साथी नरेंद्र लांजेवार… खंदा कार्यकर्ता

राजीव देशपांडे -

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक, साथी नरेंद्र लांजेवार यांचे अकाली झालेले निधन त्यांच्या कुटुंबीयांसाठी, मित्रमंडळींसाठी जितके वेदनादायक, दुःखदायक आहे, तितकेच दु:खदायक ते ज्या संस्था-चळवळींसाठी काम करत होते, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. ते ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते; पण ते तेवढेच नव्हते, तर समाजात वाचनसंस्कृती रुजावी, लहान मुलांच्यात वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी गावागावांत बालवाचनालये स्थापन व्हावीत, म्हणून चळवळ करणारा ‘कार्यकर्ता’ होते. ते लेखक-साहित्यिक तर होतेच; साहित्य संस्थांचेही पदाधिकारी होते. पण तेवढेच नव्हते. बुलडाण्यात साहित्य चळवळ वाढावी, खेड्यापाड्यात नवनवीन लेखक निर्माण व्हावेत, वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविणारे ‘कार्यकता’ होते. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक होते, लेखक होते. पण तेवढेच नव्हते, तर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे खंदे ‘कार्यकर्ते’ होते. केवळ दोन महिन्यांत त्यांनी वार्तापत्रांचे 200 वर्गणीदार केले होते. हे कार्यकर्तेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य कंगोरा होता आणि त्यामुळेच त्यांचा साहित्यिक चळवळीपासून शेतकरी चळवळींपर्यंत विविध चळवळींशी, व्यक्तींशी संपर्क होता, मैत्री होती. देशभरात कोण काय लिहितो आहे, नवीन काय करतो आहे, यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वार्तापत्रात लिहिण्यासाठी ते नवीन लेखक सुचवायचे, त्यांच्याकडून लिहून घ्यायचे, स्वत: लिहायचे. ‘अनिवा’च्या वार्षिक अंकात लिहिलेला ‘उपेक्षित सत्यशोधक : अजात संत गणपती महाराज’ हा लेख, सत्यपाल महाराजांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत, दरमहा ते विविध व्यक्तिमत्त्वांबरोबर पत्ररुपाने साधत असलेला संवाद… हे सर्वच लिखाण वाचकांना, कार्यकर्त्यांना विचारप्रवृत्त करणारे होते. त्यांच्या अकाली जाण्याने वार्तापत्राने चांगला लेखक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खंदा कार्यकर्ता गमावला आहे. नरेंद्र लांजेवार यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहे.

8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने

देशातला कोरोनाबाधित रुग्णांचा आलेख उतरता होऊ लागला आहे, व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहेत, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. जनतेचे रोजगार, महागाई हे दैनंदिन प्रश्न बाजूला सारत धर्म-जातीच्या नावावर मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न जोरात चालू आहेत. त्यासाठी धर्मांतर, पलायन, ‘लव्ह जिहाद’, ‘कोरोना जिहाद’, ‘सीएए’, ‘एनआरसी’, ‘सुल्ली डील्स’, ‘बुल्ली बाई’नंतर आता ‘हिजाब’चा मुद्दा पेटविला गेला आहे. कर्नाटकात काही दिवसांपूर्वी ‘हिजाब’ घातलेल्या मुस्लिम मुलींना शाळेत प्रवेश नाकारला गेला आणि हिंदू-मुस्लिमांमधील दोन्ही धर्मांध शक्तींच्या टकरीत मुस्लिम मुलींच्या शिक्षणाला खीळ बसण्याची भीती निर्माण झाली. या वर्षी 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाला ही पार्श्वभूमी आहे.

भांडवलशाहीच्या उदयानंतर होणार्‍या शोषणाविरोधात स्त्रिया रस्त्यावर येऊन लढू लागल्या. या कामगार स्त्रियांना अभिवादन करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीतही स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व मांडणारी तेजस्वी परंपरा आहे. ‘धर्माने केलेल्या स्त्रीनिंदेची’ कडक शब्दांत हजेरी घेणार्‍या चार्वाकापासून सुरू झालेली ही अवैदिकाची परंपरा, कर्मकांडाचे स्तोम माजलेल्या काळात भक्तीचा अधिकार स्त्रियांना देणार्‍या संतचळवळीपासून ते थेट फुले, आगरकर, आंबेडकरापर्यंत आपल्याला दाखवता येते. या परंपरेच्या प्रभावानेच स्वातंत्र्य चळवळीद्वारे स्त्री-पुरुष स्मानतेचे मूल्य संविधानात समाविष्ट झाले. परंतु इतकी दीर्घ परंपरा स्त्रीमुक्तीच्या संघर्षाला असूनही आज भारतात आणि संपूर्ण जगात स्त्रियांच्या समान हक्काची लढाई संपलेली नाही. उलट स्त्रियांना महागाई, बेरोजगारी यांसारख्या रोजीरोटीच्या प्रश्नांबरोबरच कौटुंबिक हिंसा, अंधश्रद्धा, दहशतवाद, धर्मांधता, युद्धखोरी, वंशवाद, जातीयता यांसारख्या नव्या स्वरुपातील नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. या नवीन आव्हांनाना तोंड देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हाच संदेश घेऊन पुढे जात राहण्याचा निर्धार या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण केला पाहिजे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]