सुभाष थोरात -
मार्क्सवादामध्ये ‘डी क्लास’ नावाची एक संज्ञा आहे. ‘डी क्लास’ झाले पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. याचा अर्थ तुम्ही जर वरच्या वर्गात जन्माला आला असाल, तर तुम्हाला क्रांतिकारक होण्यासाठी या वर्गाच्या सर्व सवयी, सुविधा, राहणीमान, त्याचे विचार, आचार सोडून दिले पाहिजेत आणि तुमची जीवनशैली, तुम्ही ज्या गोरगरीब जनतेसाठी लढणार आहात, त्यांच्यासारखी केली पाहिजे. भारतात जातिव्यवस्थेमुळे आपल्याला ‘डी क्लास’ बरोबरच ‘डी कास्ट’चीही कसोटी लावावी लागते. तुम्ही वरच्या जातीत जन्माला आला असाल तर या जातीचे सगळे फायदे, संस्कार, त्यातून येणारा वर्चस्ववाद नाकारला पाहिजे, जातीपल्याड गेले पाहिजे. भारतात माणूसपणाची सुरुवात तिथूनच होते. कुमार या सर्व कसोट्यांवर १०० टक्के उतरला.
२७ ऑगस्ट २०२२. नेहमीप्रमाणे कुमार नंदुरबारहून पुण्याला आमच्या घरी आला. तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. जेव्हापासून त्याचा आजार सुरू झाला, तेव्हा तो नेहमी येत असे. ही सामान्य घटना होती. आमच्याकडेच मुक्कामाला राहत असे.
त्या दिवशी पुणे येथे घर कामगार संघटनेचे अधिवेशन होते. किरण त्यासाठी गेली होती. मी घरीच होतो. कुमार आला; परंतु मी दार उघडेपर्यंत त्याला उभे राहणे शक्य होत नव्हते. मी ताबडतोब त्याला बेडवर झोपवले. पाणी दिले. तो म्हणाला, “पोट खूप दुखतेय. तीन दिवस मी काही खाल्ले नाही.” परिस्थिती गंभीर होती. मी डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांना फोन केला. तेे लगेच आले आणि आम्ही त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले.
सव्वीस ऑगस्टला त्याने नंदुरबारहून सकाळी ट्रेन घेतली. रात्री उशिरा तो मुंबईला पोचला. मात्र खूप उशीर झाल्यामुळे तो मुंबईत कोणाकडे गेला नाही. व्हीटी स्टेशनवरच थांबला. सकाळची ट्रेन घेऊन तो पुण्याला आला. अशा भीषण शारीरिक परिस्थितीत त्याने हा प्रवास कसा सहन केला असेल? मी त्याबद्दल जेव्हा विचार करतो, तेव्हा चक्रावूनच जातो. मात्र आश्चर्य वाटत नाही. कारण आयुष्यभर आंदोलनात भोगलेल्या हालअपेष्टा, तुरुंगवास, उपासमार, मैलोन्मैल चालणे, हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिला. त्याबद्दल त्याने कोणाला काही सांगितलेले ऐकू येत नाही. स्वतःचं कसलंही भांडवल करायचं नाही, आपण स्वीकारलेलं काम दृढ निश्चयानं निर्धारपूरक पार पाडायचं, हा त्याचा स्वभाव. मुक्कामाला यायचा, तेव्हा त्याच्याकडे एक छोटी पिशवी असायची. यात कपड्याचे दोन जोड असत. पुढे, पाठीवरची सॅक वापरू लागला. त्यात त्याला कॉम्प्युटर ठेवता येत असे. रात्री स्वतःचे कपडे धुऊनच तो झोपत असे. खाण्याच्या काही आवडी नाहीत. सकाळी त्याला कपभर दूध आणि एक केळ खायला आवडायचे. त्याला गोड पदार्थ आवडत. तो आला की, आम्ही त्याच्यासाठी गोड पदार्थ आणून ठेवत असू. दिवसातला बराच वेळ तो वाचत असे आणि काम करत राही. गप्पागोष्टी होत, तेव्हा प्रचलित राजकारण, भारतीय तत्त्वज्ञान, जातिव्यवस्था याबद्दलचे फुले-आंबेडकरांचे विचार, पर्यावरण, शेती या विषयांची विपुल माहिती, त्याकडे पाहण्याचा मार्क्सवादी भौतिकवादी दृष्टिकोन अचंबित करणारा असे. त्यात कुठेही विद्वत्तेचा आव नाही. दुसर्याचे बोलणे शांतपणे ऐकणे, ते तावातवाने खोडून न काढता त्यातील विसंगती समोरच्या माणसाचा आदर राखून व्यक्त करणे, हे त्याचे संवादातील कौशल्य होते. त्यामुळे त्याच्याबरोबर चर्चा या अधिक आनंदाच्या होत असत. या बोलण्यात आपला मोठेपणा सांगणारा एकही शब्द तोंडून कोणी कधी ऐकला नसेल. आजच्या जाहिरातीच्या जमान्यात स्वतःची जाहिरात न करणारा मी पाहिलेला तो एकमेव राजकीय नेता की, ज्याच्याकडे स्वतःची जाहिरात करण्यासाठी हजारो गोष्टी होत्या, ज्या त्याने गोरगरीब जनतेच्या खांद्याला खांदा लावून, प्रत्यक्ष रस्त्यावर आंदोलनात उतरून कमावलेल्या होत्या. त्याच्या पिढीत आणि नंतरच्याही पिढीत इतकं काम कोणी केले असेल, हे संभवत नाही. मात्र जाहिरातींचे तंत्र असेल तर तुम्ही मुंगी मारली तरी वाघ मारण्याचा देखावा उभा करू शकताच. सध्या राजकारणात असे देखावे उभे आहेत.
मार्क्सवादामध्ये ‘डी क्लास’ नावाची एक संज्ञा आहे. ‘डी क्लास’ झाले पाहिजे, असे नेहमी म्हटले जाते. याचा अर्थ तुम्ही जर वरच्या वर्गात जन्माला आला असाल, तर तुम्हाला क्रांतिकारक होण्यासाठी या वर्गाच्या सर्व सवयी, सुविधा, राहणीमान, त्याचे विचार, आचार सोडून दिले पाहिजेत आणि तुमची जीवनशैली, तुम्ही ज्या गोरगरीब जनतेसाठी लढणार आहात, त्यांच्यासारखी केली पाहिजे. भारतात जातिव्यवस्थेमुळे आपल्याला ‘डी क्लास’ बरोबरच ‘डी कास्ट’चीही कसोटी लावावी लागते. तुम्ही वरच्या जातीत जन्माला आला असाल तर या जातीचे सगळे फायदे, संस्कार, त्यातून येणारा वर्चस्ववाद नाकारला पाहिजे, जातीपल्याड गेले पाहिजे. भारतात माणूसपणाची सुरुवात तिथूनच होते. कुमार या सर्व कसोट्यांवर १०० टक्के उतरला. आपल्या पूर्वजातवर्गाच्या संस्कारांपासून तो पूर्ण मुक्त होता. माझ्या माहितीतील ते बहुधा एकमेव उदाहरण असेल. एक वेगळाच नवा जन्म झालेला माणूस. त्यामुळे धुळे जिल्ह्यात झालेल्या एका अत्याचाराच्या घटनेनंतर अंबरसिंग महाराजांनी ‘मटा’मध्ये ‘सातपुडा साद घालतो’ असा लेख लिहून तरुणांना साद घातली, तेव्हा जे तरुण तेथे गेले, त्यात कुमारही होता. सर्व उच्च शिक्षित. काही परतले; मात्र कुमार परतला नाही. त्याने तो संघर्ष खांद्यावर घेतला. तो आदिवासींमधलाच एक आदिवासी होऊन गेला. अनेक संघर्ष केले, मार खाल्ला, तुरुंगावास भोगला. दोन पावलावर असलेला मृत्यू अनुभवला; मात्र तो परतला नाही. तो आदिवासी कुटुंबातील एक म्हणून राहिला. त्यांच्याच रेशन कार्डवर त्यानं आपलं नाव नोंदवलं. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीनेच त्याचं दफन झालं. ‘त्या’ संघर्षमय मातीतच विसावला.
आजार झपाट्यानं बळावला. जगण्याच्या सर्व शक्यता नष्ट झाल्या. प्रचंड वेदनांनी शरीर त्रस्त होते. अशा या अवस्थेत ‘मला नंदुरबारला घेऊन चला,’ अशी त्यानं इच्छा व्यक्त केली; मात्र ते शक्य नव्हतं. डॉ. डी. एल. कराड यांच्या नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये तो अॅडमिट होता. कामगार युनियनच्या कामाच्या सर्व व्यापातून डॉ. डी. एल. कराड, तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर आणि डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी, निदान चार-दोन महिने तरी त्याला सुखाने मिळतील, नंदुरबारला जाऊन जनतेत मिसळता येईल, यासाठी अफाट प्रयत्न केले. दिवस-रात्र त्याच्या प्रकृतीवर बारीक लक्षात ठेवून राहिले.
नंदुरबारला घेऊन जाण्याच्या सर्व शक्यता मावळत गेल्या, तसा नंदुरबारहून नाशिककडे उलटा जनप्रवास सुरू झाला. अश्रूंनी भरलेले डोळे घेऊन मुला-बाळांसकट महिला, तरुण, वयस्क यांचा एक अखंड प्रवाह रोज नाशिकच्या दिशेने वाहू लागला, तो त्याच्या अंतिम श्वासापर्यंत थांबला नाही. तो जी स्वप्नं घेऊन जनतेच्या डोळ्यांत पेरीत ज्या पावलांनी त्या नंदुरबारच्या मातीत उतरला होता, ती थांबली होती. त्याच्या अंतिम प्रवासाला हजारो लोक ‘कुमार भाऊ परत या,’ अशा आर्त घोषणा देत होते.‘थांबणार नाही, थांबणार नाही, आमची चळवळ थांबणार नाही,’ असा निर्धार व्यक्त करत होते. हा निर्धार कुमारनेच त्यांच्यात पेरला होता. एकीकडे, हा निर्धार आणि दुसर्या बाजूला जनतेच्या डोळ्यांतून झरणारे अश्रू, अमर होण्याच्या जवळपास असलेल्या कुमारला यापेक्षा दुसरे चांगले काय अभिवादन असू शकेल?
बुद्धापासून सुरू झालेल्या मानवाच्या दुःखमुक्ती लढ्याच्या परंपरेचा हा पाईक कायम स्मरणात राहील. उद्या शंभर-दोनशे वर्षांनंतर या काळाच्या इतिहासाची पाने उलटताना काळाच्या पटलावर त्याचे नाव झळकत असेल. त्याचा हा लढवय्या वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्याला योग्य मानवंदना ठरेल.
तो गेला, ‘त्या’ दोन ऑक्टोबरच्या रात्री मी त्याला चार ओळींची आदरांजली वाहिली आहे –
हे जग अधिक मानवी बनवण्यासाठी
तू अखेरच्या श्वासापर्यंत झगडलास
बुद्धानंतर पुरेपूर माणूस बनण्याचा प्रयत्न करणार्या
मानवांपैकी तू एक होतास
काळावर कर्तृत्वाचा ठसा उमटवून तू गेलास
आयुष्याचे चीज केलेस
मरणार तर सर्वच
तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे
तू कीर्तिरुपे उरशील
गोरगरिबांच्या हृदयात सदैव जिवंत राहशील
कॉ. कुमार शिराळकर संक्षिप्त जीवनपट
कॉम्रेड कुमार शिराळकर यांचा जन्म १० जानेवारी १९४२ ला मिरज (जि. सांगली) येथे झाला. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक व क्रांतिकारक श्री. नारायण हरी आपटे हे कुमार यांच्या आईचे वडील.
कुमारांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (सांगली) येथून बी. ई. मेकॅनिकलची पदवी घेतली व ‘आयआयटी’ पवई येथे प्रवेश प्रक्रियेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रवेश घेतला; परंतु तिथे शिक्षण मात्र घेतले नाही. घरच्या जबाबदार्यांमुळे नोकरी करावयाचे ठरवले. १९६६-६७ मध्ये ते युवक क्रांती दलाने (युक्रांद) आयोजित केलेल्या श्रमसंस्कार शिबिरात बाबा आमटे यांच्या संपर्कात आले. याच काळात त्यांनी नोकरी व घर सोडून ग्रामीण भागात; विशेषतः आदिवासी भागात जाऊन काम करण्याचे पक्के ठरवले.
सोमनाथ येथील बाबा आमटेंच्या श्रमिक विद्यापीठात जाऊन तेथे ते काम करू लागले. त्यानंतर त्यांना तिथे दीनानाथ मनोहर, विजय कान्हेरे व महाराष्ट्रभरातून आलेले इतरही काही कार्यकर्ते भेटले. धुळे जिल्ह्यातील शहाद्यामध्ये अंबरसिंग महाराज यांचा आदिवासींसाठीचा संघर्ष तेव्हा सुरू होता. त्याला ‘माणूस’सारख्या नियतकालिकांतून प्रसिद्धी मिळत होती. त्याच सुमारास पाटीलवाडी येथे एक घटना घडली. धडगाव येथील विश्राम पाटील यांनी आदिवासींना दोन-दोन पायली धान्य दिले. सुगीला परतफेडीची बोली होती; परंतु जगन्नाथ पाटील यांनी, आपले धान्याचे कोठार आदिवासींनी लुटले, अशी पोलिसांत तक्रार केली. म्हसावद गावात तेथील पाटील गुजर समाजाने आदिवासींना बेदम मारहाण केली. लक्कडकोट येथील सुरत्या जतन्या भिल या आदिवासीची गोळ्या घालून हत्या केली गेली. तेव्हा अंबरसिंग महाराज यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना ‘सातपुडा साद घालत आहे,’ असे आवाहन केले. तेव्हा कुमार शिराळकर, दीनानाथ मनोहर, प्रकाश सामंत, विजय कान्हेरे, सुधीर बेडेकर, छाया दातार आदी अनेक कार्यकर्ते तिथे गेले आणि शहादा हे चळवळीचे केंद्र झाले. वाहरू सोनावणे, जयसिंग माळी, तुळशी परब, प्रदीप मोरे असे कितीतरी कार्यकर्ते गावागावांत आधीच चळवळ करीत होते. धनदांडगे, जमीनदारांची ‘पुरुषोत्तम सेना’ कार्यकर्त्यांना वेचून-वेचून मारहाण करायची. अशात कुमार शिराळकरांवर प्राणघातक हल्ला झाला. मात्र ते त्यातून वाचले आणि पुन्हा कामाला लागले.
सर्वोदय मंडळ, अंबरसिंग महाराजांचे आदिवासी भिल्ल सेवा मंडळ, लाल निशाण पक्ष यांनी संयुक्तरीत्या ‘भू-मुक्ती मेळावा’ आयोजित करून युवकांना शहाद्याच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला कुमार शिराळकर व इतर कार्यकर्ते हजर होते. या मेळाव्यात ‘ग्राम स्वराज्य समिती’ची स्थापना करण्यात आली. ‘शहादा चळवळी’त काम करणार्या सर्व कार्यकर्त्यांचा यात समावेश करण्यात आला आणि तीच शहादा चळवळीची निर्णय घेणारी संघटना बनली. त्यानंतर ‘श्रमिक संघटने’च्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. ही एक जनसंघटना असणार होती; तर यापूर्वीची ग्राम स्वराज्य समिती केवळ कार्यकर्त्यांची होती.
कुमार शिराळकर तळोदे तालुक्यातील गुंजाळी गावचे रहिवासी नारायण सजन ठाकरे या कॉम्रेडच्या घरी राहू लागले. पुढे, ठाकरे कुटुंबीयांच्या रेशन कार्डवर कुमार शिराळकरांचे देखील नाव लागले व तोच त्यांचा कायमचा पत्ता झाला.
मागोवा गटाची स्थापना झाली. या गटाच्या स्थापनेच्या बैठकीपासून कुमार शिराळकर या गटाचा भाग होते. आणीबाणीच्या काळात मागोवा गट विसर्जित करण्यात आला. परंतु ग्राम स्वराज्य समिती व श्रमिक संघटनेच्या माध्यमातून ‘मागोवा’चे कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात राहिले. आणीबाणीमध्ये आधी अटक व नंतर कुमार यांच्यासह इतर कार्यकर्ते भूमिगत झाले. ‘मागोवा’मध्ये काम केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये व शहादा चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये विविध मतप्रवाह तयार झाले. त्यातील एका गटाने ‘श्रमिक मुक्ती दला’ची स्थापना केली. कॉम्रेड कुमार शिराळकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. शहादा येथे झालेल्या अखिल भारतीय शेतमजूर युनियनच्या पहिल्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात कुमार यांची राज्य सरचिटणीस म्हणून निवड झाली. नंतर ते शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष, राष्ट्रीय सहसचिव झाले. २००६ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्या शिष्टमंडळाचे सदस्य या नात्याने सीताराम येचुरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी समाजवादी चीनच्या दौर्यात सहभाग घेतला. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात २०१५ पर्यंत केंद्रीय कमिटीवर होते.
शेल्टी या तापी नदीकाठच्या गावात हत्याकांड झाले. त्यामध्ये पाच आदिवासींना तुराट्यांवर जाळून टाकण्यात आले. कॉम्रेड कुमार यांचे साथीदार जयसिंग माळी यांनाही तिथे जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र जयसिंग माळी त्या वेळी तापी नदीत उडी मारून बचावले. अशा घटनांमुळे कुमार फार अस्वस्थ झाले आणि त्यांनी ‘त्या’ काळात गावोगाव फिरून जमीनदारांविरोधात प्रचंड रान पेटवले. शेल्टी हत्याकांडाच्या निषेधार्थ मुंबईत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर डाव्या पक्ष-संघटनांतर्फे प्रचंड मोर्चा काढण्यात आला.
तराडी गावात सभासद नोंदणीची मोहीम करत असताना स्थानिक जमीनदारांनी कुमार शिराळकर व प्रकाश सामंत या दोघांना ग्रामपंचायतीमध्ये कोंडून प्रचंड मारहाण केली. त्यातच त्यांच्या एका कानाला इजा होऊन तो निकामी झाला. त्यानंतर एक-दोन वर्षांतच पिंपरी गावात तुळशी परब व कुमार शिराळकर यांच्यावर एक भयानक जीवघेणा हल्ला झाला.
पुण्यातील ‘समाजविज्ञान अकादमी’सोबत कुमार संलग्न झाले आणि पुढे संस्थेचे विश्वस्तही झाले. गेली ३५ वर्षे ते अकादमीशी संलग्न होते. पुण्यात मार्क्सवादी-पुरोगामी-डाव्या-वैज्ञानिक विचारांविषयी संशोधन, अभ्यास, प्रशिक्षण, प्रसार करण्यासाठी सुधीर बेडेकर यांच्यासह ‘जनपद’ संस्थेची स्थापना केली व सुधीर बेडेकरांच्या निधनानंतर अध्यक्ष म्हणून काम केले. त्यांनी अंबरसिंग महाराज ज्ञान-विज्ञान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेतर्फे मोड, तळोदे येथे कॉम्रेड बी. टी. रणदिवे हायस्कूलची स्थापना केली. तळोदे तालुक्यातील गुंजाळी गावात आदिवासी मुलांसाठी हॉस्टेल सुरू केले व त्याचे संपूर्ण बांधकाम गावातील महिला, तरुण व कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून झाले. वास्तू उभी राहण्यापूर्वी नारायण ठाकरे यांच्या घरी हॉस्टेल सुरू केले. मुलांच्या जेवणासाठी गावातूनच भाकरी गोळा केल्या जायच्या. नंदुरबार येथे आदिवासी परिषद झाली. त्यात आदिवासी भागासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र आदिवासी जिल्ह्याची मागणी करण्यात आली व त्या मागणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
वनाधिकार कायद्याच्या नियम बनवण्याच्या समितीवर व पक्षाच्या केंद्रीय आदिवासी सबकमिटीवर तत्कालीन खासदार वृंदा कारत व जितेंद्र चौधरी यांच्यासमवेत काम केले. या काळात सबंध भारतभर फिरून २००८ मध्ये वनाधिकार कायद्याचे नियम अंतिम होईपर्यंत त्यांनी सचोटीने परिश्रम घेतले.
२००८ ला आईच्या निधनानंतर छोट्या बहिणीच्या आजारपणामुळे कुमार यांना पक्षाचे पूर्णवेळ काम करता येत नव्हते, म्हणून त्यांनी पक्षाला तसे कळवून पूर्णवेळ कार्यकर्ता मानधन घेणे बंद केले. पुढे, ‘व्हर्टिगो’च्या त्रासामुळे कुमार यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे २०१० नंतर पक्षातील व जनसंघटनेतील विविध प्रमुख जबाबदार्या इतर कार्यकर्त्यांवर सोपविण्यास त्यांनी सुरुवात केली.
मे २०१४ मधील पुणे ते खर्डा हा २० दिवसांचा ‘लाँग मार्च’ त्यांनी खांद्यावर निळा झेंडा घेऊन पायी पूर्ण केला. तरुण कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करत त्यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडली. जातिअंताच्या लढाईतील हे एक महत्त्वाचे आंदोलन होते. तसेच कॉ. कुमार शिराळकरांनी पर्यावरणीय चळवळीतही सहभाग घेतला. विशेषत: वृक्षारोपण, वनसंवर्धन, जलसंधारण, मृद्संधारण, जैवविविधता संरक्षण, सेंद्रिय शेती याबाबत डॉ. अभय बंग यांचे चेतना फाउंडेशन, नाना पाटेकर यांचे नाम फाउंडेशन, एमकेसीएल, इकॉलॉजीकल सोसायटी, बाएफ, एक्वाडॅम यांच्यासह विविध प्रयोग करत आदिवासींसाठी अभ्यास तपासणी शिबिरे आयोजित केली होती.
१९७४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कॉ. कुमार शिराळकर यांच्या ‘ऊठ वेड्या, तोड बेड्या’ पुस्तकाच्या हजारो प्रती हातोहात विकल्या गेल्या. मागोवा प्रकाशनने त्याच्या तीन आवृत्त्या प्रकाशित केल्या. २०१५ मध्ये ‘नवे जग, नवी तगमग’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केले. याशिवाय दोनशेहून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. महाराष्ट्रातला साखर उद्योग, ऊसशेती व ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न असोत, वनाधिकार कायद्याची मीमांसा, आदिवासींचे जीवन असो, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, भारत-अमेरिका न्युक्लियर करार असो किंवा धर्मांधतेचे राजकारण; पर्यावरणशास्त्राची मार्क्सवादी दृष्टिकोनातून मांडणी, निसर्ग-मानव संबंध व इतर विविध विषयांवर त्यांनी लिखाण व भाषणे केली आहेत.
२०१९ मध्ये कुमार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर उपचार करण्याचे सर्व प्रयत्न झाले. मात्र शेवटी गांधी जयंतीदिनी (२ ऑक्टोबर २०२२) रात्री ८.२५ ला कुमार शिराळकर यांचे नाशिकच्या डॉ. कराड हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. ३ ऑक्टोबरला दुपारी चार वाजता मोड गावात आदिवासी पद्धतीने दफन करून त्यांचा अंत्यविधी करण्यात झाला.
(हा संक्षिप्त जीवनपट ‘जीवनमार्ग’ साप्ताहिकाच्या कॉम्रेड कुमार शिराळकरांवरील विशेषांकातील डॉ. ज्ञानेश्वर मोटे यांनी संकलित केलेल्या लेखावर आधारित आहे. लेखातील छायाचित्रे संदेश भंडारे यांची आहेत.)