गौरव आळणे -
‘महाराष्ट्र अंनिस’च्या उपक्रमामुळे मिळाली प्रेरणा
नागपूर येथील रामटेक तालुक्यातील खरपडा (सावंगी) गावच्या संजय व सविता यांनी पारंपरिक विवाहात जात, पोटजात, कुळ, गोत्र, हुंडा, आहेर, मानपान, दागदागिने, कन्यादान, जेवणावळी, बँड, पत्रिका, अक्षता, लाइटिंग, वरात… आदी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या गोष्टी बाजूला सारून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक उपक्रम बघून विवेकी सहजीवनाचा मार्ग निवडला आणि नुकताच आंतरजातीय विवाह करून दोन धर्मांपुढे नव्हे, तर समग्र भारतीय समाजांपुढे एक नवा आदर्श घडविला.
सध्या संजय नैताम हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रामटेक शाखेचे जातिअंत संकल्प विभागाचे कार्यवाह आहेत, तर सविता डोंगरे या विविध उपक्रम विभागाच्या कार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळतात. हा विवाह अनावश्यक खर्च टाळून विवेकी जोडीदाराची निवड कशी करावी, हाच संदेश समाजातील युवा-युवतींना देणारा आहे.
या विवाहाला यशस्वी करण्याकरिता मुलगी सविता डोंगरेतर्फे फॉरेस्ट राऊंड ऑफिसर बालचंदजी नाईक, तर मुलगा संजय नैतामतर्फे शांता कुमरे या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या आंतरधर्मीय विवाहानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूरच्या शाखेने क्रांतिसूर्य जोतिबा फुलेंचा ‘संघर्ष’ ही लघुनाटिका प्रस्तुत केली. यावेळी नवविवाहित जीवनसाथींचा भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन सन्मान केला. याप्रसंगी जिल्हा प्रधान सचिव रामभाऊ डोंगरे, ममता चौधरी, राखी घुटके, अजय रहाटे, आशुतोष टेंभुर्णे, रेवत जावदे, माधुरी मेश्राम, निकिता बोंदाडे, श्वेता पाटील, अंशुमन गजभिये, चंदा मोटघरे, जान्हवी मेश्राम, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
– गौरव आळणे, नागपूर