राहुल थोरात -
राजस्थानमधील कुलधरा गाव हे आज मोठं पर्यटन केंद्र बनले आहे. देश-विदेशातून हजारो लोक हे भुताचे गाव पाहण्यासाठी दिवसा येतात. आम्हीही राजस्थान दौर्यामध्ये या भुताच्या गावाला भेट दिली.
कुलधरा हे राजस्थानमधील जैसलमेरजवळ असलेले एक रहस्यमय आणि निर्जन गाव आहे. हे गाव पालीवाल ब्राह्मण समाजाने १३ व्या शतकात वसवले होते आणि एके काळी हे एक समृद्ध गाव होते.
सर्वांत प्रसिद्ध आख्यायिकेनुसार, १८२५ मध्ये एका रात्रीत कुलधरा आणि आसपासच्या ८३ गावांतील लोकांनी हे गाव अचानक सोडले. कारण, जैसलमेरचा क्रूर दिवाण सालीम सिंह याने गावच्या सरपंचाच्या मुलीशी लग्नासाठी मागणी घातली. जर त्यांनी नकार दिला, तर संपूर्ण गावाला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली.

आपल्या मुलीच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी, संपूर्ण पालीवाल समाजाने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. गाव सोडताना त्यांनी कुलधराला शाप दिला की, या गावात कोणीही पुन्हा वस्ती करू शकणार नाही. या शापामुळेच हे गाव आजपर्यंत निर्जन राहिले आहे आणि येथे राहण्याचा प्रयत्न करणार्यांना विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते, असे सांगितले जाते.
पालिवालांनी दिलेल्या शापामुळे आजही कुलधराच्या ओसाड रस्त्यांवर आणि पडक्या घरांमध्ये आत्म्यांचे वास्तव्य असल्याची गावकर्यांची अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेमुळे आणि भीतीमुळे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या गावात संध्याकाळी ६ वाजल्यानंतर पर्यटकांना किंवा स्थानिक लोकांना थांबण्याची परवानगी देत नाही. येथे भेट देणार्या अनेक लोकांनी आणि पॅरानॉर्मल संशोधकांनी विचित्र अनुभव नोंदवले आहेत. यामध्ये अचानक थंडी वाजणे, अदृश्य व्यतींनी स्पर्श केल्यासारखे वाटणे आणि घरांमध्ये कुजबुज किंवा कोणाच्यातरी चालण्याची चाहूल ऐकू येणे यांचा समावेश आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, पालीवाल ब्राह्मणांचे आत्मे आजही त्यांच्या शापित गावाचे रक्षण करत आहेत.
काही इतिहासकार आणि भूगर्भशास्त्रज्ञ या गावच्या रहस्यमय निर्जनतेमागे वैज्ञानिक आणि ऐतिहासिक कारणे सांगतात…
पाण्याची कमतरता आणि दुष्काळ
कुलधरा वाळवंटी प्रदेशात वसलेले होते. पालीवाल ब्राह्मण हे जलव्यवस्थापनात कुशल होते आणि त्यांनी ‘खारीन’ नावाच्या विशेष जलसंचयन पद्धतीचा वापर करून शेती केली होती. काही ऐतिहासिक नोंदींनुसार, १८०० च्या दशकाच्या सुरुवातीस या भागातील पाण्याचे स्रोत (जसे की विहिरी आणि काकणी नदी) हळूहळू कोरडे पडू लागले.

पाण्याची तीव्र कमतरता आणि दीर्घकाळ चाललेला दुष्काळ यामुळे शेती करणे अशक्य झाले. त्यातच वाळवंटातील वाळू मोठ्या वार्यासोबत शेतामध्ये येऊन शेती नापीक होऊ लागली. यामुळे लोक हळूहळू दुसर्या ठिकाणी स्थलांतरित झाले. नोंदींनुसार, १८१५ पर्यंत गावात सुमारे ८०० लोक होते, तर १८९० पर्यंत ही संख्या केवळ ३७ वर आली होती, म्हणजे गाव एका रात्रीत नव्हे, तर टप्प्याटप्प्याने सोडले गेले.
जुलमी आर्थिक कर
काही इतिहासकार सांगतात की, क्रूर दिवाण सालीम सिंहने लादलेले जुलमी अत्यधिक कर आणि जुलूम यामुळे पालीवाल ब्राह्मण समुदाय आर्थिक संकटात सापडला होता. या वाढत्या आर्थिक दबावामुळे लोक आपल्या वडिलोपार्जित जमिनी सोडून सुरक्षित ठिकाणी गेले.
कुलधरा गाव निर्जन होण्यामागे दिवाण सालीम सिंहच्या अत्याचाराची आख्यायिका लोकप्रिय असली, तरी पाण्याची कमतरता (दुष्काळ) आणि भूकंपासारखी नैसर्गिक कारणे हेच मुख्य वैज्ञानिक आणि ऐतिहासिक कारणे असू शकतात.
अंधश्रद्धेवर आधारित पर्यटन व्यवसाय
कुलधरा मध्ये भूत या अंधश्रद्धेवर आधारित पर्यटनाचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला आहे. ‘शाप’ आणि ‘भुताटकी’चा टॅग आज कुलधराच्या व्यवसायाचा आधार आहे. सध्या सोशल मीडियाने कुलधराच्या ‘हाँटेड’ प्रतिमेला अधिक प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे हे ठिकाण भारतातील सर्वात ‘भयानक’ ठिकाणांपैकी एक म्हणून ओळखले जाते. स्थानिक गाईड पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सत्य कथांपेक्षा भूतांच्या आणि शापाच्या गोष्टी अधिक रंगवून सांगतात.

इतिहासकारांच्या मते, कुलधरा सोडण्यामागे दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि राजाने वाढवलेला कर ही कारणे असावी लागतात. एका रात्रीत एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी गाव सोडणे ही ऐतिहासिक घटना नक्कीच आहे, पण त्याला ‘शाप’ किंवा ‘भूत’ याचे कारण देणे, हा केवळ पर्यटनाला चालना देण्याचा मार्ग आहे. कुलधरा हे एक असे उदाहरण आहे जिथे मानवी भीती आणि गूढतेची आवड यशस्वीपणे एका आकर्षक व्यवसायात रूपांतरित झाली आहे.
– राहुल थोरात, रमेश माने
