एक संवाद कबीरासोबत : कबीरा कहे यह जग अंधा…

नरेंद्र लांजेवार - 9422180451

विवेकवादी संत कबीरा

आज बर्‍याच दिवसांनंतर तुझ्याशी मनापासून संवाद साधताना लय बरं वाटतंय बघ…. आपल्या माणसाशी, आपल्या मनातली सल मांडताना, संवाद साधताना समाधान वाटते..

दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजे आमच्याकडील वटपौर्णिमेला तुझी जयंती असते. तुझी जयंती ना सरकारी पातळीवर, ना खाजगी पातळीवर साजरी होते. आमच्या महाराष्ट्रात चार-पाच कबीरपंथी एकत्र येतात आणि तुझा वैश्विक विचार मांडून, एक-दोन गाणी गाऊन तेही आपापल्या घरी निघून जातात…(तुझी गाणी गाणार्‍यांना इथे महाराष्ट्रात शहरी नक्षलवादी संबोधले जाते). पण तुझ्या बाबतीत हे खरं म्हटले पाहिजे की, कोणतीही एक जात किंवा जमात अजून तरीही तुझ्या पाठीशी उभी नाही. जगामध्ये एक तू, एक गांधीबाबा आणि मार्क्सबाबा यांच्या पाठीशी अजून तरी जाती-जमातीची माणसं नाहीत, ही तशी पाहिली, तर तुमची खरी कमाई आहे..

पंधराव्या शतकात तू जन्माला आलास; तू जन्माला आलास आणि दंतकथा बनून गेला… तू येशू ख्रिस्तासारखा कुमारी मातेच्या पोटी जन्माला आला असशील आणि कोणीतरी लोकलज्जेस्तव तुला रस्त्याच्या कडेला टाकून दिलं. एका नवीन लग्न झालेल्या कोष्टी जातीच्या नीरू आणि त्याची नववधू नीमा या जोडप्याला तू बेवारस अवस्थेत दिसला. त्यांनी तुला घरी आणले आणि प्रेमाने वाढवले. तू बालपणापासूनच हिंदू आणि मुस्लिम धर्माची चिकित्सा करू लागला. हिंदू धर्माचे लोक तुला नास्तिक म्हणू लागलेत आणि मुस्लिम धर्माचे लोक तुला काफीर समजू लागलेत. तुझ्याबाबत अनेक चमत्कारिक गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्यात; पण तू लोकांना साधं-सोपं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान सांगू पाहत होतास… लोकांनी एकेश्वरवाद मानावा, यासाठी झगडत होतास. तुझा राम हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला राम होता, जो पुढे महात्मा गांधींनी सुद्धा स्वतःच्या हृदयामध्ये साठवून घेतला; पण हा तुझा एकेश्वरवाद समाजाला कळला नाही. लोक शेवटपर्यंत तू हिंदू – की मुस्लिम यावरच चर्चा करीत राहिले …

तू संतांची, धर्मपीठांची, पुरोहितशाहीची, मुल्ला-मौलवींची एवढी चिकित्सा केलीस की, संपूर्ण पुरोहितशाही हीच तुझ्या विरुद्ध उभी राहिली. तू रामाला गुरू मानलं. पण स्वत:चे शिष्यत्व प्रदान करून दुसर्‍यांना फसविले नाही.

कबीरा, तुझ्या विचारांचा प्रभाव हा संपूर्ण देशभर पसरला. पंधराव्या शतकात वैदिक धर्माच्या सर्व परंपरा नाकारणे म्हणजे गंमत नव्हती. वैदिक धर्म तत्त्वज्ञान, अल्लाह आणि मुस्लिम कट्टरतावादाला विरोध करणे, ही सोपी गोष्ट नव्हती. पण हे करत असताना तू कोणालाच चेला केले नाहीस, तू स्वतःचा मठ स्थापन केला नाहीस किंवा तू स्वतःला धर्मगुरूही म्हणवून घेतले नाहीस. हिंदू आणि इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर, विसंगतींवर आणि चारित्रहीनतेवर तू कडाडून हल्ला करत राहिलास. जात-पात, कुलाभिमान, धर्मभेद, कर्मकांड, रूढी, व्रतवैकल्ये यांच्याविरोधात तू सतत लढा दिलास…राम व रहिम एकच हे तू समाजाला सांगितले. खर्‍या अर्थाने भक्तिमार्ग जपण्याचा मनापासून प्रयत्न केलास. शुद्ध चारित्र्य, निष्कामता, अनासक्ती आणि सात्विक राहणी या गुणांचा सतत पुरस्कार केला. त्यामुळे तू संतांचाही संत ठरलास….

आमच्या महाराष्ट्रातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर कबीरपंथी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपला पहिला गुरू म्हणून तुझ्याकडेच बोट दाखविले. पुढे अनेकांनी तुझा विचार महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये रुजवला. तुझा विचार तुकारामांच्या अभंगात दिसतो, तुझा विचार महात्मा फुले यांच्या सत्यधर्मात दिसतो, गाडगेबाबांचे कार्य आणि कर्तृत्वातून तो दिसतो. तुझी धर्मचिकित्सा पुढे अनेकांनी अंगीकारली.

कबीरा, तू जसं मृत्यूपूर्वी एका झोपडीत बसलास आणि बाहेर धर्ममार्तंडांनी चर्चा सुरू केली…कबीराचा मृत्यू झाला तर त्याला दफनावयाचं की त्याला जाळावयाचं.. या गंभीर बाबीवरून एकीकडे दंगल सुरू झाली… कोणीतरी येऊन सांगितलं की, ज्या झोपडीत तू ध्यानस्थ बसला होतास, त्या झोपडीत तुझा देहच नाही आहे; फक्त तिथे काही फुलं आहेत. भक्तगणांनी कदाचित तुकारामांसारखा तू सदेह वैकुंठास गेला, असा बोभाटा केला. तुला दफनावयाचे की जाळायचे, हा प्रश्नच शिल्लक राहिला नाही. भोळे फक्त सांगू लागले तू सदेह वैकुंठाला गेलास…

कबीरा, धर्मचिकित्सा करणार्‍याच्या नशिबी फार वाईट घडले रे बाबा… गॅलिलिओ, न्यूटन, तुकाराम, चक्रधर स्वामी, संत बसवेश्वर या सर्वांना अग्निपरीक्षा द्यावी लागली. पुढे तुझाच वसा महाराष्ट्र आणि देशभर चालू इच्छिणारे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची धर्ममार्तंडांनी हत्या केली. अशा कितीही हत्या झाल्यात तरी विचार संपत नाहीत. हा तुझा विचार खरंच अजरामर ठरला.

समाजाला धार्मिकता हवी आहे; पण कट्टरता नको, समाजाला अध्यात्म हवा आहे; पण कडवेपणा नकोय, समाजामध्ये ईश्वराच्या नावावर दांभिकता नकोय, समाजामध्ये प्रेम आणि सत्यभावना हीच ईश्वर निष्ठा, हे तू आयुष्यभर सांगत राहिला. हेच खरं धर्म तत्त्वज्ञान, धर्मचिकित्सा आजच्या आणि उद्याच्या मानवाला हवी आहे.

कबीरा, तू नेहमी म्हणायचास…

ऐसी बानी बोलिये, मन का आपा खोय

औरन को शीतल करे, आपौ शीतल होय

बुरा जो देखन मैं चला

बुरा न मिलिया कोय

जो दिल खोजा आपना,

मुझसे बुरा ना कोय!

तुझी प्रेमाची भाषा होती. महात्मा गांधी सत्य आणि अहिंसेवर बोलायचे. आमच्याकडे साने गुरुजी – ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ असं सांगायचे… या सगळ्यांमध्ये कबीरा, तुझंच तत्त्वज्ञान भिनलेलं होतं. तू मोठमोठ्याने सांगायचास…

पोथी पढि पढि जग मुआ,

पंडित भया न कोय

ढाई अखर प्रेम का पढे सो

पंडित होय ….

हे फार कमी लोकांना कळत गेलं. तुझी धर्मचिकित्सा करत असताना तू जी दाखवली बोलण्याची, हिंमत दाखवली, ती आजही आमच्या राजकीय नेत्यांमध्ये नाही. तू बोललास….

कांकर पाथर जोरि कै

मज्जित लई बनाय

या चढि मुल्ला बांग दे

क्या बहरा हुआ खुदाय…

मुल्ला जोरजोराने अजान देतो म्हणून तू काय, तुझा खुदा बहिरा आहे? असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. आजही आमची अजान आणि रस्त्यावर महाआरतीचे ईव्हेंट सुरू आहे.

कबीरा, तू जे बोललास ते खरेच आहे…

कबीरा कहे ये जग अंधा

आंधी जैसी गाय

बछडा था तो मर गया

झुठ जाम चटाये…

कबीरा कहे ये जग अंधा …

आमच्याकडे गाडगेबाबांनी तुझं तत्त्वज्ञान साध्या-सोप्या लोकसंवादातून जन माणसांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. धर्माच्या नावावर जी अंधश्रद्धा पसरवली जायची, त्याच्यावर मुळापासून प्रहार केला. पण लोकांनी समजून घेतले नाही. श्राद्ध, आत्मा -पुनर्जन्म यावर ते भाष्य करीत राहिले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तुला गुरू मानलं आणि तुझं सर्व तत्त्वज्ञान भारतीय संविधानात एकत्रित गुंफून संपूर्ण देशात जातिवाद, असमानता यांना थारा दिला नाही. ‘आर्टिकल 15’ म्हणजे तुझेच तत्त्वज्ञान आहे. व्यक्तीला प्रतिष्ठा न देता प्रत्येकाला मताचे स्वातंत्र्य दिलं. मत मांडण्याचा अधिकार दिला. कबीर, तू म्हणायचास ना, सर्व माणसे समान आहे. ते खर्‍या अर्थाने भारतीय संविधानाने करून दाखवलं. कबीरा, आजच्या तुझ्या जयंतीला आम्हाला खरं सांगावेसे वाटते की, आम्ही फार मनापासून हादरले आहोत. हिंदू-मुस्लिम सोशल डिस्टन्स वाढते आहे. भारतीयता टिकवायची असेल तर कबीरा, तुझ्यासारख्या स्पष्टवक्ता, तुझ्यासारखा तत्त्ववेत्ता, तुझ्यासारखा संत आज देशाला हवा आहे…. तुझ्या धर्मनिरपेक्ष विचारांची आज जास्त गरज भासते आहे.

कबीर हे नावही सहसा कोणी आपल्या मुलांचं ठेवत नाही. हिंदू कुटूंबात जर कोणी मुलाचे हमीद नाव ठेवले, तर हजारो प्रश्न विचारतात. इथल्या समाजव्यवस्थेने नावाचीही धर्मानुसार विभागाची करून टाकली आहे रे….

कबीरा, मध्यंतरी मी असं ऐकलं की, तुझ्या नावाने अनेक पंथ तयार झालेत. तू आयुष्यभर वैदिक संस्कृतीवर हल्ला चढवलास; पण आता वैदिकांनीच तुझा पंथ हाती घेऊन तुझे जप, तप, आरत्या, ऊरूस सुरू केले. तुझ्या पंथाचे महंत तयार झाले. महंतांनी पुन्हा वैदिक परंपरा जोपासत तुझे उत्सव सुरू केले. भोळे लोक तुझ्या नावावर या महंतांनाच गुरू करू लागले आहेत. काळाचा महिमा वाईट असतो म्हणतात, तेच खरे, असे नव्हे, तर आमच्या वारकरी संप्रदाय, पुरोगामी जनचळवळींंना तुझ्यासारख्या संतांची जनकळवळ समजलीच नाही, म्हणून तू धर्ममहंतांच्या हाती लागला…

बा कबीरा…,

तुला समजून घेण्यात आम्ही मागे पडलो… म्हणून त्यांचे फावले…परंतु पुढील काळात जे जे माणसाचे आहे, ते ते असू दे….जे जे देवाचे, जे जे दैवाचे आहे, ते ते नसू दे, ही नवी प्रार्थना तुला चाहणारे आम्ही करणार आहोत….कबीरा, तू आम्हाला हवा आहेस….कारण तू आमचा कुळपुरुष आहेस…”


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]