केली, हे आपणापैकी अनेकांना माहीत असते. परंतु प्रतिज्ञा कोणी लिहिली, याचा उल्लेख कुठेच दिसत नाही. राष्ट्रीय भावना जागृत करणार्‍या या प्रतिज्ञेबाबतची अनभिज्ञता सर्वांसाठीच घातक आहे. या प्रतिज्ञेचा रचियता कोण आहे, याबाबत मी केलेल्या शोध मोहिमेचा वृत्तांत अतिशय मजेशीर आहे….

देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एकसमान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली आहे. अनेक वर्षांपासून आपण नित्याचा परिपाठ म्हणून शाळा भरताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली गेली? ती केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली, याची माहिती जवळपास कोणालाच दिसत नाही. मी पण ही प्रतिज्ञा शालेय जीवनापासून म्हणत आलो आहे. बालवयात पाठ्यपुस्तकातील एखादा धडा किंवा कविता वाचली की, त्या पाठाखाली किंवा धड्याखाली त्या-त्या लेखकाचे, कवीचे नाव दिलेले असते. मला बालपणापासून हा प्रश्न पडला होता की, आमची ही प्रतिज्ञा कोणी लिहिली असेल? मला शिकविणार्‍या प्रत्येक वर्गातील शिक्षकास मी हा प्रश्न विचारीत असे. मला कोणीच उत्तर दिले नाही. पुढे मी बर्‍याच शिक्षणाधिकार्‍यांना, अनेक विद्वानांना, पाठ्यपुस्तक मंडळातील तज्ज्ञांना, शिक्षणमंत्री, साहित्यिक, लेखक, अ. भा. मराठी साहित्य महामंडळावरील सदस्यांना, तसेच जवळपास प्रत्येक शिक्षणतज्ज्ञाला या प्रश्नाचे उत्तर विचारले. सर्वांनीच नकारघंटा दिली. काहींनी कदाचित साने गुरुजींनी लिहिली असावी, तर काहींनी यदुनाथ थत्ते यांची असावी असे सांगितले. समग्र सानेगुरुजी वाचल्यावरही कुठेही संदर्भ लागत नव्हता. यदुनाथ थत्तेंनी या प्रतिज्ञेच्या आठ वाक्यांचा सविस्तर अर्थ विषद करणारे ‘प्रतिज्ञा’ नावाचे पुस्तकच लिहिले आहे. या पुस्तकातही या प्रतिज्ञेच्या लेखकाचा कुठे उल्लेख आढळत नाही.(मी स्वतः यदुनाथ थत्ते यांना 1995 मध्ये शालेय प्रतिज्ञा कोणी लिहिली आहे, हे विचारले होते.) पाठ्यपुस्तक मंडळातील काही व्यक्तींनी सुचविले की, ती केव्हापासून पाठ्यपुस्तकात आली, याचा आमच्याकडे संदर्भच नाही. त्यामुळे ती कदाचित पाठ्यपुस्तक मंडळानेच कधीतरी मनात आले म्हणून तयार करून छापली असेल व पुढे तिचा हिंदी व इंग्रजी भाषेतही अनुवाद झाला असेल!

परंतु असे नाही. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत…’ ही प्रतिज्ञा भारतीय पातळीवर प्रत्येक राज्याच्या राजभाषेत भाषांतरित झालेली आहे. भारतात लिपी असणार्‍या सर्व भाषांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये ती दिसते. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून मी या प्रश्नाचा शोध घेत होतो आणि शेवटी एकदाचा त्याच्या उगमापर्यंत पोेचलो!

आपल्या देशाला जसे राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगान आहे, जसा अधिकृत ध्वज आहे, घोषवाक्य आहे, राष्ट्रीय प्राणी, पक्षी, झाड, फूल, फळ, खेळ आहेत, तशीच राष्ट्रीय प्रतिज्ञा आहे. या प्रतिज्ञेला राष्ट्रीय मानाचे वलय आहे. राष्ट्रगीताला जो मान आहे, तोच सन्मान या प्रतिज्ञेला देण्यात आलेला आहे. आपण रोजच ती म्हणतो, म्हणून कदाचित तिच्याबाबत आपल्या मनात विशेष कुतूहल नसावे, असे अनेकांच्या बाबतीत होत आले आहे.

आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी मुळात 1962 मध्ये तेलुगू भाषेत ही प्रतिज्ञा लिहिली होती. परंतु त्यांचा नामोल्लेखही कुठे प्रतिज्ञेच्या बाबत पाठ्यपुस्तकात आढळत नाही, याची खंत वाटते. आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावचे ते राहणारे होते. संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले होते. तसे ते नॅचरोपॅथीचेही तज्ज्ञ म्हणून परिचित होते. ते विशाखापट्टणम् या जिल्ह्याचे अनेक वर्षे जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची ‘कालाभरवाहू’ नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली होती. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतले कवी पेडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून एक प्रतिज्ञा भारत-चीन युध्दाच्या काळात – 1962 मध्ये – लिहिली. मुलांमध्ये ‘सारे भारतीय एक आहेत’ हा विचार रूजविण्यासाठी त्यांच्या एका शिक्षण खात्यातील मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्र प्रदेशच्या तत्कालीन शिक्षणमंत्री पी.व्ही. जी. राजू यांच्याकडे ही प्रतिज्ञा दाखविली. शिक्षणमंत्र्यांनी ही प्रतिज्ञा शाळाशाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला.

केंद्र सरकारच्या नेतृत्वात मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत देशातील शिक्षण खात्याचे कार्य चालत असे. या खात्याच्यावतीने शिक्षणामध्ये सातत्याने नवनव्या सुधारणा सुचविल्या जातात. यासाठी डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष केंद्रीय शिक्षणमंत्री असतात. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची 31 वी बैठक तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री एम. सी. छागला यांच्या अध्यक्षतेखाली 11 आणि 12 ऑक्टोबर 1964 ला बेंगलोर या ठिक़ाणी झाली होती. या बैठकीच्या वृत्तांतामध्ये (डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया – ए हिस्टॉरिकल सर्व्हेऑफ एज्युकेशन डाक्युमेंट बिफोर अ‍ॅ्ण्ड आफ्टर इंडिपिन्ट – या पुस्तकाच्या पान 140 वर) मुद्दा क्र. 18 मध्ये उल्लेख आढळतो की, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित राहण्यासाठी भावनिक समितीच्या शिफारशीनुसार शाळा-महाविद्यालयांमध्ये; तसेच राष्ट्रीय दिवसांच्या शुभपर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याकरिता पेडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली ‘भारत माझा देश आहे…’ ही प्रतिज्ञा देशपातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला व पुढे असेही सूचित करण्यात आले की, ही प्रतिज्ञा देशपातळीवर 26 जानेवारी, 1965 पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचे देशपातळीवर विविध भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आणि 1965 पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देशपातळीवर देण्यात आला आहे.

पेडेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा भारत-चीन युध्दाच्या पार्श्वभूमीवर देशाबद्दल बाल वयातच राष्ट्रीय भावना वाढीस लागावी म्हणून 1962 मध्ये प्रथम तेलुगू भाषेत लिहिली होती. 26 जानेवारी, 2022 ला या प्रतिज्ञेचे हीरकमहोत्सवी वर्ष सुरू होईल.

गेल्या साठ वर्षांपासून ही प्रतिज्ञा शाळा शाळांमध्ये घेतल्या जाते. परंतु काळानुरूप त्यात बदल करण्यात यावेत, याचा विचार कोणीच करत नाही.

प्रतिज्ञेचा जो आशय आहे, जे विचार आहेत, त्याला विरोध नाही. पण त्यासोबतच काळानुरूप विवेकवादी, विज्ञानवादी, समतावादी, एकात्म समाज घडविण्याचा वस्तुपाठ दर्शविणार्‍या धर्मनिरपेक्ष, स्त्री-पुरुष समानता, जैवविविधता, भारतीय घटनेचा आदर, पर्यावरणाचे रक्षण आणि सर्व क्षेत्रात लोकशाही जीवनमूल्ये स्वीकारण्याची हमी देणारी नवी प्रतिज्ञा हवी. आपल्या देशातील शिक्षणतज्ज्ञांनी आणि विवेकी विचारांच्या व्यक्तींनी बदलत्या काळाला अनुरूप अशी शालेय प्रतिज्ञा बदलून त्यात आता नवा आशय आणण्याचा आग्रह धरला पाहिजे. कारण ती काळाची गरज आहे…

लेखक संपर्क : 94221 80451


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]