एक संवाद : सावित्रीमाय सोबत…

नरेंद्र लांजेवार - 9422180451

“माय सावित्री, तू जाऊन एकशेपंचवीस वर्षे होत आहेत… तू जर आमच्या महाराष्ट्रात जन्माला आली नसती तर माझी पणजी, आजी, आई, पत्नी, माझी लेक इतकी शिकू शकली नसती, हे वास्तव आहे. आमच्या हातामध्ये लेखणी दिलीस आणि खर्‍या अर्थाने तू विद्येची देवता झालीस…

बयो, तू वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शेठजी म्हणजे जोतिरावांसोबत विवाहबद्ध झाली…शेटजी तवा तेरा वर्षांचे..लग्नात माय तू निरक्षर…तवा कुठं कोण्या बाई माणसाला लिवणं येत व्हतं? पण माय तू जोतीच्या संगतीने लिव्हणं शिकली.. आणि स्त्री शिक्षणाची अग्रदूत बनली.

दोनशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात अस्पृश्यांचे हाल बघून जोतिबांचं काळीज पिळवटून निघत असे. जोतिबांना सुद्धा मित्रपरिवारामध्ये स्पृश्य-अस्पृश्याचा सामना करावा लागला. तत्कालीन अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांड याविरुद्ध जोतिबांचे मन पेटून उठले. जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीमाय तू केले व खर्‍या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत तू बनली… तुझ्या एका ज्योतीने हजारो ज्योती पिढ्यान्पिढ्यांचा अंधार मिटवण्यासाठी प्रज्वलित झाल्या.

माय सावित्री, स्त्रियांच्या आणि बहुजन समाजाच्या अधोगतीला अविद्या हेच कारण आहे, हे तुम्ही फुले दांपत्याने ओळखलं आणि समाज सुशिक्षित झाला पाहिजे, महिला या शिकल्या पाहिजेत, यासाठी एक जानेवारी 1848 ला तुम्ही पुण्याच्या कसबा पेठेत, भिडेंच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली… पहिल्या दिवशी फक्त सहा मुली शाळेमध्ये आल्या. त्यामध्ये अन्नपूर्णा जोशी, सुमती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जानी कर्डिले अशा सहा मुली. सर्वांचे वय चार ते सहा वर्षे. या सहा मुलींमध्ये चार ब्राह्मण, एक धनगर आणि एक मराठा समाजाची मुलगी होती. सावित्रीमाय मुलींच्या जाती महत्त्वाच्या नाहीत गं; पण मुली शिकायला लागल्यात हे महत्त्वाचं होतं.

जोतिबांच्या विवेकी विचारांच्या सहवासामध्ये सावित्रीमाय तू प्रखर विवेकी झालीस. स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांच्या सामाजिक, धार्मिक गुलामगिरीच्या विरोधात तू प्रत्यक्ष कार्य आणि कृती करू लागलीस. तुम्ही फुले दाम्पत्यानं 1848 ते 1852 या चार वर्षांत ठिकठिकाणी मुलींच्या 18 शाळा सुरू केल्या. स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी स्वतःच्या घरात बालगृह सुरू केले. स्वतः पुढाकार घेऊन विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिक बंधूंचा तुम्ही संप घडवून आणला. विधवांना सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांचे पुनर्विवाह सुरू केले. घरीच विधवांसाठी बाळंतपणगृह सुरू केले. त्यात 35 पेक्षा जास्त ब्राह्मण विधवा स्त्रियांची बाळंतपणे स्वतः केली. स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केला. एका विधवेच्या अनाथ मुलाला दत्तक घेऊन त्याचे संगोपन केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. घरी छात्रालय सुरू केले. स्वतःच्या दत्तक मुलाचा सत्यशोधक पद्धतीने आंतरजातीय विवाह लावून दिला…सर्वप्रथम शिवजयंती साजरी केली.. दुष्काळात अन्नछत्र सुरू केले, नेटिव्ह फिमेल स्कूल, पुणे आणि दि सोसायटी फॉर प्रमोटिंग दि एज्युकेशन ऑफ महारस्, मांग्ज ऑण्ड एक्सेट्राज या शिक्षण संस्था उभारल्यात.पुण्यात पहिले नेटिव्ह सार्वजनिक वाचनालय सुरू केले. स्वधर्माची चिकित्सा केली… अंधश्रद्धेला मूठमाती दिली. नवस, व्रत-वैकल्ये यामागे चुकीच्या चाली-रीती बहुजनांवर लादल्या गेल्यात, हे समजून देण्यासाठी लेखन केले… वैदिक धर्ममार्तंडांचा तीव्र विरोध असतानाही महिलांचे जीवनमान आणि शिक्षण सुधारण्यासाठी नेहमीच सावित्रीमाय तू अग्रस्थानी राहिलीस. तत्कालीन समाजाने तुम्हा उभयतांच्या आयुष्यात काटेच पेरण्याचे काम केले, तरीही तुम्ही समाजाला फुलेच दिली…

“शिक्षण ही आमची धार्मिक बाब आहे,” असे सांगून “तुम्ही आमच्या धर्मात हस्तक्षेप करता, ‘म्हणून तुला’ धर्मबुडवी,” संबोधून त्यांनी शेण-माती, चिखल सुद्धा तुझ्यावर टाकले… तरी तू आपल्या ध्येयापासून डगमगली नाहीस.. कुठून येत होतं गं हे सारं बळ?

तात्यांच्या म्हणजे जोतिबांच्या निधनानंतर टिटवं धरणारी जगातली पहिली स्त्री तू ठरली. सर्व धर्मग्रंथांना हादरा देत, जोतिबांच्या म्हणजे शेटजींच्या पार्थिवाला अग्नी देणारी पहिली क्रांतिकारक महिला तू ठरली. माय सावित्री, तुझ्यासारखं धाडस आजच्या स्त्रियांनाही नाही गं जमत…!

मायसावित्री, तू स्वतःच्या मुलाचा दीडशे वर्षांपूर्वी पहिला आंतरजातीय विवाह लावला….अजूनही जात, धर्म आणि गोत्र, कुंडली, मान-पान, हुंडा पाहूनच विवाह जुळत आहेत गं… ज्या भिडेेंच्या वाड्यात तू मुलींची पहिली शाळा काढली, त्याच भिडेवाड्यासमोर शिकलेल्या वीस-वीस, पंचवीस-पंचवीस हजार स्त्रिया अथर्वशीर्ष सामूहिक पठण करताना बघून वाईट वाटतं गं… तू बायकांना आत्मभान जागृत करण्यासाठी शिक्षण दिले की पोथ्या-पुराणे वाचण्यासाठी? तुझ्या लाखो लेकी आजही धर्माच्या चुकीच्या चाली-रीती आणि कर्मकांडात गुंतून पडल्या आहेत.. हे बघून तुझी अधिक तीव्रतेने आठवण येते आणि मग लक्षात येते की लढाई अजूनही अपूर्णच आहे..

सावित्रीमाय, तुझा ‘काव्यफुले’ हा कवितासंग्रह तर अजरामर आहे; तसेच ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ नावाचा तुझा दुसरा कवितासंग्रहही उद्बोधक आहे. खरं तर दोनशे पृष्ठं भरतील असं ‘सावित्रीबाई फुले ः समग्र वाङ्मय’ आज उपलब्ध आहे.

सध्या कोरोनाचा काळ आहे. अनेकांचा कोरोना योध्दा म्हणून सत्कार होत आहे; परंतु 1887 ला पुण्यामध्ये जी प्लेगची साथ आली होती, त्यामध्ये तू प्लेग हा संसर्गजन्य आजार आहे, हे माहीत असूनही हजारो रुग्णांची सेवा-शुश्रुषा करीत होतीस. मुंढवा गावाच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या लहान मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच माय, तू तिकडं धावत गेली आणि ‘त्या’ लहान मुलाला पोटच्या पोरासारखं पाठीवर घेऊन धावत-पळत दवाखान्यात पोचलीस, त्यातच तुला प्लेगची बाधा झाली….आणि 10 मार्च 1897 रोजी रात्री नऊ वाजता तुझी प्राणज्योत मावळली…

माय, पाठीवर दत्तकपुत्राला घेऊन लढणार्‍या लक्ष्मीबाईच्या वीरगाथा सांगणार्‍यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या ‘शौर्यमाते’ची मात्र उपेक्षाच केली….माय, तू जर विदेशात जन्माला आली असती तर तुझ्या या शिक्षणविषयक, सामाजिक जागृतीविषयक व प्लेगच्या साथीमध्ये ज्या निर्भीडपणे कार्य केलं, त्याबद्दल तुला ‘नोबेल’ निश्चितच मिळालं असतं.

भारतासारख्या जातीय समीकरणांच्या देशात तुला मरणोत्तर ‘भारतरत्न’ सुद्धा मिळू नये, ही केवढी मोठी शोकांतिका आहे..! ज्या भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली, त्या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही मागणीसुद्धा अजूनही अपूर्ण आहे.

माय, तुझ्या कार्यकर्तृत्वाला वंदन करण्यासाठी आम्ही पुणे विद्यापीठाला तुझं नाव दिलं: पण तुझा स्वतंत्र स्त्रीवादी विचार मुला-मुलींमध्ये रुजवण्यापेक्षा आम्ही फलज्योतिष शिकविण्यातच धन्यता मानू लागलोय… तुझी विद्यार्थिनी मुक्ता साळवे, तुझी मैत्रीण ताराबाई शिंदे, फातीमा शेख यांनी दीडशे वर्षांपूर्वी जे प्रश्न व्यवस्थेला विचारले होते, ते अजूनही निरुत्तर आहेत गं…

मायसावित्री, तुला अपेक्षित असणारी परिपूर्ण स्त्री अजून घडायची आहे गं…अजूनही इथं लेकींना गर्भातच मारले जाते… तुझा असीम त्याग आणि समर्पणामुळे बायका कमावत्या झाल्यात… अगदी पायलटपासून देशाच्या राष्ट्रपतिपदापर्यंत विराजमान झाल्यात…पण अनेकांचे ‘एटीएम’ अजूनही नवऱेच वापरत आहेत गं…सामाजिक, राजकीय समतेसह धार्मिक, लैंगिक आणि आर्थिक स्वातंत्र्य महिलांना केव्हा मिळेल, हाच प्रश्न मला छळतोय गं..

मायसावित्री… तुझ्याशी संवाद साधायला काही निमित्त लागत नाही… शाळेत जाणार्‍या माझ्या मुलीकडं बघितलं की मला तुझीच पदोपदी आठवण येते. तुझ्यामुळेच ती आज मुक्त आकाशात रंग भरू पाहत आहे… याचे सर्व श्रेय निर्विवादपणे तुलाच आहे..

तुझ्या अनेक लेकरांपैकी एक लेकरू…”

-नरेंद्र लांजेवार, बुलडाणा

9422180451


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]