डॅनियल मस्करणीस -
‘अंनिस’ने आयोजित केलेल्या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित ‘ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा, त्यांचे निर्मूलन आणि विवेक’ या विषयावर वसई येथील आय. टी. इंजिनिअर आणि ख्रिस्ती धर्माचे अभ्यासक डॅनियल मस्करणीस यांचे ऑनलाईन व्याख्यान नुकतेच आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रभरातील ‘अंनिस’चे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभलेल्या या व्याख्यानाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीवर ‘अंनिस’ फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांच्या विरोधात काम करते. तसेच ‘अंनिस’ला चर्चकडून निधी पुरविला जातो, असे आरोप केले जातात. पण हे आरोप निखालस खोटे आहेत. ‘अंनिस’ सर्वच धर्मांतील अंधश्रद्धांच्या विरोधी आवाज उठवते.
डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी ठाणे जिल्ह्यातील वसई येथे केलेल्या भाषणातून प्रेरणा घेत डॅनियल मस्करणीस, फ्रान्सिस अल्मेडा, उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील व ‘अंनिस’ वार्तापत्रावरील खटले उच्च न्यायालयात विनामोबदला लढविणारे अॅड. अतुल अल्मेडा यांनी प्रामुख्याने ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांविरोधात संघर्ष करणार्या ‘विवेक मंच’ची स्थापना केली व माणूस मारला तरी विचार मरत नाहीत, या विचारांतून हा मंच डॉ. दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतरही कार्यरत राहिला. या सार्या प्रक्रियेत अग्रभागी असलेल्या डॅनियल मस्करणीस या तरुणाने या प्रक्रियेबद्दल साधना साप्ताहिकात लेखमाला लिहिली व त्याचे ‘मंच’ नावाचे पुस्तकही ‘साधना’ने प्रकाशित केले.
डॅनियल मस्करणीस यांनी त्यांच्या व्याख्यानाच्या सुरुवातीला ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धांचे स्वरूप समजावून देण्याआधी त्या धर्माचा उगम, प्रसार, अंतर्गत मतभेद व त्यातून निर्माण झालेले पंथ यांचा संक्षिप्त इतिहास सांगितला. धर्माचे मूळ विचार व चर्चचे आचार यांत वेळोवेळी उद्भवलेल्या विसंगती व संघर्ष त्यांनी नमूद केला व हीच विसंगती ख्रिस्ती धर्मातील अंधश्रद्धा व कर्मकांडे यांना कारणीभूत ठरल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी सांगितलेले एक उदाहरण म्हणजे चर्चसाठी निधी गोळा करण्यासाठी पंधराव्या शतकात धर्मगुरूंनी ख्रिस्ती जनतेला पापातून मुक्त झाल्याची प्रमाणपत्रे म्हणजेच ‘मुक्तिपत्रे’ विकायला सुरुवात केली होती. जर्मनीतील मार्टिन ल्युथर या धर्मगुरूने याविरुद्ध केलेल्या बंडखोरीतून ‘प्रोटेस्टंट’ पंथाचा जन्म झाला.
‘विवेक मंच’च्या कामाबद्दल माहिती देताना डॅनियल यांनी सांगितले, “आम्ही येशूच्या नावावर हितसंबंधी व्यक्ती सांगत असलेल्या चमत्कारांच्या विरोधात स्थानिकांच्यात प्रबोधन सुरू केले. व्हर्जिन मातेच्या पोटी येशूचा जन्म झाला, यांसारख्या विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणार्या कल्पनांची आपल्याला गरज नसून येशूच्या मातेचे मोठेपण हे तिच्याशी जोडलेल्या चमत्कारांत नाही, तर येशूला स्वतःच्या मनाचा कौल स्वीकारण्यासाठी तिने जो खंबीर पाठिंबा दिला त्याच्यात आहे, असा संवाद साधणार्या कार्यक्रमांचे आयोजन केले व करत आहोत.”
ख्रिस्ती धर्मातील धर्मगुरूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांचा उल्लेख करून डॅनियल मस्करणीस म्हणाले, “लहान मुले किंवा स्त्रिया यांच्यावर होणारे अत्याचार अत्यंत निंदनीय असून, ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथॉलिक पंथातील धर्मगुरूंना अविवाहित राहावे लागण्यासारख्या कालबाह्य रूढी या प्रकारच्या शोषणाची शक्यता वाढवतात. ख्रिस्ती धर्मातील ‘प्रोटेस्टंट’सारख्या पंथामध्ये धर्मगुरूला अविवाहित राहणे सक्तीचे नाही. अकराव्या शतकानंतर सुरू झालेली ही प्रथा रोमन कॅथलिक चर्चनेदेखील आता बंद केली पाहिजे.
चिलीतील चर्चमधील बलाढ्य धर्मगुरूंनी केलेल्या बाललैंगिक शोषणाविरोधात यशस्वी लढा देणारा वूहान क्रुझ आणि कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी चर्चमधील प्रार्थना थांबविण्यासाठी जनहित याचिका दाखल करत न्यायालयीन लढा देणारी तरुण महिला यांची उदाहरणे त्यांनी दिली.
सर्वसामान्य माणूस विवेकी असतोच. आपला विवेक जागृत ठेवत तो धर्माचे आचरण करत असतो व त्या विवेकी आचरणासाठी; प्रसंगी तो आपले प्राणही पणाला लावतो व त्यामुळेच समाजबदलाला चालना मिळते, तसेच येशूने शिकविलेली नीती पुढे नेण्यासाठी ‘चर्च’ ही व्यवस्था निर्माण केली गेली. पण आज ही व्यवस्थाच कर्मकांडी बनल्याची टीका अॅड. अतुल अल्मेडा यांनी केली. फ्रान्सिस अल्मेडा यांनी अध्यक्षीय समारोप केला. वंदना माने यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रशांत पोतदार यांनी सूत्रसंचलन केले. हौसेराव धुमाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. महाराष्ट्रातील जवळपास 300 श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.