वैचारिक कौशल्य : ‘चिकित्सक विचारक्षमता’ आणि ‘सृजनात्मक विचारक्षमता’

डॉ. चित्रा दाभोलकर - 9422496495

सद्यःयुगात-कोरोनापश्चात कालखंडात- जगभरातील सर्व लोकांवर शारीरिक, मानसिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. लहान मुले; विशेषतः किशोरवयीन मुलांवरील दुष्परिणामांमुळे मानसिक आरोग्य धोक्यात आल्याचे आढळून येत आहे. या वयात जीवनकौशल्ये रुजवली तर आयुष्यात येणार्‍या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास ही मुले सक्षम बनतात, म्हणूनच ही कौशल्ये समजून घेऊन या मुलांना शिकवणे आवश्यक ठरते. यापूर्वी आपण आत्मभान, आस्था, प्रभावी संप्रेषण, परस्पर नातेसंबंध, ताणतणावांवर मात करण्याचे कौशल्य आणि भावनिक संतुलन राखण्याचे कौशल्य ही विविध जीवनकौशल्ये समजून घेतली आहेत. प्रस्तुत लेखात वैचारिक कौशल्यासंबंधी जाणून घेऊ.

सर्व सजीवांमध्ये माणसाचा मेंदू अधिक विकसित झाला असल्यामुळे माणसांमधील वैचारिक क्षमता ही लक्षणीय असते. तिला योग्य दिशा मिळणे आवश्यक असते. जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिकित्सक विचारक्षमता’ आणि ‘सृजनात्मक विचारक्षमता’ ही दोन कौशल्ये आवश्यक जीवनकौशल्यांमध्ये अंतर्भूत केली आहेत. चिकित्सक विचार म्हणजे एखाद्या विषयाबद्दल कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी अनेक लहान-लहान प्रश्नांच्या सहाय्याने त्या माहितीची सत्यासत्यता पडताळून बघण्याची विचारप्रक्रिया. परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करण्याची प्रक्रिया. तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमतेचे कौशल्य – एखाद्या परिस्थितीसंबंधी मिळालेल्या माहितीचे विश्लेषण आणि परीक्षण वस्तुनिष्ठपणे करण्याचे कौशल्य म्हणजेच चिकित्सक विचारप्रक्रिया होय. ही व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. या व्याख्येनुसार प्रत्येक व्यक्तीने वैचारिक प्रामाणिकपणा आणि वैचारिक मोकळेपणा बाळगणे आवश्यक आहे. तसेच वैचारिक पातळीवर क्रियाशील राहणे आणि प्रत्येक परिस्थिती समजून घेताना प्रश्न विचारणे, इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम असणे आवश्यक आहे. थोडक्यात, चिकित्सक वैचारिक कौशल्य आत्मसात केल्यावर स्वतंत्र वैचारिक बैठक तयार करणे, कोणत्याही निष्कर्षाप्रत पोेचताना माहितीचे विश्लेषण करणे आणि मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे.

सृजनात्मक वैचारिक क्षमता म्हणजे काय? तर वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता. एखाद्या परिस्थितीचे किंवा उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून मोकळेपणाने कुठलाही पूर्वग्रहदूषित विचार मनात न ठेवता वेगळ्या, अभिनव पद्धतीने विचार करण्याचे कौशल्य म्हणजे सृजनात्मक वैचारिक कौशल्य. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी विचारमंथन करणे; म्हणजेच वैचारिक घुसळण करणे आवश्यक असते. समस्या सोडवताना पारंपरिक किंवा सर्वमान्य मार्ग न विचार करता अवलंबणे टाळले पाहिजे; तसेच नवीन मार्ग विचारपूर्वक शोधणे आणि आजपर्यंत कोणीही चोखंदळला नाही, असा मार्ग शोधणे. यात सर्जनशीलता, नव विचारप्रक्रिया दिसते. परंतु अशा प्रकारचा विचार करताना चिकित्सक वैचारिक कौशल्यसुद्धा अंगी असणे आवश्यक आहे. एखादा निर्णय घेताना किंवा समस्या सोडवताना योग्य मार्गाने माहिती मिळवणे, परिस्थितीचा सर्व बाजूंनी विचार करणे, निष्कर्ष काढताना उपलब्ध माहितीची सत्यता पडताळून बघणे, माहितीचे विश्लेषण करणे या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. यानंतर विचारमंथन करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. इथे स्पष्ट, तर्कसंगत विचार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे आणि संशोधक वृत्ती विकसित करणे या सगळ्या गोष्टी अध्याहृत आहेत.

चिकित्सक वैचारिक कौशल्य आणि सृजनात्मक वैचारिक कौशल्य ही दोन्ही कौशल्ये व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहेत. प्रामाणिकपणा, वैचारिक मोकळेपणा, प्रश्न विचारायची आणि उत्तरे द्यायची मनापासून तयारी आणि त्यातून स्वतःच्या विचारांची बैठक निर्माण करण्याची क्षमता विकसित करण्याचे कौशल्य लहानपणापासून अंगी बाणवणे आवश्यक ठरते.

चांगले जगता यावे म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला औपचारिक शिक्षणाबरोबरच जीवनकौशल्य विकसनाची आवश्यकता आहे. वैयक्तिक आणि सामाजिक संबंध निकोप ठेवण्यासाठी परिसरातील विविध घटना, कृती, प्रसंग आदींबाबत सहजपणे विचारपूर्वक निर्णय घेताना पारंपरिक पद्धतीपेक्षा नाविन्यपूर्ण साधा, सोपा निर्णय वेगळेपणाने घेण्याची क्षमता/कौशल्य किशोरवयीन मुलांमध्ये रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. लहानपणापासून मुलांना विविध निर्णयप्रक्रियांमध्ये सामावून घेतले आणि त्यांनी सुचविलेले उपाय पालकांनी अमलात आणले तर मुलांचा आत्मविश्वास वाढतो. कित्येक वेळा मुलांनी सुचविलेला मार्ग अधिक चांगला असू शकतो. त्यामुळे पालकांनी; तसेच इतर मोठ्या माणसांनी मुलांचे विचार मोकळ्या मनाने ऐकून घ्यावे, त्यांच्याशी चर्चा करावी, त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यावा. यामुळे मुलांची वैचारिक बैठक चांगली होण्यास मदत होते. सर्जनशील विचार करण्याची क्षमता विकसित होते. किशोरवयातील अनेक समस्यांची (वाढ-विकासासंदर्भात किंवा लैंगिकतेसंदर्भात, शरीरप्रतिमेसंदर्भात, वर्तणुक समस्यांच्या बाबतीत) उकल करताना विचार मंथनाची (brain storming) गरज असते. यात मुलांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. मुलांच्या मदतीने त्यांनाच विचार करायला लावून निर्णय घेतला तर तो अमलात आणणेही सोपे जाते. यातून मुले चौफेर विचार करायला शिकतात. कुठलीही कृती करण्यापूर्वी कृतीच्या चांगल्या-वाईट परिणामांचा विचार करायला शिकतात. जीवनकौशल्यांचे शिक्षण देणे ही काळाची गरज बनली आहे. किशोरवयीन मुलांचा बौद्धिक विकास साधताना भावनिक विकास करणेही आवश्यक आहे.

डॉ. चित्रा दाभोलकर (बालरोगतज्ज्ञ, सातारा)

लेखिका संपर्क ः94224 96495


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]